टेंपू मांझींच्या घरच्यांचं म्हणणं एकच आहे. कुठलाच गुन्हा केलेला नसताना त्यांना तुरुंगात टाकलंय.
जेहानाबाद न्यायालयात त्यांच्यावरच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना त्यांच्या घरात सापडलेल्या आणि पुरावा म्हणून दाखल केलेल्या वस्तू त्यांच्या घरातच सापडल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना देता आलेले नाहीत.
टेंपूंच्या पत्नी, ३५ वर्षीय गुणा देवी म्हणतात, “त्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यात आलंय.”
त्यांच्या म्हणण्याला बळकटी देणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पाच जणांच्या साक्षीने टेंपूंवर खटला दाखला झाला ते सगळे पोलिस होते. पोलिसांच्या पुराव्याची पुष्टी करणारा एकही बाहेरचा साक्षीदार नाही. टेंपूंवर बिहार दारूबंदी व उत्पादन (सुधारणा) कायदा, २०१६ खाली गुन्हा दाखल करण्यात आला.
“आमच्या घराच्या मागच्या शेतात दारू सापडली. ती जमीन कुणाची आहे ते आम्हाला काय माहित? त्यांना मिळालेल्या दारूशी आमचा काही एक संबंध नाही असं मी पोलिसांना सांगितलं सुद्धा,” गुणा देवी सांगतात. पण पोलिसांनी काहीही ऐकलं नाही. “तोरा घर के पीछे होऊ, ता तोरे ना होतऊ,” असं म्हणत पोलिसांनी त्यांचं सगळं म्हणणं त्यांनी धुडकावून लावलं.
२०१९ साली टेंपू मांझींना तुरुंगात टाकलं. त्यानंतर तीन वर्षांनी २५ मार्च २०२२ रोजी त्यांना घरी दारू गाळणे आणि विक्रीच्या गुन्ह्याखाली पाच वर्षं सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
टेंपू माझी, गुणा देवी आणि त्यांची चार मुलं जेहानाबादच्या केनारी या गावी राहतात. एका खोलीचं त्यांचं साधंसं घर आहे. ते मुसहर असून मुसहर टोलीवर राहतात. २० मार्च २०१९ रोजी धाड पडली तेव्हा टेंपू घरी नव्हते. ते खलासी (मदतनीस) म्हणून काम करतात, शेतमालकांसाठी शेतातला माल घरी नेण्याचं त्यांचं काम असतं. त्यासाठी ते सकाळी लवकरच घराबाहेर पडले होते.












