“आमच्या गावात मुली बिलकुल सुरक्षित नाहीयेत. रात्री ८ किंवा ९ वाजल्यानंतर त्या घराच्या बाहेर जातच नाहीत,” शुक्ला घोष सांगतात. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातल्या कुआँपूर गावातली गोष्ट. “मुलींना भीती असते. तरीही त्या विरोध करतात, आपली नाराजी जाहीर करतात.”
कुआँपूरच्या शुक्ला घोष आणि काही
मुली कोलकाताच्या रस्त्यांवरती आपलं म्हणणं मांडत होत्या. आर. जी. कर
हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका तरुण डॉक्टर विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची
निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेबद्दलचा संताप व्यक्त करण्यासाठी पश्चिम बंगालच्या
अनेक गावांमधून हजारो शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी मोठ्या संख्य़ेने कोलकात्यात आले
होते.
२१ सप्टेंबर २०२४ रोजी काढण्यात
आलेला हा मोर्चा कॉलेज स्ट्रीटवरून सुरू होऊन ३.५ किलोमीटर श्यामबाझारच्या दिशेने
गेला.
मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे तात्काळ न्याय, दोषींना कठोरातली
कठोर शिक्षा, कोलकाता पोलिस आयुक्तांचा राजीनामा (मोर्चेकरी डॉक्टरांनी देखील हीच
मागणी केली होती आणि सरकारने ती मान्यही केली आहे) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण,
गृहखात्याची धुरा सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजीनामा.
“तिलोत्तमा तोमार नाम, जुडछे शोहोर, जुडछे ग्राम [तिलोत्तमा तुझं नाव, शहरं आलीयेत, आलंय गाव]” ही या मोर्चाची एक घोषणा. कोलकात्याने मृत डॉक्टरला तिलोत्तमा हे नाव दिलं आहे. हे दुर्गेचं एक नाव आहे. आणि त्याचा अर्थ होतो सर्वोत्तम कणांनी बनलेली. कोलकाता शहराचा उल्लेखही याच नावाने केला जातो.
“महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि
त्याची जबाबदारी इथल्या पोलिसांची आणि प्रशासनाची आहे,” शुक्ला सांगतात. “आरोपींना
पाठीशी घालण्याचं काम सुरू असेल तर या मुलींना इथे सुरक्षित कसं काय वाटेल?” शुक्ला
विचारतात. त्या अंगणवाडी संघटनेच्या पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत.
“त्यांनी आम्हा शेतमजूर महिलांच्या
सुरक्षेसाठी तरी काय केलंय, सांगा? एक निदर्शक मीता रे विचारतात. मुलींना रात्री
घराबाहेर पडायला भीती वाटते. आणि म्हणूनच मी इथे आलीये. मुली आणि महिलांच्या
सुरक्षेसाठी आपल्याला लढायलाच लागणार आहे.” मीता हुगळी जिल्ह्याच्या नाकुनदा गावच्या
रहिवासी आहेत.
४५ वर्षीय मीता दी स्पष्टपणे सांगतात की त्यांना उघड्यावर जायला आवडत नाही. बांधलेला
पक्का संडास त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांची दोन बिघा जमीन आहे आणि त्यात
त्या बटाटा, भात आणि तीळ घेतात. पण अलिकडच्या पुरात त्यांच्या पिकांचं नुकसान
झालंय. “काहीही मदत मिळालेली नाही,” मीता दी सांगतात. दिवसाला १४ तास मजुरी
केल्यावर त्यांना २५० रुपये रोज मिळतो. त्यांच्या खांद्यावर मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाचा लाल बावटा दिसतो. त्यांच्या पतीचं निधन झालंय पण त्यांना विधवा
पेन्शन काही मिळालेलं नाही. पण त्यांना तृणमूल काँग्रेसच्या बहुचर्चित लक्ष्मीर किंवा
लोख्खीर भांडार योजनेचे १,००० रुपये मिळतात. पण त्यात कुटुंबाचं पोट कसं भरायचं
असा त्यांचा सवाल आहे.
*****
“मी इथे आलीये कारण मी एक स्त्री आहे.”
मालदा जिल्ह्याच्या चांचोल गावातून
आलेल्या बानू बेवा आयुष्यभर फक्त कष्ट करत आल्या आहेत. शेतमजुरी करणाऱ्या ६३
वर्षीय बानू दी आपल्या जिल्ह्यातून आलेल्या इतर बायांच्या घोळक्यात उभ्या आहेत. कामकरी
महिलांच्या अधिकारांसाठी लढण्याचा त्यांचा निर्धार आहे.
“महिलांना रात्री देखील काम करता
आलंच पाहिजे,” नमिता महातो म्हणतात. हॉस्पिटलमध्ये महिलांना रात्रपाळी देण्यात
येणार नाही या राज्य सरकारच्या अधिसूचनेबद्दल त्या बोलत होत्या. या प्रकरणावर
देखरेख ठेवून असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने देखील यावर टीका केली आहे.
पन्नाशीच्या नमिता दी पुरुलियाहून
आल्या आहेत आणि सोबतच्या मोर्चेकऱ्यांसोबत कॉलेज स्क्वेअरच्या गेटसमोर उभ्या आहेत.
तीन विद्यापीठं, शाळा, पुस्तकाची असंख्य दुकानं आणि इंडियन कॉफी हाउस हे सगळं काही
याच भागात आहे.
गौरांगदी गावच्या नमिता कुर्मी आहेत.
राज्यात त्यांचा समावेश इतर मागासवर्गीय प्रवर्गात केला जातो. त्या रोंग मिस्त्री
म्हणजे रंगारी आहेत आणि कंत्राटावर काम करतात. त्यांना दिवसाचे ३००-३५० रुपये
मिळतात. “लोकांच्या घरी खिडक्या, दारं, लोखंडी जाळी रंगवण्याचं काम मी करते,” त्या
सांगतात. त्या विधवा आहेत आणि त्यांना राज्य शासनाचं विधवा पेन्शन मिळतं.
नमितादींचं कुटुंब म्हणजे त्यांचा मुलगा, सून आणि नात. त्यांच्या मुलीचं लग्न झालंय. मुलगा लोखंडाच्या कारखान्यात काम करतो. “तुला सांगते, ती सगळ्या परीक्षा पास झालीये, मुलाखतीत उत्तीर्ण झालीये पण तिचं नेमणूक पत्र काही अजून आलेलं नाही,” त्या तक्रार करतात. “या सरकारने आम्हाला नोकऱ्या दिल्याच नाहीयेत.” या कुटंबाची एक बिघा जमीन आहे आणि त्यामध्ये ते भात घेतात. शेती पावसावर अवलंबून आहे.
*****
आर. जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये एका तरुण डॉक्टरवर हल्ला करून तिला निर्घृणपणे मारून टाकण्यात आलं. त्यानंतर कामाच्या ठिकाणी मुली आणि स्त्रियांना काय अपेष्टा सहन कराव्या लागतात ते पुन्हा चर्चेला आलं. मासेमारी करणाऱ्या, वीटभट्टी आणि रोजगार हमीवर काम करणाऱ्या महिलांसाठी संडासची सोय नसणं, पाळणाघरांची सुविधा नसणं आणि मजुरीतली तफावत हे अगदी काही मोजके मुद्दे आहेत, तुषार घोष सांगतात. ते पश्चिम बंगाल शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष आहेत. “आर. जी. करमधल्या घटनेच्या निदर्शनांमागे कष्टकरी वर्गातल्या स्त्रियांचा रोजचा झगडा तुम्हाला दिसेल,” ते म्हणतात.
९ ऑगस्ट २०२४ रोजी ही हिंसा झाली आणि
तेव्हापासून पश्चिम बंगाल पेटलेला आहे. गाव, शहर, महानगरांमध्ये अगदी साध्यातली
साधी माणसं आणि त्यातही मोठ्या संख्येने मुली आणि स्त्रियांना रस्ते काबीज केले
आहेत. राज्यभरातल्या ज्युनियर डॉक्टरांच्या आंदोलनाने अनेक मुद्दे चव्हाट्यावर
आणले आहेत. भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये
दिसणारी दडपशाही आणि धाकदपटशाची संस्कृती हे त्यातले काही. या घटनेला दोन महिने
होतील तरीही आंदोलन निवळण्याची चिन्हं दिसत नाहीत.