“चाळून, चाळून पोटातलं लेकरू पुढे बाळवाटेकडे सरकवायचं.”

सुईण म्हणून केलेल्या कामाच्या स्मृती जाग्या झाल्या आणि तिचे डोळे लकाकले. गुणामाय मनोहर कांबळे, वय ८६. बोलता बोलता समोर जणू काही बाळंतपणं करणारी तरुण चलाख दाईच बसली असावी. “हातात काकणं घालतो ना, अगदी तसं!” बाळाला बाळवाटेकडे कसं सरकवत न्यायचं, तिथून ते कसं बाहेर येऊ द्यायचं ते तिने सांगितलं. आणि कसं ते दाखवताना तिच्या हातातल्या लाल बांगड्या किणकिणल्या.

गेल्या सत्तर वर्षांत वागदरी गावातल्या दलित समाजाच्या गुणामायने उस्मानाबाद जिल्ह्यात शेकडो स्त्रियांची बाळंतपणं अगदी सुखरुप पार पाडली आहेत. “हातचलाखी आहे माय,” ती म्हणते. चार वर्षांपूर्वी, वयाच्या ८२ व्या वर्षी तिने शेवटचं बाळंतपण केलं. “माज्या हाताला अपेश नाही. परमेसर पाठीशी हाय.”

गुणामायची मुलगी, वंदना सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयात घडलेला किस्सा सांगते. गुणामायने तिथल्या एमबीबीएस डॉक्टरांसमोर तीन बाळंतपणं करून दाखवली होती. तिन्ही सिझेरियन व्हायच्या बेतात होती. “ते डॉक्टर बी म्हणू लाल्ते, ‘तुमी आमच्या पुढं आहात. आजी’,’” त्यांच्या चेहऱ्यावरचा अचंबा आणि आश्चर्य आठवून गुणामाय हसली होती.

ती फक्त बाळंतपणं करायची नाही. पार पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि उस्मानाबादहून तिला फोन यायचे. “लेकरांच्या डोळ्यात, काना-नाकात काही गेलं तर ते काढण्यात ती फार हुशार आहे. बी, मणी काही पण गेलं ना, लोक लेकरांना घेऊन येतात तिच्याकडे,” तिची नात श्रीदेवी काही महिन्यांपूर्वी आम्हाला सांगत होती. गुणामायच्या दृष्टीने हे तिचं कामच होतं. त्या पलिकडे तिला किती तरी औषधं माहित होती. पोटदुखीवर, कावीळ, सर्दी-खोकला, ताप अशा आजारांवर ती झाडपाल्याची औषधं द्यायची.

Gunamay Kamble (in green saree) with her family in Wagdari village of Tuljapur taluka . From the left: granddaughter Shridevi (in yellow kurta); Shridevi's children; and Gunamay's daughter Vandana (in purple saree)
PHOTO • Medha Kale

गुणामाय (हिरव्या लुगड्यात) तुळजापूर तालुक्याच्या वादगरीत, आपल्या घरी. डावीकडूनः नात श्रीदेवी (पिवळा कुर्ता), श्रीदेवीची दोघं मुलं आणि आई वंदना (सर्वात उजवीकडे)

गुणामायसारख्या दाया किंवा सुइणींनी पिढ्या न् पिढ्या बाळंतपणं केली आहेत. कुठलंही आधुनिक प्रशिक्षण नाही, प्रमाणपत्रं नाहीत, पण प्रामुख्याने दलित समाजातल्या अनेक स्त्रियांनी गावपाड्यांवर आणि शहरी वस्त्यांमध्ये बाळंतपणं केली आहेत, मुलं सुखरुप जन्माला घातली आहेत. गुणामायसारखं “शाबूत बाळातीन होतीस,” असं म्हणत बाळंतिणीला आश्वस्त करत.

पण गेल्या ३०-४० वर्षांत शासनाने दवाखान्यात बाळंतपणं व्हावीत यावर मोठा भर दिला आणि सुइणी किंवा दायांची भूमिका दुय्यम ठरत गेली. १९९२-९३ साली झालेल्या पहिल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात निम्म्याहून कमी बाळंतपणं दवाखान्यात होत होती. आज तीस वर्षांनंतर तो आकडा केवळ ९५ टक्क्यांवर गेला आहे असं एनएफएचएस-५ चा अहवाल सांगतो.

जुळी मुलं असोत, बाळ आडवं असो किंवा कधी पोटातच मूल दगावलं असलं तरी सुखरुप बाळंतपण करणाऱ्या गुणामायसारख्या दाईचा विचार शासकीय यंत्रणा आता कसा करते? गरोदर बाईबरोबर दवाखान्यात जायचं, बास्स. त्यासाठी तिला अशा प्रत्येक बाईमागे ८० रुपये देण्याची तरतूद केली जाते.

आता बाळंतपणं करत नसल्या, त्यांची गरज कमी होत गेली असली तरी गुणामाय म्हणायची, “गावातली लोकं माया करतात. कुणी चहाला बोलावतं, तर कुणी भाकर देतं. आता लग्नाला आमाला कुणी बोलवत नाही. पर कार्यक्रम होऊन गेल्यावर मात्र ताट देतात.” तिच्या कामाची लोकांना कदर आहे, पण दलित म्हणून असणाऱ्या जातीच्या भिंती मात्र तशाच आहेत, चिरेबंद.

*****

मांग कुटुंबात जन्माला आलेल्या गुणामायचे वडील थोडंफार शिकलेले होते. भावंडं शाळेत गेली पण गुणामाय मात्र कधीच शाळा शिकली नाही. वयाच्या सातव्या वर्षी तिचं लग्नही झालं होतं. मोठी झाल्यावर म्हणजेच पाळी आल्यावर ती सासरी नांदायला आली. “१०-१२ वर्षं वय असेल माजं. झग्यातच होते. नळदुर्गाचा किल्ला फुटला त्या साली आले मी वागदरीत,” ती सांगत होती. १९४८ साली भारतीय सैन्याने नळदुर्गात प्रवेश केला, किल्ला ताब्यात घेतला आणि हैद्राबादच्या निझामाच्या ताब्यात असलेला मराठवाडा मुक्त केला.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातलं २६५ उंबरा असलेलं वागदरी हे गुणामायचं गाव. तिथे गावाच्या अगदी टोकाला असलेल्या दलित वस्तीत तिचं घर आहे. पूर्वी फक्त एका खोलीचं तिचं घर होतं, त्याशेजारी दलित समाजासाठी सुरू केलेल्या शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत २०१९ साली दोन खोल्या बांधल्या आहेत.

Gunamay sitting on a metal cot in her courtyard
PHOTO • Medha Kale
Vandana and Shridevi with Gunamay inside her home. When she fell ill in 2018, Gunamay had to leave the village to go live with her daughters
PHOTO • Medha Kale

डावीकडेः आपल्या घरासमोरच्या अंगणात लोखंडी बाजेवर बसलेली गुणामाय. उजवीकडेः वंदना आणि श्रीदेवी गुणामायसोबत, वागदरीतल्या घरी. २०१८ साली गुणामाय पडली आणि तेव्हापासून ती आपल्या लेकींसोबत राहत होती

लग्न झाल्यावर गुणामाय वागदरीत नांदायला आली तेव्हा सासरचं घर फक्त दगड-मातीचं होतं. जमीन नाही, पती मनोहर कांबळे रामोसपण करायचे आणि गावाचं संरक्षण आणि पाटलाकडे चाकरी असायची. त्यासाठी वर्षातून एकदा बलुतं मिळायचं. घरात धान्य यायचं.

पण त्यात कसं भागावं? म्हणून मग गुणामायनी शेरडं पाळली. घरी म्हशी राखल्या. म्हशीच्या दुधाचं तूप करून नळदुर्गात ती विकायची. १९७२ च्या दुष्काळानंतर महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरू झाली, त्यावर तिने कामं केली, शेतात मजुरी केली आणि बाळंतपणं करत राहिली.

“बाळातपण लई जोखमीचं, माय. पायातून काटा काढणं अवघड. हितं तर धंडातून धंड बाहेर यायचा!” ती म्हणायची. पण इतकं नाजूक आणि जोखमीचं काम करूनही “लोक त्यांच्या मनावर पैसे द्यायचे,” ती म्हणते. “कुणी मूठभऱ दाणे द्यायचं, कुणी दहा रुपये टाकायचं. लांबच्या गावातली कुणी बाळातीण असली तर शंभराची नोट द्यायाचे.”

रात्रभर बाळंतिणीसोबत बसायचं, सकाळी बाळ-बाळंतिणीला अंघोळ घालून मगच घरी परत यायचं असा तिचा नेम असायचा. “मी कुनाच्या घरी कंदी च्या नाही घेतला. दिलेले दाणे पदराच्या टोकाला बांधून घरी यायचे माय,” ती सांगत होती.

आठ वर्षांपूर्वी एका वकिलाच्या कुटुंबात दहा रुपये दिल्याची घटना मात्र ती विसरलेली नाही. वकिलाची सून अडली होती. रात्रभर तिच्यासोबत बसून, तिला आधार देत अवघड बाळंतपण पार केल्यावर गुणामाय सांगते, “सकाळी लेकरू झालं. पोरगं हुतं. अंघोळ घालून मी निघाले तर तिच्या सासूने माज्या हातात १० रुपये ठेवले. ती नोट तिथंच ठेवली आन् तिला म्हन्लं, ‘हातात दिसतात ना ती काकणं बी २०० रुपयांची हायेत. हे दहा रुपये घे आन् एखाद्या भिकाऱ्याला बिस्किटचा पुडा दे’.”

Gunamay's daughter Vandana (in purple saree) says dais are paid poorly
PHOTO • Medha Kale
‘The bangles I am wearing cost 200 rupees,' Gunamay had once told a lawyer's family offering her Rs. 10 for attending a birth. ‘ Take these 10 rupees and buy a packet of biscuits for a beggar'
PHOTO • Medha Kale

डावीकडेः गुणामायची मुलगी वंदना सांगते की बाळंतपणं करून देखील पुरेसे पैसे मिळत नाहीत. उजवीकडेः ‘हातात दिसतात ना ती काकणं बी २०० रुपयांची हायेत. हे दहा रुपये घे आन् एखाद्या भिकाऱ्याला बिस्किटचा पुडा दे’

कुणाला कष्टाची कदर नाही आणि पैसाही किरकोळ त्यामुळे गुणामायची सगळ्यात मोठी मुलगी वंदना हिने बाळंतपणं करणं सोडून दिलं. “कुणीच पैसा देत नाही. लोकही नाही, सरकारही नाही. कुणाला किंमतच नाही तर आम्ही कशाला खपावं? माझी चार लेकरं होती लहान लहान. मी बाळातपनं करायचं थांबिवले आणि मजुरीला जाया लागले,” वंदनाताई सांगते. आईकडून त्या सगळं शिकल्या पण आता पुण्याला राहतात तिथे बाळ-बाळंतिणीला अंघोळ घालण्याचं काम तेवढं करतात.

वंदनाताई आणि तिच्या तिघी बहिणींना मिळून १४ लेकरं झाली. त्यातलं एक सोडलं तर सगळी बाळंतपणं गुणामायनेच केली. तिसऱ्या पोरीच्या वेळी जावई म्हणाला दवाखान्यातच बाळंतपण करायचं आणि मग तिचं सिझर झालं. “जावाई शाळंत शिक्षक होता. त्याचा काय आमच्यावर इस्वास नव्हता,” गुणामाय सांगत होती.

गेल्या वीस-तीस वर्षांत सिझरेयिन शस्त्रक्रियांमध्ये मोठी वाढ होतीये त्याचा गुणामायला मोठा खेद वाटायचा. महाराष्ट्रात देखील या शस्त्रक्रियांची संख्या वाढत चालल्याचं दिसतं. एनएफएचएस-५ अहवालातील आकडे सांगतात की २०१९-२१ या काळात सरकारी रुग्णालयांमधली २५ टक्के बाळंतपणं सिझेरियन पद्धतीने झाली आहेत. खाजगी रुग्णालयांसाठी हाच आकडा ३९ टक्के इतका असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे.

“कसंय, गरोदरपन, बाळातपन शरीराचा धर्म हाय,” गुणामाय म्हणाली होती. बाळजन्माच्या वेळी टाके घालण्यासारख्या उपचारांची गरज नसते असं तिला वाटायचं. त्याबद्दल तिची परखड मतं होती. “कापतात आन् टाके घालतात माय. त्यानंतर बाईला उठून बसता तरी येतं का? बाळातनीचं अंग नाजूक झालेलं असतं.” सुइणी किंवा दायांमध्ये आढळणारा एक नेहमीचा समज तिच्याही मनात होताच. “वार बाहिर यायाआधी नाळ कंदीच कापायची नाही बग. वार काळजाला जाऊन चिकटती नाही तर.”

आपल्या स्वतःच्या बाळंतपणातूनच गुणामाय शिकत गेली, तिने पारीला सांगितलं होतं. “माज्या बाळातपनातूनच म्या शिकली. कळ घ्यायची, पोट चोळायचं आणि हलकेच लेकरु हातात घ्यायचं,” तरुणपणीच आई झालेली गुणामाय आपला अनुभव सांगत होती. “मी कुनाला जवळ येऊ द्यायाची न्हाई. माईला सुदिक नाही. लेकरू झालं की हाक मारायची.”

Gunamay (left) practiced as a dai for most of her 86 years . A lot of her learning came from her experiences of giving birth to Vandana (right) and three more children
PHOTO • Medha Kale
Gunamay (left) practiced as a dai for most of her 86 years . A lot of her learning came from her experiences of giving birth to Vandana (right) and three more children
PHOTO • Medha Kale

गुणामायने (डावीकडे) ८६ वर्षांच्या आपल्या आयुष्यातला बहुतेक सगळा काळ बाळंतपणं केली. आपल्या स्वतःच्या बाळंतपणातून, वंदना (उजवीकडे) आणि तीन मुलींच्या जन्मातून ती शिकत गेली

मूल पोटातच दगावण्यासारख्या अवघड प्रसंगातसुद्धा गुणामायचा अनुभव आणि कौशल्य कामी यायचं. एक तरुण बाई अडली होती, ती सांगत होती. “मला ध्यानात आलं की लेकरू पोटातच दगावलंय.” जवळच्या दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सोलापूरला नेऊन सिझर करून बाळ काढावं लागेल असं सांगितलं होतं. “त्यांची घरची परिस्थिती नव्हती. मी म्हन्लं, मला जरासा वेळ द्या. पोट दाबत, चोळत मी ते लेकरू बाहेर काढलं,” गुणामाय सांगते. “लई अवघड होतं. कळाच येत नाहीत न्हवं,” वंदनाताई म्हणते.

“बाळातपणात अंग बाहेर येतं ते बी बसवून देते म्या. पण ओल्या अंगातच बरं का. वेळ गेली की डॉक्टरकडेच जावं लागतं,” आपले उपचार कुठे थांबवायचे आणि डॉक्टरांची मदत कुठे घ्यायची याची तिला चांगली जाण होती.

१९७७ साली देशभरात दाई प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला होती. त्याच सुमारास अनेक स्वयंसेवी संस्थांनी देखील आपल्या आरोग्य कार्यक्रमांमधून दायांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती.

“मी सोलापूरला टरलिंगला गेल्ते. कधी ते काय ध्यानात नाय,” घरातून बाहेर येत एकेक पाऊल जपून टाकत गुणामाय अंगणातल्या चिंचेखाली बाजेवर येऊन बसली.  “स्वच्छता कशी ठेवायची ते आमाला शिकविलं होतं – साफ हात, साफ पत्ती आन् साफ धागा. नाळ कापल्यावर बांधायला. दर येळी नवं सामान वापरायले होते. आता त्याचं समदंच काय ऐकलं न्हाय कंदी,” मनातलं खरंखरं गुणामाय बोलून दाखवत होती. आपलं ज्ञान, कौशल्य आणि अनुभव या प्रशिक्षणांच्या पुढे होता याचा तिला सार्थ विश्वासही होता.

२०१८ साली चक्कर येऊन पडण्याचं निमित्त झालं आणि तेव्हापासून ती आपल्या लेकींसोबत राहू लागली. तुळजापूर तालुक्यातल्या कसईत किंवा पुण्यात. पण तिचं मन मात्र रमायचं ते वागदरीत. कारण ती म्हणायची, “इंदिरा गांधीनी कसं देशावर राज्य केली, तसं हितं बाळातपणाचं काम म्या हाती घेतलं बघ.”

ता.क. गेल्या काही महिन्यांपासून गुणामायची तब्येत ठीक नव्हती. ही गोष्ट छापण्याची सगळी तयारी होत आली आणि ११ नोव्हेंबर २०२२ रोजी गुणामायने अखेरचा श्वास घेतला.

या कहाणीची वेगळी आवृत्ती २०१० साली तथापि-डब्ल्यूएचओ प्रकाशित झ वी सी इट या पुस्तकात समाविष्ट आहे.

Medha Kale

மேதா காலே, மும்பையில் வசிக்கிறார், பெண்கள் மற்றும் நல்வாழ்வு தொடர்பான விவகாரங்களில் எழுதுகிறார். PARIஇல் இவரும் ஒரு மொழிபெயர்ப்பாளர். தொடர்புக்கு [email protected]

Other stories by Medha Kale
Editor : Priti David

ப்ரிதி டேவிட் பாரியின் நிர்வாக ஆசிரியர் ஆவார். பத்திரிகையாளரும் ஆசிரியருமான அவர் பாரியின் கல்விப் பகுதிக்கும் தலைமை வகிக்கிறார். கிராமப்புற பிரச்சினைகளை வகுப்பறைக்குள்ளும் பாடத்திட்டத்துக்குள்ளும் கொண்டு வர பள்ளிகள் மற்றும் கல்லூரிகளுடன் இயங்குகிறார். நம் காலத்தைய பிரச்சினைகளை ஆவணப்படுத்த இளையோருடனும் இயங்குகிறார்.

Other stories by Priti David