“आसामे चारो धरे,” सांतो तांती गातो. झुमुर प्रकारचं हे गाणं या पंचवीस वर्षीय युवकाने स्वतः लिहिलंय आणि त्याला संगीतही दिलंय. आसामच्या डोंगरदऱ्या हेच आपलं घर असल्याचं तो गातो. आसामच्या जोरहाट जिल्ह्यातल्या सायकोटा टी इस्टेटच्या धेकियाजुली भागात तांती राहतो. सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करतो. तो आपली गाणी नियमितपणे समाजमाध्यमांवर प्रसारित करत असतो.
झुमुर इथला लोकप्रिय संगीतप्रकार आहे. तांतीच्या गाण्यात ढोलाचा ठेका आणि बासरीची धून असं सगळं काही येतं. ही गाणी सादरी भाषेत गायली जातात. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातून आसामच्या चहाच्या मळ्यांमध्ये कामाला आलेले अनेक आदिवासी समूह ही गाणी गातात.
इथले आदिवासी समूह एकमेकांसोबत आणि स्थानिकांसोबत मिसळून गेले आहेत. त्यांना ‘टी ट्राईब्स’ असं म्हटलं जातं आणि आसाममध्ये त्यांची संख्या किमान साठ लाख इतकी आहे. त्यांच्या मूळ राज्यात त्यांची नोंद अनुसूचित जमातीत करण्यात येत असली तरी इथे मात्र त्यांना तो दर्जा मिळालेला नाही. एकूण १२ लाख आदिवासी राज्यातल्या सुमारे एक हजार मळ्यांमध्ये काम करतात.
या चित्रफितीत नृत्य करणारे कलाकार आहेतः सुनीता कर्माकार, गीता कर्माकार, रुपाली तांती, लक्खी कर्माकार, निकिता तांती, प्रतिमा तांती आणि आरोती नायक.
सांतो तांतीच्या आयुष्याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल, त्याचं गाणं ऐकायचं असेल तर नक्की बघा आणि वाचा, सांतो तांतीची गाणी – दुःखाची, कष्टाची, उमेदीची