“कोणाला माहित,” आपल्या गावात कोरोना विषाणू येणार का यावर २३ वर्षांच्या दुभती जनावरं पाळणाऱ्या प्रफुल्ल कालोकरचं हे उत्तर. “पण त्याचे आर्थिक परिणाम मात्र इथे आधीच येऊन पोचले आहेत.”
प्रफुल्लच्या गावात, चांदणीमध्ये, रोज ५०० लिटर दूध संकलित होतं ते २५ मार्चला कोविड-१९ मुळे टाळेबंदी झाली त्यानंतर आता शून्यावर आलं आहे. आर्वी तालुक्यात असलेल्या ५२० उंबरा असणाऱ्या या गावात बहुतेक कुटुंब नंद गवळी समाजाची आहेत.
नंद गवळी हे हंगामी पशुपालक आहेत. वर्धा जिल्ह्यातल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या भोवती असणाऱ्या ४०-५० गावांमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. गवळी म्हणूनही ओळखला जाणारा हा समाज गवळाऊ या देशी वाणाची गुरं पाळतो. गाईचं दूध, दही, लोणी, तूप आणि खव्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा हा समाज करतो. “नंद गवळ्यांचा किमान २५,००० लिटर दुधाची विक्री घटलीये,” लॉकडाउननंतर १५ दिवसांच्या काळात समाजाचं किती नुकसान झालंय याचा अंदाज प्रफुल्ल सांगतो.
नाशवंत असणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत प्रचंड घट आल्याने दुग्धव्यवसायाला जबर फटका बसला आहे. घरातला दुधाचा वापर तर कमी झालाच आहे पण खानावळी, हॉटेल आणि मिठाईची दुकानं बंद झाल्यामुळे या पदार्थांना उठावच मिळत नाहीये. राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाची शाखा असणाऱ्या मदर डेअरीसारख्या मोठ्या उद्योगांनी देखील दुधाचं संकलन थांबवलं आहे.
प्रफुल्लच्या अंदाजानुसार या आर्थिक नुकसानाचे दूरगामी परिणाम होणार आहेत – या व्यवसायाच्या पुरवठा साखळीतल्या प्रत्येकालाच रोज हजारो रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे. पीएचडीचं शिक्षण घेणारा प्रफुल्ल हा त्याच्या नंद गवळी समाजातला एकमेव विद्यार्थी आहे. नागपूर विद्यापीठात तो वर्ध्यातील कापसाचे अर्थकारण या विषयात संशोधन करत आहे.
हजारो छोटे आणि सीमांत शेतकरी, पूर्वापारपासून गाई गुरं पाळणारे समाज आणि नंद गवळींसारख्या पशुपालकांची उपजीविका दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातल्या कृषी संकटाने त्यांना ग्रासलं आहे. आणि आता तर त्यांच्यापैकी काहींची एकमेव आधार असणारी ही उपजीविकाच संकटात आल्याने भविष्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
आणि हे संकट केवळ दुधाच्या विक्रीपुरतं
मर्यादित नाही. “आम्हाला गायी तर दोहाव्याच लागणार, नाही तर दुधाच्या गाठी होतात
आणि पुढे जाऊन त्या दूधच देणं थांबवतात,” प्रफुल्लचे काका पुष्पराज कालोकर
सांगतात. “पण या दुधाचं करायचं काय? खवा आणि लोणी पण करू शकत नाही. बाजारच बंद
आहेत.”
टाळेबंदीच्या काळात ग्राहकांचा दुधाचा वापर घटल्याने अतिरिक्त दुधाच्या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्रातल्या महा विकास आघाडी सरकारने ३० मार्च रोजी सहकारी दूध डेअऱ्यांचा महासंघ असलेल्या महानंदतर्फे गाईचं दूध संकलित करण्यात येईल असा निर्णय घेतला.
पुढचे तीन महिने – एप्रिल ते जून २०२० – रोज १० लाख लिटर गाईचं दूध संकलित करून त्यांची भुकटी करण्याचं शासनाचं नियोजन आहे. महाराष्ट्रात ४ एप्रिल रोजी महानंद तर्फे दूध संकलन सुरू करण्यात आलं आहे. राज्याचे पशुधन विकास मंत्री सुनील केदार यांनी पारीला सांगितलं: “आम्ही यासाठी रु. १८७ कोटी इतक्या निधीची व्यवस्था केली आहे. केंद्र सरकारने यात सहयोग दिला तर आम्ही संकलन वाढवू शकतो.”
महानंद व्यतिरिक्त गोकुळ आणि वारणासारख्या मोठ्या सहकारी दूध डेअऱ्यांनीही दुधाचं संकलन वाढवलं आहे जेणेकरून दूधउत्पादक शेतकरी तोट्यात जाणार नाही. यातल्या काही दुधाची भुकटी केली जाईल. मात्र यातली मेख ही आहे की वर्ध्यातल्या नंद गवळींसारखे बरेच दूध उत्पादक महानंदशी संलग्न नाहीत कारण या जिल्ह्यात महानंदचं काहीही काम नाही. शिवाय, आजवर नंद गवळी कोणत्याच सहकारी दूध संघांचे किंवा मोठ्या खाजगी दूध संघांचे सदस्य झाले नाहीयेत. ते शक्यतो किरकोळ बाजारात दूध विकतात, जो आता ठप्प झालाय.
पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राइतकं विदर्भात काही मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत नाही. मात्र या विभागात पशुपालक मात्र मोठ्या संख्येने आहेत. आणि यातले अनेक गाई-गुरं पाळणारे आहेत ज्यांच्यासाठी दूध हाच उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे.
यातलेच एक म्हणजे नंद गवळी, ज्यांची नोंद भटक्या जमातींमध्ये करण्यात आली आहे. ते वर्ध्याच्या पठारी प्रदेशात वास्तव्य करतात तसंच अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटाच्या रांगांमध्येही त्यांच्या वस्त्या आहेत. मूळचे गुजरातच्या कच्छ प्रांतातले भरवाड आहेत, गडचिरोली जिल्ह्यातले म्हशी पाळणारे गोळकर आणि गाई-गुरं राखणारे गोवारी असे अनेक समुदाय विदर्भाच्या वेगवेगळ्या प्रांतात विखुरलेले आहेत. मथुरा लम्हाण हे खास करून यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातच आढळतात आणि उमरडा प्रजातीची गुरं राखतात. या प्रजातीचे धट्टेकट्टे बैल प्रसिद्ध आहेत.
अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातला शेरडं आणि मेंढरं पाळणारा धनगर समाज, चंद्रपूर आणि गडचिरोलीतले कुरमार ज्यांचं कर्नाटकातल्या कुरुबांशी बरंच साधर्म्य आहे, हे सारे विदर्भातले वेगवेगळे पशुपालक आहेत. यातले काही हंगामी भटकंती करतात आणि त्यांची जनावरं चारण्यासाठी ते गायरानं आणि जंगलांवर अवलंबून असतात.
२०११ साली बोर अभयारण्याच्या सभोवतालच्या जंगलांमध्ये चराईला बंदी घालण्यात आली. तेव्हापासून विदर्भातले हे पशुपालक गायरानं आणि पिकांच्या काढणीनंतर रानात उरलेल्या कडबा आणि चाऱ्यावर अवलंबून आहेत असं सजल कुलकर्णी सांगतात. रिव्हायटलायझिंग रेनफेड ॲग्रिकल्चर नेटवर्कचे फेलो म्हणून नागपूर येथे कार्यरत असणारे कुलकर्णी विदर्भातील पशुपालनाचा अभ्यास करत असून ते तिथल्या पशुपालकांबरोबर जवळून काम करत आहेत.
टाळेबंदीच्या काळात चाऱ्याची उपलब्धता आणि पुरवठा यामध्येही खंड पडला आहे. काही नंद गवळी आपल्या गुरांसोबत गावांपासून ३०-४० किलोमीटर दूर अडकून पडले आहेत. टाळेबंदी सुरू व्हायच्या आधी ते गायरानांच्या आणि रानात काही चारा मिळतोय का त्याच्या शोधात बाहेर पडले होते.
टाळेबंदीच्या काळात चाऱ्याची उपलब्धता आणि पुरवठा यामध्येही खंड पडला आहे. काही नंद गवळी आपल्या गुरांसोबत गावांपासून ३०-४० किलोमीटर दूर अडकून पडले आहेत
“मुख्यतः दूध आणि मांसविक्रीतून होणारी त्यांची कमाई मोठ्या प्रमाणावर स्थानिक बाजार आणि गिऱ्हाइकांवर अवलंबून असते,” कुलकर्णी सांगतात. “आता या समाजाच्या लोकांना दूध विकण्यासाठी किंवा वैरण विकत घेण्यासाठीही गावात येऊ देत नाहीयेत.”
या सगळ्याचा सर्वात जास्त फटका बसलाय तो भरवाडांच्या विखुरलेल्या वस्त्यांना. “आमच्यासाठी हा फार कठीण काळ आहे,” गीर गाई पाळणाऱ्या या समाजाचे मुखिया रामजीभाई जोगराना मला फोनवर सांगतात. “मी माझी गाई-गुरं घेऊन जंगलात राहतोय,” ते सांगतात. जंगल म्हणजे त्यांचा कळप चारायला नेलेलं झुडपांचं वन.
जोगराना आणि इतर २० भरवाड कुटुंबं सोनखांब गावाच्या वेशीवर एका वस्तीत राहतात. हे गाव नागपूरपासून ४५ किलोमीटरवर आहे. रामजीभाईंच्या अंदाजानुसार, सगळ्यांचं मिळून दिवसाला ३,५०० लिटर दूध गोळा होत असेल. पूर्वापारपासून भरवाडांकडे स्वतःची जमीन नाही आणि उत्पन्नाचा दुसरा कोणता स्रोतही. टाळेबंदीच्या काळात हा समाज गावकऱ्यांना मोफत दूध वाटतोय. बाकीचं दूध फेकून द्यावं लागतंय किंवा वासरांना पाजावं लागतंय. “कुठलीही डेअरी, किरकोळ दुकानं किंवा मिठाईची दुकानं कुणीच दूध विकत घेत नाहीयेत,” रामजीभाई सांगतात.
त्यांच्या समाजातले जमीन विकत घेऊन त्यावर घर बांधणारे रामजीभाई हे पहिलेच. ते त्यांच्या गावातल्या मदर डेअरीच्या केंद्रात दूध घालतात आणि नागपुरातल्या काही गिऱ्हाइकांना थेट विक्री करतात. “ते थांबलं नाहीये, पण आमच्या एकूण विक्रीतला तो किरकोळ हिस्सा आहे,” ते सांगतात.
“आम्ही दिनशॉसारख्या खाजगी डेअऱ्या आणि हलदीरामला दूध घालतो आणि मग हॉटेल, चहाच्या टपऱ्या आणि मिठाईच्या दुकानांसारखं किरकोळ गिऱ्हाइक असतं,” रामजीभाई सांगतात.
रामजीभाईंच्या अंदाजानुसार एकट्या नागपूर जिल्ह्यातच भरवाडांच्या ६० वस्त्या आहेत. “आम्ही रोज जवळ जवळ २०,००० गाईंचं मिळून १.५ लाख लिटर दूध पुरवतो,” ते सांगतात. “आणि आज? शून्य.”
गायीच्या एक लिटर दुधामागे त्यांना ३०-४० रुपये भाव मिळतो. दुधातला स्निग्धांश आणि दुधाच्या एकूण दर्जावर हे ठरतं. पण त्यांचं नुकसान केवळ आताचं आर्थिक नुकसान इतकंच मर्यादित नाहीये. ते सांगतात त्याप्रमाणे आता दूध काढलं नाही तर दुधाळ गायी भविष्यात भाकड होण्याची भीती आहे, आणि ते फार मोठं संकट असेल.
“चारा मिळत नाहीये, आणि कळतच नाहीये की तो परत कधीपासून मिळायला लागेल,” रामजीभाई सांगतात. हिरवा चारा वगळता जनावरांना चांगलं दूध येण्यासाठी इतरही आहार, पेंड द्यावी लागते.
भरवाड समुदायाच्या सदस्यांनी दुधाचे कॅन रस्त्यावर आणि नाल्यात ओतून दिल्याचे इतक्यातले व्हिडिओ रामजीभाई आम्हाला दाखवतात (पारीने शहानिशा केलेली नाही). “माझ्या समाजाच्या लोकांकडून वेगवेगळ्या वस्त्यांवरून माझ्याकडे रोज असे व्हिडिओ येतायत.”
नुकसान केवळ आताचं आर्थिक नुकसान इतकंच मर्यादित नाहीये - आता दूध काढलं नाही तर दुधाळ गायी भविष्यात भाकड होण्याची भीती हे फार मोठं संकट असेल
एका व्हिडिओमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातल्या दोंडाइचा-वरवडे गावातला एक शेतकरी सांगतोय की टाळेबंदीमुळे त्याचा दुधाचा धंदा पूर्णपणे बंद पडल्यामुळे त्यांना अचानकच आर्थिक तोटा सहन करावा लागतोय.
इतर काहींना त्यांच्या भटकंतीच्या मार्गावर अडचणी येतायत. “आम्ही या वर्षी चारणीला जायचं नाही असं ठरवलं,” २० वर्षीय राहुल जोगराणा सांगतो. तो नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वरलाच थांबला पण त्याचा धाकटा भाऊ गणेश मात्र त्यांच्या गायी घेऊन बाहेर पडला. आणि आता तो नागपूरपासून ६० किलोमीटरवर रामटेकपाशी अडकलाय आणि आता तो तिथे चारा आणि पाण्याच्या शोधात आहे.
गावातले शेतकरी गणेशला त्यांच्या शेतांमध्ये गायी चारू देत नसल्याने शेवटी त्याने ट्रॅक्टरभरून कोबी आणून गायींना खायला घातला. मार्चच्या मध्यावर त्याने थोडा कडबा साठवून ठेवला होता, जो टाळेबंदीनंतर काही आठवडे त्याला पुरला. आता मात्र दुधाच्या गाडीचा एक चालक गणेशला रामटेकपाशी जिथे तो थांबलाय तिथे बाजारातून पशुखाद्य आणून देतोय.
२३ वर्षांचा विक्रम जोगराणा देखील त्याचा गाई-गुरांचा कळप घेऊन बाहेर पडला होता. आम्ही त्याच्याशी बोललो तेव्हा तो नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेला असणाऱ्या पारसिवनीपाशी होता. तिथले गावकरी त्याला गावात आपल्या शेतांमध्ये येऊ देत नव्हते. एरवी असा प्रश्न येत नाही, तो सांगतो. पूर्वापारपासून परस्परांवर अवलंबून असलेलं त्यांचं नातं तो सांगतो. “त्यांच्या रानाला शेणाचं खत मिळतं आणि आमची गुरं त्यांच्या रानातला कडबा आणि धसकटं खातात.”
विक्रम सध्या कळमेश्वरमधल्या त्याच्या घरच्यांच्या संपर्कात राहू शकत नाहीये. कारण त्याला वेळोवेळी त्याचा मोबाइल फोन चार्ज करता येत नाहीये. तो म्हणतो, “आमच्यासाठी हा सर्वात कठीण काळ आहे.”
अनुवादः मेधा काळे