अगदी झिजलेल्या चपलासुद्धा कष्टकरी जिवापाड
जपतात. माल लादणाऱ्या आणि उतरवणाऱ्या माथाड्यांच्या चपलांना खड्डे पडलेले असतात
आणि त्या आतून झिजलेल्या असतात. एखाद्या लाकूडतोड्याच्या चपलेत काटे सापडणारच.
माझ्या स्वतःच्या स्लिपर मी कितीदा तरी काटापिन लावून वापरल्या आहेत.
देशभर इथेतिथे फिरत असताना मी लोकांच्या
चपलांचे फोटो काढलेत. आणि त्या फोटोंमधून त्या चपलांमागच्या कहाण्या शोधण्याचा
प्रयत्न केलाय. आणि त्या गोष्टी शोधत असतानाच माझा स्वतःचा प्रवास सुद्धा कुठे तरी
मला सापडत गेलाय.
इतक्यात कधी तरी मी ओडिशाच्या जाजपूरला गेलो
होतो कामानिमित्त. तिथे बाराबंकी आणि पुराणमंतिरा या गावांना जायची संधी मिळाली.
आम्ही जिथे कुठे जायचो तिथे आदिवासी मंडळी जमलेली असायची त्या खोलीबाहेर पायताणं
अगदी ओळीने मांडून ठेवलेली असायची.
सुरुवातीला माझं फारसं काही लक्ष नव्हतं. पण
तीन दिवसांनंतर मात्र त्या झिजलेल्या, विटलेल्या चपलांकडे माझं लक्ष जायला लागलं.
काहींना अगदी भोकं पडलेली होती.
माझी आणि माझ्या पायताणांची गोष्टही अशीच माझ्या मनावर कोरलेली आहे. माझ्या गावी सगळ्यांकडे रबरी स्लिपर असायच्या. मी १२ वर्षांचा असेन. मदुराईत तेव्हा त्यांची किंमत २० रुपये होती. पण आमच्यासाठी चपला फार महत्त्वाच्या होत्या त्यामुळे त्या घेण्यासाठी आमचं सगळं घर भरपूर कष्ट करायचं.
बाजारात नवीन चप्पल आली की आमच्या गावातल्या
एखाद्या मुलाकडे ती यायची. आणि मग आम्ही एखाद्या सणाला किंवा बाहेरगावी जायचं असेल
तर ती चप्पल त्याच्याकडून मागून घ्यायचो आणि घालून जायचो.
जाजपूरहून परत आल्यापासून माझ्या आसपासच्या
चपला आणि पायताणाकडे माझं जास्त लक्ष जायला लागलंय. माझ्या आयुष्यात घडून गेलेल्या
काही प्रसंगांशी काही चपलांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. पायात बूट नाहीत म्हणून मला
आणि माझ्या काही मित्रांना पीटीचे शिक्षक ओरडले होते तेही अजून लक्षात आहे.
या चपलांचा माझ्या फोटोग्राफीवरही प्रभाव
पडलाय. शोषित, वंचित समाजाला फार मोठा काळ पायताण घालण्याची परवानगीच नव्हती. आणि
या गोष्टीचा विचार केल्यावरच माझ्या मनात या चपलांचं महत्त्व नव्याने निर्माण
झालं. त्या विचाराने माझ्या मनात एक बीज रोवलं आणि तेव्हापासून दिवस रात्र राबत
असलेल्या कष्टकऱ्यांचा संघर्ष आणि त्यांच्या चपला-बुटं माझ्या कामातून मी कसं
दाखवू शकेन याचा मी सतत प्रयत्न करतोय.