“चले जाव आंदोलनादरम्यान तुमचे पती, बैद्यनाथ १३ महिने तुरुंगात होते.
तुमच्यासाठी सगळं अवघड झालं असेल तेव्हा. नाही का?” पुरुलियामध्ये मी भबानी
महातोंना विचारलं. “एवढं मोठं कुटुंब आणि बाकी सगळं काम...”
“ते आले ना की जास्त अवघड व्हायच्या गोष्टी,” थंडपणे पण ठासून त्या सांगतात. “ते आले की त्यांच्यासोबत मित्रांचा गोतावळा आणि मग त्यांच्यासाठी स्वयंपाक करा. ते डबे घेऊन जाणार. कधी ५, कधी १० तर कधी २०. एक क्षण विश्रांती म्हणून नसायची.”
“पण खरंच, चले जाव आंदोलनात तुमचा सहभाग...”
“कसला डोंबलाचा सहभाग? माझा तसल्या कशाशीच काय संबंध?” त्या विचारतात. “त्या लढ्याशी माझं काहीही देणंघेणं नाही. माझे पती बैद्यनाथ महातो, त्यांचंच काय ते तसलं चालायचं. माझा सगळा वेळ हे भलं थोरलं कुटुंब सांभाळण्यात, तेवढ्या लोकांसाठी रांधा वाढा, उष्टी काढा करण्यात जात होता. किती स्वयंपाक करायला लागायचा – दररोज वाढतच जायचं सगळं काम!” भबानी सांगतात. “शेती मीच पाहत होते, लक्षात घ्या.”
आम्ही एकदमच नाराज झालो. आणि ती नाराजी बहुतेक आमच्या चेहऱ्यांवर दिसली असावी. पश्चिम बंगालच्या एकदम दुर्गम भागात लांबचा प्रवास करून आम्ही अद्याप हयात असलेल्या काही स्वातंत्र्य सैनिकांच्या शोधात इथे पोचलो होतो. मनबझार ब्लॉक I मधल्या चेपुआ गावात आमच्या समोर बसलेल्या भबानी महातो त्यासाठी एकदमच योग्य व्यक्ती होत्या. पण भारताच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य संग्रामाशी आपला तीळमात्रही संबंध नसल्याचं त्या स्पष्ट सांगत होत्या.
१०१ ते १०४ वयाच्या भबानी महातो अगदी स्पष्टपणे आणि ठामपणे बोलतात. कितीही प्रयत्न केला तरी इतक्या दूरवरच्या गावपाड्यातल्या म्हाताऱ्या माणसांचं वय नक्की किती ते सांगणं हे फार खडतर काम असतं. त्या जन्मल्या तेव्हा म्हणजेच शंभरेक वर्षांपूर्वी तर ही यंत्रणाच नव्हती. पण आम्ही काही तर करून त्यांच्या वयाचा अंदाज बांधला. आता हयात नसलेल्या त्यांच्या पतींच्या काही नोंदी तसंच त्यांच्या प्रचंड मोठ्या गोतावळ्यावरून, एक मुलगाच आता सत्तरीत आहे त्यावरून. आणि आम्ही पुरुलियाच्या ज्या भागात फिरत होतो तिथल्या त्यांच्याहून वयाने थोड्या लहान असलेल्या समवयस्कांच्या वयावरूनही.
भबानींच्या पिढीतल्या लोकांची वयं ज्या ढिसाळ पद्धतीने आधारच्या कुचकामी यंत्रणेमध्ये नोंदवण्यात येतात त्यापेक्षा आमचा अंदाजच जास्त विश्वासार्ह होता. आधारवर त्यांचं जन्म वर्ष १९२५ असं नोंदवलं गेलंय. म्हणजे त्या ९७ वर्षांच्या होतात.
त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे त्या १०४ वर्षांच्या आहेत.
“आमचं मोठं कुटुंब होतं,” त्या सांगतात. “सगळी जबाबदारी माझ्यावर असायची. सगळं काम मीच करायचे. सगळं म्हणजे सगळं मीच बघायचे. घर मीच चालवलं. १९४२-४३ मध्ये त्या सगळ्या घटना घडत होत्या तेव्हा मीच सगळ्यांची काळजी घेत होते.” त्या घटना म्हणजे कोणत्या ते काही भबानी सांगत नाहीत. पण त्या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची घटना होती, ‘चले जाव’ आंदोलन. बंगालच्या या सगळ्यात वंचित, दुर्लक्षित भागात, जो त्या काळी देखील असाच होता, ३० सप्टेंबर १९४२ रोजी स्वातंत्र्य सैनिकांनी १२ पोलिस स्थानकांमध्ये तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाही त्या उल्लेख करतात.
आजही या जिल्ह्यातली एक तृतीयांश कुटुंबं गरिबी रेषेच्या खाली जीवन कंठतायत. पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त दारिद्र्य देखील याच जिल्ह्यात आहे. भबानीदींच्या कुटुंबाची काही एकर जमीन होती, आजही आहे. बाकीच्यांपेक्षा त्यांची परिस्थिती त्यामुळे जरा बरी म्हणायची.
त्यांचे पती बैद्यनाथ महातो गावात पुढारपण करायचे. इंग्रज राजवटीच्या विरोधात सुरू असलेल्या चळवळीत ते सामील होते. पुरुलियाच्या पिर्रा गावात थेलू महातो आणि लोखी महातो हे दोघं स्वातंत्र्य सैनिक आम्हाला सांगतात की इथल्या दुर्गम भागात कसलीही माहिती पोचायला खूप वेळ लागायचा. “चले जावची घोषणा झालीये हे आम्हाला इथे एका महिन्याने समजलं,” थेलू महातो सांगतात.
तर, या घोषणेच्या प्रतिसादात ३० सप्टेंबर १९४२ ची घटना घडली. म्हणजे ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा लगावला आणि त्यानंतर बरोबर ५३ दिवसांनी. बैद्यनाथ यांना तेव्हा अटक झाली आणि त्यानंतर झालेल्या अत्याचारांमध्ये त्यांना खूप त्रास सोसावा लागला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते शिक्षक होणार होते. तेव्हाच्या काळात राजकीय संघटनकार्यात शिक्षकांची मोलाची भूमिका होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काही काळ आपल्याला हे दिसून येतं.
*****
पोलिस स्थानकांचा कब्जा करून तिथे तिरंगा फडकवणाऱ्यांमध्ये अनेकांचा सहभाग होता. जुलमी इंग्रज राजवटीला कंटाळलेली जनता तर होतीच पण इतरही अनेक जण होते. काही डावे क्रांतीकारक तर काही गांधीवादी. आणि थेलू आणि लोखी महातोंसारखे काही जे इतरांसारखे विचाराने डावे आणि आचाराने गांधीवादी.
त्यांचं राजकारण आणि त्यांचं मन डाव्या राजकारणात होतं. पण आयुष्यातली नैतिकता आणि राहणी यावर मात्र गांधींचा प्रभाव होता. आणि या दोन्ही दिशांमध्ये त्यांची फरपट देखील होत होती. अहिंसा त्यांना मान्य असली तरी इंग्रजांविरोधात मात्र ते कधी कधी हिंसक पद्धतीने विरोध करत होते. ते म्हणतातः “हे बघा, त्यांनी आमच्यावर गोळ्या झाडल्या. आणि आपले सहकाऱ्यांना, घरच्या लोकांना किंवा कॉम्रेडना जर पोलिस त्यांच्या डोळ्यादेखत मारत असेल तर लोक शस्त्रं हातात घेणार ना.” थेलू आणि लोखी दोघं कुरमी आहेत.
भबानीदी देखील कुरमी कुटुंबातल्या आहेत. पश्चिम बंगालच्या जंगलमहल भागात या समुदायाची लोकसंख्या सर्वात जास्त आहेत.
१९१३ साली इंग्रज सरकारने त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा दिला. पण १९३१ च्या जनगणनेत मात्र त्यांना त्या यादीतून काढून टाकण्यात आलं. गंमत म्हणदे १९५० साली स्वतंत्र भारतात त्यांना इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करण्यात आलं. आपल्याला पुन्हा एकदा आदिवासींचा दर्जा मिळावा ही इथल्या कुरमी समाजाची प्रलंबित मागणी आहे.
इथल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुरमी अग्रभागी होते. १९४२ साली सप्टेंबर महिन्यातले शेवटचे दोन दिवस १२ पोलिस स्थानकांवर मोर्चे निघाले त्यातही असंख्य कुरमी सामील झाले होते.
“बैद्यनाथ पुढचे १३ महिने तुरुंगात होते,” त्यांचे पुत्र सत्तरीत असलेले श्याम सुंदर महातो सांगतात. “त्यांना भागलपूर कँप जेलमध्ये ठेवलं होतं.” बैद्यनाथांचा हाच तुरुंगवास खडतर गेला असणार असं आम्ही भबानीदींना सुचवलं आणि त्यावरच त्यांचं भन्नाट उत्तरही आम्हाला मिळालं होतं. ते घरी असणं जास्त अवघड असल्याचं.
“मग काय जास्तच लोकांची ये जा सुरू. जास्तच लोकांना जेवायला वाढायचं. जास्तच लोकांचं हवं नको पहायचं. ते परत आले ना तेव्हा मी खूप रडले होते. माझ्या मनातला संताप त्यांना बोलून दाखवला होता. बाहेर त्यांचं जे काही पुढारपण चाललंय ते माझ्या जीवावर हेही त्यांना सांगितलं. आणि ते परतले की माझं काम प्रचंड वाढायचं.”
तर परत एकदा भबानीदींकडे येऊ या. त्यांच्या विचारांवर गांधींचा प्रभाव होता का? सत्याग्रह आणि अहिंसा याबद्दल त्यांची भावना काय होती?
शांत असल्या तरी भबानीदी त्यांच्या मनातलं अगदी मोकळ्या आणि नेमक्या पद्धतीने मांडतात. मठ्ठ मुलांना काही तरी समजावून सांगावं लागतंय आणि तरीही त्यांना ते कळत नाहीये अशा पद्धतीचा एक कटाक्ष त्या आमच्याकडे टाकतात आणि बोलू लागतात.
“गांधी... काय म्हणायचंय तुम्हाला?” त्या विचारतात. “नक्की काय म्हणताय? तुम्हाला काय वाटलं मी एका जागी बसून या असल्या गोष्टींविषयी विचार वगैरे करत असीन? रोज घरी येणाऱ्या लोकांचा आकडा फुगतच जायचा. त्यांच्यासाठी रांधा वाढा, उष्टी काढा, सुरूच...” हातवारे करत त्या आम्हाला समजावून सांगतात.
“आणि एक लक्षात घ्या, माझं लग्न झालं ना तेव्हा मी नऊ वर्षांची होते फक्त. असल्या मोठमोठाल्या गोष्टींचा मी कसा काय विचार करणार? आणि त्यानंतरची कित्येक दशकं मी एकटीने हा भला मोठा डोलारा सांभाळलाय. आणि हो, शेतीही मीच पाहत होते. जमिनीची मशागत करा, पेरण्या करा, मुनीश (मजूर) लोकांवर देखरेख ठेवा, खुरपायला जा आणि पिकाची काढणी...” रानात काम करणाऱ्या मजुरांना तेव्हा जेवण दिलं जात असे.
आणि जंगलाला अगदी लागून असलेल्या आपल्या शेतातून माल घरी आणायचं कामही त्यांचंच.
आणि हे सगळं अशा काळात जेव्हा या कामांसाठी कुठलीही यंत्रं उपलब्ध नव्हती. विजेवरची तर कुणी ऐकली पण नव्हती. त्यात शेतात त्या जे काही काबाडकष्ट करायच्या, जी अवजारं वापरायच्या ती देखील जुनी, पुरुषांच्या थोराड हातांना साजेशी. अगदी आजही परिस्थिती तशीच आहे. आणि ही शेती देखील विषमता आणि दारिद्र्याने गांजलेल्या अगदी दुर्गम अशा पुरुलिया सारख्या ठिकाणी.
भबानींशी लग्न झाल्यानंतर तीस वर्षांनी बैद्यनाथ यांनी दुसरं लग्न केलं.
भबानींच्याच २० वर्षांनी लहान बहिणीशी. ऊर्मिला तिचं नाव. घरात कसलंसं संकट
आल्यामुळे दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतल्याचं नातेवाईक सांगतात. दोघी बहिणींना
तीन-तीन अपत्यं झाली.
हळू हळू आमच्या सगळं काही लक्षात येऊ लागतं. भबानी महातो शेती करून, पिकं घेऊन माल घरी तर आणायच्याच आणि घरच्यांसाठी आणि इतर अनेकांसाठी जेवण रांधायच्या. १९२० आणि १९३०चं दशक तसंच १९४० च्या दशकापर्यंत त्यांचं हे काम अविरत सुरू होतं.
त्या नक्की किती एकर जमीन कसत होत्या ते फारसं स्पष्ट नाही. कुटुंबाची म्हणून असलेली जमीन त्या कसत असल्या तरी त्या जमिनीच्या मालकीची कसलीच कागदपत्रं नाहीत. जमीनदाराच्या मर्जीने त्यांची शेती सुरू होती. २० जणांच्या मोठाल्या कुटुंबाचं पोट भरत होतं ती जमीन जोनरामधलं भबानीदींचं माहेरघर आणि चेपुआमधलं सासर अशा दोघांच्या ताब्यात होती. दोन्ही गावांमधली मिळून ही जमीन ३० एकर असावी.
त्यांच्यावर कामाचा इतका प्रचंड बोजा होता की जागेपणीचा क्षण न् क्षण त्या कामच करत असायच्या.
पहाटे ४ वाजता उठत असतील नाही? “त्याच्या आधीच,” त्या जराशा घुश्शात म्हणतात. “त्याच्याही आधी.” मध्यरात्री २ वाजताच त्यांना उठावं लागत असावं. “रात्री १० वाजण्याआधी जमिनीला पाठ टेकलीये, असं तर झालंच नाही. त्यानंतरच खरं तर.”
त्यांचं पहिलं मूल हगवण लागून गेलं. “आम्ही फकिराकडे गेलो होतो, कविराज नाव होतं त्याचं. पण काहीच फरक पडला नाही. फक्त एक वर्षांची असताना ती वारली.”
मी पुन्हा एकदा त्यांना गांधींबद्दल स्वातंत्र्य चळवळीबद्दल विचारण्याचा प्रयत्न करतो. “आई झाले,” त्या सांगतात “आणि मग तसला चरखा चालवायला वगैरे कुठून वेळ होणार?” मग परत एकदा त्या आम्हाला आठवण करून देतात “लग्न झालं तेव्हा फक्त नऊ वर्षांची होते मी.”
पण त्यानंतर त्यांनी जो काळ पाहिला, जे दिवस काढले त्यातले मन हेलावून टाकणारे, भारून टाकणारे तीन प्रसंग तरी आम्हाला सांगू शकाल का? आमचा प्रश्न.
“प्रत्येक क्षणीच माझा ऊर भरून आलेला असायचा. तुम्हाला समजतंय का माझं आयुष्य नक्की कसं होतं ते. तुम्हाला काय वाटलं, मी एका जागी रिकामी बसून विचार करत बसत असेन? हे एवढं मोठं खटलं कसं चालवायचं याचाच विचार असायचा माझ्या मनात. बैद्यनाथ आणि बाकी सगळे लढ्यात सामील होते. आणि मी सगळ्यांना खाऊ घालत होते.”
इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि त्यांचं ओझं सहन होईनासं झालं तर त्या काय करायच्या? “मी आईपाशी बसायचे आणि पोटभर रडायचे. तुम्हाला सांगते, बैद्यनाथसोबत एकामागोमाग एक माणसं येत रहायची तेव्हा मी वैतागायचे नाही. फक्त रडावंसं वाटायचं.”
त्यांना काय म्हणायचंय ते आम्हाला नीट समजावं म्हणून त्या परत तेच म्हणत राहत – “मी वैतागायचे नाही. फक्त रडावंसं वाटायचं.”
*****
१९४० च्या दशकात बंगालमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता आणि त्यामुळे भबानींवरचा ताण प्रचंड वाढला होता. त्यांनी या सगळ्याला कसं तोंड दिलं असेल याची कल्पनाही करता येत नाही
आम्ही खुर्चीतून उठून निघण्याच्या बेतात असतानाच त्यांचा नातू म्हणतो, बसा जरा. पार्थो सारथी महातो त्याच्या आजोबांसारखाच शिक्षक आहे. पार्थो दांना आम्हाला काही तरी सांगायचं होतं.
आणि मग अचानक डोक्यात प्रकाश पडला.
घरातले गणगोत सोडले तर त्या इतका सारा स्वयंपाक कुणासाठी करत होत्या? बैद्यनाथांबरोबर १०-२० माणसं घरी यायची, जेवून जायची ती नक्की होती तरी कोण?
“क्रांतीकारकांसाठी चुली पेटत होत्या,” पार्थो दा सांगतात. “भूमीगत असलेले क्रांतीकारक कायम पळतीवर असायचे किंवा जंगलात लपलेले असायचे.”
ते ऐकून आम्ही काही क्षण स्तब्ध बसून राहिलो. वयाच्या
९ व्या वर्षापासून जिला स्वतःसाठी एक क्षणही निवांतपणा मिळाला नाही अशा या
भबानीदींच्या त्यागाचा विचार करून आम्हालाच भरून आलं.
१९३० आणि ४० च्या दशकात त्यांनी जे केलं त्याला स्वातंत्र्य लढ्यातला सहभाग म्हणायचं नाही तर मग कशाला म्हणायचं?
आमच्या हे गावीच नव्हतं हे बघून त्यांचा मुलगा आणि बाकीचे सगळे चक्रावून आमच्याकडे पाहत होते. आम्हाला हे समजलं असेल असं त्यांनी गृहितच धरलं होतं.
आपण कुणासाठी आणि काय करतोय याची भबानीदींना कल्पना होती का?
अं... खरं तर... हो. फक्त त्यांना त्यांची नावं माहित नव्हती. किंवा प्रत्येकाची त्यांची ओळख काही नव्हती. बैद्यनाथ आणि त्यांच्यासोबतच बंडखोर क्रांतीकारक गावातल्या बायांनी रांधलेलं अन्न घेऊन जायचे आणि जे भूमीगत होते किंवा पळतीवर असायचे त्यांच्यापर्यंत पोचवायचे. स्वतः आणि ज्यांच्यासाठी खाणं चाललंय ते पकडले जाऊ नयेत याची सगळी काळजी घ्यावी लागायची.
पुरुलियामध्ये तेव्हा काय परिस्थिती होती यावर पार्थोदांनी बरंच संशोधन केलं आहे. ते आम्हाला नंतर सांगतात की “जितके कुणी क्रांतीकारक भूमीगत किंवा लपलेले असतील त्यांच्यासाठी गावातली जी मोजकी सुखवस्तू घरं होती तिथून खाणं जायचं. आणि ज्या बाया स्वयंपाक करायच्या त्यांना फक्त अन्न शिजवून स्वयंपाकघरात ठेवून द्या असा निरोप असायचा.”
“कोण येतंय, कोण अन्न घेऊन जातंय, कुणासाठी आपण स्वयंपाक करतोय याचा कसलाच अतापता त्यांना नसायचा. बंडखोरांनी अन्न घेऊन जाण्यासाठी गावातल्या लोकांची कधीच मदत घेतली नाही. इंग्रजांचे खबरे आणि हेर गावात असायचे. आणि त्यांच्याशी हातमिळवणी केलेल्या जमीनदारांचे चेलेही. गावकऱ्यांपैकी कुणी जंगलात काही घेऊन निघालं तर त्यांना ते सहज ओळखू शकायचे. आणि मग अन्न पुरवणाऱ्या बाया आणि भूमीगत क्रांतीकारक दोघंही संकटात येऊ शकले असते. म्हणून अन्न घेण्यासाठी जे यायचे त्यांनाही कुणीच ओळखून चालणार नव्हतं. त्यामुळे बहुधा ते रात्रीच्या काळोखातच येऊन जात असावेत. जेवण कोण नेतंय हे देखील या बायांनी कधीच पाहिलं नाही.”
“अशी सगळी काळजी घेतल्यामुळे दोघंही सुखरुप राहू शकले. काय चालू आहे हे मात्र या बायांना माहित होतं. गावातल्या बहुतेक बाया रोज सकाळी गावात ओढ्यावर किंवा तळ्यापाशी भेटायच्याच. एकमेकींना काही माहिती द्यायच्या, काय घडतंय ते सांगायच्या. का आणि कशासाठी त्या सगळं करतायत हे त्यांना माहित होतं. कुणासाठी, हे मात्र गुलदस्त्यातच होतं.”
*****
आणि या ‘बायां’मध्ये काही अगदी तरुण मुली देखील होत्या. फार गंभीर परिणामांना त्यांना सामोरं जावं लागलं असतं. समजा पोलिस भबानीदींच्या घरी येऊन उभे ठाकले असते तर? ‘सगळं काही’ ज्या बघत होत्या त्या भबानीदींचं आणि त्यांच्या कुटुंबाचं काय झालं असतं? पण असं काही झालं नाही आणि भूमीगत कारवाया बहुतांश तरी निर्धोक पार पडल्या.
तरीही ज्या कुटुंबांमध्ये स्वदेशी, चरखा आणि इंग्रज राजवटीच्या विरोधाची चिन्हं दिसत त्यांच्यावर पाळत मात्र नक्की असायची. आणि धोका होता तो अगदी खराखुरा होता.
तर या रानावनांनी लपलेल्या क्रांतीकारकांसाठी त्या नक्की काय रांधायच्या? आम्ही त्यांना भेटून निघालो त्यानंतर आम्हाला त्या काय काय स्वयंपाक करायच्या ते पार्थो दा आम्हाला समजावून सांगतात. जोनार (मका), कोदो आणि माडोया (नाचणी) आणि ज्या काही मिळतील त्या भाज्या. थोडक्यात काय तर भबानीदी आणि त्यांच्या मैत्रणींमुळे घरच्यासारखंच जेवण या क्रांतीकारकांना मिळत होतं.
कधी कधी चुरमुरे तर कधी चिंड़े म्हणजेच पोहे. या बाया कधी कधी फळंही पाठवायच्या. शिवाय जंगलातली फळं आणि बोरं इत्यादी रानमेवा असायचा. जुन्याजाणत्या माणसांच्या भाषेत हे सगळं म्हणजे क्यांद किंवा तिरिल. बऱ्याच आदिवासी भाषांमध्ये याचा अर्थ आहे रानमेवा.
पार्थोदा सांगतात की त्यांचे आजोबा अचानक कधी तरी उगवायचे आणि त्यांच्या आजीला, म्हणजेच भबानीदींना नुसत्या ऑर्डर सोडायचे. जंगलातल्या आपल्या मित्रांसाठी म्हटलं की किती तरी लोकांचा स्वयंपाक असाच त्याचा अर्थ व्हायचा.
आणि त्रास फक्त इंग्रजांचा होता असं काही नाही. १९४० मध्ये त्यांची सर्वात जास्त तारांबळ झाली असणार कारण हा काळ बंगालच्या महा दुष्काळाचा होता. त्या काळात त्यांनी किती खस्ता खाल्ल्या असतील याची कल्पनासुद्धा आपल्याला करता येत नाही.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांच्या या धाडसी कारवाया सुरूच होत्या. आजही हे कुटुंब जिथे राहतं त्या मोहल्ल्याला १९५० च्या सुमारास कधी तरी प्रचंड अशी आग लागली आणि सगळी गल्ली आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. लोकांकडे असलेलं सगळं धान्य जळून खाक झालं. भबानीदींनी आपल्या माहेरहून, जोनराहून शेतातलं धान्य आणलं आणि पुढची पिकं हाती येईपर्यंत लोकांच्या पोटाला आधार दिला.
१९६४ साली जमशेदपूरमध्ये धार्मिक दंगली उसळल्या. तेव्हा हे शहर बिहारमध्ये होतं. पुरुलियातल्या काही गावांपर्यंत या दंगलीच्या झळा पोचल्या. भबानीदींनी त्यांच्या गावातल्या किती तरी मुसलमानांना आपल्या घरी आसरा दिला होता.
या घटनेनंतर वीसेक वर्षांनी भबानी दींनी गावातल्या गाई-गुरांवर हल्ले करणाऱ्या एका रानबोक्याचा खात्मा केला होता. एका लाकडाच्या दांडक्यात त्यांनी त्याचा जीव घेतला. नंतर समजलं की तो खत्ताश म्हणजेच स्मॉल इंडियन सिव्हेट होता.
*****
भबानी महातोंबद्दल आमच्या मनातला आदर दुणावला होता. गणपती यादवांच्या आयुष्यावर मी जी गोष्ट लिहिली ती मला आठवली. साताऱ्यातल्या भूमीगत क्रांतीकारकांसाठी निरोप्या आणि खाणं पोचवण्याचं काम ते करायचे. आमची भेट झाली तेव्हा वयाच्या ९८ व्या वर्षी देखील ते सायकल चालवत होते. त्या भन्नाट माणसाची गोष्ट लिहिणं माझ्यासाठी समाधानाची बाब होती. पण एक प्रश्न मात्र मी त्यांना विचारलाच नाही: जीवाची पर्वा न करता ते रानावनात लपलेल्या क्रांतीकारकांसाठी खाणं घेऊन जात होते, पण ते सगळं खाणं बनवणाऱ्या त्यांच्या बायकोचं काय?
आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्या परगावी नातेवाइकांकडे गेलेल्या होत्या.
गणपती यादव आता आपल्यात नाहीत. पण भबानी दींना भेटल्यावर आता मी ठरवलंय की परत गेल्यावर मला वत्सला गणपती यादवांची भेट घेतलीच पाहिजे. त्यांच्या शब्दात त्यांची गोष्ट मी ऐकली पाहिजे.
भबानी दींना भेटल्यावर मला लक्ष्मी पांडांचे जहाल शब्द परत एकदा आठवले. नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेत सामील झालेल्या या ओडिशाच्या स्वातंत्र्य सैनिक बर्मा (आता म्यानमार) आणि सिंगापूरच्या जंगलांमध्ये आणि तळांवर राहिल्या होत्या.
“मी कधी तुरुंगात गेले नाही, रायफल चालवायला शिकले पण कुणाला कधी गोळी मारली नाही म्हणून मी स्वातंत्र्य सानिक नाही असा अर्थ होतो का? इंग्रजांच्या बाँबहल्ल्यांचं लक्ष्य असलेल्या तळांमध्ये मी काम केलं. स्वातंत्र्य संग्रामात माझं काहीच योगदान नाही? वयाच्या १३ व्या वर्षी त्या तळांवरचे सगळे बाहेर जाऊन लढत होते आणि मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करत होते. मग मी त्या संग्रामात सहभागी नव्हते?”
लक्ष्मी पांडा असोत नाही तर सलिहान, हौसाबाई पाटील आणि वत्सला यादव. यातल्या कुणालाच मिळायला हवा तसा मान आणि ओळख मिळाली नाही. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात या सगळ्याच लढल्या आणि इतरांप्रमाणेच मानाने त्यांनी तो लढा निभावला. पण त्या बाया होत्या. स्त्रियांबद्दलचे पूर्वग्रह आणि साचेबद्ध प्रतिमांनी बुरसटलेल्या या समाजामध्ये त्यांची ही भूमिका फार कुणी लक्षातच घेतली नाही.
पण भबानी महातोंना याचं फार वावडं नाही. त्यांनी स्वतःही ही मूल्यं आत्मसात केली होती का? आपलं स्वतःचंच योगदान काय होतं याचं मोल त्यांना म्हणूनच जाणवत नसेल का?
आम्ही निघता निघता त्या शेवटी इतकंच म्हणाल्या: “पहा, मी काय घडवलंय ते. हे एवढं मोठं कुटुंब, या सगळ्या पिढ्या, आमची शेती, सगळंच. पण आजकालची ही तरुण मुलं-मली....” तिथे त्या घरात आमच्या अवतीभवती किती तरी सुना अगदी चोख काम करत होत्या. त्या त्यांच्या परीने सगळंच उत्तम करत होत्या. त्यांच्या काळात मात्र हेच सगळं त्यांनी स्वतः अगदी एकटीने केलं.
त्या या सगळ्यांना खरंच कसलाच दोष देत नाहीयेत. त्यांना फक्त एकाच गोष्टीचा खेद आहे की आज ‘सगळंच’ करणारे अगदी बोटावर मोजण्याइतके उरलेत.
या गोष्टीमध्ये अत्यंत मोलाची भर घातल्याबद्दल आणि भबानी महातोंशी बोलत असताना केलेल्या अस्खलित अनुवादासाठी स्मिता खटोर हिचा मी मनापासून आभारी आणि ऋणी आहे. शिवाय या मुलाखती आणि भेटीची सगळी पूर्वतयारी आणि बहुमोल मदत केल्याबद्दल जोशुआ बोधीनेत्रचेही आभार. जोशुआ आणि स्मिताशिवाय ही कहाणी तुमच्यापर्यंत आलीच नसती.
अनुवाद: मेधा काळे