अंजना देवींचं असं म्हणणं आहे की बजेट वगैरे सगळं गड्यांचं काम आहे.
“मरद लोग ही जानता है ए सब, लेकिन वो तो नही है घर पर,” त्या म्हणतात. खरं तर घराचं सगळं बजेट त्याच पाहतात, बरं. अंजना देवी चमार या अनुसूचित जातीच्या आहेत.
“बज्जट...” याबद्दल आपण काही ऐकलंय का हे आठवण्याचा त्या प्रयत्न करतात. “ऊ सब ता हम नही सुने है.” बिहारच्या वैशाली जिल्ह्यातल्या सोंधो रत्ती गावात राहणाऱ्या अंजना देवी पुढे म्हणतात, “इ सब पैसा वाला लोग के लिये है.”
अंजना देवींचे पती, शंभू राम, वय ८० कुठे तरी मंडळाबरोबर भजनाला गेले आहेत. ते घरच्या घरी रेडिओ दुरुस्तीचं काम करतात. पण आज काल या कामाला गिऱ्हाईक तरी कुठे आहे? “आठवड्याला कसं तरी करून ३००-४०० येतात,” त्या सांगतात. म्हणजे वर्षाला जास्तीत जास्त म्हटलं तर रु. १६,५००. करदात्यांना १२ लाखापर्यंत करातून सूट देण्यात आली त्या रकमेच्या १.३७ टक्के. ही करसवलतीची मर्यादा त्यांना सांगितल्यावर त्या हसतात. “कधी कधी तर अख्ख्या आठवड्यात १०० रुपये सुद्धा हातात येत नाहीत. मोबाइल फोनचा जमाना आहे. आजकाल कुणीच रेडिओ ऐकत नाही,” त्या तक्रारीच्या सुरात म्हणतात.
![](/media/images/02a-PXL_20250204_115909618-UKR-No_one_list.max-1400x1120.jpg)
![](/media/images/02b-PXL_20250204_113319245-UKR-No_one_list.max-1400x1120.jpg)
डावीकडेः अंजना देवी बिहारच्या वैशाली जिल्ह्यातल्या सोंधो रत्ती गावी राहतात. गावात चमार म्हणजेच चांभार समाजाची १५० घरं आहेत आणि यातली ९० टक्के कुटुंबं भूमीहीन आहेत. उजवीकडेः ८० वर्षीय शंभू राम यांचं रेडिओ दुरुस्तीचं दुकान
![](/media/images/03-PXL_20250202_070903965-UKR-No_one_liste.max-1400x1120.jpg)
घरचं सगळं बजेट स्वतःच पाहणाऱ्या अंजना देवींना केंद्रीय बजेट किंवा अर्थसंकल्पाबद्दल काहीही माहीत नाही
पंतप्रधान नरेंद्री मोदींनी १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा या बजेटने पूर्ण केल्याचं जाहीरही केलं. दिल्ली तख्तापासून ११०० किलोमीटरवर राहणाऱ्या पंचाहत्तरीच्या अंजना देवीही त्यातल्याच एक. त्यांना मात्र पंतप्रधानांचं हे म्हणणं फारसं पटलेलं नाही.
त्यांच्या गावात दुपारची शांतता पसरली आहे. लोक आपापल्या कामात व्यग्र आहेत. बजेट वगैरेचा काही गंधही त्यांना नसावा. आपल्या आयुष्याशी त्याचा काय संबंध लागत नाही याची खात्रीही असावी कदाचित.
अंजना देवींनाही या बजेटकडून फारशा अपेक्षा नाहीत. “सरकार क्या देगा! कमायेंगे तो खायेंगे, नही कमायेंगे तो भुखले रहेंगे.”
गावातले बहुतेक लोक रोजंदारीवर काम करतात आणि कामाच्या शोधात गाव सोडून स्थलांतर करतात. कर भरण्याइतकंही त्यांचं उत्पन्न नव्हतं आणि नाही.
अंजना देवींना दर महिन्याला पाच किलो धान्य मोफत मिळतं. पण नियमित कमाई मिळायला पाहिजे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. “माझ्या नवऱ्याचं वय झालंय. त्यांना आता काम होत नाही. सरकारकडून काही नियमित पगार मिळाला तरच आम्ही जगू शकतो.”