वर्ष होतं १९९७.

महिलांच्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा सुरू होत्या आणि अंतिम सामन्यात पश्चिम बंगाल आणि मणिपूरची लढत होणार होती. दर वर्षी होणाऱ्या आंतर राज्य स्पर्धांमध्ये गेली तीन वर्षं बंगालला मणिपूरकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण तरीही आपल्या पिवळ्या आणि मरुन रंगाच्या जर्सीमध्ये महिलांचा हा संघ नेटाने सामन्यासाठी सज्ज झाला होता. पश्चिम बंगालच्या हलदियामध्ये दुर्गाचाक स्टेडियममधला हा सामना बंदना पालसाठी घरच्या मैदानावरचा सामना होता.

शिट्टी झाली आणि खेळ सुरू झाला.

या आधी उप-उपांत्य सामन्यामध्ये १६ वर्षांच्या बंदनाने सलग तीन गोल केले होते आणि आपल्या संघाला गोव्याविरुद्ध विजय मिळवून दिला होता. “उपांत्य सामना पंजाबविरुद्ध होता. पण माझा पाय प्रचंड दुखत होता. त्या दिवशी आमचा संघ जिंकला आणि अंतिम सामन्यात गेला पण मला पायावर उभं देखील राहता येत नव्हतं.”

पश्चिम बंगालची सर्वात तरुण खेळाडू असलेली पाल स्पर्धेचा अंतिम सामना बाकड्यावरूनच पाहत होती. सामना संपायला काही मिनिटं राहिली होती आणि कोणत्याच टीमने गोल केला नव्हता. पश्चिम बंगालच्या प्रशिक्षक शांती मलिक अगदी नाखूष होत्या. त्यांची चिंता वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री त्या दिवशी उपस्थित होते. मलिक आल्या आणि त्यांनी पालला तयार व्हायला सांगितलं. “‘माझी हालत पहा एकदा,” मी त्यांना सांगितलं. पण कोच म्हणाल्या, ‘तू गेलीस तर गोल होणार नक्की. माझं मन मला सांगतंय’,” बोनी सांगतो.

मग वेदना तात्काळ थांबाव्या यासाठी दोन इंजेक्शन आणि घोट्याला क्रेप बँडेज घट्ट बांधून खेळासाठी बंदना सज्ज झाली. मॅचमध्ये एकही गोल झाला नाही आणि एक्स्ट्रा टाइम सुरू झाला. ज्या कुठल्या टीमचा गोल होणार ती विजयी.

“मी क्रॉसबारचा निशाणा साधत बॉल मारला आणि तो स्विंग होऊन उजवीकडे गेला. गोलकीपरने उडी मारली. पण तिला पार करून बॉल मागे गेला आणि जाळ्यात पोचला.”

PHOTO • Riya Behl
PHOTO • Riya Behl

डावीकडेः आनंद बझार पत्रिकेच्या २ डिसेंबर २०१२ रोजीच्या क्रीडा आवृत्तीत फूटबॉल खेळणाऱ्या बंदना पाल म्हणजेच आताच्या बोनी पालचे अगदी सुरुवातीचे काही फोटो.उजवीकडेः १९९८ साली महिलांच्या राष्ट्रीय फूटबॉल स्पर्धांमध्ये भाग घेता यावा यासाठी अखिल भारतीय फूटबॉल संघाने दिलेलं शिफारस पत्र

गोष्टी सांगण्याचा वकुब असणाऱ्या कसलेल्या कथाकारासारखा एक क्षण बोनी थांबतो. “माझ्या जायबंदी पायाने मी तो गोल मारला,” हसतो. “गोलकीपर कितीही उंच असू द्या. क्रॉसबारला मारलेले गोल अडवणं सोपं नाही. मी खरंच गोल्डन गोल मारला.”

तो सामना होऊन २५ वर्षं उलटून गेलीयेत पण ४१ वर्षीय बोनीच्या आवाजातला अभिमान अगदी स्पष्ट ऐकू येतो. त्यानंतर एका वर्षाने बोनीची निवड राष्ट्रीय चमूत झाली. १९९८ च्या बँकॉक आशियाई स्पर्धांमध्ये हा संघ खेळणार होता.

पश्चिम बंगालच्या नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातल्या इच्छापूर गावातल्या या फूटबॉलपटूसाठी सगळं स्वप्नवत सुरू होतं. “माझी आजी रेडिओवर [अंतिम सामन्याचं] धावतं वर्णन ऐकत होती. आजवर आमच्या कुटुंबातल्या कुणीही या स्तरावर जाऊन खेळलं नव्हतं. त्यांना सगळ्यांना माझा खरंच अभिमान वाटत होता.”

बोनी म्हणजेच तेव्हाची बंदना लहान होती तेव्हा सात जणांचं पाल कुटुंब गायघाटा तालुक्यातल्या इच्छापूर गावी राहत असते. तिथे त्यांची दोन एकर जमीन होती ज्यात घरच्यापुरता भात, मोहरी, मटार, मसूर आणि गहू पिकत होता. आता या जमिनीच्या वाटण्या झाल्या आहेत आणि काही भाग विकला देखील गेला आहे.

“माझे वडील शिंपीकाम करायचे आणि माझी आई त्यांना शिलाई आणि भरतकामासाठी मदत करायची. ती पगड्या शिवायची, राख्या  आणि इतरही बऱ्याच वस्तू तयार करायची,” बोनी सांगतो. पाच भावंडांमधला तो सर्वात धाकटा. “आम्ही अगदी लहान होतो तेव्हापासून या जमिनीत काम केलंय.” या भावंडांचं काम म्हणजे सत्तरेक कोंबड्या आणि १५ बकऱ्यांची काळजी घेणं. मग शाळेच्या आधी आणि नंतर बकऱ्यांसाठी गवत आणणं हेही त्यांचंच काम होतं.

बोनीने इच्छापूर हाय स्कूलमधून दहावी पूर्ण केली. “शाळेत मुलींचा संघच नव्हता. त्यामुळे मी शाळेनंतर मुलांच्या संघाबरोबर खेळायचो,” बोनी सांगतो. बाहेरुन पपनस आणण्यासाठी तो खोलीतून बाहेर पडतो. “आम्ही याला बताबी किंवा जांबुरा म्हणतो. फूटबॉल विकत घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे. मग काय आम्ही झाडावरून ही फळं तोडायचो आणि त्यानेच खेळायचो,” बोनी सांगतो. “खेळायला मी अशी सुरुवात केली.”

PHOTO • Riya Behl
PHOTO • Riya Behl

डावीकडेः पाल कुटुंबाच्या घरी वरच्या एका खोलीत बोनी आणि स्वाती राहतात, तिथे. उजवीकडेः कट्ट्यावर डावीकडे दोन पपनस दिसतायत त्यांचा वापर फूटबॉल म्हणून केला जायचा कारण खरा बॉल विकत घेण्याइतके पैसे जवळ नसायचे. कट्ट्यावर उजवीकडे खेळताना घालायचे बूट दिसतायत

एक दिवस सिदनाथ दास १२ वर्षांच्या बंदनाला फूटबॉल खेळताना पाहत होते. इच्छापूरमध्ये त्यांना सगळे प्रेमाने बुचु दा म्हणतात. त्यांनी जवळच्या बरसात शहरात फूटबॉल स्पर्धांसाठी निवड चाचणी सुरू असल्याचं बंदनाला सांगितलं. ती तिथे गेली आणि बरसात युवक संघाच्या चमूत तिची निवडही झाली. पहिल्याच सामन्यात उत्तम खेळ केल्यामुळे कोलकाता इथल्या इतिका मेमोरियल या क्लबने तिला आपल्या संघात घेतलं. आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही.

१९९८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी बंदनाची निवड झाली होती. पासपोर्ट, व्हिसा सगळ्या गोष्टी झटपट पूर्ण करण्यात आल्या होत्या. “आम्ही विमानतळावर होतो, निघण्याच्या तयारीत,” बोनी सांगतो. “पण मला त्यांनी तिथून माघारी पाठवलं.”

आशियाई स्पर्धांची तयारी सुरू होती तेव्हा मणिपूर, पंजाब, केरळ आणि ओडिशाच्या खेळाडूंनी बंदनाचा खेळ जवळून पाहिला होता. त्यांना ती नक्की स्त्री आहे का पुरुष याबद्दल शंका वाटली होती. आणि लवकरच हे प्रकरण या खेळाची शिखर संस्था असणाऱ्या ऑल इंडिया फूटबॉल फेडरेशनपर्यंत पोचलं.

“मला गुणसूत्रांची तपासणी करायला सांगण्यात आलं. त्या काळात ही तपासणी फक्त मुंबई किंवा बंगलोरला व्हायची,” बोनी सांगतो. कोलकात्याच्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) च्या डॉ. लैला दास यांनी रक्ताचे नमुने मुंबईला पाठवले. “दीड महिन्यांनी रिपोर्ट आला. गुणसूत्रं ‘46 XY’ असल्याचं त्यात म्हटलं होतं. मुली-बायांसाठी ती ‘46 XX’ असायला पाहिजेत. डॉक्टरांनी मला सांगितलं की मी काही [अधिकृत संघात] खेळू शकणार नाही,” बोनी सांगतो.

नुकताच उदयाला येऊ घातलेल्या या फूटबॉल खेळाडूचं वय तेव्हा फक्त १७ वर्षं होतं. पण खेळाचं भविष्यच आता धूसर दिसायला लागलं होतं.

PHOTO • Riya Behl

१९ जुलै २०१२ रोजी आरकाल सिलिगुडी या दैनिकात आलेला सिलिगुडी तालुका क्रीडा परिषदेकडे आपला परिचय सादर करतानाचा बोनीचा फोटो

इंटरसेक्स व्यक्तींची किंवा इंटरसेक्स पद्धतीची लैंगिकता असणाऱ्या व्यक्तींची लैंगिक रचना पुरुष किंवा स्त्रीच्या वैद्यकीय आणि सामाजिक रुढ व्याख्यांमध्ये बसत नाही. हे वेगळेपण शरीराच्या बाहेरच्या किंवा आतल्या प्रजनन अवयवांमध्ये, गुणसूत्रांच्या रचनेमध्ये किंवा संप्रेरकांमध्ये असू शकतं. जन्माच्या वेळी किंवा उशीराने हा फरक लक्षात येऊ शकतो

***

“मला गर्भाशय होतं, एक बीजकोष होता आणि आतमध्ये एक लिंग होतं. ‘दोघांचे’ लैंगिक अवयव होते,” बोनी सांगतो. एका रात्रीतच या फूटबॉलपटूची लैंगिक ओळख नक्की काय याबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले. माध्यमातही आणि बोनीच्या घरातही.

“त्या काळात कुणालाच हे काही माहित नव्हतं आणि समजतही नव्हतं. आता कुठे लोक एलजीबीटीक्यू मुद्द्यांवर जोर द्यायला लागले आहेत,” बोनी म्हणतो.

बोनी इंतरसेक्स आहे. एलजीबीटीक्यूआय+ मधला आय म्हणजे इंटरसेक्स. लहानपणीच्या बंदनाने आता बोनी हे नाव धारण केलं आहे. “माझं हे शरीर आहे ना ते काही फक्त भारतात नाही तर जगभरात कुणाचंही असू शकतं. आणि माझ्यासारखे अनेक खेळाडू आहेत – धावपटू, टेनिस, फूटबॉल खेळणारे अनेक,” बोनी सांगतो. त्याची लैंगिक ओळख आता पुरुष अशी आहे. लिंगभावाशी निगडीत आपली ओळख, त्याची अभिव्यक्ती, लैंगिकता आणि लैंगिक कल या सगळ्याबद्दल तो आता विविध गटांशी संवाद साधतो. अगदी वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांशीही.

PHOTO • Riya Behl
PHOTO • Riya Behl

डावीकडेः टाइम्स ऑफ इंडियाच्या शहर पुरवणीमध्ये बोनीबद्दल एक लेख छापून आला होता. उजवीकडेः बोनी पॉलचं आधार कार्ड, ज्यावर त्याचं लिंग पुरुष असं नमूद केलं आहे

इंटरसेक्स व्यक्तींची किंवा इंटरसेक्स पद्धतीची लैंगिकता असणाऱ्या व्यक्तींची लैंगिक रचना पुरुष किंवा स्त्रीच्या वैद्यकीय आणि सामाजिक रुढ व्याख्यांमध्ये बसत नाही. हे वेगळेपण शरीराच्या बाहेरच्या किंवा आतल्या प्रजनन अवयवांमध्ये, गुणसूत्रांच्या रचनेमध्ये किंवा संप्रेरकांमध्ये असू शकतं. जन्माच्या वेळी किंवा उशीराने हा फरक लक्षात येऊ शकतो. वैद्यक व्यावसायिक यासाठी DSD – Differences/Disorders of Sex Development म्हणजेच लैंगिक वाढीतील फरक किंवा विकृती अशी संज्ञा वापरतात.

“वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांकडून डीएसडी म्हणजे लैंगिक विकृती अशी चुकीची संज्ञा वापरली जाते,” दिल्लीस्थित युनिवर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसमधील डॉ. सतेंद्र सिंग म्हणतात. इंटरसेक्स व्यक्तींच्या आरोग्याविषयीचे अज्ञान आणि गोंधळ यामुळे खरं तर इंटरसेक्स व्यक्तींची नेमकी संख्या किती आहे हेही समजू शकत नाही असं ते म्हणतात.

२०१४ साली सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने ट्रान्सजेण्डर व्यक्तींच्या संदर्भात एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार दर २,००० मुलांमध्ये एका मुलाच्या लैंगिक अवयवरचनेत “स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी गुणांची अशी काही सरमिसळ झालेली असते की एखाद्या तज्ज्ञाला देखील जन्मलेलं बाळ मुलगी आहे की मुलगा हे निश्चित सांगता येत नाही.”

आणि असं असूनही “[भारतातल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या] पाठ्यपुस्तकांमध्ये ‘हर्मेफ्रोडाइट’, ‘अस्पष्ट लैंगिक अवयन’ आणि ‘विकृती’ अशा प्रकारच्या संज्ञा वापरल्या जात आहेत,” डॉ. सिंग पुढे सांगतात. ते स्वतः एक मानवी हक्क कार्यकर्ते असून अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींच्या अधिकारांसाठी काम करतात.

महिलांच्या चमूतून बाहेर काढल्यानंतर बोनीला कोलकात्याच्या साईने सांगितलेल्या शारीरिक तपासण्या कराव्या लागल्या. आणि त्यानंतर महिलांच्या कोणत्याच टीममध्ये खेळण्यास मज्जाव करण्यात आला. “आय़ुष्यातून फूटबॉलच हिरावून घेतला तेव्हा असं वाटलं की आयुष्यच संपलं. माझ्यासोबत अन्याय झाला होता,” बोनी सांगतो.

PHOTO • Riya Behl
PHOTO • Riya Behl

डावीकडेः हातात पपनस घेतलेला बोनी. त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा पपनस फळाची साल जाड असल्याने त्याचा बॉल म्हणून वापर करता आला. उजवीकडेः आपण जिंकलेले चषक आणि प्रमाणपत्रं ठेवलेल्या शोकेससमोर उभा बोनी

तो सांगतो की २०१४ साली आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्याच्या मनात थोडी आशा निर्माण झाली. “स्वतःची लैंगिक ओळख मान्य केली जाणं हा सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकाराच्या गाभ्याशी आहे. आपली लैंगिक ओळख आपल्या अस्तित्वाचा एक प्रमुख हिस्सा असते. आणि ही ओळख कायद्याने मान्य होणं संविधानाने दिलेल्या सन्मान आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचाच भाग आहे.” स्वतःला ट्रान्सजेण्डर म्हणणाऱ्या व्यक्तींना कायद्याने मान्यता मिळावी यासाठी नॅशनल लीगल सर्विसेस आणि पूजाया माता नसीब कौर जी विमेन वेलफेअर सोसायटी यांनी दाखल केलेल्या याचिकांवरील निवाड्यामध्ये हा निकाल देण्यात आला. या क्षेत्रात मैलाचा दगड ठरणाऱ्या या निकालामध्ये लैंगिक, लिंगभावाधारित ओळखीचं सविस्तर विश्लेषण करण्यात आलं असून प्रथमच स्त्री-पुरुष या चौकटीच्या पल्याड असणाऱ्या लैंगिक ओळखींची दखल घेणारा आणि ट्रान्सजेण्डर व्यक्तींच्या मूलभूत अधिकारांचं समर्थन या निकालाने केलं आहे.

या निकालामुळे बोनीची परिस्थिती किती सच्ची होती तेच सिद्ध झालं. “माझी जागा महिलांच्या टीममध्ये आहे असंच मला आतून वाटायचं,” बोनी सांगतो. “पण जेव्हा मी एआयएफएफला मी का खेळू शकत नाही अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी माझं शरीर आणि त्यातल्या गुणसूत्रांमुळे इतकंच उत्तर दिलं.”

कोलकात्यातील साईचं नेताजी सुभाष ईस्टर्न सेंटर आणि ऑल इंडिया फूटबॉल फेडरेशनला इंटरसेक्स व्यक्तींच्या लिंग आणि लैंगिक ओळखीची तपासणी करण्याची प्रक्रिया काय याविषयी वारंवार माहिती मागूनही त्यांच्याकडून आजतागायत कोणतंही उत्तर मिळालेलं नाही.

***

आपण परिस्थिती बदलायची असा बोनीने मनाशी ठाम निश्चय केला आणि इंटरसेक्स ह्यूमन राइट्स इंडिया (आयएचआरआय) या इंटरसेक्स व्यक्ती आणि त्यांच्या समर्थकांच्या देशव्यापी नेटवर्कचा तो संस्थापक सदस्य बनला. इंटरसेक्स व्यक्तींच्या हक्कांचं समर्थन, इतर इंटरसेक्स व्यक्तींकडून समुपदेशन आणि इतर आव्हानं न गरजांबद्दल जनवकिली अशा स्वरुपाचं काम या नेटवर्कतर्फ केलं जातं.

आयएचआरआय सदस्यांपैकी लहान मुलांबरोबर काम करणारा बोनी हा एकटा इंचरसेक्स व्यक्ती आहे. “पश्चिम बंगालच्या शासकीय आरोग्य केंद्रांमधून आणि बालगृहांमधून बोनीने वेळेत लक्ष घातल्यामुळे लैंगिक रचना वेगळी असलेल्या अनेक तरुण मुला-मुलींना आपल्या शरीराविषयी समजून घेण्यात, आपलं शरीर आणि आपली लैंगिक ओळख स्वीकारण्यात खूपच मदत झाली आहे. तसंच त्यांच्या आप्तांनाही त्यांना आवश्यक तो पाठिंबा देणं शक्य झालं आहे.”

PHOTO • Riya Behl
PHOTO • Riya Behl

डावीकडेः २०२१ साली बोनीला क्रीडा प्रशिक्षक म्हणून अत्युत्तम कामगिरी केल्याबद्दल पश्चिम बंगाल बाल हक्क आयोगाने पुरस्कार दिला. आपल्याबद्दल या पुरस्कारावर काय लिहिलं आहे ते बोनी वाचतोय आणि स्वाती ( उजवीकडे) पाहतीये. उजवीकडेः ऑक्टोबर २०१७ रोजी बेला या दैनिकात बोनीविषयी आलेली बातमी. सॉल्ट लेकमधल्या फूटबॉल सामन्यात किशलय चमू जिंकला आणि बोनी या संघाचा प्रशिक्षक होता, त्याचं कौतुक करणारी ही बातमी

“आजकाल तरुण खेळाडूंमध्ये त्यांच्या शरीराच्या रचनेविषयी जास्त जागरुकता दिसून येते. पण बोनीच्या काळात चित्र वेगळं होतं,” डॉ. पायोशी मित्रा म्हणतात. त्या धावपटूंच्या हक्कांवर काम करतात. स्वित्झर्लंडमधल्या लॉसानमध्ये ग्लोबल ऑब्झर्वेटरी फॉर विमेन, स्पोर्ट, फिजिकल एज्युकेशन अँड फिजिकल ॲक्टिविटी या संघटनेच्या प्रमुख कार्यवाह असणाऱ्या डॉ. मित्रा आशिया आणि आफ्रिकेतल्या महिला खेळाडूंसोबत जवळून काम करतात आणि क्रीडाक्षेत्रात मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी त्यांना सक्षम करतात.

“मी [विमानतळावरून] परत आलो तेव्हा इथल्या वर्तमानपत्रांनी माझा पिच्छा सोडला नाही, त्यांनी छळलं मला,” बोनी सांगतो. “’महिलांच्या संघात खेळत होता एक पुरुष’ असले मथळे छापून येत होते.” संघातून माघारी पाठवल्यानंतर घडलेल्या वेदनादायी घटना बोनी सांगतो. “माझे आई-बाबा, भाऊ आणि बहीण सगळे घाबरून गेले होते. माझ्या दोघी बहिणी आणि त्यांच्या सासरच्यांनी माझा खूप अपमान केला. मी सकाळी घरी आलो होतो पण संध्याकाळच्या आत मला तिथून पळ काढावा लागला.”

खिशात २,००० रुपये घेऊन बोनीने घर सोडलं. ज्या दिवशी घर सोडलं त्या दिवशी त्याने केस बारीक केले होते आणि जीन्स परिधान केली होती. आपल्याला कुणीच ओळखत नाही अशा एखाद्या जागेच्या तो शोधात होता.

“मला मूर्तीकाम यायचं म्हणून मग मी या कामाच्या शोधात कृष्णानगरला गेलो,” बोनी सांगतो. तो पाल समाजाचा आहे. “हम मूर्तीकारी है.” त्याचं लहानपण इच्छापूर गावी आपल्या चुलत्यांच्या मूर्तीशाळेत गेलं होतं आणि तिथे त्याने लागेल तशी मदत देखील केली होती त्यामुळे कृष्णनगरमध्ये काम मिळण्याइतकं कसब त्याच्याकडे होतं. आपल्या मातीच्या मूर्ती आणि बाहुल्यांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. त्याला नक्की किती कला येते हे तपासण्यासाठी त्याला सर्वात आधी भाताचा पेंढा आणि तागाच्या दोरांपासून एक मूर्ती तयार करायला सांगितलं. बोनीला काम मिळालं. २०० रुपये रोज मिळत होता आणि सगळ्यांपासून दूर असं गुपित आयुष्य सुरू झालं होतं.

PHOTO • Riya Behl
PHOTO • Riya Behl

डावीकडेः बोनी इच्छापूरमध्ये आपल्या चुलत्यांच्या मूर्तीशाळेत, त्यांना मदत करत तो ही कला इथे शिकला. उजवीकडेः भाताचा पेंढा आणि तागापासून तयार केलेला मूर्तीचा सांगाडा. कृष्णनगरमध्ये काम मिळण्याआधी परीक्षा म्हणून त्याला असाच एक सांगाडा तयार करायला सांगण्यात आलं होतं

तिथे इच्छापूरमध्ये बोनीचे आई-बाबा, निवा आणि अधीर त्याची मोठी बहीण शंकरी आणि भाचा भोलासोबत राहत होते. बोनीने घर सोडून तीन वर्षं झाली होती. थंडीच्या कडाक्यात एका सकाळी त्याने आपल्या घरी जाऊन यायचं ठरवलं. “गावातल्या लोकांनी संध्याकाळी माझ्यावर हल्ला केला. मी चपळ असल्याने कसा तरी पळून आलो. पण मी पळालो ते पाहून माझी आई मात्र रडत होती.”

हल्ला होण्याचा आणि त्यातून सुटका करून घेण्याचा हा काही एकटा प्रसंग नव्हता. पण त्या दिवशी त्याने स्वतःलाच एक वचन दिलं. “मला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की मी देखील माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. आणि मी हेही ठरवलं की माझ्या शरीरात जे काही दोष आहेत तेही मी दुरुस्त करणार,” तो सांगतो. मग बोनीने शस्त्रक्रिया करून घेण्याचं ठरवलं.

आपल्या प्रजनन अवयवांची शस्त्रक्रिया करू शकतील अशा डॉक्टरांचा शोध घ्यायला त्याने सुरुवात केली. आणि मग अखेर चार तासाच्या अंतरावर कोलकात्याजवळ सॉल्ट लेक मध्ये त्याला एक डॉक्टर सापडले. “दर शनिवारी डॉ. बी. एन. चक्रबोर्ती इतर १०-१५ डॉक्टरांसोबत बसायचे. आणि ते सगळे मला तपासायचे,” बोनी सांगतो. पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. “माझ्या डॉक्टरांनी बांग्लादेशच्या तिघा जणांवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली होती आणि त्या तिन्ही यशस्वी झाल्या होत्या,” बोनी सांगतो. पण अर्थात प्रत्येकाचं शरीर वेगळं असल्यामुळे या शस्त्रक्रियेआधी त्याला डॉक्टरांबरोबर अनेक वेळा चर्चा करावी लागली.

सगळ्या शस्त्रक्रियांसाठी मिळून २ लाखांचा खर्च येणार होता. पण बोनी मागे हटणार नव्हता. २००३ साली बोनीने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (एचआरटी) सुरू केली. टेस्टोस्टेरोनच्या निर्मितीला चालना देणारं टेस्टोव्हिरॉन हे २५० मिग्रॅचं इंजेक्शन घेण्यासाठी दर महिन्याला तो १०० रुपये खर्च करत होता. औषधं, डॉक्टरांकडे येणं जाणं आणि शस्त्रक्रियेचा खर्च भागवण्यासाठी बोनी रोजंदारीवर काम करायला लागला. कृष्णनगरमध्ये मूर्ती बनवण्याचं काम करत करत तो कोलकात्याच्या विविध भागात रंगकामाची कामं तो घ्यायला लागला.

“माझ्या ओळखीचा एक जण सुरतेतल्या एका कारखान्यात मूर्ती तयार करायचा. मग मी देखील तिकडे गेलो,” बोनी सांगतो. दिवसाला १,००० रुपये रोजाने तिथे आठवड्यातले सहा दिवस काम केलं. गणेश चतुर्थी आणि जन्माष्टमीसाठी मूर्ती तयार केल्या.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या दुर्गा पूजा आणि जगधात्री पूजेसाठी बोनी दर वर्षी कृष्णनगरला यायचा. २००६ सालापर्यंत हे असंच चालू होतं. त्यानंतर मात्र तो कृष्णनगरमधून मूर्ती तयार करण्याचं गुत्तं घ्यायला लागला. “सुरतेत मी १५०-२०० फूटी मूर्ती कशा करायच्या ते शिकलो होतो आणि इथे तशाच मूर्तींना मागणी होती,” तो सांगतो. “मग मी हाताखाली एखाद्या कारागिराला घ्यायचो आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान उत्सवांच्या धामधुमीत भरपूर कमाई करायचो.”

PHOTO • Riya Behl
PHOTO • Riya Behl

डावीकडेः बोनी आणि स्वाती. उजवीकडेः बोनी आणि त्याची आई निवा, इच्छापूरच्या आपल्या घरी

या दरम्यानच बोनी स्वाती सरकारच्या प्रेमात पडला. ती देखील कृष्णनगरमध्ये मूर्ती तयार करायची. स्वातीने शाळा सोडली होती आणि आपली आई व चार बहिणींसोबत ती मूर्ती सजवण्याचं काम करायची. तेव्हाचा काळ बोनीसाठी फार खडतर होता. “मला तिला सगळं सांगावंच लागणार होतं. आणि माझ्या डॉक्टरांनी मला वचन दिलं होतं [की शस्त्रक्रिया यशस्वी होईल, असं]. मग मी तिला सगळं सांगून टाकायचं ठरवलं.”

स्वाती आणि तिची आई दुर्गा दोघी त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या. २००६ साली बोनीच्या शस्त्रक्रियेआधी संमतीपत्रावर देखील स्वातीची सही आहे. त्यानंतर तीन वर्षांनी बोनी आणि स्वातीने लग्न केलं.

स्वातीला आठवतं की त्या रात्री तिच्या आईने बोनीला सांगितलं होतं, “माझ्या मुलीला तुझ्या शरीरात काय वेगळं आहे ते माहित आहे आणि तरीही तिने तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मी काय बोलणार? तुमी शात दिबा, तुमी थाकबा [तू तिची साथ सोडणार नाहीस. कुठेही जाणार नाहीस].”

***

बोनी आणि स्वातीचा संसार सुरू झाला पण त्यांना मुक्काम हलवावा लागला. कृष्णनगरमधले लोक त्यांच्याविषयी काहीबाही बोलायला लागले. पण त्यांनी इथून अर्धा किलोमीटरवर असलेल्या दार्जिलिंग जिल्ह्याच्या माटिगारामध्ये जायचं ठरवलं. तिथे त्यांना ओळखणारं कुणीच नव्हतं. बोनीने तिथल्या जवळच्या एका मूर्तीशाळेत काम शोधलं. “त्यांनी माझं काम पाहिलं आणि मला ६०० रुपये रोज देऊ केला, मी तयार झालो,” तो सांगतो. “माटिगाराच्या लोकांनी मला खूप सारं प्रेम दिलंय,” तो सांगतो. तिथल्या पुरुषांनी त्याला आपल्यातलाच एक मानलं. संध्याकाळी चहाच्या टपरीवर सगळे त्याच्यासोबत मस्त गप्पाटप्पा करायचे.

PHOTO • Riya Behl
PHOTO • Riya Behl

डावीकडेः इच्छापूरमध्ये एका चहाच्या टपरीवर बसलेला बोनी. उजवीकडेः स्थानिक व्यावसायिक, पुष्पनाथ देवनाथ (डावीकडे), लाकडा एक व्यापारी आणि नारळपाणी विकणाऱ्या गोरांग मिश्रा (उजवीकडे) यांच्यासोबत

पण या जोडप्याला इच्छापूरला काही परत जाता आलं नाही कारण बोनीच्या घरची मंडळी त्यांचा स्वीकार करायला राजी नव्हती. बोनीचे वडील वरण पावले पण त्याला त्यांच्या अंत्यसंस्कारालाही येऊ दिलं नव्हतं. “फक्त क्रीडाक्षेत्रातले लोक नाही, या समाजाच्या भीतीमुळे माझ्यासारखे किती तरी जण घराच्या बाहेरही पडत नाहीत,” तो सांगतो.

या दोघांना असं वाटतं की I am Bonnie हा त्याच्या आयुष्यावरचा बोधपट तयार केला गेला आणि तेव्हा कुठे त्यांच्या संघर्षाची दखल घेतली गेली. २०१६ साली कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून या बोधपटाला पुरस्कार मिळाला. त्यानंतर लगेचच किशलय बालगृहामध्ये बोनीला फूटबॉल प्रशिक्षक म्हणून नोकरीचा प्रस्ताव आला. हे बालगृह पश्चिम बंगाल बाल हक्क आयोगाकडून चालवलं जातं. “आम्हाला असं वाटलं की तो मुलांसाठी एक प्रेरणा ठरू शकतो,” आयोगाच्या अध्यक्ष अनन्या चक्रबोर्ती चटर्जी सांगतात. “आम्ही जेव्हा बोनीला प्रशिक्षकपदी नेमण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला माहित होतं की तो एक उत्तम फूटबॉलपटू आहे आणि आजवर त्याने राज्यासाठी अनेक पुरस्कार मिळवून आणले आहेत. तरीही त्याच्याकडे काम नव्हतं. त्यामुळे तो किती चांगला खेळाडू आहे याची आम्ही जाणीव ठेवणं आमच्यासाठी खरंच फार महत्त्वाचं होतं,” त्या सांगतात.

२०१७ एप्रिलपासून बोनी तिथे प्रशिक्षक म्हणून काम करतोय. तिथे तो रंगकाम आणि शिल्पकला या विषयांचंही प्रशिक्षण देतो. तो आपली लैंगिक ओळख काय आहे याबद्दल मुलांशी मोकळेपणाने बोलतो आणि अनेकांसाठी तो एक विश्वासातला, हक्काचा कान आहे. तरीही त्याला भविष्याची चिंता लागून राहते. “माझ्यापाशी कायमस्वरुपी नोकरी नाहीये. ज्या दिवशी काम असतं तेवढ्यापुरतं मानधन मला मिळतं,” तो सांगतो. एरवी त्याला महिन्याला १४,००० रुपये पगार मिळतो पण २०२० साली आलेल्या कोविडच्या महामारीनंतर अनेक महिने त्याची कमाईच होऊ शकली नाही.

२०२० साली फेब्रुवारी महिन्यात बोनीने घर बांधण्यासाठी पाच वर्षांचं कर्ज घेतलं. इच्छापूरमध्ये आपल्या आईच्या घरापासून अगदी काही पावलं दूर. आता तो आणि स्वाती तिथे आपली आई, भाऊ आणि बहिणीसोबत राहतायत. आपल्या आयुष्यातला जास्त काळ तर बोनीला याच घरातून पळून जावं लागलं होतं. फूटबॉलपटू म्हणून बोनीने जे काही कमावलंय ते आता या घराच्या बांधकामावर खर्च झालंय. तिथली एक खोली आता त्याची आणि स्वातीची बेडरुम आहे. अजूनही त्यांच्या कुटुंबाने त्यांना पूर्णपणे स्वीकारलेलं नाही. त्यामुळे खोलीबाहेरच्या व्हरांड्यात त्यांची वेगळी चूल मांडलेली आहे.

PHOTO • Riya Behl
PHOTO • Riya Behl

डावीकडे: बोनी आणि स्वाती इच्छापूरमधल्या आपल्या अर्धवट बांधून झालेल्या घरापाशी. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या छोट्याशा बेडरुममध्ये ठेवलेल्या सगळ्या चषक आणि पुरस्कारांच्या शोकेसला नव्या घरात एक कायमची पक्की जागा मिळेल

आपल्या आयुष्यावरच्या सिनेमाचे हक्क विकून येणाऱ्या पैशातून बोनी उरलेलं ३ लाख ४५ हजाराचं कर्ज फेडणार होता. पण मुंबईच्या चित्रपटकर्त्याला अजून हा सिनेमा प्रदर्शितच करता आला नाहीये आणि त्यामुळे बोनीचं कर्जही अजून फिटलेलं नाहीये.

आजवर मिळवलेले अनेक चषक, पुरस्कार आणि प्रमाणपत्रं ठेवलेल्या शोकेससमोर बसलेला बोनी इंटरसेक्स व्यक्ती म्हणून आयुष्यात आलेले सगळे अनुभव आम्हाला सांगतो. सगळं आयुष्य अनिश्चततेत जात असलं तरीही स्वाती आणि त्याने वर्तमानपत्रातली सगळी कात्रणं, फोटो आणि सगळी स्मृतीचिन्हं एका लाल बॅगेत नीट भरून ठेवली आहेत. शोकेसच्या वरच ही बॅग ठेवलेली दिसते. दोन वर्षांपूर्वी घराचं काम सुरू केलंय. जेव्हा त्यांचं नवीन घर बांधून पूर्ण होईल तेव्हा त्यात या शोकेससाठी कायमची, पक्की जागा असेल अशी दोघांनाही आशा आहे.

“अजूनही कधी कधी मी माझ्या गावात काही क्लबबरोबर १५ ऑगस्टला मैत्रीपूर्ण सामने खेळतो,” बोनी म्हणतो. “पण भारतासाठी काही मला परत खेळता आलं नाही.”

अनुवादः मेधा काळे

Riya Behl

రియా బెహల్ జెండర్, విద్యా సంబంధిత విషయాలపై రచనలు చేసే ఒక మల్టీమీడియా జర్నలిస్ట్. పీపుల్స్ ఆర్కైవ్ ఆఫ్ రూరల్ ఇండియా (PARI)లో మాజీ సీనియర్ అసిస్టెంట్ ఎడిటర్ అయిన రియా, PARIని తరగతి గదిలోకి తీసుకువెళ్ళడం కోసం విద్యార్థులతోనూ, అధ్యాపకులతోనూ కలిసి పనిచేశారు.

Other stories by Riya Behl
Translator : Medha Kale

మేధా కాలే పూణేలో ఉంటారు. ఆమె మహిళలు, ఆరోగ్యం- ఈ రెండు అంశాల పైన పనిచేస్తారు. ఆమె పీపుల్స్ ఆర్కైవ్ ఆఫ్ ఇండియాలో మరాఠీ భాషకు అనువాద సంపాదకులుగా పని చేస్తున్నారు.

Other stories by Medha Kale