एरवी या वेळी शमशुद्दीन मुल्ला शेतात असते – मोटरी आणि पंप दुरुस्त करीत.
२६ मार्च रोजी, टाळेबंदीच्या दुसऱ्या दिवशी, [कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुकयातील] सुळकुड गावाहून एक हताश शेतकरी बाईकवर त्यांच्या घरी आला. "तो मला आपल्या शेतावर घेऊन गेला, तिथं जाऊन मी त्याचा डिझेल इंजिनचा पाण्याचा पंप दुरुस्त केला." शमशुद्दीन नाही म्हणाले असते तर त्या शेतकऱ्याला त्याच्या उसाला पाणी देणं कठीण होऊन बसलं असतं.
वयाच्या १० व्या वर्षी काम सुरु केलेले हे निष्णात मेकॅनिक आता ८४ वर्षांचे झालेत. गेल्या ७४ वर्षांत त्यांनी कामातून विश्रांती घेतल्याचं हे दुसऱ्यांदाच घडतंय. पहिली वेळ म्हणजे जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती तेव्हा.
शमशुद्दीन म्हणजेच शामा मिस्त्री यांनी मागील सात दशकांमध्ये ५,००० हून जास्त इंजिन दुरुस्त केले असतील – बोअरवेल पंप, मिनी-एक्सकेव्हेटर, पाण्याचे पंप, डिझेल इंजिन, आणि बरंच काही – आणि त्यांचं कसब एका कलेच्या दर्जावर नेऊन ठेवलं. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात बारवाड या गावी त्यांचं घर म्हणजे यंत्र बिघडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचं मदत केंद्रच बनून गेलंय. दर वर्षी त्यांचं काम तेजीत असतं त्याच हंगामात - मार्च, एप्रिल आणि मे दरम्यान – ते विविध प्रकारचे तीसेक इंजिन दुरुस्त करत असतील, असा त्यांचा अंदाज आहे. प्रत्येक यंत्राचे त्यांना कमीत कमी रु.५०० मिळत असत. लॉकडाऊनमुळे त्यांचा या वर्षीचा कामाचा हंगाम मात्र पार गेला.
आता त्यांचं कुटुंब त्यांनी फेब्रुवारी आणि मार्चच्या सुरुवातीला आठ इंजिन दुरुस्त करून कमावलेल्या जेमतेम रु. ५,००० वर चालत आहे - सोबत सरकारने जाहीर केलेलं प्रत्येकी पाच किलो रेशनचं धान्य.
सुळकुडमधून बाईकवर एक शेतकरी त्यांच्या घरी आल्यापासून आणखी तीन शेतकरी आपली बिघडलेली इंजिनं घेऊन शामा मिस्त्रींकडे येऊन गेलेत. मात्र, दुरुस्ती न करताच त्यांना परत जावं लागलं. "माझ्याकडे दुरुस्तीला लागणारं सामान नाही अन् कोल्हापूर शहरातली समदी दुकानं सध्या बंद आहेत," शामा मिस्त्रींनी मला फोनवर सांगितलं.
दोन महिन्यांपूर्वी, त्यांनी सत्तरीतल्या त्यांच्या पत्नी गुलशन आणि पन्नाशीत असलेला मुलगा इसाक यांच्यासोबत आपल्या दोन एकरात ऊस लावला. एरवीदेखील शेतीचं पाणी भलत्याच वेळी सोडण्यात येतं (कधी कधी तर चक्क मध्यरात्री २:०० वाजता) आणि किती वेळ येईल याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांना शेतात जाण्याची चिंता लागून राहिलेली असते, खरं तर शेत जवळ आहे तरीही पोलिसांचे दंडुके खावे लागतील याची त्यांना कायम भीती वाटते. त्यामुळे या उसाचं काही खरी नाही.
लॉकडाऊन झाल्यापासून शामा मिस्त्रींनी अंदाजे ४० दिवसांत एकही इंजिन किंवा इतर कुठलं यंत्रदेखील दुरुस्त केलं नाहीये. "गेल्या पाच आठवड्यांत कमीत कमी रु. १५,००० चा घाटा झाला असेल," असा त्यांचा अंदाज आहे आणि ते म्हणतात, "याआधी मी असलं (लॉकडाऊन आणि महामारी) कधीच पाहिलं नाहीये." ग्रामीण कोल्हापुरात प्लेगची साथ पसरली होती, हे त्यांना आठवतं – तेंव्हा ते फक्त आठ वर्षांचे होते आणि त्यांचं कुटुंब महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या हातकणंगले जिल्ह्याच्या शेजारच्या तालुक्यात पट्टणकोडोली या गावी राहत होतं.
"त्या दिवसांमध्ये आम्हाला घर सोडून रानात राहायला सांगत होते, अन् आता उलटी तऱ्हा झालीये. घरीच कोंडून घ्यायला सांगायलेत," ते हसून म्हणतात.
आजही, वयाच्या ८३ व्या वर्षी वसंत तांबे कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ या आपल्या गावाच्या आसपासच्या २ किमी परिसरात ऊसतोडीला जातात. त्यांच्या कमाईचा मूळ स्रोत दुसराच होता. २०१९ मध्ये रेंदाळमधील सर्वांत वयस्क विणकर म्हणून ते निवृत्त झाले तेंव्हा या भागातील ते सर्वांत कुशल हातमाग कारागीर होते. त्यांच्या अंदाजानुसार त्यांनी गेल्या सहा दशकांत १,००,००० मीटरहून अधिक कापड विणलं असावं.
विणकामातलं कौशल्य असलं तरी त्याचा अर्थ या खडतर व्यवसायातून त्यांचं घर चालत होतं असा मात्र होत नाही. गेली २५ वर्षं, ते स्वतःच्या आणि दोन भावांच्या सामायिक एक एकर शेतात आणि इतरांच्या रानात किती तरी तास ऊसतोड करत आलेत. त्यांची अगोदरच नाजूक झालेली स्थिती लॉकडाउनमुळे डळमळीत झाली आहे.
"(एरवी) तीन तास काम करून मी १०-१५ मोळ्या तोडू शकतो [अंदाजे २०० किलोची एक मोळी]," इतरांच्या शेतात काम करण्याबाबत ते म्हणतात. याच्या मोबदल्यात वसंत यांना आपल्या म्हशी आणि रेडकासाठी १०० रुपयांचा चारा मिळतो – त्यांच्या भाषेत ही त्यांची रोजी. या वयातही ते तो चारा आपल्या सायकलवर घरी घेऊन येतात. एरवी ते रोज सकाळी ६:०० वाजता घरून निघाले की दुपारी २:०० वाजता परतायचे.
"मी शेवटची ऊसतोड ३१ मार्चला केली होती," वसंत म्हणतात. याचा अर्थ गेल्या ३२ दिवसांचा मिळून ३,२०० रुपयांचा चाऱ्याचा खर्च त्यांना मिळालेला नाही. पण, संकटांची ही मालिका फार आधी सुरू झालीये.
ऑगस्ट २०१९ मधील पुरात त्यांच्या सामायिक एक एकरातला ६० टक्के ऊस आणि सगळी ज्वारी गेली. आपल्या ०.३३ एकरातल्या त्यांच्या हिश्शातल्या सात टन उसाचे प्रति टन रु. २,८७५ मिळाले होते. (त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी याच तुकड्यात २१ टन ऊस काढला होता). "आता कसंही करून त्या सात टनाचे जे २०,००० रुपये मिळाले [या मार्च महिन्यात मिळालेले] त्यात पुढचं अख्खं वर्ष भागवावं लागणार."
वसंत आणि त्यांच्या पत्नी विमल, वय ७६, यांना २६ मार्च रोजी शासनाने आपल्या पॅकेजमध्ये जाहीर केलेला मोफत तांदूळ लगेच आणणं मुश्किल झालं. २ एप्रिल रोजी त्यांच्याकडे रेशनकार्ड असल्याने या दांपत्याने ६ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ अनुक्रमे रु. ३ आणि रु. २ प्रति किलो या दराने त्यांच्या नेहमीच्या स्वस्त धान्य दुकानातून विकत घेतला होता. त्यानंतर साधारण १० दिवसांनंतर त्यांना प्रत्येकी ५ किलो मोफत धान्य मिळालं.
वसंत आणि विमल दोघेही धनगर या भटक्या जमातीचे आहेत. दोघांना महिन्याला रु. १,००० वृद्धत्व पेन्शन मिळतं, शमशुद्दीन आणि गुलशनना मिळतं तसंच. वसंत यांनाही इंग्रज राजवटीतला ग्रामीण कोल्हापूरला हादरवून टाकणारा प्लेगचा काळ आठवतो, तेंव्हा ते लहान होते. "तेंव्हा खूप लोक वारले होते. सगळ्या लोकांना घर सोडून गावाबाहेर जायला सांगण्यात आलं होतं," त्यांना आठवतं.
वसंत आपल्या मूळ व्यवसायातून, विणकामातून निवृत्त होऊन जेमतेम एक वर्ष झालं तेवढ्यात लॉकडाऊन आला. आणि हा व्यवसाय त्यांनी ६० वर्षं केला, त्यात कौशल्य प्राप्त केलं. "वय झालं की! विणकामात लई कष्ट पडतात. अगदी रेंदाळहून रोज कोल्हापूरला (२७.५ किमी) पायी चालत जाण्यासारखं आहे बघा," ते म्हणतात, आणि हसू लागतात.
आणि मग काहीसे उदास होऊन म्हणतात: "अख्ख्या आयुष्यात आपण हे असलं संकट पाहिलं नाही."
लवकरच साठी गाठणारे देवू भोरे कर्नाटकाच्या बेळगाव जिल्ह्यातल्या बोरगावमध्ये गेली तीन दशकं दोर वळतायत. गेल्या पाच पिढ्या भोरे कुटुंबीयांनी दोर वळण्याची ही कला जिवंत ठेवली आहे. लॉकडाऊनमध्ये मात्र सगळी धडपड स्वतःला जिवंत ठेवण्याची आहे.
"आमच्याकडे [दोर बनवायला लागणारा] जवळपास सगळा माल आहे. आता फक्त काम सुरु करण्याची खोटी आहे," भोरे यांचा मुलगा ३१ वर्षीय अमित मला १ एप्रिल रोजी फोनवर म्हणाला होता. तो चिंतेत होता कारण शेतीचं सगळं गणितच कोलमडून पडतंय की काय याची त्याला कुणकुण लागली होती. "एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आम्ही बेंदूरसाठी दोर वळणार आहोत," तो म्हणाला होता. हा खास बैलांचा सण जून ते ऑगस्टच्या दरम्यान साजरा करण्यात येतो.
मातंग या अनुसूचित जातीचे भोरे कुटुंबीय शेतकऱ्यांसाठी दोन प्रकारचे दोर तयार करतात. एक म्हणजे १२ फूट लांबीचा कासरा, जो नांगराला जुंपताना बांधतात. त्याचा वापर कापलेल्या पिकाच्या मोळ्या बांधायला आणि काही घरांमध्ये बाळाचा पाळणा बांधायलाही केला जातो. दुसरा प्रकार म्हणजे तीन फूट लांबीचा कंडा, हा बैलाच्या मानेभोवती बांधण्यात येतो. कासरा १०० रुपयांना आणि कंड्यांची जोडी रु. ५० एवढ्याशा किमतीला विकली जाते.
अमित उगीच चिंता करत नव्हता. गेले कित्येक आठवडे काहीच काम नाही. लॉकडाऊन अगोदर देवू, त्यांच्या पत्नी नंदुबाई (वयाच्यापन्नाशीत) आणि अमित दररोज आठ तास काम करून प्रत्येकी १०० रुपये कमावत होते. लॉकडाऊनमुळे कामाचे ३५० तास वाया गेल्याने आतापर्यंत त्यांचं रु. १३,००० चं नुकसान झालं असावं, असा त्यांचा अंदाज आहे.
यंदाच्या वर्षी कर्नाटकी बेंदूर सात जून रोजी आहे. देवू, नंदुबाई आणि अमित यांची खटपट सुरु आहे. ते मिरजेहून आणतात ती रंगांची भुकटी लॉकडाऊनमुळे मिळू शकणार नाही. शिवाय, कसंय त्यांच्या पद्धतीने दोर वळताना त्यांच्या घराबाहेरच्या कच्च्या 'दोरवाटे'वर थेट १२० फूट लांब पीळ ताणावा लागतो. ही सगळी प्रक्रिया हाताने करण्यात येते – आणि पोलिसांचं लक्ष इकडे कधीही जाऊ शकतं.
त्यांनी दोर तयार केले तरी समस्या आहेतच. बरेच शेतकरी बेंदराच्या वेळी कासरा आणि कंडे विकत घेत असतात. त्यांची विक्री करण्यासाठी देवू आणि अमित कर्नाटकातील अक्कोळ, भोज, गळटगा, कारदगा आणि सौंदलगा, आणि महाराष्ट्रातील कुरुंदवाड अशा सहा गावच्या आठवडी बाजारांत जातात. या मोठ्या सणाच्या एक दोन दिवसांआधी "इचलकरंजीतही पुष्कळ रस्स्या आणि दोर विकले जातात," अमित सांगतो.
यंदाच्या वर्षी ७ जूनला कर्नाटकी बेंदूर किंवा त्यानंतरचे सणदेखील होणार की नाही, याची काहीच शाश्वती नाही. याचं त्यांना वाईट वाटतंय कारण बेंदराच्या हंगामातच त्यांची रस्स्या विकून १५,००० रुपयांची कमाई होत असते. त्यानंतर खप बराच कमी होतो.
देवू आणि त्यांच्या तीन भावांनी मिळून एक एकर जमीन विकत घेतलीये जी त्यांनी वर्षाला १०,००० रुपयाने भाड्याने दिली आहे. पण यंदा ही रक्कम तो देऊ शकेल का याचा या कुटुंबाला घोर लागून राहिलाय.
दरम्यान, यंदाच्या वर्षी बेंदूर भरणार की नाही हे भोरे कुटुंबियांना ठाऊक नाही. लॉकडाउनच्या आधी कमावलेल्या ९,००० रुपयांवर त्यांची सगळी भिस्त आहे. आणि ही पुंजीही भर्रकन संपत चाललीये.
"आधीच उशीर झालाय," अमित म्हणतो. "आणि जर लॉकडाऊन आणखी वाढलं, तर आम्ही काहीच कमावू शकणार नाही."
अनुवादः कौशल काळू