सागाच्या एका मजबूत फांदीला वेटोळं घालून नागोबा बसलेला होता. रत्ती टोला गावातल्या लोकांनी त्याला हुसकण्याचा भरपूर प्रयत्न केला पण तो काही हलेना.
पाच तास प्रयत्नांची शर्थ केल्यानंतर गावकऱ्यांनी मुंद्रिका यादव यांना बोलावलं. ते जवळच्याच वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पात वनरक्षक म्हणून काम करायचे. त्यांनी आजवर वाघ, बिबट्या, गेंडा आणि सापासारख्या २०० पशुप्राण्यांची सुटका केली आहे.
मुंद्रिका आले आणि त्यांनी आधी तो नागोबा झाडावरून खाली यावा यासाठी प्रयत्न सुरू केले. “मी त्याच्या तोंडात बांबूचं टोक घातलं आणि रस्सी आवळली. मग त्याला पिशवीत टाकलं आणि जंगलात सोडून दिलं,” ४२ वर्षीय मुंद्रिका सांगतात. “२०-२५ मिनिटाचं काम होतं.”
बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात असलेल्या या व्याघ्र प्रकल्पाचं क्षेत्र सुमारे ९०० चौ.कि.मी. इतकं आहे. आणि इथे अनेक प्रकारचे पशुपक्षी राहतात सोबत ५४ वाघ आहेत इथे. “हम स्पॉट पर ही तुरंत जुगाड बना लेते हैं,” प्राण्यांची सुटका कशी करतात त्याबद्दल मुंद्रिका सांगतात.
मुंद्रिका जंगल आणि जंगली प्राण्यांच्या सान्निध्यात लहानाचे मोठे झाले. “मी आमची म्हसरं जंगलात चारायला न्यायचो तेव्हा मी अनेकदा साप पकडायचो. तेव्हापासूनच जंगली प्राण्यांवर माझा जीव जडला. २०१२ साली वनरक्षकांसाठी शारीरिक परीक्षा घेण्यात आली तेव्हा मी अर्ज केला आणि माझी निवड झाली,” मुंद्रिका सांगतात. पत्नी आणि चार मुली असं त्यांचं कुटुंब आहे आणि ते विजयपूर गावचे रहिवासी आहेत.
“या संपूर्ण राखीव जंगलाचा नकाशा आमच्या नजरेत कोरला गेलाय. तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून जरी आम्हाला जंगलात सोडलंत आणि तुम्ही तुमच्या गाडीने निघालात तरी आम्ही तुमच्या आधी जंगलातून बाहेर पडणार,” मुंद्रिका सांगतात.
त्यानंतर आठ वर्षं मुंद्रिका ‘वनरक्षी’ म्हणून कार्यरत होते. महिन्याला अपेक्षित असणारा पगार अनेकदा वर्षभर हातात पडायचा नाही. तरीही. “जंगल आणि जंगलातल्या प्राण्यांचं रक्षण करणं हा माझ्यासाठी आवडीचा छंद झालाय.”
२०२० साली बिहार राज्य शासनाने खुल्या भरतीतून काही नव्या वनरक्षकांची नेमणूक केली. आणि मुंद्रिकांसारख्या आधीच्या काही वनरक्षकांना नवीन काम दिलं. ते आता वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पात वाहनचालक म्हणून काम करतात. “आम्हाला बाजूला सारलं गेलंय,” ते म्हणतात. या कामाबद्दल ते नाखूश आहेत. नव्या भरतीच्या परीक्षेसाठी मुंद्रिका वय आणि शिक्षण या दोन्ही कारणांमुळे पात्र नव्हते. ते दहावी पास आहेत. वनरक्षकाच्या जागेसाठी ते पुरेसं नाही.
काही तरी गंभीर घटना घडली असेल तर नवे वनरक्षकसुद्धा मुंद्रिकांनाच बोलावतात. “परीक्षा घेऊन नेमलेल्या रक्षकांकडे डिग्री आहे हो, पण प्रत्यक्षात काय करायचं त्याचं ज्ञान आमच्यापाशीच आहे,” ते म्हणतात. “आमचा जन्मच जंगलात झालाय. प्राण्यांची सुटका कशी करायची ते आम्ही त्यांच्यासोबत राहूनच शिकलोय.”