अगदी पहिल्यांदाच मन्वरा बेवाची टोपली आज रिकामी आहे. कारखाना बंद आहे, गेल्या २० दिवसांपासून मुन्शीचा पत्ता नाही आणि घरच्यांचं पोट भरायला तिच्याकडे मुळी पैसाच नाहीये. मन्वरा म्हणतात की देशात कुठे तरी काही तरी काळं आहे ज्याविरोधात लोक लढतायत आणि त्याच्यामुळेच तिच्यावर ही वेळ आली आहे.
१७ वर्षांपासून ४५ वर्षांच्या मन्वरा घर चालवतीये – विड्या वळून – १००० विड्यांमागे १२६ रुपये. नवरा वारल्यानंतर त्याच्यामागे तिने हे काम सुरू केलं. या भूमीहीन कुटंबाला दोघं मुलं, नवरा गेला तेव्हा धाकटा फक्त सहा महिन्याचा होता. तरुणपणी ती दिवसाला २००० विड्या वळायची, आता कसं तरी करून ५०० होतात.
पश्चिम बंगाल सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्यातल्या विडी कामगारांपैकी ७० टक्के महिला आहेत. “या भागात एखाद्या मुलीला चांगल्या विड्या वळता येत नसतील तर तिच्यासाठी चांगलं स्थळ मिळणंदेखील मुश्किल आहे,” पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या जांगीपूर प्रभागातल्या विडी कारखान्याचे मुन्शी असणारे मुनिरुल हक सांगतात. घरी कच्चा माल देणं आणि वळलेल्या विड्या गोळा करणं हे त्यांचं काम.
पश्चिम बंगालमध्ये नोंदणीकृत असणाऱ्या ९० मोठ्या विडी कारखान्यांमध्ये मिळून २० लाख विडी कामगार काम करतात (कारखान्यात आणि घरबसल्या) असा अंदाज आहे. सेंटर फॉर ट्रेड युनियन्सच्या स्थानिक शाखेच्या माहितीनुसार जांगीपूर हे या व्यवसायाचं मुख्य केंद्र आहे – १० लाख कामगार, १८ मोठे कारखाने आणि ५० छोटे कारखाने आणि यातल्या ९० टक्के कामगार घरबसल्या काम करतात.
८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीनंतर हे सगळं चित्र एकदम बदलूनच गेलं. मोठ्या विडी कारखान्यांनी गाशा गुंडाळलाय, जवळ जवळ निम्म्या विडी कामगारांचा रोजगार हिरावला गेलाय, हातात पैसा नाही आणि घरात पोटाला अन्न. ज्यांना अजूनही थोडं फार काम मिळतंय, त्यांच्या ऑर्डरमध्ये घट झालीये, आणि दर आठवड्याला मिळणारा पगारही थांबलाय. उदा. पटाका बीडी, इथला सगळ्यात मोठा ब्रँड आणि शिव बीडी फॅक्टरी, दोन्ही राज्याचे कामगार मंत्री जकीर होसेन यांच्या मालकीचे, दोन्ही नोटाबंदीनंतर एका आठवड्यातच बंद पडलेत.
जे काही मोजके कारखाने चालू आहेत तेही काम थांबवायचा विचार करतायत कारण रोकड अजिबातच उपलब्ध नाहीये. इथले सगळे व्यवहार रोखीत होतात. “मला दर आठवड्याला मुन्शींमार्फत कामगारांना जवळ जवळ एक दीड कोट रुपये वाटायचे असतात. आणि बँकेत मला माझ्या चालू खात्यातून रोज ५०,००० च्या वर रक्कम काढता येत नाहीये – आणि तेही मिळतील याची काही शाश्वती नाही,” जांगीपूरच्या औरंगाबादमधल्या जहांगीर विडी कारखान्याचे मालक इमानी बिस्वास सांगतात. “मी माझा धंदा कसा करायचा? रोकड उपलब्ध नसताना हा कारखाना चालवणं काही शक्य नाही आणि काही दिवसांतच मला हा बंद करावा लागणार, बाकी काही पर्याय नाही.”
मुर्शिदाबादच्या घरी विड्या वळणाऱ्या विडी कामगारांना आठवड्याला मजुरी दिली जाते – १००० विड्यांमागे १२६ रुपये. किती तास काम केलं त्यानुसार कामगार आठवड्याला ६०० ते २००० रुपयाची कमाई करतात. इथल्या सगळ्या कारखान्यांचे मुन्शी पुरेशा विड्या तयार व्हाव्यात यासाठी आठवड्याला सगळ्या कामगारांना मिळून एकूण ३५ कोटी इतकी मजुरी देतात, औरंगाबाद बीडी ओनर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी, राजकुमार जैन माहिती देतात.
काही जण मात्र या संकटाततही आपली पोळी भाजून घेत आहेत. जांगीपूर, धुलियाँ आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या समसेरगंजमध्ये सरकारच्या किमान वेतन दराचं उल्लंघन होत असलं तरी कामगारांना आता १००० विड्यांमागे ९० रुपये मजुरी देऊ केली जात आहे.
विड्यांचं उत्पादन तर घटलं आहेच पण रोकड टंचाईमुळे विक्रीही थंडावली आहे. औरंगाबाद बीडी ओनर्स असोसिएशनच्या मते मुर्शिदाबादमधून देशाच्या विविध भागात जाणाऱ्या विड्यांची संख्या निम्म्यावर आली आहे. विकल्या न गेलेल्या विड्यांची पोतीच्या पोती गोदामात तशीच पडून आहेत.
कामागारांवर या सगळ्याचे अतिशय गंभीर परिणाम होत आहेत. तसेही असंघटित क्षेत्रात सगळ्यात बिकट परिस्थिती असते ती विडी कामगारांची. “आमची सारी जिंदगी या विड्यांवर अवलंबून आहे. जिल्ह्याच्या या भागात लोकांना पोटापाण्याला विड्यांचाच काय तो आधार आहे. लोकांकडे स्वतःच्या जमिनी नाहीत, त्यांना शेतीतलं ज्ञान नाही आणि दुसरा कुठला व्यवसायही इथे नाहीये,” जहांगीर बीडी फॅक्टरीत ३० वर्षं मुन्शी म्हणून काम केलेले ६८ वर्षांचे मुहम्मद सैफुद्दिन सांगतात. “पहिल्या आठवड्यात आम्ही कामगारांना जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा देऊन उत्पादन कसं तरी चालू ठेवलं. पण आता काही ते शक्य नाहीये ना. आम्हाला इतर कारखान्यांकडून ऑर्डर पण मिळत नाहीयेत. त्यामुळे कामच नाहीये. कामगारांना गेल्या तीन आठवड्यापासून मजुरी दिलेली नाही. त्यांना फार हाल सोसावे लागतायत.”
सैफुद्दिन म्हणतात गेल्या तीन दशकामध्ये त्यांना कधीही अशा संकटाचा सामना करावा लागला नव्हता. “आमची फॅक्टरी अजून बंद पडली नाहीये, पण उत्पादन खूपच कमी झालंय. मी थोड्या फार ऑर्डर आणि कच्चा माल गेऊन जेव्हा गावांमध्ये जातो, तेव्हा तिथे लोक माझ्याभोवती कोंडाळं करतात, माझ्या मागे लागतात. प्रत्येकीलाच घर चालवण्यासाठी काही तरी करून काम हवंच आहे. पण मी काहीही करू शकत नाही, अगदी असहाय्य अवस्था झाली आहे.”
गेल्या काही आठवड्यापासून मजुरीच न मिळाल्याने मुर्शिदाबादमधल्या अनेक विडी कामगार आता अगदी कडेलोटाला पोचल्या आहेत. वाचवून मागे टाकलेले पैसे पण आता संपत आल्याने ताहेरी बीबींसारख्या काही जणी आता दिवसाकाठी एका जेवणावर आल्या आहेत. आई-वडील वारल्यापासून गेली ५० वर्षं ताहेरा बीबी विड्या वळतायत. सध्या त्यांचं वय ५८. त्यांचा मुलगा चेन्नईला कामासाठी गेला पण पायाला गंभीर इजा झाल्यामुळे परत आला, मुलीचं लग्न अजून व्हायचंय. त्यांना ताहेरा बीबींचाच आधार. आणि कुटुंबाच्या कमाईचा मुख्य स्रोत म्हणजे विड्या. ताहेरा बीबी दिवसाला १००० ते १२०० विड्या वळतात, आणि तंबाखूशी सतत संपर्क आल्यामुळे त्यांचं नुकतंच क्षयरोगाचं निदान झालं आहे. “मी बरी नाहीये, पण आमच्यासाठी विड्या नाहीत तर जेवण नाही,” त्या म्हणतात, “माझा रात रात डोळा लागत नाही.”
फोटोः अरुणवा पात्रा
अनुवादः मेधा काळे