जात्यावरच्या ओव्या प्रकल्पातल्या या सात ओव्या नांदगावच्या कुसुम सोनवणे आणि शाहू कांबळेंनी गायल्या आहेत . आणि यात आहे बाया - बायांमधली कधी कच्ची तर कधी पक्की मैत्री
तुझा माझा गं भावपणा मी तर तोडिते तो गं तुटंना
अशी रेशमाचा गं दोरा गाठ पडली ना गं सुटंना
त्या नणंदा भावजया होत्या, पण त्यांची मैत्री लग्नाच्या सोयरिकीपेक्षा पक्की होती.
“आमच्या ओव्या सगळ्यांना खूप आवडायच्या. मुळशीच्या इतर गावांमधले लोक आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला आंबेडकरांवरची गाणी गायला आम्हाला बोलवायचे.” ७० वर्षीय कुसुमबाई सोनवणे सांगतात. ओव्या गाणारी त्यांची सोबतीण शाहूबाई कांबळे आणि त्यांच्या मैत्रीबद्दल त्या बोलतात. दोघी जणी उखळात एकत्र धान्य कांडायच्या आणि ते काम करत असतानाच नव्या चाली रचायच्या. मग जात्यावर ज्वारी किंवा तांदूळ दळताना या नव्या चालींवर नव्या ओव्या रचायच्या. सप्टेंबर २०१७ मध्ये पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या नंदगाव मध्ये कुसुमताईंना आम्ही त्यांच्या घरी भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला या सगळ्या आठवणी सांगितल्या.
१९८० च्या दशकात जेव्हा गी पॉइटवँ आणि हेमा राइरकर यांचा गट महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये गेला तेव्हा कुसुमबाई आणि शाहूबाईंसारख्या बायांनी त्यांनी रचलेल्या ओव्या त्यांना दिल्या. यातल्याच काही जणी पुढे गरीब डोंगरी संघटनेच्या सदस्य झाल्या. पुणे जिल्ह्याच्या डोंगरी भागातल्या गरिबांची ही संघटना आहे. गी बाबा आणि हेमाताई, संघटनेचे सदस्य प्रेमाने त्यांना असंच म्हणायचे – आता हे दोघंही हयात नाहीत. या दोघांनी गरीब डोंगरी संघटनेच्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जाणीवजागृती केली, साक्षरतेचे वर्गही घेतले.
२५ मार्च २०१७ रोजी हेमा राईरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गरीब डोंगरी संघटनेचे काही सदस्य हेमाताईंच्या पुण्यातल्या बंगल्यावर त्यांच्या या दोन नेत्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जमले होते. त्यात मावळ तालुक्यातल्या मथाबाई भालसेन आणि बबाबाई लायगुडे व मुळशी तालुक्यातल्या कुसुमबाई सोनवणे आणि लीलाबाई कांबळे आल्या होत्या. या चौघी एकमेकींच्या सहाकारी आहेत आणि मैत्रिणीदेखील. त्या सांगतात, “आम्ही काही शाळा शिकलेलो नाही मात्र [गरीब डोंगरी संघटनेतल्या] कामाच्या अनुभवामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यामुळे आम्हाला ग्रामसभेत महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचं बळ आलंय.” बहुतेक वेळा पाण्याची टंचाई आणि टँकरची मागणी अशाच पद्धतीचे हे मुद्दे असतात.
फोटोसाठी त्यांना छानसं हसा असं सांगितल्यावर त्यांना भारीच गंमत वाटली.
८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आम्ही पारीमध्ये महिनाभर साजरा करतो. आणि म्हणूनच जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत आम्ही बायांमधल्या मैत्रीवरच्या सात ओव्या सादर करत आहोत. शाहूबाई आणि कुसुमबाई पहिल्या पाच ओव्या एकत्र गातात. शेवटच्या दोन शाहूबाईंनी एकटीने गायल्या आहेत. आणि त्यातल्या एकीत तर त्या कुसुमबाईंचं नावही घेतात.
या ओव्यांमध्ये मैत्रीसाठी भाऊपणा असा सुंदर शब्द वापरला आहे, बंधुभाव. मैत्रीत मीठ, शेपा किंवा ओवा कालवल्याचं रुपक दोघी मैत्रिणींमधल्या गैरसमजांवरचं आहे, कदाचित इतर कुणी कान भरल्यामुळे असे गैरसमज होत असावेत.
तुझा माझा भाऊपणा, असं दोघी जणी गातात. पण यात ओवा कुणी कालवला? एक मैत्रीण दुसरीला म्हणते, “आता अबोला सोड, आपण आपल्या गावी परतूया.” दुसऱ्या ओवीत त्या गातात, “आपल्या मैत्रीत मीठ कुणी कालवलं?” मग दुसरी विनवण्या करते, “तारूबाई, हा अबोला सोड, आणि बोल माझ्याशी.”
“आपल्या या मैत्रीला मी काय देऊ, चल सावित्रीबाई, दोघीत एक लवंग खाऊ,” दोघींमध्ये वाटून घेता येत नाही असं काहीच नाही असं यातनं सुचवायचंय. आणि अगदी कितीही प्रयत्न केला तरी त्यांची मैत्री काही तुटायची नाही कारण ती रेशमाच्या धाग्यासारखी आहे. तिची गाठ सुटता सुटत नाही.
पुढे त्या गातात, आपल्या मैत्रीत शेपा कुणी कालवल्या, शेपांची जशी एकदम उग्र चव लागते तसं मैत्रीत कधी कधी घडतं. मैत्रीतल्या अबोल्यामुळे एक मैत्रीण कष्टावली आहे आणि अबोल्याने येरझारा घालतीये.
शेवटच्या दोन ओव्यात शाहूबाई म्हणतात, आपल्यातली ही मैत्री आहे तशीच कायम टिकू दे. “आणि, कुसुमबाई, मी सांगते, जगाला काय बोलायचं ते बोलू दे.” आणि ही मैत्री पक्की होण्यासाठी कधी तरी वाड्यावर येऊन जायचं आवतनही ती मैत्रीण देते.
मैत्रीवरच्या या ओव्या ऐकाः
तुझा माझा ग भाऊ ग पणा कुणी कालविला ओवा
अशी आता ना माझी ग बाई सोड अबोला जाऊ गावा
तुझा माझा ना भावू ग पणा कुणी कालवील मीठ
बाई सांगते तारु ग बाई सोड अबोला बोल नीट
तुझा ना माझा ग भावपणा भावपणाला ग काय देवू
बाई सांगते सावित्राबाई एक लवुंग दोघी ग खाऊ
तुझा माझा ग भावपणा मी तर तोडीते तो ग तुटना
अशी रेशमाचा ग दोरा गाठ पडली ना ग सुटना
तुझा माझा ना ग भावपणा कुणी कालविल्या शेपा
अशी आताना माझी ग बाई अबोल्यानी घाली खेपा
तुझा माझा ना ग भावपणा कसा चालला तसा चालु दे
अशी सांगते कुसूमबाई जग बोलत ते बोलू दे
तुझा माझा ना भाव ग पणा भाऊपणाचा तगदा
अशी सांगते माझ्या ग बाई याव तु ग वाड्याला अेकदा
कलावंत – कुसुम सोनवणे
गाव – नांदगाव
तालुका – मुळशी
जिल्हा – पुणे
लिंग – स्त्री
जात – नवबौद्ध
वय – ७०
मुलं – २ मुलगे, २ मुली
व्यवसाय – भातशेती
कलावंतः शाहू कांबळे
गावः नांदगाव
तालुकाः मुळशी
जिल्हाः पुणे
जातः नव बौद्ध
वयः ७० (ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांचं गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झालं)
मुलं : दोन मुलं, दोन मुली
व्यवसायः शेती
दिनांकः या ओव्या आणि सोबतची माहिती ५ ऑक्टोबर १९९९ रोजी संकलित करण्यात आली. छायाचित्रं २५ मार्च २०१७ रोजी पुण्यात आणि २५ मार्च २०१८ रोजी नांदगाव इथे घेण्यात आली.
पोस्टरः सिंचिता माजी
अनुवादः मेधा काळे