सकाळी सकाळी सुनीता साहू कष्टाने कुशीवर वळल्या आणि विचारू लागल्या, “मुलं कुठे आहेत?” त्यांचे पती बोधराम म्हणाले की ते झोपी गेलेत. त्यांनी सुस्कारा टाकला. अख्खी रात्र त्या जाग्या होत्या. आणि बोधराम मात्र चिंतेत पडले होते. एरवी ते मस्करीत म्हणायचे की सुनीताला कुठेही आणि कधीही झोप लागू शकते.
पण २८ एप्रिलच्या रात्री बोधराम आणि सुनीताची तिन्ही मुलं (१२ ते २० वयोगटातली) मोहरीच्या कोमट तेलाने आळीपाळीने आईचे हात-पाय, डोकं आणि पोट चोळून देत होते. सुनीता वेदनेने विव्हळत होत्या. “मला काही तरी होतंय,” त्या पुटपुटल्या. बोधराम यांना त्या दिवशी सकाळी काय घडलं ते आठवून सांगत होते.
साहू कुटुंब लखनौ जिल्ह्याच्या खरगपूर जागिरमधल्या एका झोपडपट्टीत राहतात. मूळचे छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातल्या मारो गावचे हे रहिवासी सुमारे वीस वर्षांपूर्वी ते इथे रहायला आले. ४२ वर्षीय बोधराम बांधकामावर गवंडीकाम करतात. ३९ वर्षीय सुनीता घरचं पहायच्या.
एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशाला कोविड-१९ महासाथीच्या दुसऱ्या लाटेने वेढून टाकलं होतं. २४ एप्रिल रोजी राज्यात ३८,०५५ नव्या रुग्णांची नोंद झाली होती – राज्यासाठी हा उच्चांक होता. अर्थात रुग्णांचे आकडे खूप कमी दाखवले असण्याची चिंताही इथे व्यक्त करण्यात आली होती.
“प्रत्यक्षात रुग्णसंख्या चार-पाच पटीने जास्त असू शकते. आकडेवारी कमी आहे कारण या आजाराला असलेल्या सामाजिक कलंकामुळे लोक तपासून घेण्यासाठी स्वतःहून पुढे येत नाहीयेत. त्यामुळे खरं चित्र काय आहे ते समजणं अवघड आहे,” रश्मी कुमारी सांगतात. त्या लखनौच्या राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (लोहिया वैद्यकीय संस्था) येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
सुनीताला कोविड-१९ झालेला नाही अशी साहू कुटुंबाला खात्री होती कारण त्यांच्यापैकी कुणालाच आजार झाला नव्हता. त्यांना ताप होता, अंग दुखत होतं आणि जुलाब लागले होते – ही सगळी लक्षणं करोनाच्या संसर्गाकडे निर्देश करत होती.
२६ एप्रिल रोजी सकाळी सुनीता यांनी अंगदुखी आणि थकवा आल्याची तक्रार केली. सायकलच्या कॅरियरवर सुनीता यांना बसवून बोधराम तीन किलोमीटरवरच्या दवाखान्यात पोचले. त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज आहे का हे बोधराम यांनी डॉक्टरांना विचारलं होतं.
बोधराम यांना तेव्हाचे संवाद आठवतात. डॉक्टर म्हणाले होते, “तुम्ही त्यांना कुठे नेणार? कुठल्याही दवाखान्यात जागा नाहीये. ही औषधं त्यांना द्या, तीन दिवसांत त्या बऱ्या होतील.” डॉक्टरांनी जवळच्याच लॅबमध्ये फोन केला आणि रक्ताचा नमुना घेऊन जायला सांगितलं. त्यांची कोविड-१९ ची तपासणी काही करण्यात आली नव्हती.
बोधराम यांनी तपासणीचे ३,००० रुपये भरले. डॉक्टरांची फी आणि औषधांचे १,७०० रुपये खर्च आला. औषधं म्हणजे खाकी पाकिटात दिलेल्या गोळ्या आणि गडद रंगाचं एक पातळ औषध. हे शक्तीसाठी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
त्या संध्याकाळी ५ वाजता बोधराम पुन्हा एकदा सुनीता यांना सायकलवर मागे बसवून डॉक्टरांच्या दवाखान्यात घेऊन आले. तोपर्यंत त्यांच्या रक्त तपासणीचा अहवाल आला होता. त्यामध्ये serum glutamic oxaloacetic transaminase या विकराचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं. यकृतात (किंवा इतर अवयवांमध्ये) बिघाड झाला असल्याचं यातून लक्षात येतं. डॉक्टरांनी सांगितलं की सुनीता यांना विषमज्वर झाला आहे. ताकद यावी म्हणून सुनीताला सलाईन लावावं ही बोधराम यांची मागणी काही डॉक्टरांनी मान्य केली नाही. आता दिलेल्या गोळ्यांनी त्यांना लगेच आराम पडेल असं डॉक्टर म्हणाले.
विषमज्वर किंवा टायफॉइड जगभरात आढळणारी आरोग्याची मोठी समस्या आहे, मात्र एका शोधनिबंधानुसार, “... कोविड-१९ रुग्णांमध्ये विडाल तपासणीत [विषमज्वरासाठी रक्त तपासणी] संसर्ग झाल्याचा चुकीचा अहवाल येण्याची शक्यता विकसनशील देशांसाठी सार्वजनिक आरोग्याचा कळीचा मुद्दा आहे... सध्या विषमज्वर आणि डेंग्यूचा संसर्ग झाल्याचे चुकीचे अहवाल काळजीपूर्वक वाचणं फार महत्त्वाचं आहे. कोविड-१९ च्या महासाथीच्या काळात अशा रुग्णांवर देखरेख आणि त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा गरजेचा आहे.”
काळजी घ्यायलाच पाहिजे याला डॉ. प्रवीण कुमार दास देखील दुजोरा देतात. ते लोहिया वैद्यकीय संस्थेच्या कोविड-१९ रुग्णालयात प्रमुख भूलतज्ज्ञ आहेत. “आमच्या दवाखान्यात आम्हाला असं दिसून आलंय आहे की कोविडमुळे आजारी असलेल्या सुमारे १०% पेशंटमध्ये तयार झालेली प्रतिपिंडं विषमज्वराच्या जीवाणूलाही चिकटतात. त्यामुळे विषमज्वराचं निदान असलं तरी प्रत्यक्षात कोविड झालेला असतो.”
विषमज्वराचं निदान झालेल्या सुनीता २९ एप्रिल रोजी सकाळी निधन पावल्या. त्यांनी आपल्या मुलांची विचारपूस केली आणि अगदी अर्ध्या तासात त्या गेल्या. ताप व इतर लक्षणं जाणवली त्याला फक्त तीन दिवस उलटले होते. बोधराम यांना वाटलं की अखेर त्यांना झोप लागलीये. सुनीताच्या कपाळावर हात ठेवताच ते किंचाळलेच. मुलंही जागी झाली. “अशीच, अगदी सहज ती कायमची झोपी गेली,” ते म्हणाले. काही आठवड्यांपूर्वी माझ्याशी फोनवर बोलताना तेव्हा घडलेले सगळ्या घटना आणि प्रसंग कथन केले होते.
सुनीतांच्या दहनासाठी साहूंना मृत्यूचा दाखला गरजेचा होता. खरगपूर जागिरचे प्रधान रबिला मिश्रा यांनी दाखला दिला. निळ्या शाईत त्यांनी लिहिलं होतं, ‘२९.०४.२०२१ त्यांच्या झोपडीत त्या मृत झाल्या’. मृत्यूच्या कारणाचा उल्लेखच त्यावर नव्हता.
आणि म्हणूनच सुनीता यांची गणना कोविडबळींमध्ये केली जाणार नाही. उत्तर प्रदेशात आणि इतरत्रही कोविडच्या मृत्यूंची संख्या खूप कमी नोंदवली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जातीये. जगभरातूनही हाच चिंतेचा सूर एकू येतोय की नोंदवलेल्या आकड्यांपेक्षा प्रत्यक्षात झालेले मृत्यू किती तरी पट अधिक असणार आहेत.
“... कोविड-१९ मुळे झालेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मृत्यूंचे आकडे लक्षणीय रित्या कमी असण्याची शक्यता आपल्यापुढे आ वासून उभी आहे.” जागतिक आरोग्य संघटना नमूद करते. “सामान्य परिस्थितीत अपेक्षित असणाऱ्या मृत्यूंहून जादा असलेले मृत्यू म्हणजे “अतिरिक्त मृत्यू”. यामध्ये केवळ पक्कं निदान झालेले मृत्यूच समाविष्ट आहेत असं नाही. योग्य निदान न झालेले किंवा नोंद न झालेले कोविडबळी तसंच या संपूर्ण संकटाचा परिणाम म्हणून झालेल्या मृत्यूंचाही यात समावेश होतो. केवळ पक्कं निदान झालेल्या कोविडबळींच्या संख्येपेक्षा अशा प्रकारची मोजणी सर्वांगीण आणि अचूक अंदाज बांधण्यात मदत करते.”
योग्य निदान होत नसलेलं आणि अनेकदा कोविडशी संबंध जोडण्यात येणारं लक्षण म्हणजे हृदयाच्या स्नायूंचा दाह. यामुळे प्राणवायूचा पुरवठा थांबतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
लखनौपासून सुमारे ५६ किलोमीटरवर महमुदाबाद तालुक्यातल्या मीरा नगर गावातल्या सरन कुटुंबियांच्या बाबतीत हे असंच घडलं. २२ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ५७ वर्षीय राम सरन यांना अचानक तीव्र कळ आली. त्यांच्या पत्नी ५६ वर्षीय रामवती आपल्या छातीवर हात ठेवून कुठे कळ आली ते सांगत होत्या.
रामवती तेव्ही लखनौमध्ये होत्या. वयाच्या १६ व्या वर्षी त्या आपले पती राम सरन यांच्यासोबत या शहरात रहायला आल्या होत्या. शहराच्या उत्तरेला असलेल्या अलिगंज भागात सरन कुटुंब – पती पत्नी आणि तिघं मुलं – रहायचं. राम सरन आपल्या टपरीवर पाण्याच्या बाटल्या, शीतपेयं, वेफर्स आणि सिगारेटी विकायचे. काही महिन्यांपासून या सगळ्यासोबत त्यांच्या टपरीवर मास्क देखील विकायला ठेवले जाऊ लागले होते.
टाळेबंदीमुळे त्यांचं हे छोटंसं दुकान बंद झालं आणि त्यानंतर राम सरन आपल्या वडिलोपार्जित घराची देखभाल करण्यासाठी आपल्या मूळ गावी येजा करत होते. या काळात हे कुटुंब घरकाम करून रामवती जी काही कमाई करायच्या त्यावर गुजराण करत होतं.
राम सरन यांना त्रास व्हायला लागला तेव्हा त्यांच्या मुलाने, राजेश कुमारने त्यांना घरापासून महमुदाबादच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं. हा दवाखाना त्यांच्या घरापासून १० किलोमीटरवर आहे. तिथे असलेल्या डॉक्टरने राम सरन यांना दोन इंजेक्शनं दिली.
“तिथे पोचेपर्यंत माझ्या वडलांना धाप लागली होती. डॉक्टर म्हणाले की आमच्याकडे फक्त छोटा ऑक्सिजन सिलिंडर आहे पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयतच [८ किलोमीटर अंतरावर] न्यावं लागेल,” राजेश सांगतो. १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलवून आणली (राज्याचा या सुविधेचा क्रमांक). पण अँब्युलन्समध्ये ठेवताक्षणी म्हणजेच २२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता राम सरन यांनी प्राण सोडला.
“ते सारखे म्हणत होते की ‘मी काही जगत नाही’. त्यांची तब्येत इतकी चांगली होती, पण त्यांचा श्वासच संपून गेला,” राजेश म्हणतो.
मृत्यूचा दाखलाच दिला गेला नाही आणि गावात त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सामुदायिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांनी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘कोविड-१९ अँटिजेन पॉझिटिव्ह’ असं लिहिलं असलं तरी कुठलीही विशेष खबरदारी न घेताच त्यांचा दहनविधी पार पाडण्यात आला कारण त्यांच्या घरच्यांचा अजूनही ठाम विश्वास आहे की ते ‘हार्ट फेल’मुळेच मरण पावले.
सामुदायिक आरोग्य केंद्रामध्ये राम सरन यांना सेवा मिळू शकली नाही. राज्याच्या शहरांमध्ये आणि गावपाड्यांमध्ये देखील आरोग्य सेवांची दयनीय अवस्था झाली आहे, त्याचंचं हे प्रातिनिधीक उदाहरण. १७ मे राजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानेही अपुऱ्या आरोग्य सेवांबद्दल टिप्पणी केली होती.
या महासाथीत केवळ सामुदायिक आरोग्य केंद्रं किंवा जिल्हा रुग्णालयंच सेवा देण्यात कमी पडली असं मात्र नाही. राज्याची राजधानी असलेल्या लखनौ शहरातसुद्धा आरोग्याच्या सुविधांची कमतरता आहे. काही महिन्यांपूर्वी मौर्य कुटुंबाने याचा जवळून अनुभव घेतला.
१२ एप्रिल रोजी सुनील कुमार मौर्य, वय ४१ लखनौच्या चिनहट हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यांनी त्यांच्या पुतण्याला, पवनला सांगितलं, “मला श्वासच पुरत नाहीये. तू मला इथे कशासाठी ठेवलंयस? घरी नेलंस तर मला बरं वाटेल बघ.”
एक आठवडाभरापूर्वी मौर्य यांना ताप यायला लागला. खोकलाही होता. पण त्यांना असा त्रास कायमच व्हायचा त्यामुळे घरच्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. “मला चालण्याचंही त्राण राहिलेलं नाही,” असं ते म्हणायला लागले तेव्हा मात्र घरचे चाचपले. ३० वर्षीय पवन सांगतो.
मौर्य कुटुंब लखनौच्या मध्यवर्ती गोमतीनगर भागातल्या छोटी जुगौली या झोपडपट्टीत राहतं. इथे अनेक स्थलांतरित कामगारांची घरं आहेत. सुनील कुमार सुलतानपूर जिल्ह्याच्या जयसिंगपूर तालुक्याकल्या बीरसिंगपूर या गावातून इथे आले त्याला वीस वर्षं लोटली असतील. ते बांधकामावर मुकादम म्हणून विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांवर मजूर पुरवण्याचं काम करायचे.
दाटीवाटीची वस्ती असलेली छोटी जुगौली आणि तिच्याहून मोठी असलेली बडी जुगौली या दोन्ही झोपडपट्ट्या दीड किलोमीटर क्षेत्रावर पसरल्या आहेत. आणि दोन्हींसाठी मिळून एक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सहा अंगणवाड्या आहेत.
इथल्या एका केंद्रातली आशा कार्यकर्ती सांगते की महासाथ सुरू झाल्यापासून इथे जाणीवजागृतीचा एकही कार्यक्रम घेण्यात आलेला नाही किंवा मास्क, सॅनिटायझरचं वाटपही करण्यात आलेलं नाही. शासकीय कारवाई होण्याच्या भीतीने ती तिचं नाव सांगत नाही पण तिला खात्री आहे की १५,००० लोकांच्या या वस्तीतल्या शेकडो लोकांना कोविडची लागण झाली आहे पण त्यांची तपासणी किंवा कोविड रुग्ण म्हणून नोंद झालेली नाही.
तिच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १,५१७ कुटुंबांमध्ये कोविडमुळे एकही मृत्यू झालेला नाही. “सर्दी, खोकला आणि तापामुळे लोक मरतायत, पण कुणीच तपासून घ्यायला तयार नाही,” काही महिन्यांपूर्वी ती मला सांगत होती. “मार्च २०२० मध्ये आम्हाला दररोज ५० घरांना भेटी देऊन लक्षणं असणारे कुणी रुग्ण आहेत का यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. पण हे फार जोखमीचं काम असल्याने मी जात नाही. मी आमच्या भागातल्या लोकांचा एक गट तयार केलाय आणि मी फोनवर मला माहिती द्या असं त्यांना सांगितलंय.”
तर, स्थानिक आरोग्य कार्यकर्ती उपलब्ध नाही आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांना कोविडचं काम दिल्यामुळे तेही जागेवर नाहीत. मौर्य जेव्हा आजारी पडले तेव्हा कुठे जावं हाच मोठा प्रश्न होता.
म्हणून पवन आपल्या काकांना जवळच्या एका खाजगी दवाखान्यात घेऊन गेला. विज्ञानाचा विद्यार्थी असणारा पवन छोटी जुगौलीत एका डॉक्टरच्या दवाखान्यात काम करतो. त्या दवाखान्यात अँटिजेन तपासणीचे ५०० रुपये घेतले. चाचणीत संसर्गाचं निदान झालं नाही. त्यानंतर त्याने मौर्य यांना ३० किलोमीटरवर असलेल्या टी. एस. मिश्रा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेलं. तिथे त्यांनी सांगितलं की अँटिजेन तपासणी विश्वासार्ह नाही त्यामुळे त्याच्या चुलत्यांना दाखल करून घेता येणार नाही.
पण आपात्कालीन कक्षात काम करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला औषधांसाठी चिठ्ठी दिली त्यात आयवरमेक्टिन, क जीवनसत्त्व आणि झिंक लिहून दिलं होतं. ही औषधं शक्यतो कोविड-१९ ची लक्षणं असतील तर दिली जातात.
हे सगळं होईपर्यंत सुनील मौर्य यांची रक्तातली प्राणवायूची पातळी ८० पर्यंत घसरली होती. इतर दोन हॉस्पिटलला गेल्यावर त्यांना सांगण्यात आलं की व्हेंटिलेटर लावावा लागेल पण त्यांच्या दवाखान्यात त्याची सोय नाही. चार तास हिंडल्यानंतर त्यांना दाखल करून घेणारं हॉस्पिटल अखेर सापडलं. मौर्य यांना ऑक्सिजन लावला गेला. आरटी-पीसीआर तपासणीही करण्यात आली.
१२ एप्रिल रोजी श्वास घ्यायला खूपच त्रास व्हायला लागला आणि काही वेळातच सुनील मौर्य यांनी प्राण सोडला. लखनौ महानगरपालिकेने दिलेल्या (दहन/दफन करण्यासाठी आवश्यक) मृत्यूच्या दाखल्यावर मृत्यूचं कारण ‘हार्ट फेल’ असं नोंदवण्यात आलं होतं. दोन दिवसांनी आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल आला त्यात त्यांना कोविड-१९चा संसर्ग झाल्याचं उघड झालं.
“एका आठवड्यात खेळ खलास. तपासण्यांनी आम्हाला दगा दिला,” पवन म्हणतो.
“महासाथीची दुसरी लाट आणि आरोग्यसेवेसाठी अगदीच तुटपुंजा निधी याचा परिणाम म्हणजे अचूक निदानाशिवाय शहरी गरिबांना जीव गमवावा लागतोय,” रिचा चंद्रा सांगतात. शहरी वस्त्या, बेघर आणि रोजंदारीवरच्या लोकांसोबत काम करणाऱ्या लखनौ येथील विग्यान फौंडेशन या संस्थेमध्ये त्या कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्या सांगतात की शहरी गरिबांना मिळणारा रोजगार आणि सामाजिक सुरक्षेचं कवच अत्यंत तोकडं आहे. पुरेशी जागरुकता नाही, दाटीवाटीने गिचमिडीत रहावं लागतं. आणि यात आता चाचणी केल्यावर कोविडचं निदान होण्याची भीती आणि त्यासंबंधी सामाजिक कलंकाची भर पडली आहे.
आधीच तपासून घेण्याची भीती, त्यात रॅपिड अँटिजेन आणि आरटी-पीसीआर अशा दोन्ही चाचण्यांमध्ये संसर्ग नाही असं चुकीचं निदान येण्याची शक्यता त्यामुळे भीतीत अधिकच भर पडतीये.
“आरटी-पीसीआर चाचण्यांचे अहवाल चुकीचे येण्यामागे अनेक कारणं आहेत,” लोहिया वैद्यकीय संस्थेच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख ज्योत्स्ना अगरवाल सांगतात. “या तपासणीचा आधार म्हणजे आरएनएच्या प्रवर्धनाचं सूत्र. [एकीकडून दुसरीकडे नेत असताना] आरएनए जिवंत राहण्यासाठी विशिष्ट स्थिती असावी लागते. डीएनएचं मात्र तसं नाही. शिवाय कधी कधी घशातला स्राव नीट गोळा केला जात नाही किंवा आयसीएमआरची मान्यता नसलेला संच चाचणीसाठी वापरला जाऊ शकतो. अँटिजेन चाचण्यांमध्ये झटक्यात निदान होतं, पण त्यामध्ये आरएनचं प्रवर्धन होत नाही. त्यामुळे ही चाचणी म्हणजे गवताच्या भाऱ्यातून सुई शोधून काढण्यासारखं आहे.”
लखनौच्या मध्यवर्ती भागातल्या मानकनगर परिसरातल्या गढी कनौरा इथे राहणाऱ्या ३८ वर्षीय सुएब अख्तरचा आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल नकारात्मक आला.
अख्तरला कांजिण्या झाल्या होत्या आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तो त्यातून बरा झाला होता. तशा स्थितीतही त्याने रोजे ठेवायचं ठरवलं (१३ एप्रिल रोजी रमझान सुरू झाला). त्याची आई, ६५ वर्षीय सद्रुनिशा त्याला नको म्हणत होती.
२७ एप्रिल रोजी अख्तरला खोकला यायला लागला आणि धाप लागली. त्याच्या घरच्यांनी त्याला आरटी-पीसीआर आणि सीटी स्कॅन तपासणीसाठी एका खाजगी प्रयोगशाळेत नेलं. ७,८०० रुपये खर्च आला. चाचणीत संसर्ग नसल्याचं निदान झालं पण स्कॅनमध्ये ‘विषाणूजन्य न्यूमोनियाचं’ निदान झालं. पण कोविडची चाचणी नकारात्मक आल्यामुळे खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये काही त्याला दाखल करून घेण्यात आलं नाही. कोविडरुग्णांना प्राधान्य दिलं जात होतं, खाटा रिकाम्या नव्हत्या आणि बाकी आपात्कालीन सेवा सोडल्या तर सगळ्या आरोग्यसेवा ठप्प होत्या.
३० एप्रिल रोजी अख्तरने प्राण सोडला. घरच्यांनी ऑक्सिजनची घरीच सोय केली होती. ऑक्सिजन लावला असतानादेखील श्वास घ्यायला त्रास झाला आणि तो गेला. “त्याने उसासा टाकला आणि त्याच्या तोंडातून फेस यायला लागला,” सद्रुनिशा सांगतात.
आपला मुलगा “निष्णात इलेक्ट्रिशियन” होता असं त्या सांगतात. त्याला नुकतीच कतारमध्ये नोकरी मिळाली होती. “नोकरीसाठी व्हिसा मिळण्याआधी त्याला मृत्यूनेच इथनं जायचा व्हिसा देऊन टाकला,” त्या म्हणतात.
घरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या प्रेमवती नगरमधल्या तकिया मीरन शाह दफनभूमीत त्याचं दफन करण्यात आलं. तिथे मिळालेल्या मृत्यूच्या दाखल्यावर मृत्यूचं कारण नमूद केलेलं नाही. सद्रुनिशांना मात्र खात्री आहे की त्यांच्या मुलाला कोविड-१९ ची बाधा झाली असणार कारण कांजिण्या होऊन गेल्यामुळे तसंही त्याची प्रतिकारशक्ती कमी झाली होती.
१४ जून २०२० रोजी भारत सरकारने एक अधिसूचना काढली होती, “... कोविडचा संशय असलेले मृतदेह ताबडतोब नातेवाइकांच्या ताब्यात दिले जावेत, प्रयोगशाळेतून निदान पक्कं होण्याची वाट पाहत बसू नये.”
याचा अर्थ असा की ज्यांना कोविडची लक्षणं आहेत पण चाचणीत निदान झालेलं नाही अशांचा समावेश कोविडबळींमध्ये केला जाणार नाही.
उन्नाव जिल्ह्याच्या बिघापूर तालुक्यातल्या कुतुबुद्दिन गरहेवा गावच्या अशोक कुमार यादव यांच्या बाबत असंच घडलं. राज्य वीज मंडळात कंत्राटी कामगार असणाऱ्या ५६ वर्षीय अशोक कुमार यांना २२ एप्रिल पासून ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. गावातल्या केमिस्टकडून त्यांनी औषधंही घेतली. खोकला बळावला आणि अशक्तपणा जाणवायला लागला तेव्हा त्यांच्या घरच्यांनी, २५ एप्रिलच्या रात्री ४५ किलोमीटरवरच्या जिल्हा रुग्णालयात त्यांना नेलं. यादव यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली पण त्यांना दाखल करून घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी ते शौचाला जायला म्हणून पलंगावरून उठले आणि जमिनीवर कोसळले. तिथेच ते गतप्राण झाले.
“बस्स. तितकंच,” त्यांच्या पत्नी ५१ वर्षीय विमला म्हणतात. त्या गृहिणी आहेत.
घरच्यांनी कसलीच दक्षता न घेता त्यांचं दहन केलं. अशोक कुमार आणि विमला यांना तिघं मुलं आहेत. दोन दिवसांनी चाचणीचा अहवाल आला. अशोक कुमार यांना कोविड-१९ झाल्याचं निदान होतं. जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या मृत्यूच्या दाखल्यावर ‘हृदय आणि श्वसन यंत्रणा निकामी’ झाल्याने मृत्यू अशी नोंद आहे.
“कोविड-१९ च्या सर्व मृत्यूंची नोंद करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हेही खरं आहे की काही वेळा तपासणी झालेली नाही आणि काही वेळा अहवाल उशीरा आले आहेत. आता मात्र आम्ही जास्त सतर्क आहोत,” राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक, गिरिजा शंकर बाजपेयी सांगतात. लखनौ येथील कोविड-१९ व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
तरीही, आजवर अशा किती मृत्यूंची नोंद कोविडबळी म्हणून करण्यात आलेली नाही हे मात्र कधीही समजून येणार नाहीये.
उन्नावहून दुर्गेश सिंग यांनी दिलेल्या माहितीसह.