“पानी ले लो! पानी!”
थांबा. पाण्याची भांडी आणि बादल्या काढू नका इतक्यात. कारण पाणी घेऊन येणारा हा टँकर जरा लहानच आहे म्हणायचा. प्लास्टिकची बाटली, एक जुनी रबराची चप्पल, प्लास्टिकच्या पाईपचा एक छोटासा तुकडा आणि काड्यांनी बनवलेल्या या टँकरमध्ये जास्तीत जास्त ग्लासभर पाणी बसेल.
बलवीर सिंग, भवानी सिंग, कैलाश कंवर आणि मोती सिंग यांची ही निर्मिती. सांवता गावातल्या या टोळीतला सगळ्यांची वयं ५ वर्षं आणि ते १३ वर्षं. राजस्थानच्या अगदी पूर्वेकडच्या भागातल्या त्यांच्या गावात आठवड्यातून दोनदा पाण्याचा टँकर येतो. आणि तो आला की घरच्या सगळ्यांना असा काही आनंद होतो की ते पाहून त्यांनी त्यांचा हा खेळण्यातला टँकर तयार केला.
![](/media/images/02a-DSC00278-U-The_water_tanker.max-1400x1120.jpg)
![](/media/images/02b-DSC00284-U-The_water_tanker.max-1400x1120.jpg)
डावीकडेः जैसलमेरमध्ये आपल्या घराबाहेरच्या केर झाडाखाली खेळत असलेला भवानी सिंग (बसलेला). उजवीकडेः खेळण्याची दुरुस्ती आणि जुळणी सुरू आहे
![](/media/images/03a-DSC00292-U-The_water_tanker.max-1400x1120.jpg)
![](/media/images/03b-DSC00287-U-The_water_tanker.max-1400x1120.jpg)
डावीकडेः कैलाश कंवर आणि भवानी सिंग आपल्या घरी आणि घराभोवती खेळतायत. उजवीकडेः टँकर निघाला
या प्रांतात मैलोन मैल शुष्क जमीन पहायला मिळते. जमिनीच्या पोटात पाणी नाही. आसपासच्या ओरण म्हणजेच देवरायांमध्ये काही मोठे तलाव किंवा तळी आहेत. पाण्याचा तेवढाच स्रोत आहे.
कधी कधी पाण्याच्या टँकरऐवजी प्लास्टिकची बरणी अर्धी कापून ते एक टिपर बनवतात. हे सगळं कसं काय करतात या प्रश्नावर त्यांनी सांगून टाकलं की या सगळ्या वस्तू गोळा करण्यात वेळ फार जातो कारण कुठून कुठून सगळं शोधावं लागतं.
एकदा का गाडीचा सांगाडा पक्का तयार झाला की मग तारेने खेळणं जोडायचं आणि लाकडाच्या काठीने खडखडत्या चाकांवर टँकर किंवा टिपर पळायला तयार. घराबोहरच्या केर झाडापासून ते आपापल्या घरापर्यंत वाऱ्या सुरू. हे सगळे एकमेकांपासून अगदी हाकेच्या अंतरावर राहतात.
![](/media/images/04a-DSC00330-U-The_water_tanker.max-1400x1120.jpg)
![](/media/images/04b-DSC00303-U-The_water_tanker.max-1400x1120.jpg)
डावीकडून उजवीकडेः कैलाश कंवर, भवानी सिंग (मागे), बलवीर सिंग आणि मोती सिंग (पिवळा सदरा). उजवीकडेः सांवतामधले बहुतेक सगळे शेती करतात आणि शेरडं पाळतात