लातुरात शाळा बंद झाल्यावर पारस माडीकरला जे वाटलं ते साधारण कोणत्याही ११ वर्षाच्या मुलाला वाटेल तसंच होतं. एक तर चौथीची परीक्षाच रद्द झाली त्यामुळे आता मोठ्ठी सुट्टी मिळणार असंच त्याच्या मनात होतं.
पण ते काही घडायचं नव्हतं. त्याच्या वडलांची, ४५ वर्षीय श्रीकांत यांची वाहनचालकाची नोकरी गेली आणि मग मिळेल ते काम करण्यावाचून – तिपटीने कमी पगार असला तरी – त्यांच्यापुढे काहीही पर्याय राहिला नाही. २५ मार्च रोजी देशभर संचारबंदी जाहीर झाली आणि त्याच्या आईचं, ३५ वर्षीय सरिता यांचं स्वयंपाकिणीचं कामही गेलं.
पारस सध्या दिवसाचा सकाळचा वेळ डोक्यावर
पालेभाजीची टोपली घेऊन भाजी विकतोय. खेदाची बाब ही की तो ज्या दोन कॉलन्यांमध्ये
भाजी विकतो त्यांची नावं सरस्वती आणि लक्ष्मी अशी आहेत. त्याची बहीण सृष्टी, वय १२
रामगर आणि सीतीराम नगर मध्ये भाजी विकतीये.
“दर रोज संध्याकाळी मान कसली दुखते तुम्हाला काय माहित? मी घरी गेलो ना आई तेलाने मालिश करून देते आणि गरम कपड्याने शेकते. मग दुसऱ्या दिवशी मी परत ओझं घेऊन बाहेर पडू शकतो,” लहानगा पारस कुरकुरतो. सृष्टीची अडचण आणखी वेगळीच आहे. “दुपार होऊतोवर माझ्या पोटात दुखायला लागतं,” ती सांगते. “जेवायआधी मी लिंबाचं सरबत करून पिते, मग जरा आराम पडतो.” या संचारबंदीच्या आधी दोघांपैकी कुणीच अंगमेहनतीचं असं काम केलं नव्हतं. आणि आता मात्र ते अतिशय कठीण काळात दोन पैसे कमावण्यासाठी रस्त्यावर आलेत. जास्तीची अपेक्षा सोडाच.
२ एप्रिल पासून पारस आणि सृष्टी रोज सकाळी ८ ते ११ लातूर शहराच्या ठराविक भागात भाजी विकतायत. दोघंही अंदाजे ४-५ किलो भाजीचं ओझं डोक्यावर घेऊन तीन किलोमीटर तरी चालत असतील. सृष्टीचं काम थोडं जास्त कठीण आहे कारण ती वजनाचा काटाही घेऊन जाते, त्याचं एक किलो वजन आणि ५०० ग्रॅमचं मापही. पारस आईने करून ठेवलेल्या भाजीच्या जुड्या घेऊन जातो आणि जुडीमागे पैसे ठरलेले असतात. ते जेव्हा रस्त्यावर असतात तेव्हा लातूरमध्ये तापमान २७-३० डिग्री तरी असतं.
आता हा भाजीपाला ते आणतात तरी कुठून? तर सृष्टीचं काम सकाळी ८ वाजायच्या आधीच सुरू होतं. “रोज सकाळी ६ वाजता मी गोलाईत जाते (त्यांच्या घरापासून ५ किलोमीटरवर, लातूरची मुख्य बाजारपेठ).” ती तिच्या वडलांसोबत किंवा त्यांचा शेजारी २३ वर्षीय गोविंद चव्हाणसोबत जाते. तो सध्या राज्य पोलिस परीक्षांचा अभ्यास करतोय. गोलाईत जाऊन यायला स्कूटर मात्र गोविंदचीच असते (आणि त्यासाठी किंवा पेट्रोलसाठी तो कसलेही पैसे घेत नाही). भाजीपाला घेऊन आल्यावर त्यांची आई त्यांच्या दोघांच्या टोपल्या भरून देते.
“काय विकायचं आम्ही नाही ठरवत. बाबा किंवा गोविंद भैय्या काय आणतील त्यावर आहे,” पारस सांगतो. “आम्ही [रोज] ३००-४०० रुपयांचा माल पोत्यात भरून आणतो,” सृष्टी सांगते. “पण आम्ही दोघं मिळून जास्तीत जास्त १०० रुपये कमवून आणित असू.”
त्यांचे वडील श्रीकांत वाहनचालक म्हणून काम करायचे आणि दिवसाला ७००-८०० रुपये कमवून आणायचे. महिन्याचे २० दिवस तरी त्यांना काम मिळायचं. त्यांचं जेवण कामावरच होऊन जायचं. हे सगळंच टाळेबंदीनंतर थांबलं. श्रीकांत आता जुन्या औसा रोडवरच्या लक्ष्मी कॉलनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतायत. पारसने त्याचा नवा व्यवसाय तिथेच थाटलाय. या कामाचे श्रीकांत यांना महिन्याला ५००० रुपये मिळतायत. वाहनचालक म्हणून त्यांची जी कमाई होती त्यात तब्बल ७० टक्क्यांचा घाटा.
या कुटुंबाला श्रीकांत यांच्या कामाच्या ठिकाणाजवळ नवं घरही शोधावं लागलं. टाळेबंदीच्या अगदी सुरुवातीलाच त्यांनी मुक्काम हलवला. पण भाडं आहे रु. २,५०० – त्यांच्या कमाईचा निम्मा हिस्सा. त्यांच्या आधीच्या घराचं भाडं २,००० रुपये होतं.
टाळेबंदीच्या आधी सृष्टी किंवा पारस दोघांपैकी कुणालाच वाटलं नव्हतं की त्यांना असे कष्ट काढावे लागतील. हे दोघंही खूप अभ्यासू विद्यार्थी आहेत
टाळेबंदीच्या आधी त्यांची आई जवळच्याच साई मेसमध्ये स्वयंपाकिणीचं काम करायची आणि महिन्याला तिचा पगार ५,००० रुपये होता. “आई रोज सकाळी ९ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत कामावर जायची. ती सकाळी घरून निघण्याआधीच आमच्यासाठी खायला करून जायची,” सृष्टी सांगते. सरिताकडे आता कसलीही कमाई नाही. ती आता घरातलं सगळं पाहते आणि पारस आणि सृष्टीसाठी त्यांची भाजी वेगवेगळी काढण्याचं, लादून देण्याचं काम करते.
टाळेबंदी आधी आपल्याला कधी असं काम करावं लागेल असं या दोघा भावंडांना वाटलंही नव्हतं. दोघंही अभ्यासू विद्यार्थी आहेत. पारसला चौथीच्या सहामाही परीक्षेत ९५ टक्के तर सृष्टीला पाचवीच्या परीक्षेत ८४ टक्के मिळाले आहेत. “मला प्रशासकीय अधिकारी बनायचंय,” पारस सांगतो. “मला ना डॉक्टर व्हायला आवडेल,” सृष्टी सांगते. त्यांच्या शाळेत - छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा – या शासकीय अनुदानित खाजगी शाळेमध्ये त्या दोघांना फीमाफी मिळाली होती.
मी पारस आणि सृष्टीशी बोलत होते तेव्हा ‘क्वारंटाइनचे दिवस लोकांना सुखद’ व्हावेत म्हणून दूरदर्शनच्या खजिन्यातली काही जुनी गाणी सुरू होती. माझं लक्ष वेधून घेतलं ते १९५४ साली आलेल्या बूट पॉलिश या हिंदी सिनेमातल्या एका गाण्यानेः
“नन्हे मुन्ने बच्चे
तेरी मुठ्ठी में क्या है
मुठ्ठी में है तकदीर हमारी
हमने किस्मत को बस में किया है”
सृष्टी आणि पारसला हे म्हणण्याची संधी मिळाली असती तर?
अनुवादः मेधा काळे