छत्तीसगढ मधील आदिवासी जमातींचं संगीत हे मुक्तीचं संगीत आहे - अनेक दशके हिंसक संघर्षात पोळून निघालेल्या लोकांचं. बहुदा ढोलावर ताल धरलेल्या त्यांच्या गाण्यांत त्यांच्या जमिनीच्या सौंदर्याचं, त्यांच्या जंगलाचं, त्यांच्या रोजच्या जगण्याचं वर्णन आणि निसर्गाप्रति आदर आढळून येतो. लहान मुलांना देखील त्यांच्या कुटुंबात लहानपणी ही गाणी शिकवली जातात.

आम्ही ऑगस्ट २०१६ मध्ये छत्तीसगढच्या दक्षिण टोकाशी असलेल्या बिजापूर जिल्ह्यातील भैरमगढ तालुक्यात असलेल्या फारसेगढ गावाला भेट दिली होती. (२०११ च्या जनगणनेनुसार) बिजापूरच्या सुमारे २,२५,००० लोकसंख्येपैकी ८० टक्के अनुसूचित जमातीचे आहेत. फारसेगढ मधील १,४०० रहिवाशीआणि जवळील काही गावांमधील बहुतेक लोक मुरिया गोंड जमातीचे आहेत. हे गाव नक्षलवादी, शासन आणि शासनप्रणीत सलवा जुडूम यांतील संघर्षाने ग्रस्त असलेल्या गावांपैकी एक आहे. गावकरी म्हणतात ते कायम हिंसेच्या चक्रात अडकून असतात.

या संघर्षात आपला नवरा गमावलेली एक महिला विचारते, "एक मुलगा नक्षल अन् दुसरा पोलिसांचा पाठीराखा निघाल्यावर आणखी काय होणार? सगळे एकमेकांच्या जिवावर उठले असताना कुटुंबाने काय करावं? हेच आमच्या जगण्याचं वास्तव आहे." त्या पन्नाशीत असलेल्या शेतकरी आहेत. त्यांना आपलं नाव सांगायचं नव्हतं. "आम्ही फार कमावत नाही. आम्ही उद्या जगणार की नाही, हे पण आम्हाला ठाऊक नसतं. आम्ही आज जिवंत आहोत, आणि आम्ही एवढाच विचार करतो."

फारसेगढ पर्यंत फार सरकारी योजना पोहोचत नाहीत – एक निवासी शाळा, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सी. आर. पी. एफ.) तळ एवढीच काय ती शासनाची निशाणी.

Toddy trees in Farsegarh village, Chhattisgarh
PHOTO • Arundhati V. ,  Shobha R.
An open book with drawings
PHOTO • Arundhati V. ,  Shobha R.

फारसेगढ आणि आसपासच्या गावांतील आदिवासी गाणी येथील जमिनीच्या ओतप्रोत सौंदर्याचं वर्णन करतात, मात्र लोकांचे अनुभव वेगळीच कथा सांगतात. उजवीकडे: संघर्षात आपला नवरा गमावलेल्या महिलेने सांगितलेल्या संघर्षग्रस्त आदिवासींच्या जीवनाची प्रातिनिधीक कलाकृती. ( कला सहलेखक अरुंधती व्ही. यांची)


फारसेगढच्या वेशीलगत असलेली निवासी शाळा फार चांगल्या अवस्थेत नाही - वीज अनियमित येते, इमारतीला पावसाळ्यात गळती लागते. विद्यार्थ्यांना वसतिगृहात स्वयंपाक आणि साफसफाई करावी लागते. इथे सुमारे ५० आदिवासी विद्यार्थी आहेत (वय वर्ष ६-१५, सगळ्या मुली, आसपासच्या बऱ्याचशा गावांतून आलेल्या), एक काळजीवाहक शिक्षक  आणि एक स्वयंपाकी.

आम्ही भेट दिली असता विद्यार्थ्यांनी गोंडी भाषेत त्यांच्या जमातींची गाणी गायली, आणि त्यातील काहींनी ती आमच्याकरिता हिंदीत भाषांतरित केली.

पहिलं गाणं

मुली मोहाच्या झाडाबद्दल, जे त्यांच्या जीवन आणि जीविकेच्या अंतःस्थानी आहे, आवडीने गातात

मोहाच्या झाडा,
रे मोहाच्या झाडा
सुंदर किती तू
मोहाच्या झाडा!
पडतात मोहाची फुलं
लाल लाल फुलं
जणू पावसाची लाल सर
मोहाच्या झाडा,
रे मोहाच्या झाडा
सुंदर किती तू,
मोहाच्या झाडा

गायिका

सुशीला मनरा, फारसेगढ गाव
गायत्री तेल्लम, धानोरा गाव
कमला उड्डे, सागमेटा गाव

दुसरं गाणं

मुली गातात आणि आपली भावंडं आणि मित्र किती सुंदर आहेत, यावरून एकमेकींना चिडवतात.

भाऊराया,
किती सुंदर दिसतो रे तू…
सांग तुला आवडे काय?
कावळा करतो काव काव,
हिंडतो सारा गाव
काव काव काव
सांग कसा? सांग कसा?

गायिका
गायत्री तेल्लम, धानोरा गाव

तिसरं गाणं

मुली सजून नाचण्यातला सहज आनंद गाण्यातून व्यक्त करतात.

तुझे डूल घाल गं पोरी
अन् अमुच्या संगे येऊन नाच!
रेला रेला रेला… [सगळ्या]
तुझा रंगीत झगा घाल गं पोरी
अन् अमुच्या संगे येऊन नाच!
रेला रेला रेला… [सगळ्या]
तुझे नवीन जोडे घाल गं पोरी
अन् अमुच्या संगे येऊन नाच!
रेला रेला रेला… [सगळ्या]

गायिका
अवंतिका बारसे, फारसेगढ गाव

A chameleon lazes in the sun, at the government residential school for Adivasi children, Farsegarh village
PHOTO • Arundhati V. ,  Shobha R.
An Adivasi woman in Farsegarh village wearing traditional anklets
PHOTO • Arundhati V. ,  Shobha R.

डावीकडे: फारसेगढ मधील आदिवासी मुलांच्या शाळेत एक सरडा उन्हात निवांत पडलाय. ' त्या सरड्याचं शेपूट दिसतंय का? पकडा त्याला!' असं एक गाणं मिश्कीलपणे म्हणतं. उजवीकडे: मुरिया गोंड महिला घालतात ते तोडे; आणखी एका गाण्यात मुली सजून नाचण्याचं वर्णन करतात.

चौथं गाणं

आपल्या घरच्यांसोबत घालवलेली वेळ आठवून मुली एका सरड्याबद्दल गाणं म्हणतात.

रेरेला रेला रेला रेला… [सगळे]
त्या सरड्याचं शेपूट दिसतंय का?
पकडा त्याला!
ताई गं, माझ्यासाठी गाणं म्हणशील का?
ताई गं, ला ला ला
भावोजी, जरा पुढे तर या
सरड्याचं शेपूट आहे हिरवं
दिसतंय का, भावोजी?

गायिका
गायत्री तेल्लम, धानोरा गाव

पाचवं गाणं

मुली या गाण्यातून तिरंगा आणि आपल्या देशाबद्दल त्यांचं मत नम्रपणे मांडताहेत

रेरेला रेला रेला रेला… [सगळे]
हा तर नारिंगी झेंडा, गं सखे!
हा तर पांढरा झेंडा, गं सखे!
हा तर हिरवा झेंडा, गं सखे!
झेंड्याच्या मधोमध २४ रेषा
रेरेला रेला रेला रेला… [सगळे]

गायिका
सुशीला मनरा, फारसेगढ गाव
सरस्वती गोटा, बडे काकलेर गाव
कमला गुड्डे, सागमेटा गाव

सहावं गाणं

मुली त्यांना साजेशा जोडीदारासाठी एक गोड गाणं गातात.

रेलारे रेला [सगळे]
तुझी नि माझी, जोडी जमते छान.
रे साजणा, जोडी जमते छान.

गायिका
अवंतिका बारसे, फारसेगढ गाव

Sweet toddy being tapped from a tree in Farsegarh village, Chhattisgarh
PHOTO • Arundhati V. ,  Shobha R.
Girls in a residential hostel in Farsegarh singing softly with the lights switched off, after school hours
PHOTO • Arundhati V. ,  Shobha R.

डावीकडे: फारसेगढ मध्ये एका झाडावर गोळा करण्यात येणारी ताडी; एका गाण्यात म्हटलंय, ' आपण ताडी गोळा करू; आमच्या गावी या.' उजवीकडे: शाळेचे तास संपल्यावर दिवे बंद करून मुली दबक्या स्वरात गाणं गातात.

सातवं गाणं

मुली गाणं गाऊन सर्वांचं स्वागत करतात, त्यांना आपल्या गावी भेट द्यायला, वरदायी निसर्गाची मजा लुटायला आणि त्या आपल्या शेतात कसं काम करतात ते पाहायला बोलावतात.

रेलारे रेला… [सगळे]
ताडाची पानं डुलतात हळुवार
ओ! आमच्या गावी या
आपण गोळा करू ताडी,
ओ! आमच्या गावी या
या, कापूया उंच उंच गवत
गवत डुलतंय हळुवार,
इकडून तिकडे, इकडून तिकडे
ओ! आमच्या गावी या
जरा मिळून कापूया गवत
आमच्या गावी या
जरा मिळून कापूया भात
भाताचे लव्हाळे डुलतात
इकडून तिकडे, इकडून तिकडे

गायिका:
सरिता कुसराम, सागमेटा गाव
सरस्वती गोटा, बडे काकलेर गाव
सुशीला मनरा, फारसेगढ गाव

अनुवादः कौशल काळू

Arundhati V.

Arundhati V. is a human rights activist, theatre artist and trainer; she works with the Sambhaavnaa Institute in Palampur, Himachal Pradesh on issues of rights and justice.

Other stories by Arundhati V.
Shobha R.

Shobha R. is a human rights activist, theatre artist and trainer based in Bangalore. She works on issues of eviction and gender justice, and on facilitating expressions of oppression, justice and resilience.

Other stories by Shobha R.
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo