जवळपास सारख्याच दिसणाऱ्या नर आणि मादी रेशमी किड्यांमधला फरक ओळखण्यात दीपिका कामनचे डोळे तरबेज आहेत. नर आणि मादी सारखेच दिसतात पण त्यांच्यातला नर मादीपेक्षा थोडा मोठा असतो, असं म्हणत तिने एका गडद आणि फिकट तपकिरी रंगाच्या, सुमारे १३ सेंटीमीटर पंख पसरलेल्या किड्याकडे बोट दाखवलं. जरा लहान, थोडा जाड आहे तो मादी रेशीमकिडा, दीपिका सांगते.

दीपिका आसाममधल्या माजुली जिल्ह्यातल्या बोरुन चितदार चुक गावची रहिवासी आहे आणि तिने साधारण तीन वर्षांपूर्वी एरी रेशिमकिडे पाळायला सुरुवात केली.  तिच्या आई आणि आजीकडून ती हे काम शिकली.

एरी रेशमाची शेती आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीच्या खोऱ्यात आणि शेजारच्या अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय व नागालँड राज्यात केली जाते. खूप पूर्वीपासून तिथला मिशिंग समाज स्वतःपुरतं एरी रेशीमकिड्यांचं संगोपन आणि रेशमी वस्त्र विणण्याचं काम करत असे मात्र विकण्यासाठी रेशीम विणणं या समाजात अलिकडच्या काळात सुरू झालं.

आता काळ बदललाय. आता तरुण मुलीसुद्धा रेशीमकिड्यांचं संगोपन शिकून ते काम करतायत असं २८ वर्षांची दीपिका म्हणते.

PHOTO • Prakash Bhuyan

दीपिका कामन रेशीमकिड्यांचं संगोपन करते. ती एरी किड्यांच्या खाण्याचा ट्रे स्वच्छ करुन पुन्हा भरत आहे. एरा पात हे एरी किड्यांचे खाद्य आहे

रेशीमकिड्यांची शेती करण्यासाठी माजुलीमधल्या सेरीकल्चर विभागातून तुम्ही या किड्यांची अंडी खरेदी करु शकता, त्याच्या एका पाकिटाची किंमत चारशे रुपयांच्या आसपास असते. गावातले जे लोक पूर्वीपासून रेशीमकिड्यांची शेती करतायत त्यांच्याकडूनही तुम्ही अंडी विकत घेऊ शकता. दीपिका आणि तिचा पती उडाई बहुतेक वेळा गावातल्या लोकांकडूनच रेशीमकिड्यांची अंडी घेतात, कारण त्यांना ती मोफत मिळतात. एरंडाची पानं हे रेशीमकिड्यांच्या अळीचं खाद्य आहे आणित्यांच्याकडे एरा बाडी (एरंडाची शेती) नसल्यामुळे त्यांना एरंडाची पानं खरेदी करावी लागतात. रेशीमकिड्यांच्या अंड्याच्या जोड्या जितक्या जास्त तितकी जास्त एरंडाची पानं त्यांना खरेदी करावी लागतील. म्हणून त्यांना एका वेळी रेशीमकिड्यांच्या तीनपेक्षा जास्त जोड्या खरेदी करणं शक्य नाही.

ती म्हणाली, एरंडाची पानं छोट्या छोट्या जागेत लावता येत नाहीत आणि पानं शेळ्यांनी खाऊन टाकू नये म्हणून त्याभोवती बांबूचं कुंपण घालावं लागतं. हे खूप मोठं काम आहे.

रेशीमकिड्यांचे सुरवंट फार खादाड असतात त्यामुळे थोड्याच दिवसांत त्यांच्यासाठी एरंडाची पुरेशी पानं मिळवणं अवघड होऊन बसतं. त्यांना खायला घालण्यासाठी रात्री झोपेतून उठावं लागतं. सुरवंट जितकी जास्त पानं खातील तितकं जास्त रेशीम तयार करतात. उडाईनं सांगितलं की, हे सुरवंट केसेरु (Heteropanax fragrans) देखील खातात. पण ते एकतर पानं खातात किंवा केसेरु तसंच ते फक्त एकाच विशिष्ट प्रकारची पानं खातात. इतर पानं खात नाहीत.

कोष बनवण्यासाठी सज्ज झाल्यावर सुरवंट त्यासाठी योग्य जागा शोधायला लागतो. त्यांना केळ्याचं पान व गवतावर ठेवून त्यांचं रुपांतर होण्याची वाट पाहिली जाते. रेशमाचा धागा बनवणं सुरू केल्यानंतर सुरवंट फक्त दोनच दिवस दिसतात. त्यानंतर ते आपल्या कोषात निघून जातात असं दीपिका म्हणाली.

PHOTO • Prakash Bhuyan
PHOTO • Prakash Bhuyan

डावीकडे - दीपिका आणि उडाईच्या घरात भिंतीवर टांगलेले रेशमी किड्यांचे कोष. मादी किड्याचे कोष नर किड्याच्या कोषापेक्षा मोठे असतात. उजवीकडे – रेशीमकिड्यांच्या अळ्या पानावर ठेवून त्यांना त्यांचं खाद्य दिलं जात आहे

*****

कोष विणण्याचं काम सुरू झाल्यानंतर सुमारे दहा दिवसांनी रेशमाचा धागा काढण्यास सुरुवात होते. त्यापेक्षा जास्त दिवस थांबलो तर सुरवंटाचे रेशीमकिड्यात रुपांतर होऊन तो उडून जातो असं दीपिकानं सांगितलं.

रेशमाची लागवड दोन प्रकारे करता येते. एका प्रकारात नैसर्गिकरित्या सुरवंटाचे रुपांतरण पूर्ण होऊन रेशीमकिडा कोष सोडून उडून जाण्याची वाट पाहिली जाते. तर दुसऱ्या पारंपरिक प्रकारात रेशीमकिड्यांचे कोष उकळले जातात.

कोष उकळल्याशिवाय त्यातून हातानं रेशीमधागा काढणं खूप अवघड आहे. रेशीमकिडा बाहेर आल्यावर कोष लगेचच कुजून जातात असं दीपिका म्हणाली. कोष उकळताना ते मऊ झालेत का यावर सतत लक्ष ठेवावं लागतं. कोष उकळायला साधारण अर्धा तास लागतो अशी माहिती उडाईने दिली.

उकळलेल्या कोषातून बाहेर काढलेला पोलु पोका (सुरवंट/अळी) हा एक स्वादिष्ट अन्नपदार्थ आहे. त्याची चव मांसासारखी असते. पोलु पोका तळून खाल्ला जातो किंवा मग त्याचा पटोट दिया बनवून खाल्ला जातो. (पटोट दिया म्हणजे कुठलीही भाजी, मांस किंवा मासा केळ्याच्या पानात बांधून ते चुलीत भाजून केलेला पदार्थ)

कोषातून बाहेर काढलेले रेशीमधागे स्वच्छ धुऊन एका कापडात गुंडाळून सावलीत वाळवले जातात. त्यानंतर टाकूरी किंवा पॉपी (चरखा) वापरुन त्याची मोठी रिळं बनवली जातात. 250 ग्रॅम वजनाचं एरी रेशीम बनवण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात असं दीपिकानं सांगितलं. पारंपरिक ‘सदोर मेखला’ पोशाख शिवण्यासाठी सुमारे एक किलो रेशीम लागतं. घरातलं रोजचं काम झालं की दीपिका दररोज रेशीम धागा काढण्याचं काम करते.

PHOTO • Prakash Bhuyan
PHOTO • Prakash Bhuyan

डावीकडे – रेशीमकिड्यांची मादी अंडी घालत आहे. जेव्हा अळी कोषाच्या बाहेर पडते तेव्हा ती सहजीवन आणि प्रजनन यासाठी तयार झालेली असते. उजवीकडे – एरी रेशमाची अळी अंडं फोडून बाहेर आल्यानंतर साधारण तीन ते चार आठवड्यांनी कोष विणायला सुरुवात करते. तोपर्यंत या अळ्या त्यांच्या जीवनचक्राचा चौथा म्हणजेच अखेरचा रेशीम धागा बाहेर टाकण्याचा टप्पा पूर्ण करतात आणि किटकात रुपांतरित होण्यास सज्ज झालेल्या असतात. या प्रक्रियेसाठी रेशीम किड्यांच्या अळ्या आपल्याभोवती कोष विणायला सुरुवात करतात. कोष तयार व्हायला दोन तीन दिवस लागतात. अळी पुढचे तीन आठवडे कोषात राहिल्यानंतर तिचे रेशीमकिड्यात रुपांतर होते

PHOTO • Prakash Bhuyan
PHOTO • Prakash Bhuyan

डावीकडे- कोषांपासून एरी रेशमाचे धागे तयार करण्यासाठी पारंपरिक साधनं वापरली जातात. टाकुरीचा वापर एरी रेशमाचा धागा विणण्यासाठी केला जातो, धागा विणताना वजन म्हणून पॉपीचा वापर केला जातो. एरी रेशमाच्या अनेक तारा एकत्र विणून धागा तयार करण्यात पॉपीची मदत होते. उजवीकडे – तळलेल्या रेशीमअळ्या. ईशान्य भारतातल्या मिशिंग आणि इतर अनेक जमातींमध्ये हा एक स्वादिष्ट खाद्यपदार्थ मानला जातो

रेशमाचे हे धागे सुरुवातीला पांढरे असतात. वारंवार धुतल्यानंतर त्यांना एरी रेशमाचा विशिष्ट पिवळसर रंग येतो.

सकाळीच कापड विणायला सुरू करून संपूर्ण दिवसभर विणण्याचं काम केल्यावर एरी रेशमाचं एक मीटर कापड विणून होतं अशी माहिती दीपिकानं दिली.

दीपिका म्हणाली, सुती धागा मिसळूनही रेशमाचा धागा तयार केला जातो. आसामी स्त्रियांचा पारंपरिक पोशाख, साडी, सदरा शिवण्यासाठी अशा कापडाचा उपयोग केला जातो. एरी रेशमापासून बनवलेली साडी हा सध्याचा नवीन ट्रेंड आहे.

फॅशनचे नवनवीन प्रकार बाजारात येत असताना हा रेशीम उद्योग सुरू ठेवणं खूप मेहनतीचं काम आहे. रेशीम किडे पाळणं आणि त्यांच्यापासून रेशीम काढून कापड विणणं यासाठी बरेच दिवस लागतात अशी माहिती दीपिकानं दिली. दीपिकानं सध्या काही काळासाठी रेशीमकिड्यांची लागवड करणं थांबवलंय. घरातलं काम, शेतीची कामं आणि तिच्या चार वर्षांच्या मुलाचं संगोपन यातून तिला या उद्योगासाठी वेळच मिळत नाही.

*****

यामिनी पायेंग विणकामात पारंगत आहे. तिला भारतीय हस्तकला मंडळाचं प्रमाणपत्रंही मिळालं आहे. ती गेली दहा वर्ष एरी रेशीम कापड विणण्याचं काम करतेय. या कलेबाबतचा लोकांचा ओढा कमी होत चालल्याची तिला खंत आहे. ती म्हणाली, सध्या आमच्यातलेच काही जण असे आहेत की ज्यांनी कधी हातमागाला हातसुद्धा लावलेला नाही. ते खऱ्या एरीमधला आणि कृत्रिम एरीमधला फरकदेखील ओळखू शकत नाहीत. आज या उद्योगाची अशी अवस्था झाली आहे.

दहावीत असताना यामिनीनं वस्रोद्योग आणि विणकाम याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्याआधी दोन वर्ष तिनं विणकामाचा सराव केला. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने एका खाजगी संस्थेसोबत काम करायला सुरुवात केली आणि रेशमी कापड विणण्याच्या पारंपरिक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ती माजुली जिल्ह्यातल्या गावांना वारंवार भेट देत राहिली.

PHOTO • Prakash Bhuyan
PHOTO • Prakash Bhuyan

डावीकडे – आसाममधल्या माजुली इथल्या कमलांबरी या आपल्या दुकानात यामिनी पायेंग छायाचित्रासाठी पोझ देताना. उजवीकडे – एक परंपरागत एरी शाल

PHOTO • Prakash Bhuyan
PHOTO • Prakash Bhuyan

यामिनी पायेंगच्या कार्यशाळेतली विणकामाची साधनं

ज्या घरांमध्ये रेशीमकिडे पाळले जातात, त्या घरातली मुलं आपल्या आईकडून हे काम शिकतात असं माजुलीमध्ये राहणाऱ्या यामिनीनं सांगितलं. मला कापड विणणं किंवा धाग्यापासून रिळं तयार करणं ही कामं कोणी शिकवली नाहीत. माझ्या आईचं काम पाहूनच मी शिकले.

बऱ्याच बायका स्वतःच्या हातानं विणलेल्या रेशमी कापडाचेच पोशाख वापरत असत कारण त्यावेळी यंत्रावर विणलेलं कापड आजच्याइतकं सहज उपलब्ध होत नसे. स्त्रिया एरी, नूनी किंवा मोगा रेशमापासून बनवलेले सदोर मेखला वापर असत आणि जिथे जातील तिथं त्या टाकुरी आपल्यासोबत घेऊन जात असत असं यामिनी म्हणाली.

यामिनी म्हणाली, मी तेव्हाच ठरवलं होतं की मी एरी रेशीमकिड्यांची शेती करेन आणि इतरांनाही त्याचं शिक्षण देईन. सध्या यामिनी माजुलीतल्या २५ महिलांना विणकाम व वस्त्रोद्योगाचं प्रशिक्षण देतेय. तिने विणलेल्या वस्त्रांचं प्रदर्शन देशपरदेशात भरवलं जात आहे. ब्रिटीश संग्रहालयातही तिने विणलेलं एरी रेशमाचं कापड ठेवण्यात आलंय.

एरी रेशमाच्या कपड्यांना खूप मागणी आहे पण आम्ही ते पारंपरिक पद्धतीनंच तयार करतो असं यामिनीनं सांगितलं. ती म्हणाली, एरी रेशमी कामड यंत्रमागावरही विणलं जाऊ शकतं आणि बिहारमधल्या भागलपूर रेशमानं सध्या आसाममधली बाजारपेठ व्यापलीय.

हातमागावर विणलेल्या कापडाची किंमत त्यासाठी वापरलेल्या धाग्याचा प्रकार, तंत्रज्ञान तसंच गुंतागुंतीची कलाकुसर यावरुन ठरते. पारंपरिक कलाकुसर असलेला हातमागावर विणलेला एरी रेशमाची शाल साडेतीन हजारांपेक्षा जास्त किमतीची असू शकते. हातमागावरच्या सदोर मेखलाची बाजारातली किंमत 8 हजारांपासून सुरू होते आणि स्थानिक बाजारात ही किंमत 15 ते 20 हजारांच्या दरम्यान असू शकते.

पूर्वी आसाममधल्या मुली आपल्या प्रियकरासाठी गमुसा, रुमाल, उशीचे अभ्रे विणायच्या आणि आमच्या मिशिंग मुली गलुकसुद्धा विणायच्या अशी माहिती यामिनीनं दिली. लोकांनी आपल्या पारंपरिक पद्धती सोडून दिल्या आणि त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवल्या नाहीत, तर हा समृद्ध सांस्कृतिक वारसा नष्ट होईल अशी भीती तिनं व्यक्त केली. त्यामुळेच माझी जबाबदारी समजून, ही कला मला जमेल तसं पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी मी प्रयत्न करतेय असं यामिनी म्हणाली.

या वार्तांकनासाठी मृणालिनी मुखर्जी फौंडेशनचे अर्थसहाय्य मिळाले आहे.

Prakash Bhuyan

பிரகாஷ் புயன் அசாமை சேர்ந்த கவிஞரும் புகைப்படக் கலைஞரும் ஆவார். அசாமிலுள்ள மஜுலியில் கைவினை மற்றும் பண்பாடுகளை ஆவணப்படுத்தும் 2022-23ன் MMF-PARI மானியப்பணியில் இருக்கிறார்.

Other stories by Prakash Bhuyan
Editor : Swadesha Sharma

ஸ்வதேஷ ஷர்மா ஒரு ஆய்வாளரும் பாரியின் உள்ளடக்க ஆசிரியரும் ஆவார். பாரி நூலகத்துக்கான தரவுகளை மேற்பார்வையிட தன்னார்வலர்களுடன் இணைந்து பணியாற்றுகிறார்.

Other stories by Swadesha Sharma
Translator : Surekha Joshi

Surekha Joshi is a Pune-based freelance translator with a post graduation in Journalism. She works as a Newsreader with All India Radio (Pune).

Other stories by Surekha Joshi