सत्यप्रियाची गोष्ट सांगण्याआधी माझ्या पेरिअम्माबद्दल तुम्हाला काही तरी सांगायचंय. मी सहावीत होतो, १२ वर्षांचा असेन तेव्हा मी माझ्या पेरिअप्पा आणि पेरिअम्मांकडे (काका-काकी) रहायला होतो. मी त्यांना लहानपणापासून अप्पा आणि अम्माच म्हणायचो. ते माझं फार प्रेमाने करायचे आणि आमच्या घरचे सगळे पण सुट्ट्या असल्या की त्यांच्याच घरी यायचे.
माझ्या आयुष्यात माझ्या पेरिअम्माचं स्थान फार मोठं आहे. आम्हाला काय हवं नको ते ती फार प्रेमाने करायची. दिवसभर काही ना काही खाऊ घालायची, तेही अगदी वेळेवर. मी शाळेत इंग्रजी शिकायला लागलो तेव्हा माझ्या काकीनेच मला किती तरी गोष्टी शिकवल्या. मला काही शंका असली की मी तिच्याकडेच जायचो. ती चुलीपाशी असायची. मला एखाद्या शब्दाचं स्पेलिंग येत नसेल तर तीच मला एक एक करत शिकवायची. तेव्हापासूनच ती माझी आवडती काकी आहे.
स्तनाच्या कर्करोगामुळे ती गेली. खरं तर तिला जसं जगता यायला पाहिजे होतं, ते न जगताच ती गेली. तिच्याविषयी किती तरी सागंण्यासारखं आहे, पण सध्या तरी इतकंच.
*****
माझी काकी गेली त्यानंतर मी सत्यप्रियाला तिच्या एका फोटोवर काम करू शकशील का अशी विनंती केली होती. मला इतर कलाकारांबद्दल कसलीच ईर्ष्या वाटत नाही. पण सत्याचं काम पाहिलं तेव्हा मात्र माझ्या मनात कुठे तरी ही भावना यायला लागली. आपल्या कामातले इतके बारकावे शांतपणे, चिकाटीने करण्याची कला केवळ आणि केवळ सत्यामध्येच आहे. तिच्या शैलीला ‘हायपर रिॲलिझम’ अतियथार्थवाद किंवा अतिवास्ववाद म्हणतात. तिची चित्रं हाय रेझोल्यूशन प्रकारात मोडतात.
मला सत्याच्या कामाविषयी इन्स्टाग्रामवरून समजलं. मी तिला काकीचा फोटो पाठवला पण तो स्पष्ट नव्हता. चित्रासाठी तो वापरता येईल का, शंकाच होती. मला तर अशक्यच वाटत होतं.
कालांतराने मदुरईमध्ये मी सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी एक फोटोग्राफी कार्यशाळा आयोजित केली होती. तिथे पहिल्यांदाच आमची समोरासमोर भेट झाली. ती माझ्या काकीचं चित्र सोबत घेऊन आली होती. जबरदस्त काम केलं होतं तिने आणि त्या चित्राशी मी फार पटकन कनेक्ट झालो.
माझ्या पहिल्याच कार्यशाळेमध्येच मला माझ्या काकीचं चित्र मिळालं म्हणून मी फार खूश होतो. तेव्हाच मी ठरवलं की सत्यप्रियाच्या कामाविषयी लिहायला पाहिजे. मी जे काही पाहत होतो ते अद्भुत होतं. मी इन्स्टाग्रामवर तिला फॉलो करायला लागलो. मग तिच्या घरी गेलो. तिथे भिंतींवर, जमिनीवर... खरं तर सगळीकडेच केवळ चित्रंच चित्रं होती.
मी सत्यप्रिया. मी मदुराईची आहे. वय २७. माझं काम हायपर रिॲलिझम किंवा अतियथार्थवाद म्हणून ओळखलं जातं. खरं तर मला चित्र कशी काढतात ते माहीत नाहीये. मी कॉलेजमध्ये असताना माझा प्रेमभंग झाला. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी म्हणून मी चित्र काढू लागले. त्या पहिल्या प्रेमाने दिलेलं दुःख आणि उदासी घालवण्यासाठी मी कलेचा हात धरला. नैराश्यातून बाहेर येण्यासाठी लोक सिगरेट ओढतात, दारू पितात – माझ्यासाठी कला तेच काम करत होती.
कलेने मला त्यातून बाहेर काढलं. आणि त्यानंतर यापुढे मी फक्त चित्र काढणार आहे असं मी घरच्यांना सांगून टाकलं. हे धाडस माझ्यात कुठून आलं ते मला माहीत नाही. खरं तर मला आयएएस किंवा आयपीएस ऑफिसर व्हायचं होतं. त्यासाठी मी यूपीएससीच्या परीक्षा देखील दिल्या होत्या. पण ते मी फार काळ ते केलं नाही.
लहानपणापासूनच मला असं वाटायचं की दिसण्यावरून लोक आपल्याबाबत भेदभाव करतायत. शाळेत, कॉलेजात आणि एनसीसीच्या शिबिरातसुद्धा सगळे मला कमीपणा द्यायचे. वेगळं वागायचे माझ्याशी. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकसुद्धा मलाच निशाण्यावर घ्यायचे आणि सारखे सारखे ओरडत रहायचे.
मी बारावीत असताना शाळेतल्या मुलींनी पाळीच्या पॅडची नीट विल्हेवाट लावली नाही आणि संडास तुंबून गेले. आता अशा वेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पाचवी ते सातवीच्या सगळ्या मुलींना किंवा ज्यांची नुकतीच पाळी सुरू झालीये अशा सगळ्या मुलींना बोलावून पॅडची विल्हेवाट कशी लावायची याची माहिती द्यायला पाहिजे होती.
ते राहिलं बाजूला. उलट सगळ्यांमधून माझ्या एकटीवरच सगळं खापर फोडण्यात आलं. सकाळची प्रार्थना झाल्यानंतर योगाच्या वर्गासाठी बारावीच्या सगळ्या विद्यार्थिनी थांबल्या होत्या. तेव्हा माझ्याकडे निर्देश करत आमच्या बाई म्हणाल्या, “या अशा मुलीच [माझ्यासारख्या] असली कामं करतात.” मी बुचकळ्यात पडले. आता संडास किंवा गटारं तुंबली त्याच्याशी माझा काय संबंध होता?
शाळेत मला अशी वागणूक एकदा नाही, अनेकदा मिळाली असेल. नववीतल्या विद्यार्थ्यांची काही प्रेम प्रकरणं उघडकीस आली तरी त्यात माझाच दोष दिसायचा त्यांना. माझ्या आई-वडलांना शाळेत बोलावून घ्यायचे आणि सांगायचे की या मुला-मुलींना माझीच फूस आहे आणि मीच त्यांचं जुळवलंय, वगैरे. माझ्या वतीने ‘अशोभनीय शब्द’ किंवा ‘अशोभनीय कृत्या’साठी माझ्या आई-बाबांना माफीपत्र लिहायला लावायचे. भगवद्गीतेवर हात ठेवून मी खोटं बोलत नसल्याची शपथ घ्यायला लावायचे.
शाळेत असताना मी रडत घरी आले नाही असा एकही दिवस गेला नसेल. आणि घरीसुद्धा काय ऐकायला मिळायचं? ‘तूच काही तरी बोलली असशील’ किंवा ‘तुझीच चूक असणार’. मग मी घरी काही बोलणंच बंद करून टाकलं.
अगदी आतमध्ये असुरक्षिततेची भावना घर करून बसली होती.
कॉलेजमध्ये माझ्या दातांवरून मला सगळे चिडवायचे. आणि बघा अगदी सिनेमातही याच गोष्टींवरून लोकांची हेटाळणी केल्याचं दाखवतात. का? मीसुद्धा सगळ्यांसारखी माणूसच आहे. सगळेच करतात म्हणून अशा प्रकारच्या चिडवण्यात काही वावगं नाही असं लोकांना वाटतं. त्या वागण्याचा एखाद्याच्या मनावर परिणाम होतो, त्यांच्या भावना दुखावल्या जातात, त्यांच्या मनात किती मोठी असुरक्षितता तयार होते याचा कुणी विचारही करत नाहीत.
आजही आयुष्यात घडून गेलेल्या या घटना मला अस्वस्थ करतात. आजही कुणी माझा फोटो काढत असेल तर मला कसं तरी होतं. गेली २५-२६ वर्षं मला हे सतत जाणवत आलंय. एखाद्याच्या शरीरावरून त्याची चेष्टा करणं किती नॉर्मल होऊन गेलंय.
*****
मी माझं चित्र का काढत नाही? मी काय आहे हे मीच सांगितलं नाही तर दुसरं कोण सांगणार?
माझ्या चेहऱ्यासारखा चेहरा काढताना काय वाटेल? मी नेहमी विचार करायचे.
मी हे काम सुरू केलं ते सुंदर व्यक्तींच्या चेहऱ्यांपासून. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण लोकांना केवळ दिसण्यावरून जोखत नाही तर जात, धर्म, हुशारी, काम किंवा व्यवसाय, लिंगभाव आणि लैंगिकता या सगळ्याच्या आधारावर आपण लोकांशी कसं वागायचं ते ठरवत असतो. म्हणून मी मात्र माझ्या चित्रांमध्ये वेगळ्या प्रकारचं सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न करते. पारलिंगी व्यक्तींचंच उदाहरण घ्या. चित्र किंवा इतर कलाप्रकारांमध्ये केवळ अधिकाधिक बाईसारख्या दिसणाऱ्या पारलिंगी व्यक्तींचं चित्रण केलेलं आढळतं. मग बाकीच्यांची चित्रं कुणी काढायची? सगळ्या गोष्टींसाठी काही मापदंड ठरवलेले आहेत. पण मला त्या मानकांशी काहीही देणंघेणं नाही. माझ्या चित्रातली लोकं तिथे त्या कॅनव्हासवर का आहेत याचा विचार मी करते. ही सगळी माणसं आनंदात असावीत इतकीच माझी इच्छा असते.
याचप्रमाणे अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींची चित्रंही फार कुणी काढत नाहीत. या भिन्नक्षम व्यक्तींनी किती तरी कामं केली आहेत पण कलेमध्ये मात्र त्यांचं प्रतिनिधीत्व नसल्यात जमा आहे. सफाई कर्मचारी जेव्हा मरण पावतात तेव्हा त्याचं चित्रण कोण करणार?
कदाचित कलेचा विचार कायम सौंदर्यशास्त्राच्या संदर्भात केला जातो म्हणून असं होत असावं का? पण माझ्यासाठी कला हे सर्वसामान्यांचं राजकारण आहे. त्यांच्या आयुष्याचं वास्तव पुढे आणण्याचं एक माध्यम आहे. आणि त्याच संदर्भात हायपर रिॲलिझम ही शैली फार महत्त्वाची आहे. किती तरी लोक मला म्हणतात, ‘तुम्ही तर फक्त फोटोचं चित्र काढता’. हो. मी फक्त फोटोचं चित्र काढते. कारण ही चित्रशैलीच मुळात छायाचित्रणातून किंवा फोटोग्राफीमधून उत्पन्न झाली आहे. कॅमेऱ्याचा शोध लागला, फोटो काढायला सुरुवात झाली त्यानंतर या शैलीचा उगम झाला.
मला लोकांना सांगावंसं वाटतं, ‘या लोकांकडे पहा. त्यांच्याविषयी जाणून घ्या.’
आता चित्रांमध्ये अपंगत्वाचं चित्रण नक्की कसं केलं जातं? आपण त्यांच्याकडे फक्त ‘विशेष व्यक्ती’ म्हणून पाहतो का? या व्यक्तींकडे त्या कुणी तरी विशेष आहेत अशा प्रकारे का बरं पाहिलं जातं? आपल्यासारखी ही पण एकदम नॉर्मल माणसं आहेत. आता बघा, आपल्याला एखादी गोष्ट जमते, पण दुसऱ्याला ती जमत नाही. अशा व्यक्तींना सगळं काही करता यावं यासाठी सोयी करण्याची जबाबदारी आपली आहे. विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती म्हणून त्यांना एका कप्प्यात बंद करून टाकायचं आणि त्यांच्यासाठी समावेशक अशा कोणत्याही सोयी न करता त्यांना त्यांच्या स्थितीत सोडून द्यायचं हे योग्य आहे का?
त्यांच्याही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत. धडधाकट असलेल्या आपल्याला मिनिटभर जरी बाहेर पडता आलं नाही तरी आपली चिडचिड होते. अपंगत्व असलेल्या व्यक्तीलाही तसं वाटणार नाही? त्यांना करमणूक नको? शिक्षण, समागम आणि प्रेम नको? खरं तर आपल्याला ही माणसं दिसतच नाहीत. त्यांना समजून घेण्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही. कुठल्याही कलाकृतीत अपंगत्व असणारी माणसं आढळायची नाहीत. मुख्यधारेतल्या माध्यमांमध्ये तुम्हाला ती फारशी दिसणार नाहीत. पण ते आहेत, त्यांच्याही गरजा आहेत याची आठवण आपण समाजाला करून देणार की नाही?
पळणी गेल्या सहा वर्षांपासून सफाई कर्मचाऱ्यांबरोबर काम करतोय. का? कारण जेव्हा सातत्याने अनेक वर्षं आपण एखाद्या विषयाचा वेध घेत असतो तेव्हाच लोकांच्याही त्याबद्दल माहिती होतं. एखादी गोष्ट आहे, तिचं अस्तित्व आहे हेच मुळात नोंदवून ठेवण्याची गरज आहे. मग त्या लोककला असोत, लोकांच्या देहावरचे वण असोत किंवा अपंगत्व असलेल्या व्यक्ती. आपल्या कामातून आपण समाजाला आधारभूत काही काम उभं केलं पाहिजे. लोकांच्या आयुष्यात काय घडतंय हे सांगण्याचं कला हे माध्यम आहे. कला ही एक बळ देणारी व्यवस्था आहे असं मला वाटतं. एखादं अपंगत्व असलेलं मूल आपल्या चित्रात का असू नये? ते छान हसताना दाखवू शकतोच ना आपण? असं मूल कायम दुःखी, गरीब बिचारंच असावं असा काही नियम आहे का?
अनिता अम्माच्या चित्रावर मी काम करत होते. त्या प्रकल्पामध्ये त्या जास्त काळ सहभागी होऊ शकल्या नाहीत. कारण त्यात पैसाही नव्हता आणि आर्थिक सहाय्यही काही नव्हतं. त्यांना खूप साऱ्या अडचणी होत्या. कसं असतं, ज्यांच्याबद्दल आपण काही काम करतोय, त्यांच्याविषयी आपल्याला जागरुकता निर्माण करता आली पाहिजे. तसं झालं तर आपण त्यांच्यासाठी काही निधी उभा करू शकतो. तसं केलं तर त्यांना त्यातून काही आर्थिक मदत मिळू शकते. भावनिक आधारही तितकाच महत्त्वाचा असतो. माझी कला मला याच उद्देशाने वापरायची आहे.
मी काळ्या-पांढऱ्या रंगातच काम करते कारण हेच रंग मला लोकांना जसं दाखवायचंय तसं दाखवण्याची मुभा देतात. आणि लोकही तितकंच पाहू शकतात. त्यांचं लक्ष विचलित होत नाही. ही माणसं नक्की कोण आहेत, त्यांची भाविनक ओळख, त्यांचा स्व काय आहे हे सगळं काळ्या-पांढऱ्या चित्रांमधून सगळ्यात प्रभावीपणे आपण मांडू शकतो.
अनिता अम्माचं चित्र माझं फार आवडतं चित्र आहे. मी फार प्रामाणिकपणे त्या पोर्ट्रेटचं काम केलंय आणि त्या चित्राशी माझं फार खोल नातं जुळलंय. मी त्या पोर्ट्रेटचं काम करत होते तेव्हा माझ्या स्तनात वेदना व्हायच्या. त्या चित्राने फार आत काही तरी ढवळून निघालं होतं.
तुंबलेली गटारं आजही माणसांचा जीव घेतायत. पण त्याविषयी फारशी जागरुकता नाही. आणि हे काम काही ठराविक जातीच्या लोकांवरच लादण्यात आलं आहे. अनंत काळापासून ते हे काम करतायत आणि त्यासोबत सगळा आत्मसन्मान गमावून बसतायत. आणि तरीही लोक त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतात. सरकारही त्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी फार काही करत नाही. जणू काही त्यांच्या आयुष्याची काही किंमतच नाही.
मी एक समकालीन कलाकार आहे आणि माझी कला माझ्याभोवतीचा समाज आणि त्यातल्या समस्यांभोवती गुंफलेली आहे.