सुकुमार बिस्वास नारळ विकतात. पण ते काही साधेसुधे विक्रेते नाहीत बरं. तहानलेल्या गिऱ्हाइकांसाठी शहाळी सोलत असतानाही ते गातात. कारण त्यांचं संगीतावरचं प्रेम. “मी अन्नाशिवाय जगू शकतो, पण गाण्याशिवाय नाही,” ते म्हणतात. शांतीपूरच्या लंकापाडाच्या परिसरात त्यांना लोक डाबदादू (नारळवाले आजोबा) म्हणूनच ओळखतात.
सत्तर वर्षांचे डाबदादू स्ट्रॉ घालून शहाळं देतात, पाणी पिऊन झालं की ते फोडून त्यातली मलई खायला देतात. आणि हात या कामात गुंतलेले असले तरी ओठावर गाणी मात्र कायम सुरूच असतात. लालोन फकीर, शाह अब्दुल करीम, भाबा ख्यापा आणि इतर काही गूढत्वाचा शोध घेणाऱ्या कवींची गाणी ते गातात. या गाण्यांमध्ये त्यांना आयुष्याचा अर्थ सापडतो असं म्हणत ते आम्हाला एका गाण्याचा अर्थ त्यांच्या शब्दात समजावून सांगतात. “आपण सत्यापर्यंत पोचू शकतो, पण कधी? जेव्हा सत्य काय आहे हे आपल्याला माहित असेल तेव्हाच. आणि सत्य काय हे समजून घ्यायचं असेल तर आपल्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे. लबाडीपासून आपण सुटका करून घेऊ शकलो तरच आपण दुसऱ्यांवर प्रेम करू शकतो.”
तर दिवसभर ते आपली टोली म्हणजेच सायकलला जोडलेली गाडी घेऊन गावाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जात असतात. तेही गाणी गात. त्यांच्या गाण्याचा आवाज आला की लोकांना समजतं की डाबदादू आलेत म्हणून.
“काही लोक तर शहाळी विकत पण घेत नाहीत. थोडा वेळ माझं गाणं ऐकत थांबतात फक्त. माझी काहीच हरकत नसते. तसंही फार काही शहाळी विकली जातील अशी माझी अपेक्षा नसतेच. आहे त्यात मी सुखी आहे,” गिऱ्हाइकांशी बोलता बोलता ते आम्हाला सांगतात.
सुकुमार दादूंचा जन्म बांग्लादेशातल्या कुश्तिया जिल्ह्यातला. त्यांचे वडील मासे धरून प्रपंच चालवायचे. ज्या काळात मासळी मिळायची नाही तेव्हा रोजंदारी करायचे. १९७१ साली तेव्हाच्या ईस्ट पाकिस्तानमध्ये म्हणजेच आताच्या बांग्लादेशात युद्ध सुरू झालं. बहुसंख्य लोक भारतात शरणार्थी म्हणून आले. सुकुमार दादू त्यातलेच एक. “जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा सगळ्यांच्या नजरेत आम्ही शरणार्थी – रेफ्युजी होतो. बहुतेक जणांच्या डोळ्यात आमच्याप्रती दया असायची,” ते भारतात आले तेव्हा सोबत फक्त माशाची जाळी घेऊन आले होते.
सुकुमार दादूंचं कुटुंब सगळ्यात आधी पश्चिम बंगालच्या शिकारपूर गावी पोचलं. काही महिने तिथे राहिल्यानंतर ते मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या जियागंज-अझीमगंजमध्ये स्थायिक झाले. आपले वडील गंगा नदीत कसे मासेमारी करायचे हे सांगताना दादूंचे डोळे लकाकतात. “नंतर बाजारात जाऊन ते मासळी विकायचे आणि चांगले पैसे मिळायचे. घरी आले की म्हणायचे की कसलीही चिंता करू नका. जणू काही त्यांना लॉटरी लागली असावी. ते मासे विकून आम्हाला १२५ रुपये मिळाले होते. आणि त्या काळात १२५ रुपये म्हणजे पुष्कळ होते.”
सुकुमार दादूंनी लहानपणीच अनेक कामं केली आहेतः रेल्वेत वस्तू विकल्या, नदीत नावाडी झाले, रोजंदारी केली आणि बासरी किंवा दोतारासारखी वाद्यं देखील बनवली. काम काहीही करा, त्यांचं गाणं मात्र कधी थांबलं नाही. बांग्लादेशातल्या नदीकाठी आणि हिरव्या कंच रानामधली गाणी आजही त्यांना लक्षात आहेत.
सुकुमार दादू आणि त्यांची पत्नी आता पश्चिम बंगालच्या नडिया जिल्ह्यातल्या शांतीपूरमध्ये राहतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलींची लग्नं झाली आहेत आणि मुलगा महाराष्ट्रात रोजंदारीवर काम करतो. “मी काहीही केलं तरी ते नाही म्हणत नाहीत. मी जसा आहे तसा त्यांना मान्य आहे. त्यांची साथ कायम आहे. रोजच्या कमाईची मला चिंता नाही. मी जन्माला आलो त्याला किती मोठा काळ लोटलाय. पुढचं आयुष्यही मी निश्चंतपणे असंच घालवू शकतो.”