‘राजा सुपडकन्नो’ – गुजरातीमध्ये याचा अर्थ हत्तीचे कान असलेला राजा. लहानपणी ऐकलेली ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट होती. अगदी पहिल्यांदा मी माझ्या आईकडून ती ऐकली. त्यानंतर मी विविध रुपांमध्ये ती गोष्ट ऐकली. गिजुभाई बधेकांना लहान मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टींच्या पुस्तकात मी ती स्वतः वाचली देखील. बधेकांच्या त्या पुस्तकात जगभरातल्या लोककथा इथे साजेशा स्वरुपात रुपांतरित केल्या होत्या. मिडास राजाच्या गाढवाच्या कानांवरची एक गोष्टही त्यात होती. माझ्या मते राजा सुपडकन्नोचा उगम त्याच गोष्टीतून झाला असावा.

एकदा एक राजा जंगलात गेला आणि वाट चुकला. भुकेल्या राजाने एका चिमणीची मान आवळली आणि तिचा घास घेतला. पण यामुळे त्याला मिळाला एक शाप आणि राजाचे कान अचानक हत्तीसारखे भलेमोठे झाले. राजा महाली परत आला. मग अनेक दिवस त्याने वेगवेगळे फेटे आणि गमज्यांखाली आपले कान लपवण्याचा प्रयत्न करून पाहिला. लोकांच्या चाणाक्ष नजरांपासून वाचण्याचा प्रयास केला. पण एक वेळ अशी आली की त्याला आपले अस्ताव्यस्त वाढत चाललेले केस आणि दाढी कापून घेण्यासाठी नाभिकाला बोलावणं धाडावंच लागलं.

नाभिकाने राजाचे कान पाहिले आणि तो आश्चर्याने उडालाच. आणि आता त्याच्या त्या अवाढव्य कानांची वार्ता अनेक कानी होण्याची शक्यता निर्माण झाली. मग या सत्ताधीशाने त्या साध्या भोळ्या नाभिकाला धमकावलं आणि कुणाशी बोललास तर खबरदार असा दम दिला. पण मुळातच गप्पिष्ट असणाऱ्या नाभिकाला आपल्या पोटात हे गुपित दडवणं काही जमेना. शेवटी राजाच्या केशभूषाकाराने पोटातलं गुपित असह्य होऊन जंगलातल्या एका झाडाला सांगून टाकलं.

एक दिवस या झाडापाशी एक लाकूडतोड्या आला तर ते झाड राजाच्या हत्तीकानांवर एक गाणंच गायला लागलं. त्या गाणाऱ्या झाडाचं जादुई लाकूड लाकूडतोड्याने एका वाद्यकाराला ढोल बनवण्यासाठी विकलं. त्याने केलेल्या ढोलावर थाप पडली की तो ढोलही तेच गाणं गायला लागायचा. आणि मग एक दिवस तो ढोल वाजवणाऱ्या त्या माणसाला उचलून थेट राजासमोर सादर करण्यात आलं... मला आठवतंय त्या गोष्टीमध्ये ही गोष्ट बरीच पुढे जात राहते. आणि अखेर राजाला त्याच्या या पापातून मुक्ती मिळण्याचा एक उःशाप मिळतो. त्याच्या राज्यात पक्ष्य़ांसाठी एक अभयारण्य सुरू करण्याचा.

प्रतिष्ठा पंड्या यांच्या आवाजात गुजराती कविता ऐका

प्रतिष्ठा पंड्या यांच्या आवाजात इंग्रजी कविता ऐका

राजाला आले हत्तीचे कान

हाताची घडी, तोंडावर बोट
बिलकुल नाही म्हणायचं,
की राजाला आले हत्तीचे कान.
अशा वावड्या उठतातच कशा,
कशा फिरतात भनान,
म्हणे, राजाला आले हत्तीचे कान.

आता आतापर्यंत दिसणाऱ्या
कुठे गेल्या मैना सगळ्या?
कुणी चुपचाप जाळं टाकलं,
सापळ्यासाठी बी फेकलं?
काहीही काळंबेरं नाही
लोक बोलतात काहीबाही,
वळवा मान,
म्हणे, राजाला आले हत्तीचे कान.

मैनांना जरी बहिष्कृत केलंत,
घरट्यातून
झाडांमधून, जंगलातून, रानातून आणि वनातून,
हुसकून लावलंत,
त्यांच्या जगण्यावर, गाण्यांवर आणि गाण्यावर
हक्क त्यांचाच राहणार
मनात येईल तेव्हा मैनेचे पंख उडणार.
कशाला विचारताय हे प्रश्न ज्याने होईल मंथन?
राजापुढे मैनेचं आहे का काही वजन?
चिडिया बचाओ, राजा हटाओ
बंद करा ते पोकळ गान,
म्हणे, राजाला आले हत्तीचे कान.

‘मी काढीन साक्ष,’ म्हणतं पान
विचारा नाही तर आभाळाला
राजानेच मोडली मैनेची मान.’
माझं ऐका, म्हणतो वारा
ऐकलंय ना मी,
त्याच्या पोटातून ऐकू येतो मैनेचा पुकारा.
पण लोक बोलतील सगळं ते तुम्ही थोडीच ऐकणार
डोळ्याला जे दिसतं, त्यावर विश्वास ठेवणार?
अहो, विचार करणं सोडा जराशान,
म्हणे राजाला आले हत्तीचे कान.

काय तो राजा, आणि काय त्याचा देश!
भुकेल्यांता घेतो घास
अंगी भगवंताचा वेष!
असल्या वावड्यांमध्ये अडकू नका.
तुमच्या अंतरात्म्याशी झगडू नका.
भिंत म्हटली
की भेगा आल्याच.
पण त्या भेगा आणि छिद्रांमध्ये शिरू नका बरं.
गावागावात चावडीवर
हजारो बोल बोलतील
ते मानू नका खरं.
त्या वेड्या वाटेने जाऊच नका ना.
मूर्ख वेलीशी बोलूच नका ना.
आणि गाऊ नका फोल,
बडवू नका ढोल, रहा गपगुमान -
म्हणे, राजाला आले हत्तीचे कान.

ऐका माझं, ती मैना आणि झाड राहू द्या,
जंगलाकडे पाहणंही सोडा, जाऊ द्या.
आणि पहायचं तर पहा, पण ध्यानात राहू द्या.
आणि कृपा करून, मायबाप.
असल्या गोष्टी लिहिण्याचं नका करू पाप,
करा कलम म्यान,
म्हणे राजाला आले हत्तीचे कान.
काय सांगता, राजाला आले हत्तीचे कान.

मूळ गुजराती कवितेचा इंग्रजी अनुवाद कवयीत्रीने स्वतः केला आहे

Pratishtha Pandya

PARI సృజనాత్మక రచన విభాగానికి నాయకత్వం వహిస్తోన్న ప్రతిష్ఠా పాండ్య PARIలో సీనియర్ సంపాదకురాలు. ఆమె PARIభాషా బృందంలో కూడా సభ్యురాలు, గుజరాతీ కథనాలను అనువదిస్తారు, సంపాదకత్వం వహిస్తారు. ప్రతిష్ఠ గుజరాతీ, ఆంగ్ల భాషలలో కవిత్వాన్ని ప్రచురించిన కవయిత్రి.

Other stories by Pratishtha Pandya
Illustration : Labani Jangi

లావణి జంగి 2020 PARI ఫెలో. పశ్చిమ బెంగాల్‌లోని నాడియా జిల్లాకు చెందిన స్వయం-బోధిత చిత్రకారిణి. ఆమె కొల్‌కతాలోని సెంటర్ ఫర్ స్టడీస్ ఇన్ సోషల్ సైన్సెస్‌లో లేబర్ మైగ్రేషన్‌పై పిఎచ్‌డి చేస్తున్నారు.

Other stories by Labani Jangi
Translator : Medha Kale

మేధా కాలే పూణేలో ఉంటారు. ఆమె మహిళలు, ఆరోగ్యం- ఈ రెండు అంశాల పైన పనిచేస్తారు. ఆమె పీపుల్స్ ఆర్కైవ్ ఆఫ్ ఇండియాలో మరాఠీ భాషకు అనువాద సంపాదకులుగా పని చేస్తున్నారు.

Other stories by Medha Kale