जुलै ते नोव्हेंबर २०१७ या काळात विदर्भाच्या कापूस पिकवणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, खासकरून यवतमाळमध्ये अस्वस्थ वाटणे, गरगरणे, दिसायला त्रास होणे आणि पोटदुखी अशा तक्रारी घेऊन दवाखान्यात येणाऱ्यांची संख्या अचानक वाढली. हे सगळे कापूस शेतकरी किंवा शेतमजूर होते आणि सगळ्यांना रानात कीटकनाशक फवारताना विषारी घटकांशी संपर्क आल्याने विषबाधा झाली होती. किमान ५० जण दगावले, हजाराहून अधिक आजारी पडले, आणि काही तर पुढचे कित्येक महिने आजारी होते. या संकटामुळे कापूस आणि सोयाबीनसाठी कीटकनाशकांचा होणारा अनिर्बंध आणि वारेमाप वापर उघडकीस आला. याचे विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहेत.

तीन लेखांच्या मालिकेतल्या या पहिल्या लेखात पारीने या काळात इथे नक्की काय झालं आणि महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या काय निदर्शनास आलं याचा मागोवा घेतला आहे.

याच मालिकेच्या पुढच्या लेखांमध्ये आपण इथे इतक्या मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकं का वापरली जातात या व्यापक विषयाकडे बघणार आहोत. बीटी-कपास – बोंडअळीचा मुकाबला करणारं तंत्रज्ञान वापरून जनुकीय फेरबदल करण्यात आलेलं हे वाण या अळीच्या हल्ल्याला बळी पडल्याचं दिसून येतंय. उलट गुलाबी बोंडअळी जास्तच जोमाने परत आली आहे. आणि त्यामुळेच ज्याचं भय होतं तेच झालं – प्रचंड नुकसान.

****

नामदेव सोयाम भानावर नाहीत, त्यांच्या हालचाली मंद आहेत, प्रश्नांनाही ते बिचकत उत्तरं देतायत, जणू कुठून तरी दुरून बोलत असल्यासारखे. त्यांच्या पत्नी वनिता लांबून त्यांच्याकडे काही न बोलता नुसतं पाहतायत. “ते अजून धक्क्यातून सावरले नाहीयेत,” त्यांचे एक नातेवाईक दबक्या आवाजात सांगतात.

तांबारलेल्या डोळ्यात भीती, मुंडन केलेलं डोकं, कपाळावर लाल गंध, घरात गर्दीत बसलेले नामदेव. त्यांचे म्हातारे आई-वडील मागे बसलेत. वडलांचे दोन्ही पाय पूर्वी कापावे लागलेत. दोघेही कष्टाने श्वास घेतायत. आलेल्या पाव्हण्यांचं जेवण उरकलंय – बहुतेक जण गावातलेच गणगोत आहेत – सगळेच जण एकदम शांत आहेत.

नामदेव बसलेत तिथेच शेजारी व्हरांड्यात एका प्लास्टिकच्या खुर्चीवर एका तरुण मुलाचा नुकताच फ्रेम केलेला, झेंडू आणि गुलाबाचा हार घातलेला फोटो ठेवलाय. फुलाच्या पाकळ्या विखुरल्या आहेत. फोटोपुढे उदबत्ती लावलेली दिसतीये.
Namdev Soyam, with his parents, Bhaurao and Babybai, mourning the death of his younger brother, Pravin, at their home in village Tembhi of Yavatmal in September 2017
PHOTO • Jaideep Hardikar

टेंभीच्या आपल्या घरी नामदेव सोयाम आणि त्यांचे आईवडील, बयाबाई आणि भाऊराव तरण्या प्रवीणच्या मृत्यूमुळे शोकात बुडालेत

टेंभीच्या या परधान आदिवासी कुटुंबावर काय आघात झालाय ते हा फोटोच सांगतोय. महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर तहसीलमधल्या पांढरकवडा या कापसाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरापासून टेंभी ४० किमी अंतरावर आहे.

फक्त २३ वर्षांचा असणारा प्रवीण सोयाम २७ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री उशीरा मरण पावला. त्याला अजून ४८ तासही लोटले नाहीयेत. आम्ही २९ सप्टेंबर २०१७ रोजी, दसऱ्याच्या एक दिवस आधी त्याच्या घरी पोचलो होतो.

प्रवीण हा नामदेवचा धाकटा भाऊ आणि सवंगडी. प्रवीणच्या जागी आज तोही (नामदेव) असू शकला असता, जमलेल्यांपैकी कुणी तरी म्हणून गेलं. नामदेवला बरं नव्हतं म्हणून त्याच्या वडलांनी प्रवीणला रानात औषध मारायला पाठवलं होतं. तो गेला त्याच्या फक्त दोन दिवस आधी. “सोमवार होता, २५ सप्टेंबर,” त्याचे वडील, भाऊराव आम्हाला सांगतात. प्रवीण नामदेवपेक्षा धट्टाकट्टा होता, प्रवीणच्या फोटोवरची नजर न हटवता ते आमच्याशी बोलतात.

One of the relatives of the Soyams shows the different chemicals – pesticides, growth promoters, etc – that the Soyam brothers used for spraying on their cotton plants
PHOTO • Jaideep Hardikar

रासायनिक मिश्रणः सोयाम यांच्या रानात वापरलेली कीटकनाशकं आणि वर्धकं

“त्यानं काय फवारलं होतं?” आम्ही विचारलं. नामदेव उठले आणि घरात गेले. वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या पिशव्या, बाटल्या घेऊन ते बाहेर आलेः असाटॅफ, रूबी, प्रोफेक्स, सुपर आणि मोनोक्रोटोफॉस. व्हरांड्यात प्रवीणचा ए-४ आकाराचा फोटो ठेवलाय त्या प्लास्टिकच्या खुर्चीपाशीच जमिनीवर त्यांनी ही सगळी औषधं मांडून ठेवली.

“ही सगळी कशासाठी?” आम्ही परत विचारतो. नामदेव काही न बोलता आमच्याकडे पाहत राहतात. “तुम्हाला ही वापरायला कुणी सांगितलं?” ते पुन्हा गप्पच. त्यांच्या वडलांनी सांगितलं की पांढरकवड्याच्या एका दलालाने. तो बी-बियाणं, खतं आणि शेतात लागणाऱ्या इतर गोष्टी विकतो. त्यानेच रानात ही औषधं वापरायला सांगितलं होतं. या कुटुंबाची १५ एकर जमीन आहे. पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या या रानात ते कापूस, थोडं सोयाबीन, डाळी आणि ज्वारीचं पीक घेतात.

प्लास्टिकच्या निळ्या ड्रममध्ये या सगळ्या कीटकनाशकांचं मिश्रण करून प्रवीणने त्या दिवशी रानात फवारलं. आणि ते मिश्रणच जीवघेणं ठरलं. तो औषध पिऊन नाही तर अपघाताने श्वासावाटे विषारी घटक शरीरात गेल्यामुळे तो गेला. यंदा बोंडअळीची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यामुळे प्रवीण फवारणी करत होता.

प्रवीणच्या अचानक जाण्याने सोयाम कुटुंब शोकमग्न होतं तेव्हाच विदर्भावर कीटकनाशकांच्या आपत्तीचा आघात झाला होता.

* * * * *

सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१७ या काळात यवतमाळ आणि पश्चिम विदर्भाच्या बाकी भागात ५० शेतकरी मरण पावले तर हजाराहून अधिक आजारी पडले आहेत. (सरकारने सरकारी आणि खाजगी रुग्णालयांकडून ही आकडेवारी गोळा केली आहे.) अपघाताने हे कीटकनाशकांचं मिश्रण डोळ्यात-नाकात गेल्यामुळे काहींची दृष्टी गेली, मात्र त्यांचा जीव वाचला.

या संकटाचा सामना करण्यात आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने फारच ढिलाई दाखवली. मात्र त्याची व्याप्ती इतकी जास्त होती की अखेर नोव्हेंबरमध्ये सरकारला या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमावं लागलं ( विशेष तपास पथकाचा अहवाल आणि शिफारसी ).

त्या तीन महिन्यांमध्ये, यवतमाळमध्ये सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकरी तब्येतीच्या तक्रारी घेऊन येत होते – दृष्टी जाण्यापासून ते संपूर्ण चेतासंस्थाच बंद पडणं किंवा श्वासाच्या तक्रारी.

“हे अगदीच विचित्र आहे आणि मी आजपर्यंत असं काही बिलकुल पाहिलेलं नाहीये,” यवतमाळच्या वसंतराव नाईक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्रमुख असणारे डॉ. अशोक राठोड यांनी मला सांगितलं. “या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या अचानक वाढल्याचं सगळ्यात आधी आम्हाला जुलैमध्ये लक्षात आलं होतं,” ते सांगतात. “ते आले तेव्हाच अत्यवस्थ होते – उलट्या, चक्कर, अस्वस्थपणा, श्वासाचा त्रास, अचानक दृष्टी जाणं आणि आसपासचं भान हरपणं अशा तक्रारी घेऊन ते येत होते.” जिल्हा रुग्णालयाचे तीन वॉर्ड – १२, १८ आणि १९ – विषारी औषधांच्या फवारणीनंतर आजारी पडलेल्या शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी खचाखच भरले होते.
Ward number 18 of the Yavatmal Government Medical College and Hospital was flooded with patients mostly farmers who had accidentally inhaled toxic pesticides while spraying on their fields between July and November. This photo was taken in September 2017
PHOTO • Jaideep Hardikar
Raghunath Shankar Kannake, 44, a marginal farmer, was among the tens of farmers who were admitted to Ward 19, of the Yavatmal Government Medical College and Hospital, during the September-November 2017 incidence following accidental inhalation of pesticide while spraying it on their farms
PHOTO • Jaideep Hardikar

पिकावर कीटकनाशकं फवारताना अपघाताने औषधाच्या वाफा नाकात गेल्यामुळे आजारी पडलेल्या शेतकऱ्यांनी यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात गर्दी केली होती

जुलै २०१७ मध्ये, डॉ. राठोड सांगतात, सरकारी हॉस्पिटलमध्ये ४१ रुग्ण दाखल झाले होते. ऑगस्टमध्ये हाच आकडा १११ वर गेला आणि सप्टेंबरमध्ये ३०० रुग्ण दाखल झाले – सगळ्यांच्या तक्रारी सारख्याच होत्या. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येही हे संकट सरलं नव्हतं. एकट्या यवतमाळ जिल्ह्याच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये १००० हून अधिक शेतकरी दाखल झाले होते. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यातूनही अशाच तक्रारी येऊ लागल्या होत्या.

राज्याचे कृषी अधिकारी देखील बुचकळ्यात पडले होते. आणि आरोग्य अधिकारीदेखील. कालांतराने राज्य सरकारने परिस्थितीवर तत्काळ उपाययोजना न केल्याबद्दल राठोड यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं (याबाबत तिसऱ्या लेखात विस्ताराने), आणि नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे फोरेन्सिक विभागप्रमुख डॉ. मनीष श्रीगिरीवार यांना प्रभारी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं.

नोव्हेंबर सरेतो विषबाधेच्या केसेस हळू हळू कमी झाल्या, एक तर थंडी पडायला लागली आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांनी भीतीपोटी कीटकनाशकं फवारणंच बंद केलं. पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान झालं होतं – माणसांचं आणि कपाशीचं, जिच्यावर अभूतपर्व असा बोंडअळीचा हल्ला झाला होता.

* * * * *

सालगडी म्हणून काम करत असलेल्या निकेश कथाणे गेले सात दिवस सलग रानात कीटकनाशक फवारत होता. अखेर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एका दुपारी तो तसाच खाली कोसळला.

“माझं डोकं भलतंच जड झालं होतं, काही दिसेनासं झालं होतं,” निकेश सांगतो. ऑक्टोबरच्या मध्यावर यवतमाळ शहरातल्या सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तो उपचार घेतोय, सोबत त्याचे आईवडील बसलेत. “आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी त्याला दवाखान्यात नेलं,” त्याचा भाऊ लक्ष्मण सांगतो. ते बरं झालं. अजून उशीर झाला असता तर काही खरं नव्हतं. निकेशने आता परत कीटकनाशकाला हात लावायचा नाही असं ठरवलंय. त्याला सतत झटके येत होते. त्याच्या जिवाला आता धोका नाहीये पण त्याच्या आजूबाजूचे नऊ जण अजूनही मृत्यूशी झुंज देतायत. त्यानेच तो घाबरलाय. आम्ही त्याच्याशी बोललो तेव्हा अतिदक्षता विभागात दाखल होऊन त्याला सात दिवस झाले होते.

Nikesh Kathane, a 21-year-old farm labourer, recuperating in the ICU of the Yavatmal Government Medical College and Hospital in September 2017, after falling sick in the wake of accidental inhalation of pesticide while spraying it on his owner’s field. With him are his parents Keshavrao and Tarabai and his elder brother Laxman
PHOTO • Jaideep Hardikar

२१ वर्षीय, निकेश कथाणे, शेतमजूर, यवतमाळच्या रुग्णालयात उपचार घेतोय, सोबत त्याचे चिंतातुर आई-वडील आणि भाऊ

त्याने चिनी बनावटीचं बॅटरीवर चालणारं फवारणी यंत्र वापरलं होतं – त्याने फवारणी झटपट आणि सोपी होते – आणि जास्त धोकादायक. “या पंपाने तुम्ही कमी वेळात जास्त फवारू शकता,” निकेश सांगतो.

कथाणे कुटुंब राळेगाव तहसीलच्या दहेगावचं, यवतमाळ शहरापासून ३० किमी लांब. लक्ष्मण सांगतो त्यांच्या गावचे इतर पाच जण त्याच रुग्णालयाच्या वेगवेगळ्या वॉर्डमध्ये उपचार घेतायत. त्यांची परिस्थिती फारशी गंभीर नसली तरी त्यांनाही विषबाधेनंतर होणारे त्रास होत आहेत.

रुग्णालयाच्या १८ नं. वॉर्डमध्ये दिग्रस तहसीलातल्या वडगावचा २९ वर्षीय शेतकरी, इंदल राठोड आहे. त्याच्या कुटुंबाची चार एकर जमीन आहे. त्याला इथे येऊन दहा दिवस झालेत, तरी अजून त्याला आसपासचं भान नाहीये, त्याचा भाऊ अनिल आम्हाला सांगतो.

भय आणि थरकाप आहे फक्त खचाखच भरलेल्या रुग्णालयांमध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातच जाणवत होता.

सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात मी शेतकऱ्यांशी बोलत होतो, त्यातल्या कित्येकांनी सांगितलं की भीतीपोटी त्यांनी कीटकनाशकं फवारणंच बंद केलंय. मनोली गावच्या नारायण कोटरंगेंची तीच कहाणी. गावातल्याच एकाची १० एकर जमीन त्यांनी करायला घेतलीये, तिथे एक दिवस प्रोफेक्स सुपरची फवारणी करत असताना त्यांना गरगरू लागलं. “माझ्या नऊ फवारण्या झाल्या होत्या,” ते सांगतात. “दहाव्या बारीला मात्र मी थांबलो. पुढचा अख्खा आठवडा मला कामच झालं नाही, आजारीच होतो मी.”

A four-acre farmer from Manoli village, Vilas Rathod, in Yavatmal’s Ghatanji tehsil inspects his cotton crop; Rathod stopped spraying after he fell sick, but did not need hospitalization
PHOTO • Jaideep Hardikar
One of the farmers, completely disoriented, had to be tied to his bed in the ICU of the Yavatmal hospital so that he did not fall down as his body jerked
PHOTO • Jaideep Hardikar

विलास राठोड (डावीकडे), विषारी वाफा नाकातोंडात गेल्या तरी त्यांच्यावर दवाखान्यात दाखल व्हायची वेळ आली नाही, इतर शेतकरी मात्र गंभीर स्वरुपाच्या विषबाधेच्या लक्षणांमुळे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत

प्रत्येक गावात फवारणी केल्यानंतर आजारी पडलेलं कुणी ना कुणी भेटतंच. “रुग्णांच्या रक्त तपासणीतनं दिसतंय की विषाचा परिणाम त्यांच्या चेता संस्थेवर झालाय,” कनिष्ठ निवासी डॉक्टर असणारे डॉ. पराग मानपे सांगतात. तेच निखिल आणि अतिदक्षता विभागातल्या इतरांवर उपचार करत आहेत. नाकातोंडात विषारी घटक गेल्याचा परिणाम विष प्यायल्यावर होतो तसाच आहे, उपचार मात्र अवघड आहेत कारण शरीरातले विषाचे अंश काढून टाकण्यासाठी इथे ‘स्टमक वॉश’ देणं शक्य नाहीये. श्वासावाटे विषारी वाफा शरीरात गेल्यामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम झाला.

रुग्णालयात दाखल झालेल्या शेतकऱ्यांमध्ये दोन प्रकारच्या समस्या दिसत होत्या – एक विशिष्ट कीटकनाशक जे भुकटीच्या स्वरुपात वापरलं जातं, त्याने दृष्टीवर परिणाम झालाय. आणि द्रवस्वरुपातल्या विशिष्ट प्रकारच्या कीटकनाशकाचा चेतासंस्थेवर.

या औषधांमध्ये काय होतं – प्रोफेनोफॉस (एक प्रकारचं ऑरगॅनोफॉस्फेट), सायपरमेथ्रिन (एक कृत्रिम पायरेथ्रॉइड) आणि डायाफेन्थियुरॉन, वेगवेगळ्या पिकांवरच्या अळ्यांवर मारण्यासाठीची रसायनं. ही सगळी रसायनं एकत्र केली की एक असं काही जहर तयार होतं की ते माणसाचाही जीव घेऊ शकतं.

* * * * *

टेंभी गावच्या सोयामांच्या घरी, प्रवीणची तब्येत हळू हळू ढासळू लागली. आधी त्याला छातीत दुखू लागलं, नंतर उलट्या आणि कसं तरी व्हायला लागलं, त्यानंतर अस्वस्थ वाटू लागलं. २४ तासात तो अत्यवस्थ झाला होता. पुढच्या दिवशी पांढरकवड्याच्या एका छोट्या रुग्णालयात दाखल झाल्यावर तीनच तासात त्याने प्राण सोडले. दोन दिवसात सारा खेळ खतम.

रुग्णालयात त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं असं म्हणणं पडलं की त्याने औषध फवारताना पुरेशी काळजी घेतली नाही त्यामुळे विषारी घटकांच्या संपर्कात आल्याने त्याचा मृत्यू झाला. या भागात ही असली जीवघेणी कीटकनाशकं फवारताना कुणीही हातमोजे, तोंडाला रुमाल किंवा मास्क किंवा अंगात जास्तीचे संरक्षक कपडे घालत नाही.

“मी त्याला कपाशीवर फवारणी उरकून घ्यायला सांगितली कारण नामदेव आजारी पडला होता,” भाऊराव सांगतात. यंदा त्यांच्या गावातल्याच काय संपूर्ण प्रदेशातल्या शेतकऱ्यांना जुलैपासूनच पिकावर वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचं लक्षात येऊ लागलं होतं, त्यामुळे त्यांनी वेगवेगळी कीटकनाशकांची मिश्रणं फवारली होती, एकदा नाही अनेकदा. तीच गत सोयामांची.

फवारून आल्यावर प्रवीणला थकल्यासारखं वाटत होतं. पण डॉक्टरकडे जायला तो तयार झाला नाही. “आम्हाला वाटलं गरम्यामुळे असेल. हवा तापली होती आणि या काळात गावात नेहमीच तापाची शक्यता असते,” भाऊराव सांगतात. दुसऱ्या दिवसी संध्याकाळी प्रवीणची तब्येत जास्तच बिघडली तेव्हा नामदेव आणि बयाबाईंनी त्याला शेजारच्या गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं की हे दुखणं साधं नाही त्यामुळे त्याने त्यांना ४० किमीवरच्या पांढरकवड्याच्या रुग्णालयात घेऊन जायला सांगितलं.

ते संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात पोचले. तरण्या प्रवीणने रात्री १० वाजता अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पोस्टमॉर्टेम अहवालात लिहिलंयः “ऑरगॅनोफॉस्फेट विषबाधेमुळे मृत्यू.”

Jaideep Hardikar

ஜெய்தீப் ஹார்டிகர் நாக்பூரிலிருந்து இயங்கும் பத்திரிகையாளரும் எழுத்தாளரும் ஆவார். PARI அமைப்பின் மைய உறுப்பினர்களுள் ஒருவர். அவரைத் தொடர்பு கொள்ள @journohardy.

Other stories by Jaideep Hardikar
Translator : Medha Kale

மேதா காலே, மும்பையில் வசிக்கிறார், பெண்கள் மற்றும் நல்வாழ்வு தொடர்பான விவகாரங்களில் எழுதுகிறார். PARIஇல் இவரும் ஒரு மொழிபெயர்ப்பாளர். தொடர்புக்கு [email protected]

Other stories by Medha Kale