“छोटीशी जरी चूक झाली, सत्तूर नाही, कोयता होणार!” राजेश चाफेकर त्यांच्या कामातले बारकावे अगदी चपखलपणे सांगतात. लोहारकाम म्हणजे त्यांचा हातखंडा. वसई तालुक्याच्या आकटणमधल्या त्यांच्या या दुकानात आजवर १०,००० हून जास्त लोखंडी अवजारं-हत्यारं त्यांनी घडवली आहेत.
बावन्न वर्षीय राजेश चाफेकर आपले वडील दिवंगत दत्तात्रेय चाफेकर यांच्याकडून ही कला शिकले. पांचाळ लोहारांची त्यांची ही सातवी पिढी. महाराष्ट्रभरातले शेतीकाम, मच्छीमारी करणारे अनेक जण आजही त्यांच्याकडून वस्तू बनवून घेतायत. “लोक म्हणायचे, ‘आकटण से ही हत्यार ले के आओ’,” राजेश दादा सांगतात. शेतीत वापरली जाणारी पंचवीस प्रकारची लोखंडी अवजारं त्यांना बनवता येतात.
गिऱ्हाईक इथून ९० किलोमीटरवर असलेल्या नवी मुंबईच्या उरणहून यायचे. बोटी बनवण्यासाठी लागणाऱ्या तासणीची ठोक ऑर्डर देऊन जायचे. पूर्वी तर “गिऱ्हाईक यायचे, आमच्या घरी चार दिवस मुक्काम करायचे. आम्ही नवीन अवजार कसं तयार करतो ते अगदी सुरुवातीपासून पहायचे,” राजेश दादा सांगतात.
आकटणमधले बोळ आणि आळ्या जातीवर आधारित व्यवसायानुसार वसलेल्याः सोनार, लोहार, सुतार, चांभार आणि कुंभार आळी. या गावातल्या सगळ्यांचंच सांगणं आहे की ते विश्वकर्म्याचे उपासक आहेत. सगळ्या कारागीर जात-समुदायांची ही देवता आहे. पांचाळ लोहार २००८ सालापासून भटक्या जमाती – ब प्रवर्गात समाविष्ट असून या आधी त्यांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये केला गेला होता.
वयाची १९ वर्षं पूर्ण झाली त्या काळात राजेश दादांना आपल्या घराण्याचा हा व्यवसाय पुढे नेण्याची कसलीही इच्छा नव्हती. एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात ते स्टोअरकीपर म्हणून काम करत होते. महिन्याला १,२०० रुपये पगार मिळत असे. पण एकत्र कुटुंबामध्ये काही कुरबुरी झाल्या आणि त्यांच्या वडलांच्या हातचं कामच गेलं. तेव्हा दादांना आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात उडी घ्यावीच लागली.
त्यांचा रोजचा दिवस सकाळी ७ वाजता सुरू होतो. त्यानंतर सलग १२ तास त्यांचं काम सुरू असतं. मध्ये मध्ये चहा प्यायला जरा सुटी घ्यायची तेवढीच. एका दिवसभरात ते तीन अवजारं तरी तयार करू शकतात. आणि त्यांचं मुख्य गिऱ्हाईक म्हणजे वसईच्या भुईगावजवळच्या बेनापट्टीचे आणि गोराई गावातले आदिवासी.
त्यांच्याकडे बनणारी सगळ्यात लोकप्रिय हत्यारं-अवजारं म्हणजे कोयता, मोरली, औत, तासणी, काती, चिमटे आणि सत्तूर.
राजेश त्यांच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाइकाच्या मागणीप्रमाणे काही हत्यारं बनवून देतात कारण “प्रत्येक गावाची स्वतःची काही गरज असते आणि त्याप्रमाणे त्यांना हत्यार बनवून हवं असतं. ताडी गोळा करणाऱ्यांना झाडं चढून जाताना हातात कोयता पक्का धरावा लागतो त्यामुळे त्याची मूठ जास्त मजबूत लागते.” केळी आणि नारळाच्या वाड्यावाले त्यांच्याकडची हत्यारं धार लावण्यासाठी, दुरुस्त करून घेण्यासाठी वर्षभर अधून मधून राजेश दादांकडे आणत असतात.
“आणि आमच्या कामाच्या बदल्यात आम्हाला काय काय भेट मिळत असते,” ते म्हणतात आणि बोलता बोलता कोयत्याला धार केल्याबद्दल गावातल्याच एकाने आणून दिलेले वाडीतले दोन ओले नारळ ते आम्हाला दाखवतात. “काती दुरुस्त करून दिली की आमचे कोळी बांधव आम्हाला त्या दिवशी घावलेली मासळी आणून देतात,” दादा सांगतात.
त्यांना पार पुण्याच्या वाघोलीतूनही ऑर्डर येतात. कारण त्या भागात आता फारसे लोहार उरले नाहीत. “त्यांचे सत्तूर असतात, बकरे कापायला.”
राजेश दादांना आपल्या कामात सतत नवनवीन काही तरी करून पहायची आवड आहे. सुकलेले नारळ झटक्यात फोडता यावेत यासाठी त्यांनी एक खास कोयता तयार केलाय. “मी काही तरी प्रयोग करत राहतो. पण तुम्हाला काही दाखवता यायचा नाही. माझं पेटंट आहे!” आपल्या या डिझाइनबद्दल ते मजेत म्हणतात. आणि ते खरंच आम्हाला फोटो काढू देत नाहीत.
त्यांच्याकडची सगळ्यात जास्त मागणी असणारी वस्तू म्हणजे मोरली. स्वयंपाकाच्या ओट्यावर पक्की बसवता येईल अशी ही सुबक मोरली भाजी चिरण्यासाठी वापरली जाते. ज्यांना जमिनीवर बसून पाटावरची विळी वापरायला वयापरत्वे त्रास होतोय अशांसाठी ही फार सोयीची आहे.
“कधी कधी मी दिवसाला १०० रुपये कमवतो आणि कधी फक्त १० रुपये. कधी कधी अगदी ३,००० ते ५,००० चा सुद्धा धंदा होतो. पण पुढचा दिवस रिकामा. काही सांगू शकत नाही,” गेली ३२ वर्षं लोहारकाम करणारे राजेश दादा आपल्या कमाईबद्दल सांगतात. “गिऱ्हाईक आणि मरण कधी येईल काय सांगता येतं का?”
*****
दररोज, अगदी रविवारीसुद्धा सकाळी बरोबर ९ वाजता दादा आपली भट्टी पेटवतात.
आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते भट्टी गरम होण्याची वाट बघत बसले होते. तितक्यात गावातलाच एक जण त्यांच्याकडे एक बटाटा घेऊन आला. काहीच न बोलता दादांनी त्याच्याकडून तो बटाटा घेतला आणि भट्टीतल्या राखेत पुरला. “त्याला कोळशाच्या आरात भाजलेला बटाटा आवडतो. आता तासाभराने तो घेऊन जाणार.”
थोडा वेळ जातो आणि पहिलं गिऱ्हाईक येतं. चार कोयत्यांना धार करून हवी असते. दादा काम घेतात आणि जरासं थांबून विचारतात, “अर्जंट नाहीये ना?” गिऱ्हाईक म्हणतं, नाही. काही दिवसांत येऊन घेऊन जा, दादा सांगतात.
“क्या करू? बोलना पडता है. मेरे साथे कोई है नही ना...” ते आपली अडचण सांगतात.
दिवसभराची कामं यायला लागतात आणि त्यासाठी लागणारा सगळा कच्चा माल दादा गोळा करू लागतात. ही तयारी आधीच पूर्ण करणं फार गरजेचं आहे कारण एकदा का भट्टी तापली की सगळ्या गोष्टी हाताशी लागतात. एका भांड्यात सहा ते आठ किलो कोळसा काढतात आणि त्यातले लहान दगड बाजूला काढू लागतात. “लहान दगड असले की कोळसा जरा सावकाश जळतो.” भट्टी पेटवण्याआधी दगड आठवणीने काढून घ्यावे लागतात.
त्यानंतर दादा झटकन थोडा लाकडाचा भुस्सा कोळशावर टाकतात, जेणेकरून आग लवकर पेटावी. भट्टीतला विस्तव पेटता रहावा यासाठी भाता वापरतात. याला पूर्वी धामणी म्हणायचे. भात्याने हवा भरत राहिली की भट्टीतला विस्तव पेटता राहतो आणि हवेची दिशा पण ठरवता येते.
सगळी हत्यारं अवजड वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्प्रिंग मेटलच्या पाट्यापासून बनवली जातात. पाच-सात मिनिटं भट्टीत लाल गरम करून घेतलेला पाट्याचा तुकडा ऐरणीवर ठेवला जातो. त्यानंतर दोन क्षण चिमट्याने उलटा धरून त्याच्यावर एकदम वेगात घण घातले जातात. “लोखंड गरम असतानाच हे करावं लागतं नाही तर आकार बिघडून जातो,” दादा सांगतात. या भागात घणाचा उच्चार ‘घाण’ असा करतात.
दादा छोटा घण वापरत असले तरी त्यांचा मुलगा, ओम मात्र मोठा घण वापरतो. पुढचा एक तासभर हे दोघं बापलेक लोखंडाचा तुकडा तापवायचा आणि त्यावर घण घालायचे असं करत राहतात. तेव्हा कुठे त्यांना हवा तसा आकार मिळतो. “हत्यार आकारात आलं की मग लाकडी मूठ आणि पातं निसटू नये म्हणून मांदळ [स्टीलची बारीक रिंग] बसवली जाते.”
पुढचं काम म्हणजे पातं एकदम सपई करायचं. त्यासाठी ८० वर्षं जुनं जातं वापरलं जातं. हत्याराला धार करण्यासाठी जात्याचा दगड सगळ्यात चांगला. तयार हत्यारावर अगदी शेवटचं काम केलं जातं ते मोगरीने. ही त्यांना त्यांच्या वडलांनी दिली आहे.
कारखाना धुराने भरून गेलाय. पण त्यांना त्याचं काही फार वावगं वाटत नाहीये. “मला ही गरम हवा आवडते. मज्जा आता है मेरेको.” भट्टीशेजारी सतत बसणं त्रासदायक होऊ लागलं की ते पायावर अधूनमधून गार पाणी मारतात. तितकाच दिलासा.
गावातल्या एका यूट्यूबरने त्यांच्यावर एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल झाला. त्यानंतर त्यांना एनआरआय लोकांकडून कामाच्या ऑर्डर मिळू लागल्या. पण ही हत्यारं शस्त्र म्हणून गणली जात असल्याने त्यांना ती काही परदेशी पाठवता आली नाहीत. मग ऑस्ट्रेलियातले एक जण स्वतः इथे आले आणि त्यांच्याकडून सत्तूर घेऊन गेले.
राजेश दादांचं ठरलेलं गिऱ्हाईक आहे मात्र त्यांच्या हाताखाली फारसं कुणी नाही त्यामुळे त्यांना आलेल्या ऑर्डर वेळेत पूर्ण करणं अवघड व्हायला लागलंय. “मी काय गिऱ्हाइकाला ‘उद्या ये’ असं सांगू शकत नाही ना,” ते म्हणतात.
त्यांच्या वाड्यातली अनेक लोहार मंडळी चांगल्या पगारासाठी रेल्वे किंवा इतर छोट्या व्यवसायांमध्ये काम मिळेल म्हणून ठाणे किंवा मुंबईच्या जरा जवळ रहायला गेली. “आता वाडाच संपला तर काय करणार?” ते म्हणतात.
सुमारे ३० वर्षांपूर्वी त्यांच्या आळीत १०-१२ लोहारांच्या भट्ट्या पेटलेल्या असायच्या. पण “आता दोनच राहिले!” ते वगळता त्यांचा एक चुलत भाऊ तेवढा लोहारकाम करतोय.
दादांचा मुलगा, ओम, वय २० अभियांत्रिकीचं शिक्षण घेतो आहे. तरीही “शनिवार-रविवार मी त्याला मदतीला घेतो. हे काम आहे आमचं. त्यातली कला अशीच संपून चालणार नाही.”
आपण गेल्यानंतर आपल्यामागे सगळी हत्यारं, अवजारं, उपकरणं आपल्या पोराने जपून ठेवावीत अशी त्यांची इच्छा आहे. “माझ्याकडे आजही माझ्या बापाची, आज्याची हत्यारं आहेत. घण कसा घातला याच्यावरून एखादं हत्यार कुणी तयार केलंय ते ओळखू येतं. प्रत्येकाची घण घालायची पद्धत वेगवेगळी असायची.”
राजेशदादांच्या पत्नी सोनाली ताई शिक्षिका आहेत. आपल्या पतीने लोहारकामाची ही
परंपरा पुढे सुरू ठेवली आहे याचा त्यांना फार अभिमान आहे. “आज कसंय, सगळ्यांना
झटपट पैसा पाहिजे. भट्टीपाशी बसून घण कोणाला घालायचेत?” त्या विचारतात.
भट्टीसाठी बिगरस्वयंपाकाचा कोळसा लागतो आणि हा खिशाला मोठा भार झालाय. कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) ने २०२३ साली चांगल्या दर्जाच्या कोळशाच्या भावात ८ टक्क्यांनी वाढ केली. “मी हे काम सुरू केलं तेव्हा तो ३ रुपये किलो होता. आणि आज ५८ रुपये किलो झालाय,” दादा सांगतात.
रोज कोळशावर होणारा खर्च वसूल कसा करायचा हाच त्यांच्या समोरचा मोठा पेच आहे. ते एक कोयता ७५० रुपयांना विकतात. त्यासाठी २-३ किलो वजनाचं पातं लागतं. त्याला नगाला १२०-१४० रुपये खर्च येतो. या पात्याला आकार देण्यासाठी ६ किलो कोळसा लागतो. लाकडी मूठ बाभळीची असते. ठोक खरेदी केली तर नगाला १५ रुपये पडतात नाही तर एका नगासाठी ६० रुपये मोडावे लागतात. मांदळ मात्र ते गावातल्याच एका भंगारवाल्याकडून घेतात. तिच्यासाठी नगाला १-२ रुपये खर्च येतो.
“तुम्हीच गणित मांडा आणि मला सांगा, माझ्या हातात किती पैसा राहतो ते?”
पूर्वी कसं, सुतार आणि लोहार एकमेकांची कामं करत असत. दादा सांगतात, “पूर्वी आम्ही खैराचं लाकूड वापरत असू. बाभळीपेक्षा महाग असायचं. पण कसं होतं, जंगलात गेल्यावर सुतार लोक आमच्यासाठी लाकूड घेऊन यायची. आणि त्या बदल्यात आम्ही त्यांच्या बैलगाड्यांच्या चाकाची पाती आणि खुटली बनवायला मदत करायचो. एकमेकांना मदत असायची आमची.”
हे काम असंय की यात इजा, जखमा व्हायच्याच. बाजारात संरक्षक साहित्य मिळतं पण दादांच्या मते यातलं काहीच वापरता येत नाही. कारण भट्टीजवळ इतकी उष्णता असते की श्वास कोंडतो. सोनाली ताईंना एकच घोर असतो. भाजून घेऊ नये म्हणजे झालं. “हत्यारं तयार करत असताना त्यांना आतापर्यंत किती तरी वेळा कापलंय. एकदा तर पायाला पण कापून घेतलं होतं त्यांनी.”
अशाने थांबतील ते राजेश दादा कसले? “बाकड्यावर बसून काय मला काम मिळणारे काय? भट्टीपाशीच बसावं लागणार ना. कोयला जलाना है मेरेको.”
“चलता है घर.”