जयपालच्या दोन खोल्यांच्या घराला विटांच्या भिंती आणि पत्र्याचं छप्पर आहे. आत मात्र अनेक मोठमोठी आलिशान घरं तुम्हाला दिसतील. अनेक मजल्यांची उंच खांबांची, सज्जे आणि बुरुज असलेली.
ही सगळी घरं कागदाची आहेत बरं.
गेल्या ४-५ वर्षांपासून १९ वर्षीय जयपाल चौहान मध्य प्रदेशातल्या खांडवा जिल्ह्यातल्या आपल्या करोली गावातल्या घरी सकाळचा आणि दुपारचा बराचसा वेळ ही घरं उभी करतोय. कागदाच्या गुंडाळ्या करून त्यांच्या भिंती बनवायच्या आणि मग डिंकाचा वापर करून या गुंडाळ्यांच्या भिंतींचे महाल-राजवाडे उभे करायचे.
“मला इमारतीचं कायम आकर्षण वाटतं, त्या कशा बांधत असतील त्याचं,” तो म्हणतो.
वयाच्या १३ व्या वर्षीपासून जयपालने मंदिरांच्या पुठ्ठ्याच्या प्रतिकृती बनवायला सुरुवात केली. दुसऱ्या एका गावात एका लग्नाला गेला असताना त्याने कुणाच्या तरी घरी काचेचं एक छोटं मंदीर पाहिलं होतं. त्याला त्याचं इतकं कुतुहल वाटलं की त्याने स्वतः पुठ्ठ्याचं एक मंदीर तयार केलं. अशीच काही तयार करून त्याने कुणाकुणाला भेट म्हणून दिली. २०१७ साली शाळेतल्या प्रदर्शनात त्याच्या एका प्रतिकृतीला बक्षीस देखील मिळालं होतं.
त्याने पुठ्ठ्याची एक मोटारसायकल बनवली होती. त्याला देखील शाळेत बक्षीस मिळालं होतं. त्याच्या संग्रहामध्ये त्याने बनवलेल्या अशा अनेक वस्तू आहेत – टेबल फॅन, शर्यतीची कार आणि जुन्या खेळण्यातली चाकं वापरून तयार केलेली एक क्रेन.
“काही दिवस गेले की दमटपणामुळे पुठ्ठा मऊ पडायचा,” जयपाल सांगतो. “मग एक दिवस माझ्या मनात विचार आला की रद्दीत टाकायला ठेवलेल्या पुस्तकांचा मला वापर करता येईल. मला अचानकच ही कल्पना सुचली. मग मी कागदाच्या सुरनाळ्या करून त्यापासून ही मॉडेल तयार करायला सुरुवात केली.”
करोलीत तेव्हा सिमेंट-काँक्रीटची अनेक नवी घरं बांधली जात होती. ती पाहून त्याला सुरुवातीला नव्या कल्पना सुचत गेल्या. “ही घरं जे लोक बांधतायत ना ते गावात राहतात, आणि आम्ही [त्याचं कुटुंब] आणि दुसऱ्याच्या रानात काम करणारे लोक गावाबाहेर राहतो आणि आमची घरं अजूनही दगडमातीची आहेत,” जयपाल सांगतो. “पण या सिमेंटच्या घराचं डिझाइन काही मला फारसं आवडत नाही. म्हणून मी दोन-तीन वेगवेगळ्या कल्पनांचा मिलाफ करतो. फारच साधं डिझाइन असलं तर घराला उठाव येत नाही. पण जरा वेगळं काही तरी केलं असलं तर मी त्याचं कागदी मॉडेल तयार करतो.”
साधी दारं आणि खिडक्या असणाऱ्या घरांपेक्षाही त्याला कटआउट आणि कारागिरी केलेली घरं आवडतात. त्याने एक मॉडेल तयार केलं त्याबद्दल तो म्हणतो, “मी वरचा मजला गावातली घरं कशी असतात, तसा केलाय. पण तळमजला मात्र वेगळा आहे.” गावातल्या एका शिक्षकांनी त्याला रद्दीत जाणाऱ्या वह्या वापरायला दिल्या होत्या. त्यांच्या घरावरून प्रेरणा घेऊन त्याने हे मॉडेल बनवलं. पण या वह्यांमध्ये खूप चित्रं आणि व्यंगचित्रं होती, आणि जयपालच्या सांगण्यानुसार कागदाच्या मॉडेलवर ती विचित्र दिसतात. म्हणून मग तो जवळच्या एका सरकारी शाळेतून जुनी पुस्तकं आणि वह्या घेऊन आला.
“मी काही आधी प्लॅन किंवा डिझाइन तयार करत नाही. थेट घरं बनवायला सुरुवात करतो,” जयपाल सांगतो. सुरुवातीची काही त्याने नातेवाइकांना देऊन टाकली. पण मग त्याच्या या कलाकृती पहायला लोक घरी यायला लागले तसं त्याने भेट म्हणून ही घरं देणं थांबवलं. यातलं एकही त्याने आजवर विकलेलं नाही – काही घरं त्याच्या घरी मांडून ठेवलेली आहेत.
मॉडेलमध्ये काम किती आहे त्यावर घर किती दिवसात पूर्ण होणार ते ठरतं. २x२ उंच लांब आणि रुंद असणारं एक कागदी घर बनवायला त्याला ४ ते २० दिवस लागतात.
महाल उभारत नसेल तेव्हा त्याचं शिक्षण सुरू असतं. गावातल्या एका शाळेतून त्याने नुकतंच १२ वी चं शिक्षण [महासाथीच्या काळात ऑनलाइन] पूर्ण केलंय. त्याचे वडील दिलावर चौहान, वय ४५ सुतारकाम करतात. करोली आणि आसपासच्या गावांमध्ये तसंच शहरांमध्ये ते टेबल, खुर्च्या, झोपाळे तसंच दाराच्या चौकटी, उंबरे बनवायचं काम करतात. जयपाल त्यांना मदत करतो.
जयपाल म्हणतो की त्याला लाकडाचं काम करायला फारसं आवडत नाही पण तो दारांचं आणि खिडक्यांचं डिझाइन बनवून देतो किंवा पत्र्याचं छप्पर बसवायला लागणारी उपकरणं वापरायला मदत करतो. “शेजारच्या गावात तीन आणि करोलीत दोन दारांचं डिझाइन मी बनवलंय,” तो सांगतो. “मी इंटरनेटवरून आणि ऑनलाइन मासिकं मिळतात ती पाहतो आणि त्यातल्या कल्पना वापरून अनोखी डिझाइन तयार करतो. कधी कधी कागदावर काढतो पण बहुतेक वेळा लाकडावरच नक्षी काढतो आणि माझे वडील त्याप्रमाणे दार तयार करतात.”
कधी कधी जयपाल आपल्या मेहुण्यालाही मदत करायला जातो. ६० किलोमीटरवर त्याचं गाव आहे आणि तिथे तो शिलाईकाम करतो. तो कधी कधी त्याच्याकडे जाऊन कापड बेतायला किंवा विजारी शिवायला मदत करतो.
जयपालची आई, राजू चौहान, वय ४१ गृहिणी आहेत. पूर्वी घरच्या सुतारकामाच्या व्यवसायात त्या मदत करायच्या. “एखादी चारपाई बनवत असतील तर ती पाय बनवायची आणि माझे वडील बाकी सगळी कामं करायचे,” जयपाल सांगतो. पण घरची परिस्थिती सुधारत गेली आणि आता त्या हे काम करत नाहीत.
जयापलचे मामाजी मनोहर सिंग तन्वर यांचा त्याच्या या कामाला सगळ्यात जास्त पाठिंबा आहे. ते शेजारीच रहायचे आणि आपल्याकडे येणाऱ्या पाहुणे मंडळींना आपल्या भाच्याची कला दाखवायला आवर्जून घेऊन यायचे. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. डेंग्यू झाला असावा अशी शंका आहे.
जयपालची मॉडेल्स बनवण्याची आवड आणि त्याप्रती त्याची निष्ठा याला दिलावर आणि राजू या दोघांचाही पाठिंबा आहे. “मी काही शिकलेला नाहीये. पण मला वाटतं तो योग्य मार्गाने चाललाय आणि कित्येक लोक येऊन त्याचं काम पाहून जातात,” दिलावर म्हणतात. “त्याला हवं तेवढं त्याने शिकावं आणि माझ्या परीने जितकं शक्य आहे तितकं मी त्याच्यासाठी करेन. त्याच्या शिक्षणासाठी मला माझं घर आणि जमीन जरी विकावी लागली ना तरी चालेल. कारण जमीन काय परत घेता येईल. शिक्षणाची वेळ निघून गेली, की गेलीच.” राजू मला म्हणतातः “त्याच्याकडे लक्ष असू द्या. आमच्याकडे फार काही नाही. आमचा तो एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या दोघी बहिणींचं लग्न झालंय.”
जयपालचं घर सध्या घरांच्या प्रतिकृतींनी सजलं असलं तरी त्याच्या कुटुंबाने मात्र विस्थापनाच्या कळा सोसल्या आहेत. २००८ साली त्यांना करोलीहून तीन किलोमीटरवर असलेलं आपलं गाव, टोकी सोडावं लागलं कारण ओंकारेश्वर धरणामध्ये ते बुडणार होतं.
तिथून १० किलोमीटरवर असलेल्या एका गावात त्यांना पुनर्वसनाचा पर्याय देण्यात आला. मात्र ते गाव दुर्गम आणि ओसाड असल्याने दिलावर यांनी तिथे जायला नकार दिला. “तिथे दुकानं नव्हती, कामं नव्हती,” जयपाल सांगतो. मग त्याच्या वडलांनी नुकसान भरपाई म्हणून मिळालेल्या पैशातून करोलीमध्ये जमिनीचा छोटा तुकडा विकत घेतला. सध्या ते त्याच जागेवर राहतायत. दिलावर यांना वडलोपार्जित दोन एकर शेतजमीन देखील मिळाली. करोलीहून ८० किलोमीटरवर असलेल्या या जमिनीत ते सोयाबीन, गहू आणि कांदा करतात.
टोकीमध्ये पत्र्याचं छत असलेल्या ज्या मातीच्या घरात आपला जन्म झाला ते घर जयपालला पुसटसं आठवतं. “मला फारसं लक्षात नाहीये. आता मी घरांची मॉडेल्स बनवतोय, पण मला काही ते घर जाऊन बघता येणार नाही कारण ते पाण्यात बुडालंय. पण मी आता राहतोय त्या घराचं मॉडेल बनवायचा मात्र माझा विचार आहे.”
पण या घरातून देखील विस्थापित होण्याची वेळ या कुटुंबावर येऊ शकते. त्यांचं घर एका रस्त्याजवळ आहे आणि तो रस्ता आता सहा पदरी करण्याचा सरकारचा विचार आहे. “म्हणजे आम्हाला परत कुठे तरी जावं लागणार,” जयपाल म्हणतो.
पुढे शिकण्याचा आणि स्थापत्य अभियंता बनण्याचा त्याचा विचार आहे. रचनांमध्ये, इमारती उभ्या करण्यात त्याला रस आहे आणि ही पदवी मिळाली तर सरकारी नोकरी मिळण्याची देखील शक्यता असल्याने त्याचा तसा विचार आहे.
इतक्यात त्याने ताज महालची एक प्रतिकृती बनवली आहे. “आमच्या घरी कुणीही आलं आणि मी बनवलेली मॉडेल्स पाहिली की विचारायचं की ताज महाल बनवला का नाही म्हणून,” तो म्हणतो. त्याच्यासाठी खूप सारा कागद लागेल – पण वरचा भव्य घुमट हळू हळू आकार घेतोय. येत्या काळात इतरही काही प्रतिकृती तायर होतील. खूप सारं कौशल्य, चिकाटी तर लागणारच आणि रद्दीच्या कागदांचा भारा आणि भरपूर डिंक.