“मी दोन्ही हातात पाना घेऊनच मरतोय बघा,” शमशुद्दिन मुल्ला म्हणतात. “मरण आल्यावरच आम्ही रिटायर होतोय!”
हे जरा नाट्यमय वाटू शकतं पण खरंच शमशुद्दिन यांनी ७० हून अधिक वर्षं हातात पाना आणि इतर हत्यारं घेऊन कामं केलीयेत. हरतऱ्हेची इंजिनं दुरुस्त करायची कामं – पाण्याचे पंप, बोअरवेलच्या मोटरी, खोदकामाची बारकी यंत्रं, डिझेल इंजिन आणि इतरही किती तरी.
गप्प पडलेली किंवा बिघडलेली ही यंत्रं दुरुस्त करून पुन्हा चालू करण्याचं कसब त्यांच्याकडे असल्यामुळे कर्नाटकाच्या बेळगाव आणि महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये त्यांना भरपूर मागणी असते. “लोक मलाच बोलवतात,” त्यांच्या आवाजात अभिमान असतो.
शमशुद्दिन यांच्याकडे यंत्रात नक्की काय बिघाड झालाय हे हुडकून काढण्याचं खास कसब असल्याने शेतकरी आणि इतरही गिऱ्हाईक त्यांच्याकडे येतात. “मी लोकाला निस्तं हँडल फिरवायला सांगतो. यंत्रात काय बिघाड झालाय ते हुडकून काढायला तेवढंच बास होतंय,” ते सांगतात.
आणि मग खरं काम सुरू होतं. एखादं बिघडलेलं इंजिन सुरू करायला त्यांना आठ तास लागतात. “इंजिन खोलण्यापासून ते परत सगळं लावण्यापर्यंत सगळंच,” शमशुद्दिन सांगतात. “आजकाल, [इंजिनच्या] किटमध्ये सगळं सामान तयारच येतंय, त्यामुळे दुरुस्त करणं जरा सोपं झालंय.”
पण ही आठ तासाची सरासरी साधण्यासाठी असंख्य तासाचं काम आणि सराव कामी आलाय. आता वयाची ८३ वर्षं पूर्ण केलेल शमशुद्दिन गेल्या ७३ वर्षांत ५,००० हून जास्त इंजिन दुरुस्त केल्याचा अंदाज बांधतात – नदीतून पाणी उचलणारे पंप, तेलाचे घाणे, विहिरी आणि बांधकामावर दगडाच्या शिळा हलवणारी यंत्रं आणि इतरही किती तरी प्रकार.







