समोर मांडून ठेवलेल्या अनेक चित्रांकडे किंवा छाया-पुतळ्यांकडे पाहत रामचंद्र पुलवार म्हणतात, “आमच्यासाठी ही फक्त कातड्याची चित्रं नाहीत. देवी-देवता आहेत ह्या. दैवी आत्म्यांचं रुप.” अतिशय नाजूक काम केलेल्या या चित्रांचा वापर थोलपावकोथ म्हणजेच सावल्यांच्या खेळांमध्ये केला जातो. केरळच्या मलबार प्रांतामध्ये ही चित्रं वापरून केलेले हे खेळ लोकप्रिय आहेत.
पूर्वी ही चित्रं चक्किलियनसारखे काही विशिष्ट समुदायच तयार करत होते. पण या कलेची लोकप्रियता कमी होत गेली तसं या समाजाच्या लोकांनी पण हे काम सोडून दिलं. म्हणून मग कृष्णनकुट्टी पुलवार यांनी ही कला जिवंत रहावी यासाठी इतरांना ही चित्रं किंवा पुतळ्या कशा तयार करायच्या ते शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या मुलाने एक पाऊल पुढे जाऊन आपल्या कुटुंबातल्या तसंच शेजारपाजारच्या स्त्रियांना या कलेचं प्रशिक्षण द्यायला प्रारंभ केला. राजलक्ष्मी, रजिता आणि अश्वती आज ही चित्रं साकारत आहेत. देवळामध्ये सादर होणाऱ्या या कलाप्रकारावर पुरुषांचीच मक्तेदारी होती तिला आता धक्का द्यायला सुरुवात झाली आहे.
ही चित्रं किंवा पुतळ्या दैवी प्रतिमा आहेत असं त्या घडवणाऱ्या कारागिरांना वाटतंच. पण या चित्रांचे खेळ पाहणाऱ्यांचीही तीच भावना असते. रेडा आणि बकऱ्याच्या कातड्यापासून ही चित्रं तयार केली जातात. सुरुवात कातड्यावर नाजूक नक्षीकाम असणारी चित्रं काढून होते. वेगवेगळ्या प्रकारच्या हत्यारांचा वापर करून या प्रतिमा कोरून काढल्या जातात. कापून, बारीक बारीक छिद्रं करून त्याची नक्षी साकारली जाते. “आजकाल तितके कुशल लोहारही नाहीत त्यामुळे यासाठी लागणारी हत्यारंही मिळेनाशी झाली आहेत,” रामचंद्र यांचे पुत्र राजीव पुलवार सांगतात.
या चित्रांमधली नक्षी पाहिली तर त्यात निसर्ग आणि मिथकांचा वापर जास्त दिसतो. त्यामध्ये तांदळाचे दाणे, चंद्रकला आणि सूर्याच्या प्रतिमा दिसतात. निसर्गाच्या सौंदर्याची दखल आणि त्याप्रती असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त केलेली दिसते. डमरू, शंकराची रुपं, विशिष्ट वेशांचा चित्रात होणारा वापर या खेळांसोबत गायल्या जाणाऱ्या गाण्यांशी सुसंगत असतो. पहाः थोलपावकोथ छाया-पुतळ्यांचे सर्वसमावेशक खेळ
आजही या चित्रांमध्ये नैसर्गिक रंगांचाच वापर केला जातो. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ आहे. आजकाल आधुनिक गरजांचा विचार करून त्यांनी खास करून बकऱ्याच्या कातडीवर ॲक्रिलिक रंगांचा वापर करायला सुरुवात केली आहे. या रंगांमुळे नक्षीकाम आणि रंगसंगतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करता येतात.
थोलपावकोथ केरळच्या मलबार प्रांतातल्या बहुविध संस्कृतींचा संगम असणाऱ्या, धर्मांमध्ये समन्वय साधणाऱ्या परंपरांचं प्रतीक आहे. यामध्ये आता वेगवेगळे कारागीर येऊ लागले आहेत हे नक्कीच सुखद बाब आहे.
हे वार्तांकन मृणालिनी मुखर्जी फौंडेशनच्या फेलोशिपंतर्गत केले आहे.
This story is supported by a fellowship from Mrinalini Mukherjee Foundation (MMF).