लोक्खीकांतो महातो. दिसायला देखणे. चालण्या-बोलण्यात रुबाब. वयाच्या ९७ व्या वर्षी देखील स्वच्छ मोकळा आवाज. पाहताक्षणी रबींद्रनाथ टागोरांचा भास व्हावा असं रुप.
२०२२ साली मार्च महिन्यात आम्ही लोक्खीदादूंना भेटलो. पश्चिम बंगालच्या पिर्रामधलं विटा-मातीचं, बिना-गिलाव्याचं एका खोलीचं त्यांचं घर. आपले परमप्रिय मित्र थेलू महातोंशेजारी लोक्खीदादू बसले होते.
तेव्हा थेलूदादूंचं वय होतं १०३ वर्षं. २०२३ साली ते वारले. वाचाः थेलू महातोंची विहीर आणि आठवणींचे आवर्त
या भागातल्या हयात असलेल्या मोजक्या काही स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक म्हणजे थेलू दादू. ऐंशी वर्षांपूर्वी ते पुरुलियातल्या पोलिस ठाण्यावर चालून गेले होते. वर्ष होतं १९४२. आणि त्यांच्या भागातल्या चले जाव चळवळीतला हा एक उठाव होता.
पोलिस ठाण्याला घेराव घालण्याचा कार्यक्रम ठरला आणि त्यात १७ वर्षांहून मोठी मंडळी सामील झाली. त्यामुळे की काय लोक्खी दादू त्या मोर्चात नव्हते कारण त्यांचं वय तेवढं भरत नव्हतं.
आपल्या मनात असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमेत थेलू दादू किंवा लोक्खी दादू दोघंही बिलकुलच बसत नाहीत. सरकारी आणि उच्चभ्रू समाजाने तयार केलेल्या प्रतिमांमध्ये तर नाहीच नाही. मोर्चांमध्ये खोगीरभरती म्हणून जमा झालेली बिनचेहऱ्याची मंडळी नाहीत ही. आपापल्या विषयाची त्यांना अगदी सखोल जाण आहे. थेलूदादूंसाठी शेती आणि लोक्खीदादूंसाठी गाणं आणि विविध सांस्कृतिक बाबी म्हणजे हातखंडा.
लोक्खीदादू विद्रोहाच्या सांस्कृतिक चळवळीत जास्त सक्रीय होते. ढामसा (नगाऱ्यासारखं वाद्य), मादोल (छोटी ढोलकी) अशी आदिवासी वाद्यं घेऊन त्यांचा जत्था गाणी गात असे. संथाल, कुर्मी, बिरहोर आणि इतर आदिवासी समूह ही वाद्यं वाजवत असत. लोक्खींच्या जत्थ्यात गायली जाणारी गाणी फार काही आगळी-वेगळी नसायची. साधीच वाटायची. पण त्या काळाचा विचार केला तर त्यांना वेगळा अर्थ प्राप्त होतो हे निश्चित.
“आम्ही अधून मधून वंदे मातरम असा नारा देत असू,” लोक्खीदादू सांगतात. त्यांना त्या गाण्याचं किंवा त्या नाऱ्याचं फार काही वाटत नसे. “इंग्रज चवताळून उठायचे,” हसत हसत ते सांगतात.
या दोघांनाही स्वातंत्र्यसैनिकांना दिलं जाणारं निवृत्तीवेतन मिळालेलं नाही. आणि त्यासाठी खटपट करणं त्यांनी कधीच सोडून दिलंय. थेलू दादू वयोवृद्धांना मिळणाऱ्या १००० रुपये पेन्शनवर सगळं भागवतात. लोक्खीदादूंनी ती पेन्शनसुद्धा फक्त एक महिना मिळाली आणि नंतर कोण जाणो कशी बंद झाली.
इंग्रजांची राजवट उलथवून लावण्यासाठी विविध स्तरातले लोक पुढे आले होते. त्यामध्ये विचाराने डावे मात्र वागणुकीत अगदी गांधीवादी असणारे थेलू आणि लोक्खींसारखे तरुण होते. दोघंही कुर्मी समाजाचे. ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात उठाव करणारे पहिले कोण असतील तर ते कुर्मी लोक.
लोक्खी आमच्यासाठी ‘टुसु गान’ गातात. कुर्मींच्या सुगीच्या सणाला टुसु म्हणतात. तेव्हा ही गाणी गायली जातात. सुगीच्या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा धार्मिक सण नाही. तो अगदी धर्मनिरपेक्ष सण आहे. ही गाणी पूर्वी फक्त अविवाहित मुली गात असत. पण हळूहळू इतरांनाही या गाण्यांची भुरळ पडली. लोक्खीदादूंनी गायलेल्या गाण्यांमध्ये टुसु म्हणजे एक तरुणीचं रुप आहे. आणि दुसऱ्या गाण्यात सण संपल्याचा संदर्भ येतो.
টুসু নাকি দক্ষিণ যাবে
খিদা লাগলে খাবে কি?
আনো টুসুর গায়ের গামছা
ঘিয়ের মিঠাই বেঁধে দি।
তোদের ঘরে টুসু ছিল
তেই করি আনাগোনা,
এইবার টুসু চলে গেল
করবি গো দুয়ার মানা।
टुसू निघाली दक्षिणेला
भूक लागता खाईल काय
?
जा
,
टुसूचा गामचा
*
आण
,
तुपातली मिठाई बांधीन
,
माय.
तुझ्या घरी टुसू होती
माझं येणंजाणं होतं
आता टुसू निघून गेली
तुझ्या घरी करू काय?
*खांद्यावर टाकायला, डोकं झाकायला किंवा डोक्यावर बांधायला वापरलं जाणारं पंच्यासारखं कापड. भन्नाट नक्षी, कल्पक रंग आणि आकृती आणि विविध उपयोग यामुळे गामचा लोकप्रिय आहे.
शीर्षक छायाचित्र आणि टुसू गाण्यांचा इंग्रजी अनुवादः स्मिता खटोर