शिवानी कुमारी केवळ १९ वर्षांची आहे, पण तिला वाटतं की तिच्याकडे आता फारसा वेळ राहिलेला नाही.
गेली चार वर्षं तिने घरच्यांना आपलं लग्न ठरवण्यापासून अडवलं होतं – पण आता तिला वाटतंय हे सुख फार काळ उपभोगता येणार नाही. "त्यांना अजून किती काळ रोखू शकेन, माहीत नाही," ती म्हणते. "हे कधी तरी संपेलच."
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील गंगसारा या तिच्या गावात मुलींचं इयत्ता १०वी पूर्ण होण्याआधीच किंवा १७-१८ वर्षांच्या आतच लग्न लावण्यात येतं.
शिवानी (या कहाणीतील सगळी नावं बदलली आहेत) अजून तटून आहे, आणि ती बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात आहे. कॉलेजला जावं असं तिला नेहमीच वाटायचं, पण आपण एवढे एकटे पडू याची तिला कल्पना नव्हती. "गावातल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींचं लग्न झालंय. मी ज्या मुलींसोबत लहानाची मोठी झाले अन् शाळेत गेले त्या सगळ्या निघून गेल्या," ती म्हणते. आम्ही एका दुपारी शेजारच्या घरी बोलत होतो कारण तिला स्वतःच्या घरी मोकळेपणाने बोलता आलं नसतं. इथेही आम्ही घरच्या शेळ्या विसावल्या होत्या त्या पडवीत बोलावं असा तिचा आग्रह होता. "कोरोनात कॉलेजमधल्या माझ्या शेवटच्या मैत्रिणीचं लग्न झालं," ती म्हणते.
ती म्हणते की तिच्या समाजात मुलींना कॉलेजला जाण्याची संधी क्वचितच मिळते. शिवानी ही रविदास (चमार जातीची एक पोटजात ) या महादलित समाजाची आहे – २००७ मध्ये बिहार शासनाने २१ अत्यंत मागासलेल्या अनुसूचित जातींना एकत्रितपणे ही संज्ञा दिली होती.
अविवाहित असल्याचं सामाजिक लांच्छन आणि घरचे, शेजारचे व नातेवाइकांकडून सतत लग्न करण्याचा दबाव यामुळे तिचा एकटेपणा आणखी वाढला आहे. "बाबा म्हणतात पुरे झालं शिक्षण. पण मला पोलिस ऑफिसर व्हायचंय. त्यांना वाटतं मी इतकं मोठं स्वप्न पाहू नये. ते म्हणतात मी शिकतच राहिले तर माझ्याशी लग्न कोण करेल?" ती म्हणते. "आमच्यात तर मुलांचंही लवकर लग्न होतं. कधी कधी मला वाटतं मी पण राजी व्हावं, पण मी इथपर्यंत आले आहे अन् मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे."
शिवानी जाते ते समस्तीपूरमधील केएसआर कॉलेज तिच्या गावाहून अंदाजे सात किलोमीटर लांब आहे. तिला पायी चालत जाऊन नंतर बस पकडावी लागते आणि अखेरच्या पल्ल्यासाठी सवारी ऑटोरिक्षा. कधीकधी तिच्या कॉलेजची मुलं तिला आपल्या मोटारगाडीवर न्यायला तयार असतात, पण कोणी तिला मुलासोबत पाहण्याच्या भीतीने ती नेहमी नकार देते. "गावातले लोक अफवा पसरवण्यात पटाईत असतात. माझ्या जवळच्या मैत्रिणीला एकदा शाळेतल्या मुलासोबत पाहिलं तर तिचं थेट लग्न लावून दिलं. असलं काही माझ्या डिग्रीच्या अन् पोलीस होण्याच्या स्वप्नाच्या आड यायला नको," ती म्हणते.
शिवानीचे आईवडील शेतमजूर असून ते महिन्याला रू. १०,००० कमावतात. तिची आई, ४२ वर्षीय मीना देवी यांना आपल्या पाच मुलांची काळजी वाटते. त्यात १३ व १७ वर्षांची दोन मुलं, आणि १०, १५ वर्षांच्या दोघी व १९ वर्षीय शिवानी या तीन मुली आहेत. "मला माझ्या मुलांची दिवसभर काळजी वाटते. मुलींच्या लग्नासाठी मला हुंडा जमवायचा आहे," मीना देवी म्हणतात. त्यांना मोठं घरही बांधायचं आहे. त्यांची वीटकाम केलेली ॲसबेस्टॉसचं छप्पर असलेली एक खोली असून आणि संडास शेजारच्या तीन घरात मिळून आहे. "घरी येणाऱ्या मुलींची [सुना] चांगली सोय करावी लागेल अन् त्या इथेही खूश राहतील हे पाहावं लागेल," त्या म्हणतात. या सगळ्या गडबडीत शिक्षणाचं महत्व कधीच कमी झालं असतं, पण शिवानीने कॉलेजला जाण्याचा चंगच बांधला होता.
घरून शिवानीच्या स्वप्नांना केवळ मीना देवींचा पाठिंबा आहे. त्या स्वतः मात्र कधीच शाळेत गेल्या नाहीत. "ती महिला पोलिसांना पाहते अन् म्हणते की मी त्यांच्यासारखी होणार. तिला मी कसं अडवणार सांगा?" त्या विचारतात. "[ती पोलीस झाली तर] आई म्हणून मला खूप अभिमान वाटेल. पण सगळे तिची खिल्ली उडवतात, अन् मला त्याचं वाईट वाटतं."
गावातल्या काही मुली आणि महिलांसाठी हे प्रकरण फक्त टोमण्यांपुरतं राहत नाही.
१७ वर्षीय नेहा कुमारी हिच्या घरी लग्नाला विरोध केला की मार पडलाच म्हणून समजा. "प्रत्येक वेळी लग्नाचं नवीन स्थळ आलं अन् मी नकार दिला की बाबा संतापून आईला मारतात. आता हे म्हणजे आईकडून खूप जास्त अपेक्षा करण्यासारखं आहे, मला कल्पना आहे," ती म्हणते. ती आपल्या भावंडांच्या एका लहान खोलीत बोलतीये. तिचे वडील दुपारी आराम करतात त्या खोलीहून दूर. या खोलीत एक कोनाडा नेहाच्या अभ्यासाकरिता राखीव असून तिच्या पुस्तकांना हात लावायची कोणालाच परवानगी नाही, ती हसून सांगते.
तिच्या आई नैना देवी म्हणतात की त्यांना मार खाण्याचं काहीच वाटत नाही. त्यांनी तर नेहाच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी आपले दागिने विकायचं देखील ठरवलं आहे. "तिला जर शिकता आलं नाही अन् लग्न करण्याची जबरदस्ती केली तर ती म्हणते की मी विष खाऊन मरून जाईन. मी ते कसं काय पाहू शकेन?" त्या विचारतात. त्यांचे पती २०१७ मध्ये एका अपघातात आपला पाय गमावून बसले आणि त्यांनी शेतमजुरी सोडली. तेव्हापासून नैना देवी, ३९, त्यांच्या घरातील एकमेव कर्त्या आहेत. हे कुटुंब भुईया या महादलित समाजाचं आहे. नैना यांना दरमहा शेतमजुरीतून मिळणारे रू. ५,००० घर चालवायला पुरेसे नाहीत, त्या म्हणतात, आणि ते नातेवाइकांकडून मिळणाऱ्या मदतीच्या भरवशावर निभावून नेतात.
नैना देवी म्हणतात की त्यांना मार खाण्याचं काहीच वाटत नाही. त्यांनी तर नेहाच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी आपले दागिने विकायचं देखील ठरवलं आहे. 'तिला जर शिकता आलं नाही अन् लग्न करण्याची जबरदस्ती केली तर मी विष खाऊन मरून जाईल असं म्हणते. हे मी कसं काय पाहू शकेन?' त्या विचारतात
नेहा इयत्ता १२वीत शिकते, आणि तिला पटण्यातल्या एका ऑफिसात काम करायचंय. "माझ्या घरी कोणीच ऑफिसात गेलं नाहीये – ते करणारी पहिली मुलगी व्हायचंय मला," ती म्हणते. तिच्या मोठ्या बहिणीचं १७व्या वर्षी लग्न झालं आणि वयाच्या २२ वर्षांपर्यंत तिला तीन मुलं झालीत. तिचे भाऊ १९ व १५ वर्षांचे आहेत. "मला माझी बहीण आवडते, पण तिच्यासारखं जगणं मात्र मला नको," ती पुढे म्हणते.
सराईरंजन तहसिलातील ६,८६८ लोकसंख्या असलेल्या (जनगणना २०११) गंगसारा गावात नेहाच्या सरकारी शाळेत इयत्ता १२ पर्यंत वर्ग आहेत. ती म्हणते की तिच्या वर्गात केवळ सहा मुली आणि १२ मुलं आहेत. "आठवीनंतर शाळेतल्या मुलींची संख्या हळूहळू कमी होत जाते," नेहाच्या शाळेतील शिक्षक अनिल कुमार म्हणतात. "कधी त्यांना कामावर पाठवतात, तर कधी त्यांचं लग्न लावून देतात."
बिहारमध्ये ४२.५ टक्के मुलींचं लग्न १८ वर्षांच्या आत लावण्यात येतं – अर्थात, ( बाल विवाह प्रतिबंधक कायदा २००६ अन्वये) देशातील लग्नाच्या कायदेशीर वयाच्या आत. हा आकडा देश पातळीवरील २६.८ टक्क्यांपेक्षा पुष्कळ जास्त आहे, असं राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ्य सर्वेक्षण ( एनएफएचएस -४, २०१५-१६ ) मध्ये नमूद केलंय. समस्तीपूरमध्ये तर हा आकडा ५२.३ टक्क्यांवर जातो.
नेहा आणि शिवानी यांच्यासारख्या मुलींच्या शिक्षणाव्यतिरिक्त इतरही घटकांवर याचे विपरीत परिणाम होतात. "बिहारमध्ये गेल्या काही वर्षांत जननदर कमी झाला असला [२००५-०६ मध्ये ४ वरून २०१५-१६ मध्ये ३.४ तर २०१९-२० मध्ये ३] तरी ज्या मुलींचं कमी वयात लग्न होतं त्या गरीब आणि कुपोषित होण्याची व स्वास्थ्य सुविधांपासून वंचित राहण्याची संभावना जास्त असते," पूर्णिमा मेनन म्हणतात. त्या इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथे एक सिनियर फेलो असून त्यांनी शिक्षण, अल्पवयीन विवाह आणि महिला व मुलींचं स्वास्थ्य यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास केलाय.
मेनन यांच्या मते शाळा व लग्न तसेच दोन गरोदरपणातील अंतर या सर्व स्थित्यंतरांना पुरेसा वेळ द्यायला हवा. "आपण मुलींच्या आयुष्यात होणाऱ्या मोठ्या बदलांच्या दरम्यानचं अंतर वाढवायला हवं," त्या म्हणतात. "आणि मुली लहान असतानाच याची सुरुवात करायला हवी." हे आवश्यक अंतर ठेवण्यात धनलाभ हस्तांतरण योजना आणि कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन यांसारख्या सहाय्यकारी योजना मुलींना आपलं स्वप्न साकार होण्यात मदत करू शकतात, असं मेनन यांना वाटतं.
"आमचं असं मानणं आहे की मुलींचं लग्न लांबवलं तर त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता येतं आणि अधिक सुदृढ आयुष्य जगता येतं," किरण कुमारी म्हणतात. त्या समस्तीपूरच्या सराईरंजन तहसिलीत कार्यरत असलेल्या जवाहर ज्योती बाल विकास केंद्र या समाजसेवी संस्थेमध्ये कार्यवाहक आहेत. कित्येक बालविवाह थांबवून मुलीची इच्छा असल्यास घरच्यांना लग्न लांबवण्यासाठी राजी करण्यात कुमारी यांचा बराच वाटा आहे. "मुलींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि स्वतः निवडलेलं आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं, हे आमचं ध्येय आहे."
मार्च २०२० मध्ये महामारीमुळे टाळेबंदी लागल्यापासून पालकांना समजावणं कठीण जातंय, असं कुमारी यांना वाटतं. "पालक म्हणतात: 'आमची कमाई कमी होत चाललीये [आणि पुढे किती कमाई होईल याचाही भरवसा नाही], मुलींचं लग्न लावून आम्हाला निदान एक जबाबदारी तरी पूर्ण करायची आहे.' आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की मुली म्हणजे ओझं नसतात, उलट त्या तुमच्या कामीच येतील."
गेला काही काळ १६ वर्षीय गौरी कुमारीच्या हाती पुष्कळ वेळ होता. वय वर्षे ९ ते २४ अशा सात बहिणींपैकी ती सर्वांत मोठी असल्यामुळे तिच्या आईवडलांनी – तिचं कुटुंब देखील भुईया जातीचं आहे – याआधी बरेचदा तिचं लग्न जुळवलं होतं. दरवेळी त्यांचं मन वळवण्यात ती यशस्वी व्हायची. पण मे २०२० मध्ये नशिबाने तिची साथ दिली नाही.
समस्तीपूरमधील महौली दामोदर या तिच्या गावाबाहेर बस स्टँडजवळ एका बाजाराच्या गर्दीत माझ्याशी बोलताना गौरीने तिच्या लग्नाची हकीकत सांगितली: "आधी माझ्या आईला वाटत होतं की मी बेगुसराईमधल्या एका अंगठाछाप मुलाशी लग्न करावं, पण मला माझ्यासारखा शिकलेला नवरा हवा होता," ती म्हणते. "शेवटी मी आत्महत्या करण्याची धमकी दिली अन् जवाहर ज्योतीमधल्या सर मॅडम लोकांना बोलावलं तेंव्हा तिने नाद सोडला."
पण गौरीचा नकार आणि पोलिसांना बोलावण्याच्या धमक्या फार काळ चालल्या नाहीत. मागील वर्षी मे महिन्यात तिच्या घरच्यांनी कॉलेजमध्ये जाणारा एक मुलगा पसंत करून गौरीचं अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न लावून दिलं. टाळेबंदीमुळे मुंबईच्या ठोक बाजारांत रोजंदारी करणाऱ्या तिच्या वडलांना देखील हजेरी लावता आली नाही.
"मला या स्थितीत असल्याचा पश्चात्ताप होतो. मला खरंच वाटत होतं की मी शिकून मोठी होणार. पण मी अजूनही हार मानणार नाही. मी एक दिवस शिक्षिका होणार," ती म्हणते, "जेणेकरून मी तरुण मुलींना सांगू शकेन की त्यांचं भविष्य स्वतःच्याच हाती आहे."
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा
अनुवाद: कौशल काळू