ती नेहमीसारखी इतर आदिवासी स्त्रियांबरोबर रानात काम करत होती. इतक्यात तिच्या सलिहा गावचा एक तरुण धावत आला, ओरडला, “त्यांनी गावावर हल्ला केलाय. तुझ्या वडलांना मारलंय, त्यांनी आपली घरं पेटवून दिलीयेत.”
‘ते’ म्हणजे शस्त्रधारी इंग्रज पोलिस. इंग्रज राजवटीला जुमानत नाही म्हणून अखख्या सलिहा गावावर त्यांनी हल्ला केला होता. इतरही काही गावं बेचिराख केली होती, जाळपोळ करून धान्य लुटून नेलं होतं. बंडखोरांना त्यांची पायरी दाखवायसाठीचा हा सगळा खेळ होता.
हे ऐकताच देमती देई शबर, शबर जमातीची एक आदिवासी स्त्री इतर ४० तरुण स्त्रियांना घेऊन सलिहाच्या दिशेने धावली. “माझे वडील जमिनीवर पडले होते, त्यांच्या पायाला गोळी लागली होती, रक्त भळाभळा वाहत होतं”, म्हातारी देमती देई सांगते.
एरवी फारसं नसणारं तिचं भान या आठवणीनं लख्ख जागं होतं. “मला राग अनावर झाला आणि मी त्या बंदुकधारी पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्या काळी रानात किंवा जंगलात जाताना आमच्याकडे सगळ्यांकडे लाठ्या असायच्या. जंगलात कोणताही प्राणी आडवा आला तर हातात काही नको?”
तिने केलेला हल्ला पाहिला आणि बाकीच्या ४० जणींनी आपापल्या हातातल्या काठ्या इतर पोलिसांवर उगारल्या. “त्या नालायकाला हाकलून लावलं मी. असा मारला, असा मारला, पळणं सोडून त्याला दुसरं काही सुचलंच नाही. ढुंगणाला पाय लावून पळाला” संतापाची किनार होती तरी खुदखुदत ती आठवण देमती देई सांगते. अख्ख्या गावभर त्याला मारत मारत पळवलं तिनं. नंतर वडलांना तिकडून दुसरीकडे नेलं. पुढे दुसऱ्या एका उठावाच्या वेळी मात्र त्यांना अटक झाली. त्या भागात इंग्रजांविरोधात उठाव करण्यात कार्तिक सबर अग्रणी होते.
देमती दई शबर यांना सगळे नौपाडा जिल्ह्यातल्या त्यांच्या जन्मगावाच्या नावाने ‘सलिहान’ म्हणून ओळखतात. एका शस्त्रधारी इंग्रज अधिकाऱ्याला लाठीने उत्तर देणारी ओडिशाची एक नावाजलेली स्वातंत्र्य सैनिक. तिच्यात एक बेडरपणा आहे, आजही. तिला मात्र आपण फार मोठं काही केलं आहे असं अजिबात वाटत नाही आणि त्याचा ती फारसा विचारही करत बसत नाही. “त्यांनी आमची घरं उद्ध्वस्त केली, पिकं मोडली. आणि त्यांनी माझ्या वडलांवर हल्ला केला. मी त्यांच्याशी लढले नसते की काय!”
तो काळ होता १९३० चा. तिचं वय होतं १६. या क्रांतिकारी प्रदेशातल्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देणाऱ्या सभांवर इंग्रज बडगा उगारत होते. इंग्रज अधिकारी आणि त्यांच्या पोलिसांवर देमतीने केलेला हल्ला पुढे ‘सलिहा उठाव आणि गोळीबार’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
मी तिला भेटलो तेव्हा ती नव्वदीला टेकली होती. अजूनही तिचा चेहरा सुंदर आणि करारी आहे. शरीर सुकलंय, हळूहळू दिसोनासं व्हायला लागलंय. पण तरूणपणी ती नक्कीच उंचीपुरी, ताठ आणि सुंदर असणार. तिचे लांबसडक हात... आजही त्यात लपलेली ताकद जाणवते. त्या हाताने घातलेला लाठीचा घाव चांगलाच जोरदार असणार. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं कंबरडंच मोडलं असणार. तो पळाला म्हणून वाचला म्हणायला पाहिजे.
मात्र तिच्या या असामान्य शौर्यासाठी तिला काहीही मिळालेलं नाही. आणि तिच्या गावापलिकडे तर ते आता कुणाच्या ध्यानातही नाही. मी जेव्हा तिला भेटलो तेव्हा सलिहान बरगर जिल्ह्यात हालाखीत जगत होती. तिच्या शौर्याची दखल घेणारं एक रंगीबेरंगी सरकारी प्रमाणपत्र हीच काय ती तिची संपत्ती. आणि त्यातही तिच्या प्रतिहल्ल्याचा उल्लेख नव्हताच. तिच्यापेक्षा तिच्या वडलांचीच स्तुती जास्त. केंद्र सरकार किंवा ओडिशा सरकारकडून तिला कसलंही पेन्शन किंवा भत्ता मिळत नव्हता.
इतर काहीही आठवत नसलं तरी एक आठवण तिच्या मनावर स्वच्छ कोरलेली आहे. तिच्या वडलांवर, कार्तिक सबर यांच्यावर झालेला गोळीबार. मी त्या घटनेचा उल्लेख केला आणि जणू काही तो प्रसंग आता तिच्या डोळ्यासमोर घडतोय अशा त्वेषाने ती सगळ्या गोष्टी मला सांगू लागली. तिच्या बोलण्यातला संताप अजूनही शमला नव्हता. त्या घटनेने इतरही काही आठवणी जाग्या झाल्या.
“माझी मोठी बहीण भान देइ आणि गंगा तालेन आणि सखा तोरेन (तिच्या जमातीच्या इतर दोन स्त्रिया) – त्यांनाही अटक झाली. त्या गेल्या आता सगळ्या. बाबा दोन वर्षं रायपूरच्या तुरुंगात होते.”
आज तिच्या भागात इंग्रजांना साथ देणाऱ्या जमिदारांची चलती आहे. सलिहान आणि तिच्यासारख्या अनेकांनी मिळवलेल्या स्वातंत्र्याचा सर्वात जास्त फायदा या धनदांडग्यांना झालाय. अभाव आणि वंचनाच्या महासागरांमधली ही नजरेत खुपणारी संपत्तीची बेटं.
आमच्याकडे पाहून ती काय छान हसली, एकदा नाही अनेकदा. आम्ही तिचं ते हास्य पाहिलं. पण ती आता थकलीये. आपल्याच तिन्ही मुलांची नावं – ब्रिष्नू भोइ, अंकुर भोइ आणि अकुरा भोई – आठवायला कष्ट पडतायत. आम्ही निघालो आणि हात हलवून तिने आमचा निरोप घेतला. देमती देइ शबर ‘सलिहान’च्या चेहऱ्यावरचं हसू आताही ढळलं नाहीये.
२००२ मध्ये आम्ही सलिहानला भेटलो . त्यानंतर वर्षभरातच तिचं निधन झालं .
देमती शबर सलिहानसाठी
सलिहान, तुझी कहाणी ते कधीच सांगणार नाहीत.
आणि पेज थ्रीवरही मला तू दिसणार
नाहीस.
ती जागा आहे रंगरंगोटी केलेल्या
कोण-जाणे-कुणाची,
काटछाट करून ‘सुंदर’ होणाऱ्यांची,
आणि इतर पानं राखीव
उद्योगधुरिणांसाठी.
प्राइम टाइमही तुझ्यासाठी नाही
सलिहान.
तो आहे खुनी, हल्लेखोरांचा
जाळपोळ करणाऱ्या, दंगे माजवणाऱ्या
आणि तरीही नंतर एकोप्याचे गोडवे
गाणाऱ्यांचा.
सलिहान, इंग्रजांनी तुझं गाव पेटवलं
हातात बंदुका घेऊन ते आले
आगगाड्यांमधून
दहशत आणि वेदना घेऊन
सगळंच शहाणपण जेव्हा मातीमोल झालं
होतं
होतं नव्हतं ते सगळं त्यांनी पेटवून
दिलं होतं
पैसा, रोकड - सगळं त्यांनी लुटलं होतं, सलिहान.
गोऱ्या क्रूर इंग्रजांनी हल्ला केला
पण तू त्यांना जबरदस्त उत्तर दिलंस
सलिहान
तू त्याच्या अंगावर धावून गेलीस
त्याच्या बंदुकीची तमा न बाळगता
त्याच्यावर चालून गेलीस.
आजही तुझ्या लढ्याची कथा सलिहामध्ये
सांगितली जाते,
तू जिंकलीस सलिहाची लढाई.
तुझे आप्त जखमी होऊन पडले होते
वडलांच्या पायात गोळी होती, ते घायाळ होते
पण तू न खचता, तशीच भिडलीस
त्या अधिकाऱ्यावर लाठी घेऊन बरसलीस
त्याला जायबंदी केलंस तू
जखमी होऊन तो पळाला
एका १६ वर्षाच्या मुलीच्या
तडाख्यातून वाचला, लपून बसला
इंग्रज राजवटीच्या विरोधात उभ्या
तुम्ही चाळीस आदिवासी मुली
होतात तुम्ही कणखर आणि सुंदर.
आता तू थकलीयेस, पिकलीयेस
शरीर साथ देत नसलं तरी
तुझ्या डोळ्यात आजही ती चमक आहे जी
खरं तर तू आहेस
इंग्रजांचे पाय चाटणारे
आज तुझ्या गरीब गावावर सत्ता
गाजवतायत
कितीही बांधू देत मंदिरं, पुण्यस्थळं
आपलं स्वातंत्र्य विकण्याचं त्यांनी
केलेलं पाप
नाही धुतलं जाणार, सलिहान
उपाशी आणि भुकेली तू
तुझं नावही इतिहासाच्या पानात विरून
जाईल
रायपूर जेलच्या दस्तावेजासारखं
तुझ्यासारखं काळीज असतं जर माझं
तर किती आणि कसं यश पाहिलं असतं मी
आणि लढाही फक्त स्वतःपुरता नाही
सोबतचे सगळेच मुक्त व्हावे म्हणून
लढलीस तू सलिहान
आमच्या मुलांना तू कळली पाहिजेस
नक्की.
पण प्रसिद्धीचा झोत तुझ्यावर यावा
तरी कसा?
कोणत्याच रॅम्पवर तू झळकली नाहीस
ना कोणता मुकुट चढवलास शिरावर
पेप्सी आणि कोकच्या जाहिरातीतही कुठे
होतीस तू?
माझ्याशी मात्र बोल सलिहान
वेळ काळाची पर्वा न करता, तुला हवं तितकं
कारण जेव्हा मी जाईन तुला भेटून
मला लिहायचंय तुझ्याबद्दल,
तुझं बेडर काळीज आणि मन उलगडून
दाखवायचंय मला
माझी लेखणी भारताच्या ओंगळ बीभत्स
उद्येगपतींसाठी झिजणार नाही कधीच.
छायाचित्रे - पी. साईनाथ
या लेखमालेतील इतर लेखः
शेरपूरः कहाणी त्यागाची आणि विस्मृतीत गेलेल्या गावाची
गोदावरीः पोलिस अजूनही हल्ला होण्याची वाट पाहताहेत
सोनाखानः वीर नारायण सिंग दोनदा मेला