दोन गर्भं आहेत, खाजगी प्रसूतीगृहातल्या डॉक्टरांना रोपी अगदी ठामपणे सांगत होती. कसलाही सोनोग्राफी रिपोर्ट वगैरे नसला तरीही.

दोन वर्षांपूर्वीचा हा प्रसंग रोपी मन्नू बेते अगदी खुलून, रंगवून सांगते. “ कान में वो लगाया ,” कानात स्टेथोस्कोप लावायची नक्कल करत ती म्हणते. समोर निजलेल्या किडकिडीत अंगाच्या गरोदर बाईचं लहानसं पोट पाहून डॉक्टरांनी वेगळं निदान केलं आणि रोपीचा अंदाज मान्य नसल्याचं सांगितलं.

मेडम, दो होता दो ,” ती परत परत सांगत राहिली. आणि मग कंटाळून दवाखान्याच्या प्रसूती खोलीतल्या एका स्टुलावर जाऊन बसली. सत्तरी पार केलेली रोपी आणि अडलेली, वेणांनी थकून गेलेली गरोदर बाई मेळघाटातल्या जैतादेही या त्यांच्या गावापासून २० किलोमीटरवर परतवाड्यातल्या दवाखान्यात गेल्या होत्या.

संध्याकाळी मुलगा जन्मला आणि काही सेकंदात अजून एक डोकं दिसायला लागलं. आणि पाठोपाठ त्याची जुळी बहीण जन्मली.

रोपी तिच्या घराच्या ओसरीत एका टोकाला लाकडी खाटेवर बसली होती. मातीच्या भिंतींचं पारंपरिक बांधकाम असलेलं घरं शेणाने लख्ख सारवलेलं होतं. घराला तीन खोल्या आहेत. पण घरात दुसरं कुणीच नाही. घरची दोन एकर शेती आहे आणि रोपीची मुलं शेतात गेलीयेत.

कोरकू भाषेत तिने एक चांगली शिवी हासडली – मराठीत ज्याचा अर्थ होतो गाढवाची *** . मला सांगता सांगता रोपी परत हसायला लागते. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या खोल जातात. “तिला तेच म्हटलं मी,” शहरातल्या डॉक्टरला शिवी दिल्याची आठवण तिला सुखावून गेल्यासारखी वाटते.

Ropi, Jaitadehi village's last remaining traditional dai, says she must have delivered at least 500-600 babies
PHOTO • Kavitha Iyer

जैतादेहीची हयात असलेली शेवटची दाई रोपी सांगते की आजवर तिच्या हातून किमान ५००-६०० बाळं जन्माला आली असतील

हा विश्वास कशातून येतो – चार दशकांच्या अनुभवातून. कोरकू समाजाची रोपी तिच्या समाजातली शेवटची दाई असावी. आजवर तिने किमान ५००-६०० बाळं जन्माला घातली असतील. मोजदाद कोण ठेवतंय? पण आजवर तिच्या हातून जी बाळंतपणं झाली त्यात एकही मूल मृतावस्थेत जन्माला आलेलं नाही. तिच्या आवाजातला आणि चेहऱ्यावरचा अभिमान लपत नाही. “ सब चोखा .” पूर्वापारपासून बाळंतपणाचं काम करणाऱ्या दायांकडे कुठलंही आधुनिक वैद्यक प्रशिक्षण किंवा प्रमाणपत्र नाही.

अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटाच्या जंगलात, धारणी आणि चिखलदरा तालुक्यात राहणाऱ्या कोरकू आदिवासींसाठी रोपीसारख्या बायांचं मोल केवळ घरी बाळंतपणांची परंपरा जोपासण्यापुरतं मर्यादित नाही. गरोदरपणात काय काळजी घ्यायची तेही त्या सांगतात. बाळंतपणात मदत करतात आणि मेळघाटासारख्या दुर्गम डोंगराळ भागात जिथे दवाखान्यात जायला वाहनाची लवकर सोय होऊ शकत नाही तिथे आवश्यक अशी आरोग्यसेवा देखील पुरवतात.

मेळघाटातल्या बहुतेक गावांमध्ये एक-दोघी दाया आहेत असं रोपी सांगते. पण त्या सगळ्या म्हाताऱ्या आहेत आणि त्यांची पुढची पिढी काही या कामात आलेली नाही. जैतादेहीत आणखी एक दाई होती पण ती अनेक वर्षांपूर्वी वारली. तिची सून किंवा मुलगी हे काम शिकू शकली असती पण तिच्या घरचं कुणीच आता हे काम करत नाही.

रोपीची दोन्ही मुलं घरी जन्मली आहेत आणि तेव्हा तिची आई आणि गावातल्या दाईने बाळंतपण केलं होतं. तिला चार मुलं होती पण दहा एक वर्षांपूर्वी कसल्याशा आजाराने दोघं वारली. दोन मुलींची लग्न होऊन त्या जैतादेहीतच राहतात. तिला भरपूर नातवंडं आणि पतवंडं आहेत. (तिच्या दोन्ही मुलींनी हे काम करायला नकार दिला, एकीने ही कला जरा तरी शिकून घेतली होती, रोपी सांगते.)

“माझी सून इतकी घाबरते, ती माझ्या सोबत बाळंतिणीच्या खोलीत पण थांबत नाही,” रोपी सांगते. “ती बघत पण नाही, दोरा किंवा कापड द्यायचं लांबच. ऐसा कापने लगता [ती अशी थरथरायला लागते],” रक्त पाहिल्यावर आपली सून कशी थरथर कापते त्याची नक्कल करत रोपी सांगते.

मागच्या पिढीतल्या बायांना शरीरधर्माची भीती वाटायची नाही, रोपी सांगते. “आम्हाला काही दुसरा पर्यायही नव्हता. धीट व्हायलाच लागायचं. ऊठसूट जायला डॉक्टर किंवा नर्स नव्हत्या.”

Ropi with her great grandchildren: her own children were all born at home, assisted by her mother and a dai
PHOTO • Kavitha Iyer

रोपी आपल्या पतंवंडांसमवेतः तिची सगळी मुलं घरीच जन्मली. सोबतीला तिची आई आणि एक दाई होती

तिची आई आणि आजी दोघी दाई होत्या. आपल्या आजीसोबत जाऊन जाऊन तिने ही कला शिकून घेतली. तिची आई काही आपल्या या चुळबुळ्या मुलीला सोबत येऊ द्यायची नाही. रोपी कधीच शाळेत गेलीही नाही. “ बाकेई हेजेदो [मागे थांब],” आई ओरडायची ते रोपीला आजही आठवतं. “पण माझी आजी मला सोबत घेऊन जायची. मी अगदी १२-१३ वर्षांची होते तेव्हा.” सोळाव्या वर्षी रोपीचं लग्न झालं त्याआधीपासूनच ती तिच्या आजीला मदत करायला जायला लागली होती.

*****

मेळघाटाचं जंगल आणि डोंगररांगा जैवविविधतेचं आगार आहेत. इथेच १,५०० चौरस किलोमीटरवर पसरलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. या पानगळीच्या जंगलात कोरकू आणि गोंड आदिवासींची गावं आणि पाडे आहेत. यातली अनेक गावं राखीव जंगलात, बफर क्षेत्रात आणि जंगलाच्या वेशीवर आहेत. बहुतेक आदिवासी शेती करतात, जनावरं पाळतात आणि बांबू किंवा वनौषधींसारख्या वनोपजावर उदरनिर्वाह करतात.

१५० उंबरा असलेलं बोराट्या खेडा चिखलदऱ्यापासून ५० किलोमीटरवर जंगलाच्या अगदी आतमध्ये आहेत. इथली सत्तरीची चरकू बाबुलाल कसदेकर “आठवतं तेव्हापासून” दाईचं काम करतीये. ती सांगते की अगदी आजही मेळघाटाच्या दुर्गम गावांमध्ये दर दहा गरोदर बायांमधल्या पाच जणी तरी घरी बाळंतपण करणं पसंत करतात. गेल्या काही वर्षांत आरोग्यसेवांची स्थिती जराशी सुधारली असली तरी. (२०१५-१६ साली झालेल्या एनएफएचएस-४ नुसार ग्रामीण भागातली ९१ टक्के बाळंतपणं दवाखान्यात होतायत. पण मेळघाटातल्या दुर्गम गावांचं चित्र काही यात प्रतिबिंबत होत नाही.)

२०२१ साली एप्रिलमध्ये बोराट्या खेड्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचं एक उपकेंद्र सुरू झालं. दोन महिन्यांनी मी उपकेंद्राला भेट दिली तोपर्यंत काही तिथे नळाचं पाणी आलेलं नव्हतं. इथे २४ तास गरज पडेल तेव्हा येईल अशा एका नर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. खरं तर उपकेंद्राच्या वर पहिल्या मजल्यावर तिने रहावं अशी अपेक्षा आहे पण बोराट्या खेड्यातली एएनएम शांता विहिके दुर्वे याच गावची सून असल्याने ती गावात राहते.

उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी या पदावर काम करण्यासाठी एका डॉक्टरचं पद देखील आहे मात्र नळाचं पाणी नसल्याने या पदासाठी कुणीच अर्ज केला नाही असं गावातले लोक सांगतात. इथून २० किलोमीटरवर असलेल्या सेमाडोहच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकती पदवी घेतलेल्या एका डॉक्टरचं प्रशिक्षण सुरू आहे आणि तो लवकरच (मी तिथे भेट द्यायला गेले तेव्हा) इथे कामावर रुजू होईल अशी अपेक्षा आहे.

Bortyakheda’s ANM Shanta Durve (left) urges Charku, the village's elderly dai, to come along even for deliveries the PHC
PHOTO • Kavitha Iyer

बोरट्या खेडाची एएनएम शांता दुर्वे प्राथमिक आरोग्य  केंद्रात एखादी प्रसूती असेल तर गावातल्या जुन्या जाणत्या दाई ,चरकूला  सोबत यायला साेगते

पण एएनएम शांता सांगते की बऱ्याच गरोदर बाया उपकेंद्रात प्रसूतीसाठी यायला फारशा राजी नसतात. “बाळंतपण आपल्यातल्याच कुण्या बाईने केलं तर धीर वाटतो,” ती सांगते. शांताने तिशी पार केली आहे आणि शेजारच्या मोर्शी तालुक्यात दहा वर्षं सेवा केल्यानंतर ती आता इथे आली आहे.

सेमाडोहच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती असेल तेव्हा शांता चरकूसारख्या जुन्या जाणत्या दाईला सोबत यायची गळ घालते. अनेक कुटुंबांमध्ये आजही दाईचा सल्ला जास्त मानला जातो. पण बोराट्या खेडा आता एकही तरुण दाई नाही याचं शांतालाही वाईट वाटतं. चरकूचं काम पुढे नेणारं या खेड्यात आता कुणी नाही. दुसरी एक दाई होती पण तिनेही म्हातारपणामुळे हे काम आता बंद केलंय. काही वर्षांपूर्वी युनिसेफसोबत राज्य सरकारने सुरू केलेल्या दाई प्रशिक्षण कार्यक्रमातही तिने भाग घेतला नाही.

चरकू त्या एक दिवसाच्या प्रशिक्षणात सहभागी झाली होती. ती सांगते, “आपल्याला वाटतं आपल्यालाच सगळं कळतं. पण त्यांनी आम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. साबण कसा वापरायचा, हात कसे धुवायचे आणि दर वेळी नवीन पातं वापरायचं.”

ती जर एखाद्या बाईबरोबर बाळंतपणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली तर बाळंतपण नर्सच करते. आणि खाजगी दवाखान्यात ती शक्यतो जातच नाही. नर्सला जमलं तर ठीकच कारण बायांना पुरुष डॉक्टरसमोर लाज वाटते. काही गुंतागुंत झाली तरच डॉक्टरला सांगितलं जातं. आणि सोबत गेलं तरी चरकूला त्याचे पैसे मात्र मिळत नाहीत.

तरी पण ती सोबत का बरं जाते? “ चलो बोला तो जाती . मी गेल्याने बाळंतिणीला बरं वाटत असेल तर काय हरकत आहे?”

पूर्वी बाळंतपण झाल्यावर लोक तिला धान्य द्यायचे. पितळ्याच्या दोन किंवा तीन पाई (पायली) तांदूळ किंवा गहू. कधी कधी कुणी पैसे द्यायचं.

इतक्या दशकांनंतरही दायांना फार काही पैसा मिळत नाही. २०२१ साली जून महिन्यात मी चरकूला भेटले. त्याच्या आदल्याच महिन्यात तिने एकीचं बाळंतपण केलं होतं. त्याचे तिला ५०० रुपये आणि चार किलो गहू मिळाले होते. ती बाई झटक्यात मोकळी झाली होती. वेणा सुरू झाल्या आणि लगेच बाळ झालंसुद्धा. “जास्त वेळ लागला असता तरी मला तितकेच पैसे मिळाले असते,” ती सांगते.

Charku with two of her great grandkids: at least half of the babies born in Bortyakheda over the past three decades had Charku present at the time of their birth, and she has delivered her own grandchildren and a great-grandchild
PHOTO • Kavitha Iyer

चरकू आणि तिची दोन पतवंडंः बोरट्याखेडामध्ये गेल्या तीस वर्षांत जी बाळंतपणं झाली त्यातल्या निम्म्या  मुलांच्या जन्माच्या वेळी चरकू तिथे होती. तिची नातवंडं आणि पतवंडं तिच्याच हाती जन्माला आली आहेत

चरकूचा नवरा पाच वर्षांपूर्वी वारला. त्यांची एकरभर जमीन तो कसायचा. आता तिची मुलगी आणि जावई शेत पाहतात. दाई म्हणून सतत नेमाने काही पैसा मिळत नाही, चरकू सांगते. इतक्यात काही महिन्यांत तिला अगदी ४,००० रुपयेसुद्धा मिळालेत आणि कधी कधी १,००० मिळता मिळता मारामार.

बोराट्या खेडात गेल्या तीस वर्षांत जी काही मुलं जन्मली त्यातल्या निम्म्या बाळंतपणांमध्ये चरकू तिथे होती असं गावातल्या बाया सांगतात. तिची नातवंडं आणि पतवंडंसुद्धा तिच्याच हाती जन्माला आली आहेत.

काही नवजात बाळं थोड्या दिवसांनी मरण पावली, ती सांगते. “बाळंतपणाच्या वेळी नाही, काही दिवस गेल्यावर.” का ते तिला माहित नाही. कुणालाच माहित नाही, ती म्हणते.

आता तिला दिसायला त्रास व्हायला लागलाय त्यामुळे तिच्याकडे येणाऱ्यांना ती शक्यतो उपकेंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जायला सांगते.

*****

रोपीला काही तिचं वय सांगता येत नाही. अलिकडे तिचे पाय कुरकुरू लागलेत. घोट्याला सूज आहे आणि गुडघे फार दुखतात. शहरातल्या दवाखान्यात ती गेलेली नाही आणि गावातल्या वैद्याने दिलेलं एक तेल चोळतीये. पण फार काही फरक पडलेला नाही.

रोपी आजही गावात हिंडू-फिरू शकते, आपल्या मुलींकडे जाते, जुन्या सवंगड्यांना भेटते. पण बाळंतपणासाठी जर तिच्याकडे कुणी आलं तर मात्र ती त्यांना नकार देतीये. घराबाहेर इतका वेळ जमेल का ही शंका आणि डोळ्याला पण आजकाल नीट दिसेनासं झालंय. “मी त्यांना शहरातल्या [परतवाडा] दवाखान्यात फोन करायला लावते आणि अँब्युलन्स येईपर्यंत सोबत थांबते. जर गाडी लगेच गावात परत येणार असली तर मी त्यांच्यासोबत जाते.”

Ropi's family has a small goat-rearing business, and they also cultivate two acres. Her earning as a dai remain modest, and have not improved greatly over the decades
PHOTO • Kavitha Iyer
Ropi's family has a small goat-rearing business, and they also cultivate two acres. Her earning as a dai remain modest, and have not improved greatly over the decades
PHOTO • Kavitha Iyer

रोपीच्या कुटुंबाचा बकरीपालनाचा छोटा धंदा आहे आणि ते आपल्या दोन एकरात शेती करतात. बाळंतपणं करून थोडाफार पैसा मिळतो पण गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यात फार काही वाढ झालेली नाही

जैतादेहीत रोपीची चांगलीच ख्याती होती. ती वेळेला पटकन धावून यायची आणि धीराने प्रसंगाला सामोरी जायची. “पूर्वी लोक मला बोलवायला यायचे तेव्हा मी आधी त्यांना काय काय गोष्टी लागतील ते सांगायचे – पत्ती, धागा, सुई.” बाळंतपणाच्या दरम्यान योनीद्वार फाटलं तर दाया ते शिवून टाकायच्या. त्यात काय एवढं असा भाव रोपीच्या चेहऱ्यावर दिसतो.

वेणा नुकत्याच सुरू झाल्या आहेत का बराच वेळ लोटलाय याचा अंदाज घेऊन ती तिची हातातली कामं संपवायची आणि बाळंत होऊ घातलेल्या बाईच्या घरी जायची. चिंतातुर नातेवाइक गोळा झालेले असायचे.

रोपी देवाचा धावा करूनच तिचं काम सुरू करायची. हात स्वच्छ धुवून ग्रीवा किती उघडलीये ते तपासायची.

“[बाळंतिणीची] आई काही काम करत नाही, पण ती पण तिथेच बसलेली असते. रडत, कण्हत. लेकीच्या आवाजाइतका हिचा आवाज असतो. ‘ ओ माई, जल्दी कर दो माई ,’ आया रडत असतात. आता ते काही माझ्या हातात थोडीच आहे!” रोपी म्हणते.

कधी कधी वेणा कित्येक तास सुरू असतात. मग रोपी पटकन घरी येऊन चार घास खाऊन, नवऱ्याला आणि लेकाला जेवायला वाढून परत जायची. “त्या वेळी तर आयांचा आवाज टिपेला जायचा. बाळ बाहेर येईपर्यंत जाऊ नको म्हणून त्या रडायला लागायच्या. पण कधी कधी अख्खी रात्र वेणा सुरू राहतात. अशा वेळी सगळे घाबरतात, पण मी नाही.”

अशा वेळी रोपी थोडं तेल मागून घ्यायची. (स्वयंपाकासाठी वापरतात ते कुठलंही तेल चालायचं) आणि बाईचं पोट चोळायची. पोट तपासून बाळ आडवं आहे का ते तिला समजायचं. किंवा मग चोळून चोळून ती बाळाचं डोकं योग्य जागी फिरवायची. कधी कधी बाळ पायाळू जन्मायचं पण अशा वेळीही फार काही अडचण येत नसल्याचं रोपी सांगते.

बाकी काही प्रथा परंपरा अजूनही तशाच सुरू आहेत. नववा महिना उलटून गेल्यानंतरही वेणा सुरू झाल्या नाहीत तर भूमकालाने मंतरलेल्या पाण्याचे दोन तीन घोट चरकू गरोदर बाईला प्यायला सांगते

बाळंतपण पार पडल्यावर तिथली जागा साफ करायचं कामसुद्धा दाईच करते असं रोपी सांगते. “पूर्वी आम्ही बाळाला लगेच न्हाऊ घालायचो. पण आता आम्ही तसं करत नाही,” ती म्हणते. पूर्वी बाळाला लगेच आंघोळ घालून त्यानंतरच अंगावर प्यायला आईकडे देण्याची प्रथा होती.

चरकू पण हेच सांगते. “पूर्वी आम्ही पाणी कोमट करून लगेच बाळाला न्हाऊ घालायचो. कधी कधी तर दोन दिवसांनी बाळ आईकडे द्यायचे.” पहिल्या दिवशी बाळाला फक्त गुळाचं पाणी किंवा मधपाणी द्यायची पद्धत होती.

जन्मल्या जन्मल्या बाळाला आंघोळ घालण्याची प्रथा आता कमी व्हायला लागलीये. गावातल्या नर्सचा सल्ला आणि दवाखान्यात बाळंतपण करण्यासाठी होत असलेल्या कामामुळे तसंच मेळघाटातल्या बालमृत्यूंसंबंधी राज्यपातळीवर विशेष लक्ष देण्यात आल्याने हा बदल झाला असावा (या भागातले बालमृत्यू आणि तीव्र कुपोषणाबद्दल विविध अभ्यास आणि अहवाल तयार झाले आहेत). आजकाल बाळंतपणानंतरचे रिवाज आणि देवदेवापेक्षा बाळाच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात झालीये, बोराट्याखेडाची एएनएम शांता सांगते. आणि राज्य शासन आणि युनिसेफने घेतलेल्या प्रशिक्षणांमुळे घरी होणारी बाळंतपणं जास्त सुरक्षित व्हायला मदत झाली आहे.

आजकाल, जन्मानंतर बाळ हालचाल करू लागलं आणि आईला थोडी विश्रांती मिळाली की आडवं पडून किंवा बसल्या बसल्या बाळाला अंगावर कसं पाजायचं ते दाई नव्या आईला दाखवते. आणि अर्ध्या तासाच्या आत बाळाला आईचं दूध मिळतं, चरकू सांगते.

काही प्रथा परंपरा मात्र अजूनही सुरूच आहेत. नववा महिना उलटून गेल्यानंतरही वेणा सुरू झाल्या नाहीत तर भूमकालाने (पारंपरिक भगत) मंतरलेलं पाणी चरकू गरोदर बाईला प्यायला देते.

मुलगा होणार का मुलगी हे ओळखायला आवडतं असं रोपी सांगते. गर्भात मुलगा असेल तर पोट पुढच्या बाजूला वाढतं, रोपी म्हणते. “मुलगी असेल तर बाजूने जास्त बाहेर येतं.” पण हे सगळं अंदाजपंचे चालतं असं सांगत ती हसायला लागते. थोडासा ठोकताळा असतो, बास. बाळ जन्माला येईपर्यंत मुलगा आहे का मुलगी कळू नये अशीच देवाची इच्छा आहे, ती म्हणते.

Charku's eyesight is dimming, and she tells families more and more frequently to head to the PHC or the new sub-centre.
PHOTO • Kavitha Iyer
Ropi too sends away most people who come to seek her help, tellign them, 'I can’t do it any longer'
PHOTO • Kavitha Iyer

डावीकडेः चरकूची नजर आता अधू व्हायला लागली आहे आणि तिच्याकडे बाळंतपणासाठी कुणी आलं तर त्यांना ती प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात जायला सांगते. उजवीकडेः रोपीसुद्धा मदतीसाठी आलेल्यांना ' आता माझ्याच्याने होत नाही' असं सांगून माघारी पाठवू लागलीये

बोराट्याखेडाचे रहिवासी सांगतात की दाई गावाच्या आरोग्यासाठी पूरक काम करते. गरोदर बायकांना राज्याकडून मिळणारे लाभ (नियमित तपासणी, लोह आणि फोलिक आम्लाच्या गोळ्या आणि कॅल्शियम) पोचवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. बाळंतपणाचं नियोजन करणं आणि वेळेत दवाखान्यात घेऊन जाण्याचं मोलाचं काम त्या करतात.

जैतादेही परतवाड्यापासून फार लांब नाही त्यामुळे लोक सहजपणे इथल्या खाजगी डॉक्टरांपर्यंत पोचू शकतात. त्यामुळे रोपीनंतर आता गावात दुसरी दाई नाही याचं फारसं वैषम्य त्यांना वाटत नाही. पण जिथे बाळंतपणं केली जातात अशा सरकारी दवाखान्यांसाठी रोपी चार शब्द नक्की सांगते. “काही बाया इतक्या किडकिडीत असतात. नऊ महिने रोज त्यांना उलट्या होत असतात. वशाट खात नाहीत, काही काही पदर्थ पाहिले की तोंड फिरवतात. गरोदर बाईने सगळं काही खाल्लं पाहिजे. काहीच सोडायचं नाही,” रोपी म्हणते. “डॉक्टरांनी पण गरोदर बायकांना या गोष्टी सांगायला पाहिजेत.”

कोरकू समाजात बाळ जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी दाईला घरी बोलावतात. त्याच दिवशी तिला तिचं मानधन दिलं जातं, किमान पहिले पाच दिवस बाळ जगल्याची खात्री झाल्यानंतर. “काही जण अपघाताने दगावतात, काही आजारात आणि काही बाळंतपणात,” रोपी काहीशी गंभीर होऊन म्हणते. “प्रत्येकाला कधी ना कधी मरण येणारच आहे. पण बाळंतपण सुखरुप पार पडणं म्हणजे आई आणि बाळ दोघांची जीत असते.”

बाळंतपण सुखरुप पार पडल्यावर लोक तिचे आभार मानायचे, तिचं ऋण असल्याचं सांगायचे. दाई म्हणून तिची ही सर्वात मोठी कमाई असल्याचं रोपी सांगते. आता ती फारसं काम करत नाही आणि या कृतज्ञतेची आठवण तिला येत राहते. आजकाल तिच्याकडे मदतीसाठी येणाऱ्या बहुतेकांना ती माघारी पाठवतेः “ जाओ बाबा, अब मेरे से होता नही ,” ती म्हणते.

पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Kavitha Iyer

கவிதா ஐயர் 20 ஆண்டுகளாக பத்திரிகையாளராக இருந்து வருகிறார். ‘லேண்ட்ஸ்கேப்ஸ் ஆஃப் லாஸ்: தி ஸ்டோரி ஆஃப் ஆன் இந்திய வறட்சி’ (ஹார்பர்காலின்ஸ், 2021) என்ற புத்தகத்தை எழுதியவர்.

Other stories by Kavitha Iyer
Illustration : Priyanka Borar

ப்ரியங்கா போரர், தொழில்நுட்பத்தில் பல விதமான முயற்சிகள் செய்வதன் மூலம் புதிய அர்த்தங்களையும் வெளிப்பாடுகளையும் கண்டடையும் நவீன ஊடக கலைஞர். கற்றுக் கொள்ளும் நோக்கிலும் விளையாட்டாகவும் அவர் அனுபவங்களை வடிவங்களாக்குகிறார், அதே நேரம் பாரம்பரியமான தாள்களிலும் பேனாவிலும் அவரால் எளிதாக செயல்பட முடியும்.

Other stories by Priyanka Borar
Editor and Series Editor : Sharmila Joshi

ஷர்மிளா ஜோஷி, PARI-ன் முன்னாள் நிர்வாக ஆசிரியர் மற்றும் எழுத்தாளர். அவ்வப்போது கற்பிக்கும் பணியும் செய்கிறார்.

Other stories by Sharmila Joshi