मीना मेहेर यांच्याकडे बिलकुल म्हणून वेळ नाही. त्या पहाटे ४ वाजता आपल्या गावच्या, सातपाटीच्या ठोक मासळी बाजारात पोचतात. बोटीच्या मालकांसाठी माशाचा लिलाव सुरू असतो. तिथून ९ वाजेपर्यंत घरी आलं की त्या अंगणात थर्मोकोलच्या खोक्यांमध्ये मासे साफ करून खारवून ठेवतात. एक-दोन आठवड्यानंतर ते बाजारात विकले जातील. संध्याकाळी त्या बस किंवा शेअर रिक्षा करून १२ किलोमीटरवर पालघरच्या बाजारात सुकट विकायला जातात. आणि काही माल उरलात तर त्या सातपाटीतच संध्याकाळच्या बाजारात विकून येतात.
पण लिलावाच्या बोटींची संख्या आता
कमी कमी व्हायला लागलीये. आणि त्यामुळे सुकवायला मासळी कमी पडायला लागलीये.
“मासळीच नाही, विकायचं तरी काय?” कोळी समुदायाच्या ५८ वर्षीय मीना विचारतात. हा
समुदाय महाराष्ट्रात इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट आहे. आणि म्हणूनच आता त्या
वेगवेगळ्या प्रकारची कामं करू लागल्या आहेत. पावसाळा संपला की त्या बोटीच्या
मालकांकडून किंवा सातपाटीतल्या ठोक व्यापऱ्यांकडून ताजी मासळी विकत घेतात आणि थोडी
फार कमाई होईल या आशेत ती विकतात. (त्यातून त्यांची किती कमाई होते त्याचे तपशील
मात्र त्यांनी आम्हाला सांगितले नाहीत.)
घरच्या कमाईत थोडी फार भर घालावी
यासाठी त्यांचे पती उल्हास मेहेर, वय ६३ हे देखील आता अधिकचं काम करू लागले आहेत.
ते ओएनजीसीच्या सर्वेक्षण बोटींवर सर्वेक्षक आणि नमुना संकलक म्हणून जातात. पूर्वी
ते मुंबईच्या मोठ्या मासेमारी बोटींवर वर्षांतले दोन महिने काम करायचे, आता ते ४-६
महिने काम करतात.
महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातलं
सातपाटी ‘गोल्डन बेल्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनारी पट्ट्यात येतं. हा पट्टा
माशांच्या प्रजननासाठी आणि इथल्या खास बोंबीलसाठी प्रसिद्ध आहे. पण आजकाल बोंबील
जास्त मिळत नाही. डहाणू-सातपाटीच्या पट्ट्यात १९७९ साली ४०,०६५ टन बोंबील मिळाला
होता. तो विक्रम मोडणं तर दूरच मासळी इतकी घटली आहे की २०१८ साली केवळ १६,५६७ टन
इतका बोंबील या पट्ट्यात मिळाला आहे.
यामागे अनेक कारणं आहत – औद्योगिक प्रदूषणात वाढ, ट्रॉलर्स आणि पर्स सिएन जाळ्यांद्वारे होणारी अनिर्बंध मासेमारी
“आपल्या महासागरात ट्रॉलर्सला प्रवेश
नाही, पण त्यांना कुणीही रोखत नाही,” मीना सांगतात. “मासेमारी हा आमच्या समाजाचा
धंदा होता. पण आजकाल कोणी पण बोट विकत घेऊ शकतो. या मोठ्या बोटींमुळे माशांची अंडी
आणि पिल्लं मरतात आणि मग आमच्यासाठी मासळीच शिल्लक राहत नाही.”
कसंय, मासळी आली की स्थानिक बोटमालक
लिलावासाठी मीना आणि इतरांना बोलावत आले आहेत. पण आजकाल खात्रीच देता येत नाही की
बोटी मासळी भरून येतील म्हणून. बोंबील, पांढरा पापलेट आणि मुशी, वाम किंवा इतर
लहान मोठे मासे घावतील की नाही याचीही काही खात्री नाही. त्यामुळे मीना आजकाल फक्त
दोन बोटींचा लिलाव करतात. दहा वर्षांपूर्वी हाच आकडा आठ इतका होता. इथल्या अनेक
बोट मालकांनी मासेमारी करणंच बंद केलंय.
“१९८० च्या दशकात सातपाटीत ३०-३५
बोटी मासेमारी करत होत्या. पण हा आकडा आता [२०१९ च्या मध्यावर] १२ वर आलाय,”
नरेंद्र पाटील सांगतात. ते राष्ट्रीय मत्स्यकामगार मंचाचे अध्यक्ष असून आणि
सातपाटी मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत.
सातपाटीच्या संपूर्ण मच्छीमार समाजावरच या घटत्या मासळीचा परिणाम होत आहे. ग्राम पंचायत आणि सहकारी संस्थांच्या अंदाजानुसार सध्या इथली लोकसंख्या ३५,००० इतकी आहे (जनगणना, २०११ नुसार १७,०३२). १९५० च्या सुमारास राज्यातली पहिली प्राथमिक मत्स्यव्यवसाय शाळा (नियमित अभ्यासक्रमासह) सातपाटीला सुरू करण्यात आली आणि २००२ मध्ये जिल्हा परिषदेस हस्तांतरित करण्यात आली. या संस्थेलाही आता अवकळा आली आहे. तसंच १९५४ साली उभारण्यात आलेलं, विशेष प्रशिक्षण देणारं मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रही आता बंद पडलं आहे. सध्या केवळ दोन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था सुरू आहेत आणि बोटमालक आणि मासे निर्यातदारांमध्ये मध्यस्थी करण्याचं काम करत आहेत. सोबतच कर्ज, डिझेलवर अनुदान आणि मच्छीमार आणि बोटमालकांसाठी इतर सेवा सुविधा पुरवण्याचं काम करत आहेत.
पण सातपाटीच्या कोळणी मात्र त्यांना
सरकारकडून किंवा सहकारी संस्थांकडून कसलीच मदत मिळाली नसल्याचं सांगतात. किरकोळ
दरात बर्फ आणि मासे साठवणीची जागा तेवढी त्यांना या संस्था देतात.
“सरकारने प्रत्येक कोळणीला आमच्या
धंद्यासाठी १०,००० रुपये तरी द्यायला पाहिजेत. मासळी विकत घेऊन विकण्याएवढे पैसे
आमच्यापाशी नाहीत,” ५० वर्षीय अनामिका पाटील म्हणतात. पूर्वी कसं इथल्या बहुतेक
बाया घरच्यांची धरून आणलेली मासळी विकायच्या, पण आता अनेकींना व्यापाऱ्यांकडून
मासे विकत घ्यावे लागतायत. आणि त्यासाठी लागणारी पत किंवा भांडवल, दोन्ही
त्यांच्यापाशी नाही.
काही जणींनी खाजगी सावकारांकडून
२०,०००-३०,००० कर्ज काढलंय. कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज काढण्याचा पर्यायच
त्यांच्याकडे नाही “कारण आम्हाला आमच्याकडे दागिने, घर किंवा जमीन तारण म्हणून
ठेवावी लागेल,” अनामिका म्हणतात. त्यांनी एका बोटमालकाकडून ५०,००० रुपयांचं कर्ज
काढलं आहे.
बाकी कोळणींना हा धंदाच सोडून दिलाय. काहींनी पूर्णपणे तर काहींनी सोबत दुसरं काम सुरू केलंय. “मासळी घटत चाललीये म्हटल्यावर बोंबील सुकवण्याचं काम करणाऱ्या कोळणींना काही तरी करून जुळवून घ्यावंच लागणार होतं. त्या आता पालघरच्या एमआयडीसीत कामाला जातात,” केतन पाटील सांगतात. ते सातपाटी मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत.
“सातपाटीत एवढा बोंबील घावायचा, काय
सांगायचं. आम्ही बाहेर उघड्यावर झोपायचो कारण घरभरून फक्त बोंबील असायचा. त्याची
आवक जसजशी कमी व्हायला लागली तसं आम्हाला सगळ्या गोष्टी भागवणं अवघड व्हायला
लागलं. मग आम्ही दुसरी कामं करायला लागलो,” स्मिता तारे म्हणतात. त्या गेली १५
वर्षं पालघरच्या एका औषधनिर्माण कंपनीत पॅकिंगचं काम करतात. आठवड्यातले सहा दिवस,
रोज १० तासांची पाळी असं काम केल्यानंतर त्यांना महिन्याला ८,००० रुपये पगार
मिळतो. त्यांचे पतीदेखील आता मासळी धरत नाहीत. ते पालघर आणि इतर
गावांमध्येलगीनसराईत किंवा सण समारंभाला बँडमध्ये ड्रम वाजवतात.
पालघर शहर इथून १५ किलोमीटरवर आहे.
आजकाल गावातल्या बसथांब्यावर कामावर निघालेल्या बायकांची रांग आपल्याला पहायला
मिळते.
मीना यांची सून, शुभांगी, वय ३२
देखील २०२० च्या फेब्रुवारी महिन्यात पालघर अप्लायन्सेस युनिटमध्ये कामाला जायला
लागली. तिथे कूलर, मिक्सर आणि इतर वस्तूंच्या पॅकिंगचं काम चालतं. रोजचे १०
तासांच्या पाळीचे २४० रुपये तर १२ तासांच्या पाळीचे ३२० रुपये मिळतात. दर आठवड्यात
शुक्रवारी सुट्टी असते. (मीना यांचा मुलगा प्रज्योत त्यांना माशांवर प्रक्रिया
करण्याच्या कामात मदत करतो आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेत काम करतो. पण सहकारी
संस्थांचीच अवस्था इतकी बिकट आहे की त्याची कायमस्वरुपी नोकरी जाण्याची भीती आहे.)
मीनासुद्धा सध्या दररोज २-३ तास एका
ताटलीत पांढरे मणी, सोनेरी रंगाची काडी, एक मोठी चाळणी, नेलकटर आणि चष्मा असा
जामानिमा करून बसतात. त्या काडीत मणी ओवून त्याचा गोल तयार करायचा हे त्यांचं काम.
पाव किलो मणी ओवून दिल्या की गावातलीच एक बाई त्यांना २००-२५० रुपये देते. पण हे
काम पूर्ण व्हायला आठवडा सुद्धा लागू शकतो. आणि यातलेच १०० रुपये खर्च करून त्या
नवा माल घेऊन येतात.
४३ वर्षीय भारती मेहेर यांच्या
कुटुंबाच्या मालकीची बोट आहे. मात्र २०१९ च्या सुमारास त्यांनी एका
सौंदर्यप्रसाधनं तयार करणाऱ्या कंपनीत कामाला जाण्याचा निर्णय घेतला कारण माशाच्या
धंद्यातून होणारी कमाई पुरी पडत नव्हती. त्या आधी, माशाचा लिलाव आणि विक्री करत
करत भारती आणि त्यांची सासू आणि मीनाताईसुद्धा कृत्रिम दागिने तयार करायच्या.
सातपाटीतले कित्येक जण आता वेगळे
व्यवसाय करतायत. पण त्यांच्याशी बोलताना गतकाळाच्या स्मृती सातत्याने जागवल्या
जातात. “आणखी काही वर्षांनी आम्हाला आमच्या पोरांना पापलेट किंवा बोंबील कसा असतो
ते बहुतेक चित्र काढून दाखवावं लागणार आहे – कारण हे मासे मिळेनासे होतील,”
बेस्टमधून चालक म्हणून निवृत्त झालेले चंद्रकांत नाईक म्हणतात. ते सध्या त्यांच्या
पुतण्याच्या छोट्या बोटीवर मासेमारीसाठी जातात.
अर्थात केवळ गतस्मृतींच्या आधारे मासेमारीच्या धंद्यात टिकून राहता येणार नाही
हे अनेकांना माहित आहे. “मी तर माझ्या पोरांना बोटीवर चढू पण देत नाही. छोटीमोठी
कामं ठीक आहेत, पण मी त्यांना सोबत बोटीवर काही नेत नाही,” ५१ वर्षीय जितेंद्र
तमोरे सांगतात. त्यांच्या वडलांची बोट आता ते वापरतायत. त्यांच्या कुटुंबाचं
सातपाटीमध्ये माशांच्या जाळ्याचं दुकानसुद्धा आहे. त्याच्या कमाईवर त्यांचं कसं
तरी भागतंय. “आमच्या जाळीच्या धंद्याच्या जोरावरच आम्ही आमच्या [२० आणि १७ वर्षे
वयाच्या] पोरांची शिक्षणं केली,” त्यांच्या पत्नी जुही तमोरे सांगतात. “आमचं
आयुष्य कसं तरी चालू आहे. पण त्यांनी मात्र मासेमारीच्या धंद्यात बिलकुल येऊ नये,
हीच आमची इच्छा आहे.”
या कहाणीतल्या काही मुलाखती २०१९ मध्ये घेण्यात आल्या आहेत.
शीर्षक छायाचित्रः मार्च २०२० मध्ये होळीच्या सणारोजी सातपाटीतल्या मच्छीमार स्त्रिया दर्याची पूजा करतायत. घरची माणसं समुद्रात असताना त्यांचं रक्षण कर आणि येणारा हंगाम चांगला जाऊ दे हेच त्यांचं मागणं असतं. या सणाच्या दिवशी बोटीसुद्धा सजवल्या जातात आणि त्यांची देखील पूजा केली जाते.