अंजन गावाजवळचा पवित्र डोंगर आणि त्याच्या माथ्यावरच्या पांढऱ्या आणि भगव्या पताका. पांढऱ्या पताका निसर्गपूजक असणाऱ्या सरना आदिवासींच्या आहेत. या पताका किंवा झारखंडच्या उरांव आदिवासींच्या आहेत. भगवे झेंडं हिंदूंचे. १९८५ साली त्यांनी या डोंगराच्या माथ्यावर हनुमानाचं मंदिर बांधलं होतं. हिंदू देवता असलेल्या हनुमानाचा जन्म इथेच झाला असा त्यांचा दावा होता.
बांबूच्या कमानीवर दोन्ही भाविकांचं स्वागत करणारे दोन फलक आहेत. दोन्हीवर आपापल्या समित्यांची नावं लिहिलेली आहेत. वनखातं आणि अंजन गावाचे रहिवासी एकत्रितरित्या चालवत असलेलं गुमला वन प्रबंधन मंडल (संयुक्त ग्राम वन प्रबंधन समिती) २०१६ पासून या तीर्थस्थळाचं तसंच वाहनतळाचं व्यवस्थापन करत आहे. २०१९ साली हिंदूंनी अंजन धाम मंदिर विकास समिती स्थापन केली आणि ती मंदिराची व्यवस्था पाहते.
प्रवेशद्वारातून आत आलं की लगेचच वर जाणारे दोन जिने आहेत. हे दोन्ही जिने वेगवेगळ्या मंदिरात जातात. एका जिन्याने तुम्ही डोंगरमाथ्यावरच्या हनुमान मंदिरात जाऊ शकता आणि दुसऱ्या जिन्याने तुम्ही दोन गुहांमध्ये पोचता. हिंदूंचं मंदिर अस्तित्वात नव्हतं तेव्हापासून इथे आदिवासी ‘पाहन’ म्हणजे भगत इथल्या देवाची पूजा करत आले आहेत.
दोन्ही देवळांपाशी दोन वेगवेगळ्या दानपेट्या ठेवलेल्या आहेत. आणि अर्थातच दोन वेगळ्या देवांच्या सेवेकऱ्यांनी दोन वेगवेगळ्या उद्दिष्टांनी या पेट्या ठेवल्या आहेत हे सांगायला नको. एक गुहेच्या बाहेर आणि एक मंदिराच्या आत. तिसरी एक पेटी देवळाच्या प्रांगणात आहे. ती आहे बजरंग दलाची. या पेटीतल्या पैशाचा उपयोग मंगळवारच्या भंडाऱ्यासाठी केला जातो. यातून भक्त आणि संतांच्या जेवणाची सोय केली जाते. अंजग गावाच्या डोंगराच्या पायथ्याशी आणखी एक दानपेटी आहे. त्यामध्ये गोळा झालेला पैसा आदिवासींना पूजासाहित्य खरेदी करण्यासाठी वापरला जातो.
“हा प्रदेश पूर्णपणे आदिवासींचा आहे. अंजनगावात या आधी कुणी पंडित वगैरे काही नव्हतं,” गावाचे माजी प्रधान रंजय उरांव, वय ४२ मला देवळांच्या व्यवस्थेविषयी सांगतायत. “हे इतक्यात वाराणसीचे पंडित लोक इथे आले आहेत. इथले उरांव आदिवासी किती तरी वर्षांपासून प्रकृती देवी अंजनीची उपासना करतात. पण या अंजनीचा संबंध हनुमानाशी आहे याचा आम्हाला कणही गंध नव्हता,” ते म्हणतात.
रंजय यांच्या सांगण्यानुसार, “पंडित आले आणि त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की अंजनी ही प्रत्यक्षात हनुमानाची आई होती. अंजन हे हनुमानाचं पवित्र जन्मस्थळ असल्याचं घोषित केलं. आणि आम्हाला काही कळायच्या आत डोंगराच्या माथ्यावर हनुमानाचं मंदिर पण बांधून झालं. त्यांनी ती जागा अंजन धाम असल्याचं जाहीर करून टाकलं.”
ते सांगतात की आदिवासींनी मंदिर बांधण्याची मागणी कधीच केली नव्हती. सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पातळीवर हे सगळं ठरलं असावं. त्या काळी झारखंड बिहारमध्ये होतं.
अंजन गावातल्या हनुमान मंदिरातलेपंडित केदारनाथ पांडेय यांच्याकडे मंदिर कसं निर्माण झालं याची एक भन्नाट कथा आहे. दोन कुटुंबं या मंदिराची व्यवस्था पाहतात त्यातलं एक ४६ वर्षीय केदारनाथ यांचं. “माझे आजोबा माणिकनाथ पांडेय यांना एक दिवसात स्वप्नात असा साक्षात्कार झाला की हनुमानाचा जन्म याच डोंगरातल्या एका गुहेत झाला आहे,” ते सांगतात.
ते स्वप्न पडल्यानंतर त्यांच्या आजोबांनी डोंगरावर जायला सुरुवात केली. तिथे जाऊन ते पूजा करायचे आणि रामायणाचा पाठ वाचायचे. “अंजना गौतमऋषी आणि त्यांची पत्नी अहल्येची मुलगी.” आपल्या आजोबांकडून ऐकलेली गोष्ट ते आम्हाला सांगू लागतात. “ती शापित होती आणि या डोंगरावर आली. त्यांच्याच नावावरून या डोंगराचं नाव पडलं अंजना पर्वत. ती शंकराची भक्त होती. एक दिवस शंकर भगवान तिच्यासमोर प्रकट झाले आणि शापातून सुटका मिळण्यासाठी त्यांनी तिच्या कानात एक मंत्र सांगितला. आणि याच मंत्राच्या प्रभावामुळे हनुमानाचा जन्म त्यांच्या कुशीतून नाही तर मांडीतून झाला.”
“त्या काळी रघुनाथ सिंह गुमलाचे एसडीओ होते. ते माझ्या वडलांचे अगदी जवळचे मित्र. त्या दोघांनी मिळून ठरवलं की या डोंगरावर हनुमानाचं एक मंदिर बांधावं. सुरुवातीला आदिवासींनी याला विरोध केला आणि डोंगरावर जाऊन बकऱ्याचा बळी दिला. पण शेवटी मंदिर बांधलं गेलं आणि हे स्थळ अंजन धाम असल्याचं जाहीर करण्यात आलं,” ते कसलीही तमा न बाळगता हे सगळं मला सांगतात.
अंजन गावाचं नाव अंजनी माईच्या नावावरून पडलं आहे. ही एक आदिवासी देवता आहे. निसर्गाची एक शक्ती. गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की ही देवता गावाच्या सभोवताली असलेल्या डोंगरांमध्ये वास करते. ते शेकडो वर्षांपासून डोंगरातल्या गुहांमध्ये तिची पूजा करत आले आहेत.
गावाचे रहिवासी महेश्वर उरांव, वय ५० सांगतात, “लोक किती तरी वर्षं या डोंगरात शिळा पूजतायत. आणि ही निसर्गपूजा होती. या डोंगरावर हनुमानाचा जन्म झाल्याची गोष्ट अगदी अलिकडे सांगू लागले आहेत.”
गावाचे प्रधान बिरसा उरांव, वय ६० यांनी अंजन गावात हे हनुमानाचं मंदिर बांधलं जात होतं ते सगळं काही स्वतः पाहिलं आहे. ते अगदी स्पष्टपणे सांगतात की आदिवासी निसर्गपूजक आहेत. “आदिवासी हिंदू नाहीत. अंजन गाव उरांव आदिवासी बहुल गाव आहे आणि उरांव आदिवासी सरना धर्म मानतात. सरना धर्मात निसर्गाची पूजा केली जाते. वृक्ष, डोंगर, नदी, झरे सगळ्याची पूजा होते. निसर्गातल्या ज्या गोष्टींमुळे आम्ही जिवंत राहू शकतो, जगू शकतो त्या सगळ्याची आम्ही पूजा करतो.”
त्याच गावातल्या ३२ वर्षीय रमणी उरांव म्हणतात की दावातले लोक सरना धर्म मानतात. आणि त्यामध्ये फक्त निसर्गाची पूजा केली जाते. “आमचे लोक आज देखील निसर्गाशी संबंधित सरहुल [वसंतोत्सव] आणि करम [सुगीचा सण] अगदी उल्हासात साजरा करतात. मंदिर नव्हतं तेव्हा काही आम्ही इथे हनुमानाचा जन्म झाला वगैरे गप्पा ऐकल्या नव्हत्या. आम्ही डोंगराची पूजा करायचो. डोंगरातल्या गुहेत काही शिळा होत्या, आम्ही त्या पूजायचो. त्यानंतर हनुमान एकदम लोकप्रिय झाले. मंदिर बांधलं गेलं. मग सगळेच लोक इकडे पूजा करायला येऊ लागले. मग काही आदिवासी मंडळी देखील तिथे पूजा करू लागली.”
झारखंडचे प्रसिद्ध कादंबरीकार आणि कथाकार रणेंद्र कुमार, वय ६३ सांगतात की अंजन गावात आदिवासींच्या देवळावर हिंदूंनी, त्यांच्या मंदिराने कब्जा केला यात खरं तर नवं किंवा आश्चर्यजनक काहीच नाही. ते सांगतात, “आदिवासींच्या अनेक देवतांना फार पूर्वी वैदिक समाजाने आपल्या उपासनेचं अंग बनवलं होतं.”
“सुरुवातीला बौद्ध लोकांनी आदिवासींच्या देवी-देवता आपल्या धर्मात नेल्या. आणि त्यानंतर त्या सगळ्याच हिंदू धर्माचा भाग झाल्या. छत्तीसगडची तारा, वज्र डाकिनीसारख्या देवी या मुळातल्या आदिवासी देवता आहेत,” ते म्हणतात. “समानतेचा बेगडी प्रचार करून आदिवासींना आता हिंदू धर्मात समाविष्ट केलं जातंय.”
झारखंडचे कुडुख भाषेचे प्राध्यापक डॉ. नारायण उरांव सांगतात की बळाचा वापर करून केलं संस्कृतीवरचं आक्रमण आणि समावेश आजही थांबलेला नाही. ते म्हणतात, “मातीच्या छोट्या मूर्ती आणि मडई या सणासाठीच्या खुल्या जागांच्या ठिकाणी देवतांचे मंडप बांधले गेले किंवा हिंदूंची मंदिरं आली.” आणि एकदा का मंदिर बांधलं की तिथे भाविकांची रीघ लागते. आणि मग आदिवासींनी आपल्या प्रथा-परंपरा साजऱ्या करणं मुश्किल होऊन जातं.
“आणि मग तेसुद्धा या मंदिरांमध्ये जाऊ लागतात. रांचीतलं पहाड मंदिर, हरमू मंदिर, अरगोडा मंदिर, कांके मंदिर किंवा मोरहाबादी मंदिर या ठिकाणी हे असंच झालं आहे,” ते म्हणतात. “आजही या मंदिरांच्या शेजारी आदिवासींच्या उपासना स्थळांचे, मंदिरांचे अवशेष दिसतात. ज्या जागांवर, मैदानांमध्ये आदिवासींचे सामुदायिक सण साजरे व्हायचे, जतरा किंवा मंडा जतरासारख्या पूजा मांडल्या जायच्या, त्या जागांचा वापर आता दुर्गा पूजा किंवा जत्रेच्या बाजारासाठी केला जातो. रांचीतल्या अरगोडाशेजारी मोकळा माळ आहे तिथे उरांव-मुंडा लोक पूजा करायचे. आपले सण साजरे करायचे.”
गुंजल इकिर मुंडा आम्हाला रांचीजवळच्या बुंडूमधल्या एका देवडी मंदिराबद्दल सांगतात. तिथे सुरुवातीला कुठलंही मंदिर नव्हतं. पण त्यांचेच नातेवाईक इथे फार पूर्वीपासून पाहन म्हणून आदिवासींसाठी पूजा बांधायचे. “तिथे पूर्वी फक्त एक शिळा होती. मुंडा लोक तिथे येऊन ती शिळा पूजायचे. मंदिर झालं आणि मोठ्या संख्येने हिंदू लोक तिथे यायला लागले आणि ही जागा आमची आहे असा दावा त्यांनी सुरू केला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाच्या आदेशानंतर दोन्ही गटांची पूजा या एकाच ठिकाणी करायला सुरुवात झाली. आठवड्यातले काही दिवस इथे आदिवासींचे पाहन पूजा बांधतात आणि इतर दिवशी पुजारी लोक हिंदूंसाठी पूजा करतात.”
डोंगरावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी पूजा होते. आदिवासी 'पाहन' म्हणजे पुजारी डोंगरातल्या दोन गुहांमध्ये पूजा करतात तर डोंगराच्या माथ्यावर असलेल्या हनुमान मंदिरात हिंदू पंडित पूजा करतात
पण इथे मात्र याहूनही बरंच काही सुरू आहे असं दिसतंय.
इतिहासात खोल शिरल्यावरच आपल्या लक्षात येतं की आदिवासींना हिंदू धर्माच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम फार गुप्तपणे सुरूच आहे. देवी प्रसाद चटोपाध्याय आपल्या लोकायत या पुस्तकात एक फार मोलाचा प्रश्न विचारतात – १८७४ साली वैदिक धर्माचं पालन करणाऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या केवळ १०% होती. असं असताना हिंदूंना बहुसंख्याकांचा दर्जा कसा काय मिळाला? याचं उत्तर आपल्याला भलतीकडेच सापडेल. जनगणनेत.
१८७१ ते १९४१ या कालखंडात भारतात जनगणना झाली तेव्हा आदिवासींच्या धर्माची नोंद वेगवेगळ्या शीर्षकांखाली झालेली दिसते. उदा. आदिवासी, इंडिजिनस (मूलनिवासी), ॲनिमिस्ट (जीवात्मवादी). मात्र १९५१ साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या जनगणनेत विविध परंपरा मानणाऱ्या सगळ्यांना ट्रायब रिलीजन अशा एका नव्या प्रवर्गात टाकलं. १९६१ साली हा प्रवर्ग काढून टाकला आणि हिंदू, ख्रिश्चन, जैन, शीख, मुस्लिम आणि बौद्ध या सोबत ‘इतर’ हा रकाना जोडण्यात आला.
याचा परिणाम असा झाला की २०११ साली झालेल्या जनगणेत भारतातल्या ०.७% लोकांनी स्वतःची ओळख “इतर धर्म व धारणा” अशी केली. देशातल्या अनुसूचित जमातींची लोकसंख्येतील टक्केवारी ८.६ आहे. त्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे.
फार पूर्वी, १९३१ च्या जनगणना अहवालामध्ये भारतातील जनगणना आयुक्त जे. एच. हटन आदिवासी धर्मांबद्दल आपल्या मनात असलेली चिंता व्यक्त करतात. ते लिहितात, “एखादी व्यक्ती जर समाजमान्य धर्माचे असल्याचं नाकारत असेल तर बाकी काही विचारणा न करता तिचा समावेश हिंदू धर्मात करण्याची मानसिकता वाढीस लागते. काय विचार केला जात असेल? या देशाला हिंदुस्तान म्हणतात. हा हिंदूंचा देश आहे त्यामुळे इथे राहणारे लोक हिंदू असले पाहिजेत. त्यांनी आपण इतर कुठल्या धर्माचे असल्याचं स्पष्टपणे सांगितलं तर गोष्ट वेगळी. अन्यथा ते हिंदूच.”
*****
“जनगणनेत आदिवासींनी स्वतःची नोंद कुठे करायची?” अंजन गावाचे रहिवासी ४० वर्षीय प्रमोद उरांव विचारतात.
ते म्हणतात, “आम्ही निसर्गाची पूजा करतो. जगाकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोन खुला आणि सर्वांना सामावून घेणारा आहे. कट्टरतेला इथे थारा नाही. त्यामुळे आमच्यातले काही जण हिंदू, किंवा इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारतात तेव्हा देखील धर्माच्या नावाखाली आम्ही खून करत नाही. आमचे लोक डोंगरावर जाऊन हनुमानाची पूजा जरी करत असले तरी आपण त्यांना हिंदू म्हणू शकत नाही.”
“रकाना काढला गेला. आमच्यातले बरेच जण जनगणनेत स्वतःची नोंद हिंदू अशी करतात. पण आम्ही हिंदू नाही. जात व्यवस्था हे या धर्माचं मूळ आहे. पण आम्ही या व्यवस्थेचा भाग नाही.”
अंजन गावातले बिरसा उरांव म्हणतात, “आदिवासी फार खुल्या विचारांचे, लवचिक आहेत. त्यांच्या धारणांचा कुणाला स्वीकार करायचा असेल तरी काहीच हरकत नाही. यामध्ये कुणाला सामील व्हायचं असेल तर त्यांची काहीच हरकत नसते. उलट ते आलेल्यांचा मान ठेवतील. या अंजन धामात अनेक हिंदू पूजा करायला येतात, कित्येक मुसलमानही येतात. त्या सगळ्यांचं स्वागतच आहे. अनेक आदिवासी आता दोन्हीकडे पूजा करतात. डोंगरावरच्या गुहांमध्ये आणि हनुमान मंदिरात देखील. पण आजही ते स्वतःला आदिवासी मानतात. हिंदू नाही.”
हनुमानाच्या पूजेचा प्रश्न तितकासा सरळसाधा नाही.
गावातलेच महेश्वर उरांव सांगतात, “आदिवासी इथे राम किंवा लक्ष्मणाची पूजा करत नाहीत. पण लोकांचं म्हणणं आहे की हनुमान सवर्ण समुदायातले नव्हते. ते आदिवासी होते. त्यांना माणसाचा चेहरा आणि प्राण्याचं धड देऊन सवर्णांनी आदिवासींची चेष्टा केलीये. इतकंच नाही त्यांनी हनुमानाची देखील खिल्ली उडवली आहे.”
रंजय उरांव यांच्या मते लोकांनी पंडितांचं म्हणणं मान्य केलं कारण त्यांच्या मते हनुमान सवर्ण समाजाचे नव्हते. ते म्हणतात, “ते जर त्यांच्यातलेच एक असते तर त्यांना शेपटी कशी काय असती? त्यांना एखाद्या प्राण्याच्या रुपात दाखवलं गेलं आहे कारण ते आदिवासी होते. आणि म्हणूनच अंजनी माई आणि हनुमानाची गोष्ट सांगितली गेली तेव्हा त्यांना ती पटली.”
गावातल्या ३८ वर्षीय मुखिया गुंजल करमी उरांव यांना गावातले लोक वर्षातून एकदा डोंगराची पूजा करायला जायचे तो काळ आजही आठवतो. त्या म्हणतात, “तेव्हा तिथे फक्त गुहा होत्या. लोक तिथे जायचे आणि पाऊस पडू दे म्हणून प्रार्थना करायचे. आजही आम्ही तीच परंपरा पाळतोय. आणि आम्ही सगळे मिळून जेव्हा एकत्र प्रार्थना करतो तेव्हा इथे नेहमी पाऊस पडतो.”
“आजकाल लोक मंदिराला प्रदक्षिणा घालतात. कारण तेही त्याच डोंगरावर आहे. काही आदिवासी मंदिराच्या आत जाऊनही पूजा करतात. जिथे कुठे मनाला शांतता मिळेल तिथे जाण्याची मोकळीक प्रत्येकालाच आहे,” त्या म्हणतात.
गावातल्या इतर बायांचं देखील हेच म्हणणं आहे की त्या स्वतःला हिंदू मानत नाहीत. पण त्यातले काही जण देवळात जाऊन देवाची पूजाही करतात. “एखादं मंदिर डोंगरावर असलं की ते त्या डोंगराचा भाग बनून जातं ना. डोंगराची पूजा करणारे लोक त्या हनुमानाला का बरं वेगळं काढतील? आता, दोन दोन देव एकत्र येऊन काही करतायत, आमच्यासाठी चांगला पाऊस पाडतायत, तर बरंच आहे की. काही नुकसान आहे का?”