नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातल्या सावरखेडमध्ये फारसं कुणी खळखळून हसत नाही. अनोळखी कुणाशी बोलताना ते त्यांचं तोंड फारसं उघडत नाहीत. “आम्हालाच कसनुसं होतं,” रामेश्वर जाधव सांगतो. तो बोलतो तेव्हा लक्षात येतं की त्याचे सगळे दात किडलेत आणि बेढब झालेत. दातांचा रंगही पिवळा किंवा गडद विटकरी झाला आहे.

२२ वर्षांचा रामेश्वर शेतमजूर आहे. ५०० वस्तीच्या सावरखेडमध्ये अशी अडचण असणारा तो एकटाच नाहीये. जवळ जवळ प्रत्येकच मोठ्या माणसाचे दात कमी जास्त खराब झालेत. गावातल्या अरुंद गल्लीबोळातनं किंवा शेताकडे जाणारे बरेच जण लंगडतायत किंवा पाठीतनं कायमचेच वाकलेत. जे चालू शकतायत त्यांना बऱ्याचदा मध्ये थांबावं लागतंय. असं वाटतंय की हे अख्खं गाव एका वेगळ्याच संथ गती काळात गेलंय.

आणि हे सगळं झालंय ते जमिनीच्या पोटातल्या, गावकऱ्यांच्या पावलाखाली दडलेल्या एका गोष्टीमुळेः इथल्या भूजलामध्ये फ्लुरॉइड आहे. हे रसायन माती, दगड आणि भूजलामध्ये नैसर्गिकरित्या आढळतं. पण त्याचं प्रमाण जर का जास्त असेल तर मात्र त्याचे अतिशय घातक परिणाम होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते एका लिटरमागे १.५ मिलीग्रॅमपेक्षा जास्त फ्लुरॉइड असेल तर ते मानवी वापरासाठी धोक्याचं आहे. २०१२-१३ मध्ये जेव्हा भूजल सर्वेक्षण विभागाने पाण्याची तपासणी केली तेव्हा सावरखेडमध्ये हे प्रमाण ९.५ मिलीग्रॅम इतकं होतं.

“पाण्यामध्ये फ्लुरॉइडचं प्रमाण किती आहे यावर फ्लुरोसिस अवलंबून असतो, त्यामुळे त्याचा प्रभावही वेगवेगळा असतो,” नांदेडचे डॉ. आशीष अर्धापूरकर सांगतात. एकदा हानी सुरू झाली की ती काही थांबवता येत नाही. “लहान मुलं मात्र यापासून वाचतात. त्यांना अक्कलदाढा आल्यानंतरच दातांचा फ्लुरोसिस होऊ शकतो आणि हाडांची वाढ झाल्यानंतर सांगाड्याचा, म्हणजेच वयाच्या सहा वर्षानंतर.”

Man with rotten teeth
PHOTO • Parth M.N.
Man with his two front teeth missing
PHOTO • Parth M.N.

रानेश्वर जाधव (डावीकडे) आणि त्याचे वडील शेषराव – सावरखेडमध्ये पिण्याच्या पाण्यात प्रमाणाबाहेर फ्लुरॉइड असल्याने बाधित झालेल्यांपैकी हे दोघं

“अगदी सुरुवातीच्या काळात फ्लुरोसिसला आळा घालता येतो,” लातूर शहरातले विख्यात दंतरोगतज्ज्ञ, सतीश बिराजदार माहिती देतात. “नाही तर मग त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे आहेत. लोकांना कायमचं अपंगत्व येतं, त्यांचे दात खराब होतात. शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि एकूणच आजारांचा मुकाबला करण्याची शरीराची क्षमता कमी होत असल्याने इतर आजारांचाही तुम्हाला धोका निर्माण होतो.”

पण सावरखेडच्या रहिवाशांना किती तरी काळ हे माहितच नव्हतं. २००६ पर्यंत शासनातर्फे विहिरीजवळ एक नळ बसवला गेला, तोपर्यंत लोक हेच दूषित पाणी पीत होते. ही विहीर गावापासून एक किमी लांब आहे आणि आजही गावच्या पिण्याची पाण्याची गरज भागवण्यासाठी कमी पडते आहे. हापसा किंवा हातपंप मात्र अगदी प्रत्येक घराच्या दारात आहेत. “आम्हाला कल्पना होती की आम्ही [हापशाचं] जे पाणी पितोय ते शुद्ध नाहीये. पण ते इतकं धोकादायक आहे हे काही आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. आणि जेव्हा पाण्याची इतकी निकड असते तेव्हा जे मिळतंय ते प्यावंच लागतं,” ५५ वर्षांचे शेतकरी आणि शेतमजुरी करणारे मधुकर जाधव सांगतात.

मात्र याबद्दल जरा कुठे माहिती व्हायला लागली तोपर्यंत मधुकर जाधवांच्या बहिणीसाठी अनुसया राठोड यांच्यासाठी (सुरुवातीच्या फोटोमध्ये) मात्र फार उशीर झाला होता. “सुरुवातीला गुडघे दुखायला लागले [अंदाजे ३० वर्षं झाली],” त्या सांगतात. त्यांचा एकही दात शिल्लक नाही. “मग सगळं अंग दुखायला लागलं. मग माझी हाडंच वेडीवाकडी झाली, त्यांचा आकारच बदलला, अगदी पांगळी झाले मी.”

जेव्हा सांधे दुखायला लागले तेव्हा त्याचा संबंध आपण पितोय त्या पाण्याशी आहे असं काही त्यांच्या घरच्या कुणाच्या मनात आलं नाही. “आम्हाला वाटलं साधंच दुखणं असेल,” मधुकर सांगतात. “पण नंतर जसजसं त्रास जास्तच वाढू लागला तसं आम्ही तिला यवतमाळ, नांदेड आणि किनवटच्या किती तरी डॉक्टरांना दाखवलं. मी तब्बल एक लाखाच्या वर खर्च केला असेल, अगदी नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून कर्जाने पैसे काढले. पण कुठलेच उपाय चालले नाहीत आणि अजून खर्च करण्याची माझी काही ऐपत नव्हती. मग मात्र आम्ही उपचार करणं सोडून दिलं...”

पेय जल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या तब्बल २,०८६ जलस्रोतांमध्ये फ्लुरॉइड आहे, इतकंच नाही नायट्रेट आणि आर्सेनिकदेखील आहे – जे दोन्हीही अतिशय घातक आहेत

व्हिडिओ पहाः फ्लुरोसिसने बाधित शेतकरी त्यांच्या अडचणी सांगतायत

आता पन्नाशीत असलेल्या अनुसया स्वतःच्या पायावर उभंदेखील राहू शकत नाहीत. त्यांचे पाय एकमेकांत अडकून राहत असल्यामुळे त्यांना इकडून तिकडे जायचं असेल तर हातांचा वापर करावा लागतो. गेली १० वर्षं त्यांची स्थिती अशीच आहे. “मी माझ्या कुटुंबाला भार झालीये,” त्या म्हणतात. “मी माझ्या भावापाशी राहते, तो माझी काळजी घेतो. पण मला खरंच फार अपराधी वाटतं की मी त्याच्यासाठी किंवा त्याच्या कुटुंबासाठी फार काही करू शकत नाही.”

मधुकरभाऊंनाही जाणवतं की गेल्या काही वर्षांत त्यांना आधीइतकं काम होत नाही. “मी रानात तासभर काम केलं तर मला अर्धा तास आराम करावा लागतो. माझी पाठ फार दुखते,” ते सांगतात. “अगदी साधं लघवीला जरी जायचं तरी कष्ट पडतात. शरीर कडक झालंय अगदी.” मधुकर त्यांच्या सहा एकर रानात कापूस, तूर आणि ज्वारी घेतात. ते शेतमजूर म्हणूनही काम करतात. “एरवी मजुराला जेवढी मजुरी मिळते [सुमारे दिवसाला २५० रुपये]तेवढी मला कुणीच देत नाहीत. तुमची किंमत अशी कमी होत जाताना पाहणं फार क्लेशकारक आहे.”

पंकज महालेंच्या घरच्यांनीही खूप उपाय करून पाहिले पण सहा महिन्यापूर्वी त्यांच्या वडलांचं निधन झालं. “त्यांना हाडांचा फ्लुरोसिस झाला होता,” ३४ वर्षीय पंकज सांगतो. “ते कंबरेतून वाकले होते. आम्ही त्यांना हाडाच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो, नांदेडमध्ये, अगदी नागपूरलाही घेऊन गेलो. पण त्यांनी सांगितलं की माझ्या वडलांची हाडं इतकी ठिसूळ झाली आहेत की साधा धक्का जरी लागला तरी ते मोडून पडतील. त्यांना कॅल्शियमची औषधं दिली होती, ज्याचा महिन्याचा खर्च होता ३००० रुपये. त्यांना वेगवेगळ्या डॉक्टरांकडे नेता यावं म्हणून आम्ही एक खाजगी कार भाड्याने घेतली होती. ते गेले तोपर्यंत लाखो रुपये खर्च झाले असतील. जिल्हा प्रशासनाने मात्र कसलाही मोफत उपचार पुरवला नाही.”

A man limping towards his home
PHOTO • Parth M.N.

मराठवाड्याच्या या गावांमधल्या अनेकांना हाडांचा फ्लुरोसिस झाला असल्याने अनेक जण लंगडतायत किंवा त्यांची हाडंच वेडीवाकडी झाली आहेत

तर, सावरखेडच्या पाण्यातलं हे अतिरिक्त फ्लुरॉइड नक्की आलं तरी कुठून? या भागातल्या फ्लुरोसिसच्या मुळाशी आहे दुष्काळ. किती तरी वर्षं झाली, इथला शेतकरी सिंचनासाठी आणि रोजच्या वापरासाठी पाणी मिळावं म्हणून बोअरवेल खणत आला आहे. मात्र शुष्क मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य जसजसं वाढत चाललं आहे तसं लोकांनी बोअरचं पाणी प्यायलादेखील सुरुवात केली आहे. भूजलाच्या काही स्रोतांमध्ये फ्लुरॉइडचं प्रमाण आढळतं. मात्र जितकी जास्त खोल बोअरवेल तितकं त्यातलं फ्लुरॉइडचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता जास्त. भरीस भर, खतं, कीटकनाशकं, सांडपाणी, उद्योगांचं मैलापाणी आणि भूजलाची खालावलेली पातळी या सगळ्यामुळे फ्लुरॉइडचं प्रमाण वाढत गेलं आहे.

खरं तर कोणतीही बोअरवेल २०० फुटाच्या खाली जाऊ नये (महाराष्ट्र भूजल कायदा, २००९) असं असतानाही मराठवाड्यात बोअरवेल अगदी ५०० फुटाच्या खाली पोचल्या आहेत. बोअरवेलची संख्या आणि त्या किती फूट खोल चालल्यात यावर कुणाचं लक्ष नाही, बेभरवशाचा पाऊस आणि नगदी पिकांकडे वळल्यामुळे पाण्याच्या मागणीत झालेली वाढ या सगळ्यामुळे या भागातले शेतकरी पाणी लागेपर्यंत खोल खोल जातच राहतायत.

आणि जर सावरखेडसारख्या एखाद्या कमनशिबी गावाने फ्लुरॉइडचं प्रमाण जास्त असणाऱ्या भागात बोअर खणली तर मग हे रसायन हळू हळू तिथल्या लोकांमध्ये भिनत जातं – इतकं की सावरखेडच्या ५१७ रहिवाशांपैकी २०९ जणांची २०११ च्या जनगणनेने “नॉन-वर्कर” अशी गणना केली आहे. आणि राष्ट्रीय फ्लुरोसिस प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाच्या एका अहवालामध्ये असं नोंदवण्यात आहे की (२०१३ पर्यंत) नांदेडमध्ये ३,७१० व्यक्तींना दातांचा फ्लुरोसिस तर ३८९ जणांना हाडांचा फ्लुरोसिसची बाधा झाली आहे.

स्थानिक पत्रकार धर्मराज हल्याळे यांनी या संकटाचा फार जवळून मागोवा घेतला आहे. ते सांगतात की २००६ मध्ये सावरखेडमध्ये नळजोड आला मात्र चार वर्षं हा नळ नीट कामच करत नव्हता. “वीजच नसायची,” ते सांगतात. “मग पंप काम करायचा नाही. मी जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारला याबाबत लिहिलं होतं. मी महिनाभर पाठपुरावा केला, अखेर २०१० मध्ये तो दुरुस्त करण्यात आला.” हल्याळेंनी संपूर्ण राज्यात काय परिस्थिती आहे याबाबत माहितीच्या अधिकाराखाली एक अर्जही दाखल केला होता. त्यात [एकूण ३६ जिल्ह्यांपैकी] २५ जिल्ह्यांमध्ये जलस्रोतांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात फ्लुरॉइड असल्याचं निदर्शनास आलं.

A man sitting
PHOTO • Parth M.N.

सुनेगाव (सांगवी) च्या सुकेश ढवळेंना फ्लुरॉइड असलेलं पाणी प्यायल्यामुळे दाताचा फ्लुरोसिस झाला आहे

माहितीचा स्रोत बदलला की ही आकडेवारीदेखील बदलते. पेय जल व स्वच्छता मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे २०१६-१७ मध्ये महाराष्ट्रातल्या तब्बल २,०८६ जलस्रोतांमध्ये फ्लुरॉइड आढळून आलं – सोबत नायट्रेट आणि आर्सेनिकदेखील सापडलं आहे. हे दोन्ही घातक आहेत. हा आकडा गेल्या काही वर्षांत कमी झाला आहे – २०१२-१३ मध्ये हा आकडा होता ४,५२०. २०१४ मध्ये नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार नांदेड जिल्ह्यात ३८३ गावांच्या जलस्रोतांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त फ्लुरॉइड आढळून आलं. यातल्या २५७ गावांना पाण्याचे पर्यायी स्रोत पुरवण्यात आले होते. २०१५-१६ मध्ये मात्र भूजल सर्वेक्षण विभागाने नांदेड जिल्ह्यातली केवळ ४६ गावं फ्लुरोसिसने बाधित असल्याचं जाहीर केलं आणि त्यातल्या केवळ ४ गावांमधली समस्या अजून हाताळली गेली नसल्याचं नमूद केलं.

अॅड. असीम सरोदे यांच्या नेतृत्वाखाली नऊ वकिलांनी गावातल्या लोकांना फ्लुरॉइडयुक्त पाणी प्यायला लागत असल्यासंबंधी एक याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केली. त्यावर ११ जानेवारी २०१६ रोजी लवादाने आदेश दिला की महाराष्ट्रातल्या १२ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि भूजल सर्वेक्षण विभागाने पाण्याच्या दर्जावर लक्ष ठेवावे, जिल्हानिहाय माहिती सादर करावी, पाण्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध करून द्यावेत आणि रुग्णांना निःशुल्क आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी. सोबत इतरही काही उपाययोजना हाती घ्याव्यात. या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली हे लक्षात आल्यावर २८ नोव्हेंबर २०१७ रोजी लवादाने १२ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने एक अधिपत्र काढले. यात नांदेड, चंद्रपूर, बीड, यवतमाळ, लातूर, वाशिम, परभणी, हिंगोली, जालना आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होता.

दरम्यान, सावरखेडहून २०० किमीवर असलेल्या सुनेगाव (सांगवी) मध्ये आता एक खणलेली विहीर आहे. आधी मात्र इथे अशी एकही विहीर नव्हती. २००६ मध्ये लिंबोटी धरणाचं काम झालं आणि लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या ६३० वस्तीच्या या गावाजवळ पाण्याचा एक तलाव तयार झाला. पाण्याचा पाझर वाढल्यामुळे २००७ साली विहीर खणल्यावर तिला पाणी लागलं.

पण हे सर्व होईपर्यंत सुयश ढवळेंनी त्यांच्या ३० वर्षं आयुष्यातली २० वर्षं फ्लुरॉइडने बाधित पाणी प्यायलं आहे. आणि सावरखेडच्या इतरांसारखीच आपलीही तब्येत ढासळताना पाहिली आहे. “मला सतत माझ्या दातावर काही तरी थर चढलाय असं वाटत राहतं,” शेतमजुरी करणारे ढवळे सांगतात. झाडाखालून उठताना त्यांच्या सांध्यांची कुरकुर स्पष्ट ऐकू येते. “काही काळाने तो थर गळून पडतो आणि त्याबरोबर दाताचा तुकडाही निखळून पडतो. मी काहीही टणक पदार्थ खाऊ शकत नाही. माझे सांधेही दुखतात. फार काळ काम नाही करता येत मला.”

सुनेगाव (सांगवी) पासून आठ किमीवर असलेल्या अहमदपूरमधल्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेच्या प्रमुखाला मी फ्लुरोसिस होण्याची शक्यता असणाऱ्या गावांची यादी देण्याची विनंती केली. संगणकावर त्याने ती यादी शोधली; शेजारचं सुनेगाव शेंदरी लातूर जिल्ह्यातल्या अशा २५ गावांच्या यादीत होतं. सुनेगाव शेंद्रीचे ३५ वर्षीय गोविंद काळे माझ्यासोबत होते, ते अचानक उद्गारले, “आम्ही वर्ष झालं बोअरचंच पाणी प्यायलोय. गावातली खोदलेली विहीर कोरडी पडलीये. आख्खं गाव बोअरचंच पाणी प्यायलंय. कुणीच यावर काहीच कसं करंना? आम्हाला कुणी काही सांगितलं बी नाही.”

आठ वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशमधील नलगोंडा गावात (आता तेलंगणामध्ये) ही समस्या सर्वात आधी उजोडात आली होती. त्यावर क्रिपल्ड लाइव्ज [पांगळी आयुष्यं] नावाचा एक बोधपटदेखील बनवण्यात आला होता. त्यापासनं आपण काहीही शिकलो नाही असंच म्हणावं लागेल हे निश्चित.


Parth M.N.

பார்த். எம். என் 2017 முதல் பாரியின் சக ஊழியர், பல செய்தி வலைதளங்களுக்கு அறிக்கை அளிக்கும் சுதந்திர ஊடகவியலாளராவார். கிரிக்கெடையும், பயணங்களையும் விரும்புபவர்.

Other stories by Parth M.N.
Translator : Medha Kale

மேதா காலே, மும்பையில் வசிக்கிறார், பெண்கள் மற்றும் நல்வாழ்வு தொடர்பான விவகாரங்களில் எழுதுகிறார். PARIஇல் இவரும் ஒரு மொழிபெயர்ப்பாளர். தொடர்புக்கு [email protected]

Other stories by Medha Kale