भारत राऊत महिन्याला ८०० रुपये पेट्रोलवर खर्च करतात – स्वतःच्या मालकीचं पाणी वाहून आणण्यासाठी. मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ताकविकीतल्या इतरांचीही तीच गत आहे. ताकविकी आणि इतरही गावात घरटी एक माणूस फक्त एका कामासाठी जुंपला गेला आहे – जिथून मिळेल तिथून पाणी आणणे. उस्मानाबादच्या रस्त्यांवर दिसणारं प्रत्येक वाहन कुठून ना कुठून पाणी वाहून नेताना दिसतंय. यात सायकल, बैलगाड्या, मोटरसायकल, जीप, ट्रक, व्हॅन आणि टँकरचा समावेश आहे. याशिवाय, डोईवर, कमरेवर आणि खांद्यावर हंडे आणि कळशा भरून नेणाऱ्या बाया तर आहेतच. दुष्काळात बहुतेक जण कसंबसं जगण्यासाठी हे करतायत. मात्र काही – निव्वळ नफ्यासाठी.
उस्मानाबादच्या रस्त्यांवर दिसणारं जवळ जवळ प्रत्येक वाहन कुठून तरी पाणी वाहून नेतंय
“खरंय, घरटी एक माणूस तरी पूर्ण वेळ पाण्याच्या मागे आहे,” भारत सांगतात. त्यांची साडेपाच एकराची शेती आहे. त्यांच्या घरात पाण्याचं काम त्यांच्याकडे आहे. “मी आमच्या रानात बोअरवेलला जसं पाणी येईल तसं भरत राहतो. पण इथनं आमचं रान साडेतीन किलोमीटरवर आहे.” म्हणून भारत त्यांच्या हिरो होंडाला तीन प्लास्टिकचे हंडे अडकवतात आणि दिवसातून तीन फेऱ्या करतात. दर खेपेला साधारण ६० लिटर पाणी. “बोअरला जे काही थोडं पाणी येतं, ते भरायला मी जातो,” ते सांगतात. “पिकंच वाळून चाललीयेत.” कधीही पहा, या गावातल्या २५ मोटारसायकली पाण्याच्या खेपा करताना दिसतील.
ताकविकीचे भारत राऊत पाणी आणण्यासाठी प्लास्टिकचे हंडे हिरो होंडाला अडकवून नेतात
पाण्याची एक खेप ६ किलोमीटरहून जास्त. म्हणजे एका दिवसात २० किलोमीटर किंवा महिन्यात ६०० किलोमीटरहून जास्त अंतर. त्यासाठी अंदाजे ११ लिटर पेट्रोल लागतं. म्हणजे महिन्याला केवळ या कामासाठी त्यांना ८०० रुपयांचं पेट्रोल टाकावं लागतं. “पाण्याच्या वेळा एक आड एक आठवडा बदलत राहतात,” अजय निटुरे माहिती देतात. ते सरकारी पाणीसाठ्यावरून पाणी भरतात. “या आठवड्याला १० ते ६ वीज राहणार, त्यामुळे त्या वेळातच पाणी मिळणार. पुढल्या आठवड्यात, मध्यरात्रीपासून सकाळी १० वाजेपर्यंत.” निटुरे त्यांच्या सायकलला ७ हंडे अडकवून २-३ किलोमीटरच्या खेपा करतात. त्यात दोनदा ते गावातल्या दवाखान्यात जाऊन आलेत – “खांदे लई दुखतात.”
भूमीहीन मजुरांचे मालकांशी वाद होतात. “कधी कधी उशीर होतो. कधी कधी तर खाडाच करावा लागतो,” झामभार यादव सांगतात. “जनावरं चारायलाही उशीर होतो, ते वाईट आहे. पाच महिने झाले, असंच चालू आहे.” सकाळपासून त्यांनी सायकलला सहा घडे अडकवून पाण्याच्या दोन खेपा केल्या आहेत.
ताकविकीतल्या बायांच्या कष्टापुढे हे सगळं फिकं पडतं. दोन-तीन हंडे घेऊन दिवसातून किती तरी वेळा पाण्यासाठी या बाया पायी खेपा करताहेत. “दिवसातून ८-१० तासाचं काम आहे हे” पाणी भरायला गोळा झालेल्या बायांपैकी काही जणी सांगतात. त्या पाण्याचा पुनर्वापर कसा कसा करतात ते सांगतातः “आधी आंघोळीला पाणी घ्यायचं, त्याच पाण्यात कपडे धुऊन टाकायचे, आणि मग भांड्याला ते पाणी वापरायचं.” बाया जितकं अंतर चालतात ते मोटरसायकलने पुरुष जितकं अंतर कापतात त्यापेक्षा अनेकदा जास्त असतं. त्यांच्या खेपाही जास्त होतात आणि दिवसातून त्यांना १५-२० किलोमीटर तरी चालावंच लागतं. या सगळ्या ताणामुळे किती तरी जणी आजारी पडल्या आहेत.
आहे ते पाणी जास्तीत जास्त कामांसाठी कसं वापरायचं ते सांगताना ताकविकीच्या बायाः “आधी आंघोळीला पाणी घ्यायचं, त्याच पाण्यात कपडे धुऊन टाकायचे, आणि मग भांड्याला ते पाणी वापरायचं.”
फुलवंतीबाई ढेपेंसारख्यांची परिस्थिती अजूनच वाईट आहे. त्या दलित आहेत आणि किती तरी पाणवठ्यांवर त्यांना प्रवेश नाही. शासनाने अधग्रहित केलेल्या विहिरीवर, जिथून त्या पाणी भरतात, तिथेही, “मी रांगेत सगळ्यात शेवटी असते.”
पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा जनावरांवरही परिणाम होतोच. पाणी कमी आणि चाऱ्याची टंचाई, त्यामुळे “माझ्यासारख्या दुधाचा धंदा करणाऱ्यावर वाईट दिवस आलेत. माझ्या गाईंचे आणि माझे लई हाल चालू आहेत. दूध विकून दिवसाला ३०० रुपय मिळायचे,” सुरेश वेदपाठक सांगतात. “आता दूधच आटलंय, आधीपेक्षा निम्मेदेखील सुटत नाहीत.”
उस्मानाबादच्या सगळ्या अंतर्भूत समस्या ताकविकीत एका ठिकाणी पहायला मिळतील. या गावात ४,००० हून कमी लोक राहतात पण सिंचनासाठी इथे १,५०० हून जास्त बोअर आहेत. “आता आता ज्या पाडल्यात त्या साडेपाचशे फुटापेक्षा खोल गेल्या आहेत,” भारत राऊत सांगतात. या दुष्काळी भागातलं मुख्ये पीक आहे ऊस. “गेल्या वर्षी इथे ३९७ मिमि पाऊस पडला. इथलं सरासरी पाऊसमान ७६७ मिमि आहे,” उस्मानाबादचे जिल्हाधिकारी के एम नागरगोजे मीहिती देतात. “८०० मिमि हा काही फार वाईट पाऊस नाही. काही भागात तर ४०० मिमि पण पुरतो.”
पण जर २६ लाख टन उसाचं उत्पादन होणार असेल तर ८०० मिमि पाऊसही पुरणं शक्य नाही. कारण या उसाला एकरी १.८ कोटी लिटर पाणी लागतं. (ऑलिम्पिकचे साताहून जास्त स्विमिंग पल भरतील इतक्या पाण्याने) ताकविकीत पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक संचाचा वापर करणारे फार कमी शेतकरी आहेत.
जिल्हाधिकारी नागरगोजेंसमोर मोठा गंभीर पेच आहे. भूजल विभागात कामाचा अनुभव असल्याने त्यांना त्याची पूर्ण कल्पना आहे. जिल्ह्यातल्या सगळ्या पाणी प्रकल्पांमध्ये पाणी मृत साठ्यापर्यंत खाली गेलंय. या पातळीला पाणी आलं म्हणजे ते उपसताही येत नाही आणि त्याचा काही वापर करता येत नाही. तिथे फक्त मासे जिवंत राहू शकतात. जिल्ह्यातल्या लघु प्रकल्पांमध्ये आता साडे चौतीस लाख चौरस घन फूट पाणी साठा शिल्लक आहे. पण जिल्ह्याच्या १७ लाख लोकांना तो किती काळ पुरणार? त्यांच्याकडे आता दोन शहरं आणि ७८ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी १६९ टँकर आहेत. आणि असा जिल्हा जिथे खाजगी बोअरवेलची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.
“जानेवारीत भूजलाची पातळी सुमारे १०.७५ मीटर होती. या भागातल्या गेल्या पाच वर्षाच्या सरासरीपेक्षा ही पाच मीटरने कमी आहे,” नागरगोजे सांगतात. “काही तालुक्यात ती अजून खालावलीये.” यंदा या संकटाला हा जिल्हा तोंड देऊ शकेल याची त्यांना खात्री आहे. मात्र सध्याची पीक पद्धती भविष्यात असं संकट आलं तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मारक ठरणार याचीही त्यांना जाणीव आहे.
ताकविकीमध्ये उत्पन्न कमी होत चाललंय तसं कर्जाचा आकडा फुगत चाललाय. “इथला सावकारीचा दर महिन्याला ५ ते १० रुपये शेकडा असा आहे,” संतोष यादव सांगतात. (म्हणजे दर साल ६० ते १२० टक्के) यादवांनी स्वतः शेतात पाइपलाइन टाकण्यासाठी १० लाखाचा खर्च केलाय. आता सगळी लाइन कोरडी ठक्क पडलीये. आणि उन्हाळा तोंडावर आलाय. पण यादव म्हणतातः “त्याचा विचार करायला कुणाला वेळ आहे? आजचा दिवस कसा काढायचा त्यावर आमचं सगळं लक्ष आहे. एका वेळी एक दिवस इतकंच करू शकतोय आम्ही.”
उस्मानाबादच्या गावांमध्ये गल्लोगल्ली लोक दिवसाच्या कोणत्याही प्रहरी फक्त पाणी भरताना दिसतायत
एकीकडे दुष्काळामुळे किती तरी जण जगण्यासाठी धडपडत आहेत तर दुसरीकडे या टंचाईमुळे काही धंद्यांची भरभराट होत आहे. ठिकठिकाणी याचा प्रत्यत येतोय. “आम्ही दिवसभर नुसते फोनवर आहोत. ज्यांच्याकडे बोअर किंवा इतर कुठलं पाणी आहे त्यांच्याकडून पाणी विकत घ्यायची धडपड आहे सगळी,” समाजसेविका असणाऱ्या भारती थवले सांगतात. “पाणी विकणाऱ्याशी मी सौदा केला. १२० रुपयात ५०० लिटर पाणी तो मला देणार होता. पण रस्त्यात त्याला २०० रुपये देणारा भेटला आणि त्यानं त्याला पाणी विकलं. नंतर फोनवर फोन केल्यावर दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता त्याने माझ्याइथे पाणी आणून टाकलं.” या घटनेनंतर आता त्या शेजाऱ्याकडून पाणी विकत घेतायत.
सगळ्या जिल्ह्यात दिवस रात्र, पाण्याचा धंदा तेजीत आहे. टंचाईमुळे पाण्याचे दर वाढतच चाललेत. सरकारने ७२० विहिरी ताब्यात घेतल्या आहेत. विहिरीच्या मालकांना महिन्याचे १२,००० रुपये सरकार देतं. या विहिरींचं पाणी जनतेसाठी फुकट आहे. पण विहिरीपासूनचं अंतर आणि तिथली गर्दी प्रचंड आहे. त्यामुळे खाजगी पाणीवाल्यांची चलती आहे. त्यांच्याबरोबर तुम्ही लिटरनुसार घासाघीस करू शकता. पाचशे लिटरची किंमत २०० रुपयाच्या वर जाऊ शकते. पाणी कमी घेतलं तर दर जास्तच वाढतात. येत्या काही काळात ही सगळी परिस्थिती अजूनच चिघळणार आहे. प्रत्येक वसाहतीत कुणाकडे तरी बोअरवेल किंवा पाण्याचा काही तरी स्रोत आहे. आणि पाण्याच्या टंचाईत ते आपले हात धुऊन घेताहेत. इथे, पाणी पैशासारखं वाहतंय...
पूर्वप्रसिद्धी – द हिंदू , ६ मार्च २०१३
नक्की वाचाः टँकर आणि तहानेचं अर्थकारण
२०१४ मध्ये पी साईनाथ यांना एका लेखमालेसाठी वर्ल्ड मीडिया समिट ग्लोबल अवॉर्ड फॉर एक्सलन्स हे पारितोषिक मिळालं. हा लेख त्या लेखमालेचा भाग आहे.