“आम्ही दर वर्षी उन्हाळ्यात एक महिना इथे पैसे कमवण्यासाठी इथे येतो,” शांती सांगते, बोलता बोलता ती तिची ओढणी कपाळापाशी घेते आणि तिच्या नऊ वर्षांच्या नातवाला, अमरजीतला रावणहाथा वाजवायचं थांबू नको असं म्हणतात कोपराने हलकेच ढुसणी देते. “ बजाओ, बजाओ ,” ती त्याला सांगते. तो जरासा नाखुशीतच तारांवर बो फिरवतो.

पर्वतरांगा पहायला जात असताना आम्हाला शांती आणि अमरजीत ( शीर्षक फोटो पहा ) भेटले. धरमशालाच्या वरच्या दिशेला मॅकलॉइडगंजपासून तीन किलोमीटरवरच्या नड्डी गावी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका चौथऱ्यावर ते बसलेले होते.

शांतीने जरासं ओशाळून आम्हाला सांगितलं, “या पोराचा [अमरजीतचा] आजा रावणहाथा फार छान वाजवतो, पण आज त्यांना बरं नाही म्हणून ते आले नाहीत. आम्ही कायम हे वाद्य वाजवत आणि गाणी गात आलोय. पण माझ्या नातवाला काही ते [रावणहाथा वाजवायला] आवडत नाही. आजकाल सगळे म्हणतात पोरांनी शिकायला पाहिजे. म्हणून तो [आमच्या गावी] शाळेत जातो.”

तू कितवीत आहेस, मी अमरजीतला विचारलं. “चौथीत,” त्याने हसून उत्तर दिलं.

रावणहाथा याचा शब्दशः अर्थ आहे, रावणाचा हात. हे दोनतारी वाद्य आहे. त्याच्या एका टोकाला नारळाची करवंटी आणि बकऱ्याच्या कातड्याने बनवलेला लहानसा भोपळा असतो. वादक वाद्याचा भोपळा पोटाशी धरतो आणि त्याला जोडलेला बांबू समोर हवेत ठेवतो. या बांबूला एक धातूची आणि एक प्राण्याच्या केसापासून तयार केलेली  तार असते. या तारांवरून बो फिरवला की त्यातून सूर निघतात.

त्यांचं नशीब चांगलं असेल तर वेगाने जाणाऱ्या वाहनांमधनं काही पर्यटक उतरतात किंवा जे पायी जात असतात ते थांबून त्यांचं वादन ऐकतात आणि त्यांना काही पैसे देऊ करतात

व्हिडिओ पहाः रावणहाथा वाजतोय, राजस्थानातून थेट हिमाचल प्रदेशात

रामायणात या वाद्याचा उल्लेख सापडतो. असं म्हटलं जातं की रावणाने शंकराची उपासना करताना त्याची दहा शिरं, एक हात आणि काही केसातून रावणहाथा बनवलं. हनुमानाने ते लंकेहून भारतात आणलं. भौगोलिक आणि कालाच्या सीमा भेदत आता श्रीलंकेतील संगीतकार आणि व्हायोलिनवादक दिनेश सुबसिंघे या वाद्याचं पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यांच्या अनेक चालींमध्ये त्यांनी या वाद्याचा वापर केला आहे.

राजस्थानात प्रामुख्याने भटक्या समूहांमधले अनेक लोकगायक-संगीतकार रावणहाथा वाजवतात. शांतीचं कुटुंब शेतमजुरी करतं आणि राज्याच्या मारवाड प्रदेशातल्या नगौर जिल्ह्यातल्या मुंडवा गावी मुक्कामी आहे. ती तिचा मुलगा राजू, तिचा नवरा, तिची सून सुकली आणि नातू, अमरजीतसोबत दर वर्षी एप्रिलच्या मध्यावर हिमाचल प्रदेशात येते. या काळात गावी शेतात फारसं काही काम नसतं त्यामुळे पुढचा महिनाभर ते इथे राहतात. ते जोधपूरपर्यंत बसने जातात, मग पंजाबच्या भटिंडापर्यंत रेल्वेने जातात आणि मग धरमशालापर्यंतचा प्रवास पुन्हा बसने. नुसत्या यायच्या प्रवासावरच त्यांचे माणशी ३०० रुपये खर्च होतात.

धरमशालाला आल्यावर ते राहतात कुठे? “आम्ही २,५०० महिना भाड्याने खोली करतो. सगळे पाचही जण तिथे राहतो, स्वयंपाक करतो.” हिंदी सिनेमातली गाणी वाजवून या कलाकारांची कुठल्याही दिवशी ४०० ते ५०० रुपये कमाई होते. आज ते दोन ठिकाणी गेलेत. शांती आणि अमरजीत एका ठिकाणी आणि राजू आणि त्याची बायको सुकली दुसरीकडे.

नजर खिळवून टाकणाऱ्या धौलाधार पर्वतरांगा आणि मनाला मोहिनी घालणारे बौद्ध विहार पहायला आलेल्या, आपापल्या टॅक्सी, गाड्या किंवा दुचाकी वाहनांवरून वेगाने जाणाऱ्या पर्यटकांचं लक्ष आपल्याकडे वेधून सोपं नाही. रोज ते एकाच जागी आपलं वाद्य वाजवतात, शक्यतो एखाद्या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर किंवा त्याच्या आसपास. त्यांचं नशीब चांगलं असेल तर वेगाने जाणाऱ्या वाहनांमधनं काही पर्यटक उतरतात किंवा जे पायी जात असतात ते थांबून त्यांचं वादन ऐकतात आणि त्यांना काही पैसे देऊ करतात.
A man and his wife sitting on the side of the road in the moutains. the man is holding an instrument called ravanahatha in his hands
PHOTO • Namita Waikar

नामग्याल विहाराच्या दिशेने जात असताना आम्हाला अमरजीत, मंजू आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा, राजू भेटले

दलाई लामांचा निवास असणाऱ्या त्सुंगलागखांग संकुलातील नामग्याल विहाराकडे जात असताना आम्हाला या स्थलांतरित कामगारांचं आणखी एक कुटुंब भेटलं. या कुटुंबामध्ये देखील एक अमरजीत होता, हा मात्र रावणहाथातून फार मंजुळ सूर काढत होता. त्याची बायको मंजू आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा राजू शेजारीच अंथरलेल्या हिरव्या रंगाच्या प्लास्टिकवर बसलेले होते. समोर ठेवलेल्या स्टीलच्या ताटलीत काही दहा रुपयाच्या नोटा आणि काही नाणी दिसत होती, पर्यटकांनी आतापर्यंत दिलेले पैसे होते ते. त्यांच्या अगदी काही फुटांवर मागे रस्त्याला लागून थेट कांग्रा दरी आहे.

अमरजीत आणि मंजूदेखील राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्याच्या गोमाबारी पाड्यावर राहणारे शेतमजूर आहेत. या वर्षी राजस्थान ते धरमशाला आणि परतीच्या प्रवासावर त्यांचे १२०० रुपये खर्च झालेत. त्यांच्या खोलीचं महिन्याचं भाडं आहे, ३००० रुपये. “आम्ही खोलीत इलेक्ट्रिक हीटरवर स्वयंपाक करतो. बाकी किराणा आम्ही आमच्यासोबतच घेऊन आलोय. त्यामुळे इथे वेगळा खर्च करावा लागत नाही,” मंजू सांगते. रोजची कमाई ५०० रुपये पकडून आणि राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च वगळून त्यांच्या हातात महिन्याला १०,००० रुपये पडतात.

“आम्ही गंगानगरला परतू तेव्हा शेतात मजुरीच करणार,” अमरजीत सांगतो, थोडासा खंतावून. पर्यटक जमा व्हायला लागतात तसं तो बोलणं थांबवतो. आणि मग त्याच्या रावणहाथातून लोकप्रिय हिंदी गाण्याचे सूर निघू लागतात.

परदेसी, परदेसी, जाना नहीं

मुझे छोड के...

पाय निघत नाही तरी, आम्ही मात्र निघतो.


अनुवादः मेधा काळे

நமீதா வாய்கர் எழுத்தாளர், மொழிபெயர்ப்பாளர். PARI-யின் நிர்வாக ஆசிரியர். அவர் வேதியியல் தரவு மையமொன்றில் பங்குதாரர். இதற்கு முன்னால் உயிரிவேதியியல் வல்லுனராக, மென்பொருள் திட்டப்பணி மேலாளராக பணியாற்றினார்.

Other stories by Namita Waikar
Translator : Medha Kale

மேதா காலே, மும்பையில் வசிக்கிறார், பெண்கள் மற்றும் நல்வாழ்வு தொடர்பான விவகாரங்களில் எழுதுகிறார். PARIஇல் இவரும் ஒரு மொழிபெயர்ப்பாளர். தொடர்புக்கு [email protected]

Other stories by Medha Kale