मोद मोदांड उडले
मुद्दु सिक्किय तांग उडले
(नुसती घाई कामाची नाही
विचार कर, सावकाश जा, तुला नक्कीच सोनं सापडेल)
कधी काळी नीलगिरीच्या वनांमध्ये राहणारे आळु कुरुंबांच्या मते, योग्य ‘स्थळ’ शोधण्यासाठी काय करायला पाहिजे हे ही म्हण अगदी चपखलपणे सांगते. आणि त्यांच्यातल्या एकाच्या – रवी विश्वनाथनच्या शैक्षणिक प्रवासासाठी देखील ती तितकीच योग्य आहे. रखडत सुरू झालेली त्याची शिक्षणाची गाडी आता भारतियार विद्यापीठ, कोइम्बतूरकडून प्रदान होणाऱ्या पीएचडीपर्यंत पोचली आहे. त्याच्या समाजातला तो पीएचडी करणारा पहिला सदस्य तर आहेच पण त्याचा पीएचडीचा प्रबंधदेखील त्याच्या आळु कुरुंबा भाषेची रचना आणि व्याकरणावरचा पहिला वहिला दस्तावेज आहे. आणि खरी गोष्ट ही आहे की विश्वा (त्याला असंच पुकारलेलं आवडतं) ३३ वर्षांचा आहे, अजून अविवाहित आहे आणि योग्य ‘स्थळ’ शोधण्यासाठी त्याने निवांत वेळ घेतलाय.
तमिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातल्या कोटागिरी शहराजवळ असणाऱ्या बनगुडी या आळु कुरुंबा पाड्यावर विश्वा लहानाचा मोठा झाला. आई वडील ७ वाजता कामासाठी बाहेर पडले की औपचारिक शिक्षण घेण्यासाठी तीन किलोमीटरवरच्या सरकारी माध्यमिक शाळेत पोरांनी जावं अशी इथली साधी अपेक्षा.
आता इथेच जरा गोची झालीये बरं का. बहुतेक दिवशी, आईवडील कामावर गेले की बरीच मुलं जवळच्या जंगलात धूम ठोकतात आणि दिवसभर तिथेच हुंदडतात, काही जण आपल्याच वीट-मातीच्या घरासमोर कोबा केलेल्या अंगणांमध्ये खेळत राहतात. “आमच्या समाजात शालेय शिक्षणाला कधीच प्राधान्य नव्हतं. शाळेत जायच्या वयाचे आम्ही २० जण तरी होतो, शाळेत खरोखर पाऊल टाकणारे मात्र अगदी मूठभरच असतील,” विश्वा सांगतो. मुलं फक्त त्यांच्या मायबोलीत बोलायची आणि शिक्षक मात्र – जेव्हा केव्हा ते उगवायचे – अधिकृत राज्यभाषेत, तमिळमध्येच बोलायचे म्हणजे अजूनच उल्हास.
परकी भाषा, शालेय शिक्षणाच्या फायद्याचा कसलाही गंध नसणारे वडीलधारे, आपल्यासारखाच विचार करणारं मित्रांचं टोळकं आणि मोहून टाकणारा मुक्त निसर्ग – अर्थात विश्वा अनेकदा शाळेला दांडी मारायचा. त्याचे पालक शेजारच्याच राज्यात बिगारी काम करायचे – आई चहाची पानं खुडायची आणि वडील पावसाच्या पाण्यासाठी चारी खणायचं आणि ट्रकमधून ५० किलोच्या खताच्या गोण्या उतरवायच काम करायचे. वर्षातून किमान दोनदा तरी त्याचे वडील इतर आळु कुरुंबा गड्यांबरोबर डोंगरातल्या सुळक्यांमध्ये मध गोळा करण्यासाठी जायचे. १८०० च्या सुमारास इंग्रजांनी नीलगिरी आक्रमण करेपर्यंत जंगलातून औषधी वनस्पती आणि मध गोळा करणं हेच इथल्या लोकांचं जगण्याचं साधन होतं. इंग्रज आल्यावर त्यांनी जंगलांमधली प्रचंड जमीन चहाच्या मळ्यांमध्ये रुपांतरित केली, तिथल्या आदिवासींना जंगलातून हाकलून लावलं आणि जवळच्या वस्त्यांमध्ये आसरा घेणं भाग पाडलं.
प्राथमिक शाळेत जाण्यासाठी विश्वाच्या फार कुणी मागे लागलं नाही आणि माध्यमिक शाळेची स्वतःची वेगळीच आव्हानं होती. त्याचे वडील सतत आजारी असायचे आणि मग घराला हातभार लावण्यासाठी या मुलाला रोजंदारी करावी लागायची, आणि त्यामुळे अधून मधूनच तो शाळेच जायचा. तो १६ वर्षांचा असताना त्याच्या वडलांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचाराच्या खर्चाचं ३०,००० रुपयांचं कर्ज मागे ठेऊन त्यातच ते दगावले. विश्वाने शाळा सोडली आणि वाहन परवाना काढला. आई काम करत होती त्याच चहाच्या मळ्यात तो ९०० रुपये महिना पगारावर ड्रायव्हरचं काम करू लागला.
तीन वर्षं आठवड्याचे सातही दिवस काम केल्यावर आणि एकरभर जमीन गहाण ठेवल्यावर कुठे त्यांचं कर्ज फिटलं आणि त्याचं शिक्षण परत सुरू झालं. “माझे आई-वडील कधीच शाळेत गेले नव्हते, मात्र त्यांना माझी इच्छा दिसली आणि मी शिक्षण चालू ठेवावं असं त्यांना वाटलं. मी शाळा सोडली कारण माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता, पण मला ठाऊक होतं की मी शिक्षण थांबवणार नाही,” तो सांगतो.
आणि त्याने खरंच शिक्षण थांबवलं नाही आणि वयाच्या २१ व्या वर्षी, वर्गातल्या इतरांहून वयाने मोठ्या विश्वाला अखेर माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला हातात पडला.
इथून पुढे त्यांच्या शैक्षणिक प्रवासात खंड पडला नाही. त्याने कोटागिरीतून बारावीचं शिक्षण पूर्ण केलं आणि ७० किलोमीटर दूर कोइम्बतूरच्या शासकीय कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथे त्याने तमिळ साहित्य विषय घेऊन बीए केलं आणि त्यानंतर दोन एमए पदव्या घेतल्या – एक तमिळ साहित्यामध्ये आणि दुसरी भाषाशास्त्रामध्ये. आदिवासी संघटनांनी, शासनाने आणि सामाजिक संघटनांनी दिलेल्या शिष्यवृत्तींमधून आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहाय्याने त्याने त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवला.
तमिळ साहित्याचा अभ्यास करत असताना त्याला नीलगिरीतल्या इतर आदिवासी, उदा. तोडा, कोटा आणि इरुला जमातींवरचे सामाजिक आणि भाषिक संशोधनपर निबंध सापडले. त्याच्या असं निदर्शनास आलं की आळु कुरंबा जमातीची संस्कृती आणि पेहराव याचीच नोंद झाली आहे, भाषेबद्दल काहीच नाही. आणि मग त्याने म्हणी आणि कोडी गोळा करायला सुरुवात केली आणि मग व्याकरणाकडे गाडी वळवली.
भाषाशास्त्राचा एक विद्यार्थी असल्याने भाषा कशा लोप पावतात हे कटु सत्य त्याला माहितीये. कोणत्याच दस्तावेजाशिवाय आणि लिखित व्याकरणाशिवाय त्याची भाषाही टिकून राहू शकणार नाही याची त्याला जाणीव आहे. “ही भाषा बोलणारे सगळेच मरून जाण्याआधी मला भाषेची अंगं, व्याकरणाचे नियम आणि मांडणी नोंदवून घ्यायची आहे.”
२०११ च्या जनगणनेनुसार कुरुंबांची एकूण लोकसंख्या ६,८२३ इतकी नोंदवण्यात आली आहे आणि आळु कुरुंबांचं म्हणणं आहे की त्यांच्या समाजाचे केवळ १७०० जण आहेत. (इतर कुरुंबाः कादु कुरुंबा, जेनु कुरुंबा, बेट्ट कुरुंबा आणि मल्लु कुरुंबा) मैसूरच्या केंद्रीय भारतीय भाषा संस्थेनुसार एखादी भाषा बोलणाऱ्यांची संख्या १०,००० हून कमी असेल तर त्या भाषेचं अस्तित्व धोक्यात असल्याचं मानलं जातं. सगळ्या कुरुंबा जमातींना हे लागू होतं.
या भाषेला लिपी नसल्याने भाषेचे नियम लिहिणं अवघड झालं आहे, विश्वाने ही भाषा लिहिण्यासाठी तमिळ ‘उसनी’ घेतली तेव्हा त्याच्या लक्षात आलं. अनेक ध्वनींचा अनुवादच शक्य नाही. “माझ्या भाषेत आम्ही एखादी गोष्ट, उदा. रोप मातीतून उपटण्यासाठी ‘ख्त’ असं म्हणतो. मात्र तमिळ लिपीमध्ये हा ध्वनीच नाहीये,” तो उदाहरण देऊन सांगतो.
एप्रिल, २०१८ मध्ये विश्वाला त्याची पीएचडी पदवी मिळेल आणि मग तो विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकाच्या पदासाठी अर्ज करेल. इथपर्यंत पोचणारा तो पहिलाच आळु कुरंबा ठरणार आहे. “इथपर्यंत पोचण्यासाठी फार मोठा काळ गेला आहे,” तो सांगतो, खेदाने.
या युवकाचं पुढचं ध्येय शिक्षणाशी अजिबातच संबंधित नाही – ते आहे लग्न. “माझ्या समुदायात, विशीच्या आतच लग्नं होतात. पण मला आधी पीएचडी पूर्ण करायची होती त्यामुळे मी विरोध करत होतो.” पण आता तरी दोनाचे चार होणार का नाही? “हो,” लाजत लाजत तो सांगतो, “मी दुसऱ्या एका वस्तीत तिला पाहिलंय. थोड्याच महिन्यात आता सगळं पार पडेल.”
कीस्टोन फौंडेशनच्या आळु कुरुंबा एन सेल्वींनी दिलेला वेळ आणि ज्ञान याबद्दल लेखिका त्यांची आभारी आहे.
अनुवादः मेधा काळे