‘‘आम्हाला श्वासच घेता येत नाही,’’ कामगार सांगतात.
तेलंगणातल्या नालगोंडा जिल्ह्यातल्या धान्य खरेदी केंद्रात काम करताना ते जे मास्क लावतात, ते घामाने भिजतात. साळीच्या ढिगांतून उठणार्या धुरळ्यामुळे अंगाला खाज येते, शिंका येतात, खोकला येतो. किती मास्क बदलणार? किती वेळा हात आणि तोंड धुणार? त्यांना दहा तासांत प्रत्येकी ४० किलो वजनाची ३२०० धान्याची पोती भरायची असतात, ती ओढून न्यायची असतात, त्यांचं वजन करायचं असतं, ती शिवायची असतात, खांद्यावरून वाहून न्यायची असतात आणि ट्रकमध्ये चढवायची असतात. हे सगळं करत असताना ते किती वेळा तोंड झाकून घेणार?
४३-४४ अंश सेल्सिअसच्या भाजून काढणाऱ्या उन्हात हे ४८ कामगार दहा तासात १२८ टन – म्हणजे मिनिटाला २१३ किलो धान्य हाताळत असतात. त्यांचं काम पहाटे तीन वाजता सुरू होतं आणि दुपारी एक वाजता संपतं. म्हणजे सकाळी ९ ते दुपारी १, असे किमान चार तास ते प्रचंड उष्ण आणि शुष्क हवेत काम करत असतात.
मास्क घालायला हवा, शारीरिक अंतर पाळायला हवं, खरं आहे; पण छायाचित्रांत दिसतंय त्या, कांगल तालुक्यातल्या कांगल गावच्या धान्य खरेदी केंद्रावर काम करताना हे पाळणं अशक्यच आहे. राज्याचे कृषी मंत्री निरंजन रेड्डी यांनी एप्रिलमध्ये स्थानिक पत्रकारांना सांगितलं की, तेलंगणात अशी ७००० केंद्रं आहेत.
या कामाची कामगारांची कमाई किती? प्रत्येक केंद्रात बारा-बारा कामगारांचे चार गट असतात आणि प्रत्येक कामगाराला इथल्या कामाचे रोज ९०० रुपये मिळतात. पण यातली मेख अशी की, तुम्हाला हे काम एक दिवसाआड मिळतं. म्हणजे ४५ दिवसांच्या खरेदीच्या हंगामात प्रत्येक कामगाराला २३ दिवस काम मिळतं – म्हणजे दीड महिन्यांच्या धान्य खरेदीच्या काळात २०,७५० रुपयांची कमाई.
या वर्षी रबी हंगामातली धान्य खरेदी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली, २३ मार्च ते ३१ मे असा कोविड १९ ची टाळेबंदी होती, बरोब्बर त्याच काळात!
अनुवादः वैशाली रोडे