ख्वाजा मोइनुद्दिन यांना आजही मतदानाचा तो दिवस आणि त्या दिवशी घातलेला कडक इस्त्रीचा कुर्ता अगदी स्पष्ट आठवतो. स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक – १९५१-५२. विशीतल्या या तरुणाचा उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्या छोट्याशा गावात दौडत दौडत उड्या मारत ते मतदान केंद्रावर पोचले होते. नव्यानेच स्वतंत्र झालेल्या देशाचा श्वास नसानसात भरला होता.

७२ वर्षं उलटली. मोउनुद्दिन चाचांनी आज नव्वदी पार केली आहे. १३ मे २०२४ रोजी ते परत एकदा तसाच कडक इस्त्रीचा कुरकुरीत कुर्ता घालून घरातून बाहेर पडले. या वेळी दौडत नाही तर काठीचा आधार घेत त्यांनी मतदान केंद्र गाठलं. पावलातला जोश गेला होता आणि वातावरणातला उत्साहही.

“तब देश बनाने के लिये व्होट किया था, आज देश बचाने के लिये व्होट कर रहा हूँ,” बीड शहरातल्या आपल्या घरी ते आमच्याशी बोलत होते.

त्यांचा जन्म अंदाजे १९३२ च्या आसपासचा. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातला. मोठेपणी तहसिल कचेरीत चाचा चौकीदार म्हणून कामाला होते. पण १९४८ साली त्यांना पळून ४० किलोमीटरवरच्या बीड शहरात कुठे तरी आसरा घ्यावा लागला होता. भारतीय संघराज्य शासनाने हैद्राबाद संस्थान खालसा करून भारतात समाविष्ट केलं तेव्हा उसळलेल्या हिंसाचाराचा परिणाम.

१९४७ साली फाळणी झाली. रक्तपात झाला. काश्मीर, त्रावणकोर आणि हैद्राबाद या तीन संस्थानांनी भारतात समाविष्ट होण्यास नकार दिला. हैद्राबादच्या निजामाला स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं होतं. भारतातही नाही आणि पाकिस्तानातही जायचं नव्हतं. मराठवाड्याचा संपूर्णी इलाका तेव्हा निजामाच्या राजवटीत होता.

१९४८ च्या सप्टेंबर महिन्यात भारतीय सैन्य हैद्राबादमध्ये घुसलं. आणि चारच दिवसांत निजाम शरण आला. अनेक वर्षांनी खुल्या झालेल्या शासन स्थापित सुंदरलाल आयोगाच्या अहवालानुसार भारत सरकारने केलेल्या कारवाईमध्ये किमान २७,००० ते ४०,००० मुसलमान मरण पावले. आणि मोइन चाचांसारख्या अनेक तरुणांना जीव मुठीत घेऊन पळून जावं लागलं होतं.

“आमच्या गावातली विहीर मढ्यांनी भरली होती,” ते सांगतात. “आम्ही पळून बीडला गेलो. तेव्हापासून हेच शहर माझं घर आहे.”

PHOTO • Parth M.N.
PHOTO • Parth M.N.

ख्वाजा मोइनुद्दिन यांचा जन्म १९३२ साली बीड जिल्ह्याच्या शिरुर कासार तालुक्यात झाला. १९५१-५२ साली झालेल्या भारताच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी मत दिलं आणि मे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आज वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मतदान केलं

बीडमध्येच त्यांचं लग्न झालं, लेकरं झाली. स्वतःच्या डोळ्यापुढे नातवंडं मोठी होताना पाहिली. ३० वर्षं शिंपी म्हणून काम केलं आणि स्थानिक राजकारणातही थोडा भाग घेतला.

पण सात दशकांपूर्वी शिरुर कासारहून बीडला पळून जावं लागलं तेव्हापासून ते आजपर्यंत आपलं मुसलमान असणं धोक्याचं आहे ही भावना काही त्यांच्या मनातून गेलेली नाही.

वॉशिंग्टन डीसी मध्ये असलेल्या इंडिया हेट लॅब या संस्थेने केलेल्या नोंदींनुसार २०२३ साली भारतात द्वेषभावना पसरवणारी ६६८ भाषणं झाली. म्हणजे दररोज जवळपास दोन भाषणं. महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राच्या या भूमीत यातली सर्वात जास्त म्हणजे ११८ भाषणं झाल्याचं या नोंदी सांगतात. ही संस्था सातत्याने भडकाऊ, द्वेषपूर्ण भाषणं आणि गुन्ह्यांचा मागोवा घेत आहे.

“फाळणी झाल्यानंतर भारतामध्ये मुसलमानांचं स्थान नक्की काय असणार आहे याबद्दल सगळेच जरा साशंक होते,” चाचा म्हणतात. “पण माझ्या मनात भीती नव्हती. भारत या राष्ट्रावर माझा ठाम विश्वास होता. पण आज मला विचाराल, तर अख्खी जिंदगी इथे गेल्यानंतर मात्र मनात शंका येते की हा माझाच देश आहे का...”

शीर्षस्थ एक नेता सगळं काही बदलू शकतो या गोष्टीवर मात्र त्यांचा पूर्ण विश्वास नाही.

“पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रत्येकाविषयी फार आपुलकी आणि प्रेम वाटायचं. आणि लोकांचंही त्यांच्यावर तितकंच प्रेम होतं,” मोइन चाचा सांगतात. “हिंदू आणि मुसलमान गुण्या-गोविंदाने एकमेकासोबत राहू शकतात हा विश्वास त्यांनी आम्हाला दिला होता. फार हळवा माणूस होता तो. हाडाचा धर्मनिरपेक्ष. पंतप्रधान या नात्याने त्यांनी एक आशा जागवली होती की भारत हा एक अगदी विशेष देश असणार आहे.”

पण आज अगदी दुसऱ्या टोकाला जाऊन सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा मुसलमानांचा उल्लेख “घुसखोर” असा करतात तेव्हा कुणी तरी पोटात गुद्दा मारलाय की काय असं वाटत असल्याचं चाचा म्हणतात. धर्मा-धर्मात तेढ वाढवून यांना निवडणूक जिंकायची आहे.

२२ एप्रिल २०२४ रोजी राजस्थानातल्या एका सभेत बोलताना सत्ताधारी भाजपचे ‘स्टार प्रचारक’ असणाऱ्या मोदींनी काँग्रेस पक्ष लोकांची संपत्ती “घुसखोरांना” वाटून टाकणार असल्याचा निखालस खोटा दावा केला होता.

मोईन म्हणतात, “अतिशय निराश करणारं वक्तव्य होतं ते. एक काळ असा होता जेव्हा मूल्यं आणि सचोटीला सर्वात जास्त मोल होतं. आता काहीही करून सत्ता काबीज करण्याचा खेळ झालाय सगळा.”

PHOTO • Parth M.N.
PHOTO • Parth M.N.

‘फाळणीनंतर भारतात मुसलमानांचं स्थान नक्की काय असेल याबद्दल थोडी साशंकता होती,’ मोइनुद्दिन सांगतात. ‘तेव्हा भीती वाटत नव्हती. एक राष्ट्र म्हणून भारतावर माझा विश्वास होता. आज मात्र सगळं आयुष्य इथे काढल्यानंतर कुठे ना कुठे वाटतं की खरंच हा माझा देश आहे का...’

चाचांच्या घरापासून दोन-तीन किलोमीटरवर सइद फख्रु उझ झमा राहतात. त्यांनी अगदी पहिल्या निवडणुकीत मत दिलं नसलं तरी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पुन्हा निवडून आले त्या १९६२ साली झालेल्या निवडणुकीत मात्र मतदान केलं होतं. “काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे मला माहित आहे, पण नेहरूंची विचारधारा मी कधीच सोडणार नाही,” ते सांगतात. “मला आठवतंय की सत्तरीच्या दशकात इंदिरा गांधी पुण्याला आल्या होत्या. मी त्यांना पहायला गेलो होतो.”

भारत जोडो यात्रेवर ते खूश होते. राहुल गांधीने कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा काढली होती. आणि महाराष्ट्रात ते उद्धव ठाकरेंचे आभारी आहेत. आपल्या मनात अशी भावना येईल असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं.

“शिवसेना बदलतीये आणि चांगला बदल आहे हा,” ते म्हणतात. “महामारीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी उत्तम प्रकारे राज्य कारभार सांभाळला. इतर राज्यात ज्या प्रकारे मुसलमानांना लक्ष्य करण्यात आलं तसं त्यांनी इथे महाराष्ट्रात होऊ दिलं नाही.”

८५ वर्षांचे झमा म्हणतात की भारतीय समाजात धर्माच्या नावावर फूट होतीच. पण “त्याला विरोध करणारेही तेवढ्याच जोरकसपणे आवाज उठवत होते.”

१९९२ साली विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात धर्मांध हिंदू गटांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत असलेली बाबरी मशीद पाडली. त्या जागी रामायणातल्या रामाचा जन्म झाला असल्याचा दावा करण्यात आला. त्या घटनेनंतर देशभरात धार्मिक दंगे उसळले. महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईत साखळी बाँबस्फोट झाले आणि त्यानंतर हिंसक दंगली.

१९९२-९३ च्या त्या सगळ्या काळात बीडमध्येही अशांतता आणि तणाव होता.

“माझ्या मुलाने शांतता आणि बंधुभाव टिकून रहावा यासाठी शहरात शांतता मोर्चा काढला होता. हिंदू आणि मुसलमान यामध्ये मोठ्या संख्येने सामील झाले होते. आज मात्र ती एकजूट कुठे पहायला मिळत नाही,” ते सांगतात.

PHOTO • Parth M.N.

सईद फख्रु उझ झमा यांनी १९६२ साली झालेल्या निवडणुकीत मतदान केलं होतं. पंतप्रधान नेहरू यात पुन्हा एकदा जिंकून आले होते. ८५ वर्षांचे झमा म्हणतात की भारतीय समाजात धर्माच्या नावावर फूट होतीच. पण ‘त्याला विरोध करणारेही तेवढ्याच जोरकसपणे आवाज उठवत होते’

सइद चाचा जन्मापासून याच घरात राहतायत. बीडमध्ये त्यांच्या कुटुंबाचा बराच दबदबा आहे. निवडणुकीआधी बरेच राजकीय नेते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. त्यांचे वडील आणि आजोबा दोघंही शिक्षक होते आणि पोलिसांच्या कारवाईत दोघांना तुरुंगवासही झाला होता. त्यांचे वडील वारले तेव्हा धर्मापलिकडे जाऊन हजारो लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले होते. स्थानिक नेते मंडळीही आली होती.

“गोपीनाथ मुंडेंबरोबर माझं फार चांगलं नातं होतं,” बीडच्या आजवरच्या सगळ्यात अग्रणी नेत्याबद्दल झमा सांगतात. “ते भाजपचे असले तरी आमच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांना मत दिलं होतं. आम्हाला खात्री होती की ते हिंदू आणि मुसलमानात फरक करणार नाहीत.”

पंकजा मुंडेंबरोबरही त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याचं ते सांगतात. बीडमधून त्या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत. पण मोदींच्या धार्मिक तेढ वाढवणाऱ्या राजकारणापुढे पंकजाताईंचा टिकाव लागणार नाही असं त्यांना वाटतं. “त्यांनी बीडच्या सभेतही काही भडकाऊ वक्तव्यं केली,” झमा सांगतात. “ते इथे येऊन गेले आणि पंकजाची हजारो मतं घटली. खोटं बोलून तुम्ही फार मजल मारू शकत नाही.”

झमांचा जन्म होण्याआधी घडलेल्या एका प्रसंगाबद्दल ते सांगतात. त्यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर एक मंदीर आहे. १९३० च्या दशकात त्या मंदिराबद्दल एक किस्सा झाला. गावातल्या काही मुसलमानांचं म्हणणं होतं की मुळात ती मशीद आहे. त्यांनी हैद्राबादच्या निजामाकडे याचिका केली की या मंदिराचं मशिदीत रुपांतर करावं. झमा यांचे वालिद सइद मेहबूब अली शाह हे सच्च्या शब्दाचे म्हणून प्रसिद्ध होते.

“मंदीर आहे का मशीद हे ठरवण्याचं काम जेव्हा त्यांच्याकडे आलं तेव्हा माझ्या वडलांनी साक्ष दिली की ही मशीद असल्याचा कसलाच पुरावा त्यांच्या आजवर पाहण्यात आलेला नाही. निकाल लागला आणि मंदीर वाचलं. काही जण नाराज झाले, पण माझे वडील खोटं बोलले नाहीत. आम्ही महात्मा गांधींची शिकवण पाळतोः ‘सत्य तुम्हाला नेहमीच मुक्तीकडे नेतं’.”

मोइनुद्दिन यांच्याशी बोलतानाही गांधींचा उल्लेख सातत्याने येत राहतो. “एकता आणि धार्मिक सलोख्याचा विचार त्यांनीच आमच्यात रुजवला,” ते सांगतात आणि जुनं हिंदी गाणं गाऊ लागतातः ‘तू न हिंदू बनेगा, न मुसलमान बनेगा. इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा.’

१९९० साली मोइनुद्दिन बीडमध्ये नगरसेवक झाले तेव्हा त्यांच्यापुढे हेच ध्येय होतं. “१९८५ साली ३० वर्षांनंतर मी माझं शिंपीकाम थांबवलं कारण मला राजकारणाची ओढ होती,” ते हसत हसत सांगतात. “पण राजकारणी म्हणून मी फार काळ टिकू शकलो नाही. अगदी स्थानिक निवडणुकांमध्येही ज्या प्रकारचा पैसा आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे ते काही मला सहन झालं नाही. गेल्या २५ वर्षांपासून मी सगळ्यातूनच निवृत्ती घेतलेली आहे.”

PHOTO • Parth M.N.

१९९२-९३ मध्ये बीड शहरातही तणावपूर्ण स्थिती असल्याचं झमा सांगतात. ‘माझ्या मुलाने शांतता आणि बंधुभाव टिकून रहावा यासाठी शहरात शांतता मोर्चा काढला होता. हिंदू आणि मुसलमान यामध्ये मोठ्या संख्येने सामील झाले होते. आज मात्र ती एकजूट कुठे पहायला मिळत नाही’

काळ बदलत गेला आणि भ्रष्टाचार बोकाळला. झमा देखील याच कारणाने सगळ्यातून बाहेर पडले. पूर्वीच्या काळी ते गावात कंत्राटदार म्हणून काम करायचे. “१९९० नंतर सगळंच बदलून गेलं,” ते सांगतात. “लाचखोरी वाढली. कामाचा दर्जा पार घसरला. मग मी विचार केला की यापेक्षा घरीच बसलेलं बरंय.”

सगळ्या कामातून निवृत्ती घेतल्यानंतर झमा आणि मोइनुद्दिन जास्त धार्मिक झाले आहेत. झमा पहाटे ४.३० वाजता उठतात आणि सकाळची नमाज अदा करतात. मोइनुद्दिन चाचांच्या घरासमोरच मशीद आहे. त्यामुळे ते घरून निघतात आणि जरा शांतता मिळावी म्हणून मशिदीत जातात. त्यांची मशीद बीडच्या एका अरुंद गल्लीत आहे हे नशीब.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून कडव्या हिंदुत्ववादी गटांनी राम नवमी साजरी करत असताना मुद्दामहून मशिदीच्या समोर भडकाई, द्वेषपूर्ण आणि धार्मिक भावना भडकवणारी गाणी मोठ्याने वाजवायला सुरुवात केली आहे. बीडमध्येही तीच गत आहे. मोइनुद्दिन चाचा राहतात ती गल्ली अरुंद असल्याने तिथे असली प्रक्षोभक शोभायात्रा जाऊ शकत नाही हीच चांगली गोष्ट आहे.

झमांचं नशीब तितकं चांगलं नाही. मुसलमानांवर हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करणारी, त्यांना माणसापेक्षा हीन मानणारी गाणी त्यांना इच्छा नसूनही ऐकावीच लागतात. त्या गाण्यांमधला एकेक शब्द त्यांना आपण कुणी तरी हीन आहोत ही जाणीव करून देत राहतो.

“माझी नातवंडं आणि त्यांची मित्रमंडळी राम नवमी आणि गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या भाविकांना पाणी, फळांचा रस आणि केळी वगैरे वाटायची. मला आजही आठवतंय,” झमा सांगतात. “इतकी सुंदर परंपरा होती. पण त्यांनी आम्हाला मान खाली घालावी लागेल अशी ही गाणी वाजवायला सुरुवात केली आणि ते सगळं तिथेच थांबलं.”

PHOTO • Parth M.N.

सइद चाचा जन्मापासून याच घरात राहतायत. बीडमध्ये त्यांच्या कुटुंबाचा बराच दबदबा आहे. निवडणुकीआधी बरेच राजकीय नेते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. त्यांचे वडील आणि आजोबा दोघंही शिक्षक होते आणि पोलिसांच्या कारवाईत दोघांना तुरुंगवासही झाला होता. त्यांचे वडील वारले तेव्हा धर्मापलिकडे जाऊन हजारो लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले होते. स्थानिक नेते मंडळीही आली होती

रामावर त्यांची अपार श्रद्धा आहे. ते म्हणतात, “रामाने कधी आपल्याला दुसऱ्याचा द्वेष करायला सांगितलं नाही ना. ही तरुण मुलं त्यांच्याच देवाला बदनाम करतायत. तो देव काही असल्या गोष्टींचं प्रतीक नव्हता.”

मशिदीसमोर यात्रा काढणाऱ्यांमध्ये तरुण मुलांचा भरणा जास्त आहे आणि याच गोष्टीची झमा यांना सर्वात जास्त चिंता वाटते. “माझे वडील हिंदू मित्र-मंडळी येईपर्यंत ईदला जेवत नसत,” ते सांगतात. “मीही तेच पाळत आलोय. पण आता मात्र हे सगळं फार झपाट्याने बदलायला लागलंय.”

धार्मिक सलोख्याच्या, गुण्या-गोविंदाने नांदण्याच्या त्या काळात आपल्याला परत जायचं असेल तर पुन्हा एकदा एकतेचा आणि एकजुटीचा संदेश देण्याची फार मोठी गरज आहे. आणि त्यासाठी गांधींसारखा प्रामाणिक आणि ठाम विश्वास असणारा नेता आज हवा आहे.

गांधींच्या जीवनप्रवासाबद्दल बोलत असताना त्यांना मजरुह सुलतानपुरी यांचा एक शेर आठवतोः “मैं अकेला ही चला था जानिब-इ-मंझिल मगर, लोग साथ आते गये और कारवाँ बनता गया.”

“नाही तर संविधान बदलून टाकलं जाईल आणि त्याचे भोग पुढच्या पिढीला भोगावे लागतील,” ते म्हणतात.

Parth M.N.

పార్థ్ ఎం.ఎన్. 2017 PARI ఫెలో మరియు వివిధ వార్తా వెబ్‌సైట్ల కి స్వతంత్ర జర్నలిస్ట్ రిపోర్టర్ గా పని చేస్తున్నారు. ఆయన క్రికెట్ ను, ప్రయాణాలను ఇష్టపడతారు.

Other stories by Parth M.N.
Editor : Priti David

ప్రీతి డేవిడ్ పీపుల్స్ ఆర్కైవ్ ఆఫ్ రూరల్ ఇండియాలో జర్నలిస్ట్, PARI ఎడ్యుకేషన్ సంపాదకురాలు. ఆమె గ్రామీణ సమస్యలను తరగతి గదిలోకీ, పాఠ్యాంశాల్లోకీ తీసుకురావడానికి అధ్యాపకులతోనూ; మన కాలపు సమస్యలను డాక్యుమెంట్ చేయడానికి యువతతోనూ కలిసి పనిచేస్తున్నారు.

Other stories by Priti David
Translator : Medha Kale

మేధా కాలే పూణేలో ఉంటారు. ఆమె మహిళలు, ఆరోగ్యం- ఈ రెండు అంశాల పైన పనిచేస్తారు. ఆమె పీపుల్స్ ఆర్కైవ్ ఆఫ్ ఇండియాలో మరాఠీ భాషకు అనువాద సంపాదకులుగా పని చేస్తున్నారు.

Other stories by Medha Kale