सैनिक टाकळीत शिरताना सामुदायिक भवनाच्या भोवताली एक ‘अमर जवान’ स्मारक पहावयास मिळतं. या स्मारकावर युद्धात कामी आलेल्या १८ जवानांची नावे कोरली आहेत.
महाराष्ट्रातील कोल्हापूरपासून ५० किमी दूर शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी ह्या गावाला अनेक पिढ्यांपासून सैनिकांचा इतिहास लाभला आहे. ५५०० लोकसंख्या असलेल्या या गावातील जवळपास प्रत्येक परिवाराने एक तरी सैनिक देशाला सुपूर्त केला आहे.
२००७ साली सैनिक समाज कल्याण मंडळाने या स्मारकाची स्थापना केली. मंडळाचे अध्यक्ष आणि सैनिक टाकळीचे रहिवासी लेफ्टनंट बाबासाहेब सीताराम पाटील ३६ वर्षे सैन्यात राहिल्यानंतर २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले. ते म्हणतात, “ पूर्वी गावातील सुमारे १२०० परिवारातील किमान एक तरी तरुण देशसेवेसाठी सैन्यात जात असे; परंतु आजकाल सैन्यात भरती पदांची संख्या कमी झाल्याने स्पर्धेत वाढ झाली आहे. त्यामुळे सैन्यात जाणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे.”
डावीकडेः लेफ्टनंट बाबासाहेब पाटील, सैनिक समाज कल्याण मंडळाचे अध्य्क्ष उजवीकडेः शेतीतल्या उत्पन्नातून स्वराज्य करिअर अकादमीची स्थापना करणारे विनोद पाटील
पहिल्या महायुद्धाच्या वेळी इंग्रज सैन्याला सैनिकांची कमतरता जाणवू लागली तेव्हापासूनच सैनिक टाकळीतून तरुण सैन्यात रुजू होऊ लागले. १९६८ मध्ये सेनाप्रमुख जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांनी टाकळी गावाचे सैन्यदलातील योगदान पाहून त्याचे “सैनिक टाकळी” असे नामकरण केले.
पण पाटील यांच्या मते गावातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य सन्मान आणि मोबदला मिळालेला नाही. १९७८ मध्ये सैनिकांच्या कल्याणाकरिता कॅप्टन बापूसाहेब जाधवांनी स्थापन केलेल्या सैनिक समाज कल्याण मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. मंडळात जवळपास ६५० माजी सैनिक आणि २५० वर्तमान सैनिक आहेत. पाटील सांगतात, “येथे आम्ही त्यांचा मोबदला (जसे की पेन्शन) आणि शासन दरबारी असलेल्या अधिकारांची काळजी घेतो. बरेचसे सैनिक शिक्षित नसल्यामुळे त्यांचा कागदोपत्री व्यवहारदेखील आम्हीच सांभाळतो.”
ललिता कांबळेंचे वडील लिंगप्पा चावरे सियाचेनमध्ये धारातीर्थी पडले. तेव्हा त्या फक्त ९ वर्षांच्या होत्या
३९ वर्षीय ललिता कांबळे या आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या गावकऱ्यांपैकीच एक. १९८७ मध्ये सियाचेनमध्ये झालेल्या चकमकीत त्यांचे वडील लिंगप्पा चावरे शहीद झाले. “त्यावेळी मी चौथीत तर माझी लहान बहीण तिसरीत होती. लहान भाऊ बालवाडीत आणि आई चार महिन्यांची गरोदर.” त्या पुढे सांगतात, “ वडिलांच्या बलिदानानंतर आम्हाला दरमहा ७०० रुपये पेन्शन आणि (एकरकमी) २०,००० रुपये मिळाले. माझी दिवंगत आई त्या ७०० रुपयांत अख्खं घर चालवत असे.”
ललिताचा लहान भाऊ जीवन सैन्य प्रशिक्षणाकरिता बेळगांवला गेला पण सैन्यात प्रवेश न मिळाल्यामुळे सध्या वाहनचालक म्हणून काम करतो. काही वर्षांपूर्वीच ललिताचे पती मरण पावले. “मला (माझ्या वडीलांची) पेन्शन मिळत नाही. कारण काय तर मी विवाहित असून मला एक मुलगा आहे. पण माझ्या भावालाही पेन्शन मिळत नसल्याने आम्ही पुण्यातील औंध मिलिटरी कॅम्प मध्ये चौकशी केली. आमची मागणी वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचवू असं त्यांनी आम्हाला सांगितलं खरं, पण त्यानंतर काहीही झालेलं नाही. आता माझ्या (१९ वर्षीय) मुलाने सैन्यात प्रवेश मिळवावा हेच माझं स्वप्न आहे.”
सुलाताई पाटलांचे पती ३० वर्षांपूर्वी शहीद झाले, त्या अजूनही मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत
सुलाताई पाटील यांनाही शासनाकडून त्यांचं देणं हवं आहे. १९८७ मध्ये लग्नानंतर ६ महिन्यातच श्रीलंकेतील जाफनामध्ये त्यांचे पती शहीद झाले. “अनेकदा मागणी करूनही मला काहीच मदत मिळालेली नाही.” सुलाताई सांगतात, “मी अनेकदा तहसीदाराच्या कार्यालयात जाऊन आले. मदत तर सोडाच माझी साधी तक्रारही नोंदवून घेतली नाही. नंतर मी शिवणकाम करायला लागले पण त्यातून घर चालविणं कठीण आहे. सरकारने आम्हाला काही तरी नुकसानभरपाई किंवा जमिनीचा तुकडा तरी द्यायला हवा.”
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, स्वराज्य अकादमीच्या भिंतीवरील घोषवाक्य
२०१६ मध्ये शहीद रावसाहेब चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने सैनिक प्रशिक्षणाकरिता येथे स्वराज्य करिअर अकादमीची स्थापना करण्यात आली. १९७१ मधील भारत–पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या रावसाहेब पाटील यांच्या नावे ही संस्था काम करते. संस्थापक विनोद पाटील म्हणतात, “ बहुतांश तरुणांना स्पर्धापरीक्षांबाबत माहिती नसते. मला सैन्यात जाण्याची इच्छा नसल्याने काहीतरी वेगळे म्हणून मी इच्छूक तरुणांना मार्गदर्शन करण्याचे ठरविले.” विनोद पाटील यांनी आपल्या शेती व्यवसायातून आलेल्या पैशातून ही अकादमी स्थापन केली आहे. सध्या इथे टाकळी आणि आजूबाजूच्या गावातील २५ तरूण प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाची जबादारी विनोदचे काका कॅप्टन (निवृत्त) वसंत पाटील यांच्यावर आहे.
स्थानिक छ्त्रपती शिवाजी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे देखीलएक दिवस सैन्यात जाण्याचे स्वप्न आहे. यातल्या कित्येकांचे पालक सैन्यात नाहीत, तरीही. यातले काही जण उद्या जवान म्हणून सैन्यात रुजू होतील आणि सैनिक टाकळीचं नाव पुन्हा एकदा सार्थ ठरेल.
या लेखाची वेगळी आवृत्ती लेखकाच्या ब्लॉगवर ३० जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झाली होती .
फोटोः संकेत जैन