“बर्फ पडणार आहे हे आम्हाला वेळेत सांगितलं असतं तर आम्ही फुलं लवकर काढली असती,” मुश्ताक अहमद म्हणतात.
अहमद काश्मीरच्या दक्षिणेकडच्या पाम्पोर तालुकयातल्या नामबाल गावी राहतात. इथे, दर वर्षी मे महिन्याच्या मध्यावर ते आणि इतरही शेतकरी केसराची लागवड करतात. आणि ऑक्टोबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत फुलं वेचणीला येतात. या फुलाचे केसर म्हणजेच अतिशय मौल्यवान केसर.
भारतामध्ये फक्त काश्मीरमध्येच (जे आता राज्य नाही, केंद्रशासित प्रदेश आहे) केसराची शेती होते. त्यातलं काही इथल्या प्रसिद्ध काह्वा चहात वापरलं जातं, पण बहुतेक सगळं देशाच्या इतर राज्यांमध्ये पाठवलं जातं. अन्नपदार्थात, आयुर्वेदिक औषधांमध्ये आणि देवदेवतांच्या पूजेत केसर वापरलं जातं.
पण या वर्षी काश्मीरमध्ये तब्बल एक महिना आधी - ७ नोव्हेंबर रोजी - बर्फ पडायला सुरुवात झाली. त्याचा फुलोऱ्यावर असलेल्या रोपांवर परिणाम झाला. परिणामी पाम्पोरच्या माजी गावातल्या वासिम खांडेंना फक्त ३०-४० ग्रॅम केशर काढता आलं. आपल्या ६० कनाल (८ कनाल म्हणजे एक एकर) जमिनीतून दर कनालमागे २५०-३०० ग्रॅम केशर निघेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र कनालमागे २०,००० रुपयांचा नफा होण्याऐवजी त्यांचं तीन लाखांहून अधिक नुकसान झालंय.
“या हंगामाकडून आमच्या भरपूर अपेक्षा होत्या, मात्र अवेळी बर्फ पडल्यामुळे आमचं पीक वाया गेलं,” अब्दुल माजिद वानी सांगतात. सुमारे २००० सदस्य असणाऱ्या जम्मू-काश्मीर केशर उत्पादक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. वानींच्या अंदाजनुसार या वर्षी काश्मीरच्या केशर शेतकऱ्यांचं एकूण २० कोटींच्या आसपास नुकसान झालं आहे. केशराचा व्यवसाय सुमारे २०० कोटीच्या घरात असल्याचं काश्मीर अन्न प्रक्रिया उद्योग विभागाचे अध्यक्ष डॉ. झैनुल अबिदीन यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
काश्मीरमधल्या २२६ गावांमध्ये मिळून ३२,००० कुटुंब केशराची शेती करतात असं काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी तयार केलेल्या बोधपटात म्हटलं आहे. अहमद आणि खांडेंची गावंही यात समाविष्ट आहेत. यातली अनेक गावं पुलवामा जिल्ह्याच्या पाम्पोर क्षेत्रात मोडतात. ही सगळी कुटुंबं मिळून दर वर्षी सुमारे १७ टन केशराची निर्मिती करतात असं कृषी संचालक सैद अल्ताफ ऐजाझ अंद्राबी यांचं म्हणणं आहे.












