“ए कोमल! काय माल आहे!” “ए लाल, छान दिसते!” माणसं ओरडतायत. १५ वर्षांची कोमल, जी स्टेजवर नाचतीये, तिला आपल्या नावावरून किंवा कपड्याच्या रंगावरून होणाऱ्या शेरेबाजीची सवयच झाली आहे. “काही मर्द तर माझं लक्ष खेचून घेण्यासाठी स्पर्धाच करतात. जर मी एखाद्याकडे नजर फिरवली, तर त्याचे मित्र ओरडतात ‘अगं त्याच्याकडे नको बघू, त्याची मैत्रीण आहे! आमच्याकडे बघ गं!", ती म्हणते.

मंगला बनसोडे आणि नितीन कुमार तमाशा मंडळात नाचणाऱ्या स्त्रियांमध्ये देखील जमलेल्या गर्दीतून जोरदार वाहवा मिळवण्यासाठी चढाओढ लागलेली असते.  त्या माणसांना मोठ्याने शिट्टी वाजवायला आणि शेरेबाजी करायला उकसवतात, जेमतेम १८ वर्षांची काजल शिंदे म्हणते. "अगं खाल्लं नाही का.. बरी आहेस नं?" ते चिडवतात. "अगं आम्हाला काही ऐकू येत नाही!" आपल्या कानांना हात लावून ते इशारे करतात.

काजल ही कोमलप्रमाणेच एक प्रमुख नर्तकी आहे. दोघीही ज्येष्ठ तमाशा कलाकार मंगला बनसोडे यांच्या फडात काम करतात. सोबत १५० इतर कलाकार आणि कामगार. महाराष्ट्रातील गावागावात अजूनही तमाशा ही लोकप्रिय लोककला आहे. सप्टेंबर ते मे या हंगामात हे फड दररोज नव्या गावी जातात. खेळ रात्री ११ वाजेपासून कधीकधी पहाटेपर्यंत लांबतात आणि स्टेज खेळ सुरु होण्याच्या अगदी दोन तास आधी उभारलं जातं, कार्यक्रम संपताच स्टेज उतरवलं जातं. मंगलाताईंचा फड यशस्वी फडांपैकी एक आहे; बाकीच्या फडांना मात्र घटत चाललेले प्रेक्षक आणि आटत चाललेला नफा पहावा लागत आहे. (बघा: 'तमाशा एका तुरुंगासारखा आहे, ज्यातून मला कधीही सुटका नकोय आणि ’'तमाशाः नव्या ढंगात पण अजूनही रंगात' )

Audience appreciation determines a tamasha's success  – to generate it, the female dancers must perform vigorously, listen to lewd comments, pretend to like the catcalls
PHOTO • Shatakshi Gawade
Audience appreciation determines a tamasha's success  – to generate it, the female dancers must perform vigorously, listen to lewd comments, pretend to like the catcalls
PHOTO • Shatakshi Gawade

प्रेक्षकांकडून जेवढी वाहवा मिळेल , तेवढा तमाशा यशस्वी मानला जातो - ही वाहवा मिळवण्यासाठी नाचणाऱ्या बाया जोरजोरात नाचतात , असभ्य शेरेबाजी ऐकून घेतात आणि वर ते सगळं त्यांना आवडतंय असंही दाखवावं लागतं

त्यांच्या फडातील खेळादरम्यान, स्टेज रंगीबेरंगी दिव्यांनी व भल्यामोठ्या स्पीकर्सनी नटलेला असतो. स्टेजच्या समोर लावलेली यंत्रं गाण्यातील मोक्याच्या क्षणी आग ओकतात. काही गाण्यांवर नाचणाऱ्या स्त्रिया स्टेजच्या कोपऱ्यात लावलेल्या खांबांवर चढतात. “कधीकधी खांबाला झटका लागतो, त्यामुळे आम्हाला जरा सांभाळून राहावं लागतं,” कोमल सांगते, ती अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेवगाव गावी राहते.

तमाशाच्या फडाचं यश तिथे होणाऱ्या तिकीट विक्रीवर अवलंबून असतं- जी की प्रेक्षकांकडून मोठमोठ्यानं मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून असते. "आम्ही त्यांना मोठ्यानं शिट्ट्या वाजवायला लावतो, कारण जर गर्दीला मजा आली, तरच आमच्या तमाशात काही दम येतो", काजल म्हणते.

लोकप्रिय गाण्यासाठी जेव्हा प्रेक्षकांतून “वन्स मोअर” चा ओरडा ऐकू येतो, तेव्हा फडाला ती मागणी मान्य करावीच लागते. “आम्ही लोकांची सेवा करतो. त्यांना हसवतो, त्यांचं मनोरंजन करतो. त्यांच्या चिंता विसरून जायला मदत करतो," मंगलाताई, आता ६६, म्हणतात.

यासाठी नाचणाऱ्या स्त्रियांना आवेशाने नाचावं लागतं, असभ्य शेरेबाजी ऐकावी लागते आणि आवडत नसतानाही ती त्यांना आवडते असं दाखवावं लागतं.

A tent backstage is usually the 'green room' to get ready. Right: At 66, troupe owner and veteran artist Magalatai Bansode still performs and draws crowds
PHOTO • Shatakshi Gawade
A tent backstage is usually the 'green room' to get ready. Right: At 66, troupe owner and veteran artist Magalatai Bansode still performs and draws crowds
PHOTO • Shatakshi Gawade

स्टेजच्या मागे उभा केलेला एक तंबू हीच सहसा तयारी करण्यासाठी ' ग्रीन रूम ' असते. उजवीकडे: वयाच्या ६६व्या वर्षीसुद्धा फडाच्या मालकीण आणि ज्येष्ठ कलावंत मंगलाताई बनसोडे नाचतात आणि गर्दी खेचून आणतात

प्रेक्षकांसोबत होणारा असला संवाद कधीकधी अंगलट येऊ शकतो. खेळ सुरु होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर जेव्हा माणसं जबरदस्ती करू पाहतात, तेव्हा कोमल त्यांना तिचं लग्न झालं असल्याचं सांगते. “कधीकधी तर मी सांगते की मी पाच मुलांची आई आहे,” ती हसून सांगते. कोमलचे वडील फडात प्रबंधक म्हणून काम करतात आणि तिची आई याच फडासोबत काम करणारी कलावंत होती, जिने मागल्याच वर्षी काम थांबवलंय. कोमल, ७ वर्षांची असताना तिने स्टेजवर भगवान कृष्ण म्हणून काम केलं, अन् १२ वर्षांची होताच शाळा सोडून पूर्णवेळ काम करायला घेतलं. तिची बहीण रमा, २८, सुद्धा याच फडात नर्तकी आहे.

जर एकच माणूस तमाशाचा कार्यक्रम पाहून बऱ्याच खेळांना हजेरी लावत असेल, तर मात्र तो चिंतेचा विषय आहे हे कोमल, रमा आणि इतर नाचणाऱ्या जाणून आहेत. कधी कधी पुरुष या सेल्फी काढण्यासाठी या पोरींच्या मागे लागतात. अशा वेळी मग अंगचटीला येणाऱ्यांना दूर ठेवावं लागतं. “आम्ही अशी वेळ येऊ देण्याचं टाळतो आणि सेल्फीची मागणी तर मुळीच मान्य करत नाही,” कोमल सांगते. “जर एखादा माणूस मागेच लागला, तर आम्हाला मॅनेजरला बोलवावं लागतं.”

काही ' असभ्य ' काम नाही

यासोबतच स्त्रिया तमाशामुळे त्यांना मिळालेल्या आर्थिक स्वातंत्र्याचा आणि कलावंत म्हणून मिळालेल्या मान्यतेचा उल्लेख करतात. “मला नाचायला फार आवडायचं,” कोमल सांगते, “आणि एकदा मला शाळेत नाचाच्या स्पर्धेत पहिलं पारितोषिकही मिळालं होतं.” तमाशाच्या या धंद्यात, काजल सांगते तिला मजा येतीये - कलावंतांना कला सादर करण्याची संधी तिला आवडते.

१५० लोकांच्या फडात, जवळपास २५ मुली किंवा बायका आहेत. तमाशाची सुरुवात पुरुषांनी सादर केलेल्या एका गणाने होते, नंतर स्त्रिया एक गवळण - कृष्ण आणि गोपिकांमध्ये होणारा संवाद दाखवणारा नाच - सादर करतात. गवळण सादर केल्यावर शिवलेली तयार नऊवारी नेसलेल्या या स्त्रिया आपल्या तंबूत ('ग्रीन रुम मध्ये) परत जाऊन पुढील नाचासाठी तयार होतात. प्रत्येक कलावंत ७-८ गाण्यांवर सहाय्यक किंवा मुख्य नर्तकी म्हणून ठेका धरते. बहुतेक सगळी गाणी लोकप्रिय बॉलीवूड गाणी असतात, अध्ये मध्ये काही मराठी चित्रपट गीतं आणि काही लोकप्रिय हरयाणवी/भोजपुरी गाणी टाकली जातात.

In Nayarangaon village: tents and a stage put up a few hours before the show become work spaces, but offer the women little privacy
PHOTO • Shatakshi Gawade

नारायणगावात: खेळ चालू होण्याच्या काही तासांपूर्वी उभारलेले तंबू आणि स्टेज हेच त्यांचं कामाचं ठिकाण असतं , पण त्यात स्त्रियांना पाहिजे तेवढा खाजगीपणा मिळत नाही

गावातील बऱ्याच लोकांना तमाशातील जीवनशैली ‘असभ्य’ वाटते आणि फडावर काम करणाऱ्या स्त्रियांना ते खालच्या नजरेत पाहतात. "जेव्हा गर्दीतून आम्हाला कोणी ‘रंडी’ किंवा ‘छिनाल’ [वेश्यांकरिता वापरले जाणारे अपशब्द] म्हणून शिव्या घालतं, तेव्हा आम्हाला न चिडता त्यांना शांत करावं लागतं," ४३ वर्षीय शारदा खंडे म्हणतात. त्या सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील धुळगावच्या कलावंत आहेत. “आम्ही त्यांना म्हणतो, ‘तुम्हाला आया-बहिणी न्हाईत का, आम्हाला असं घालून पाडून कशापायी बोलता?’ तर म्हणतात, ‘आमच्या आया -बहिणी तुमच्यासारख्या नाहीत. तमाशात काम करण्यापरीस दुसरं चांगलं काही काम भेटत न्हाई का?' मग आम्ही उलटून म्हणतो की हे पण एक कामच आहे.”

दमवून टाकणारं वेळापत्रक आणि आठ महिन्याची बांधिलकी स्त्रियांना जरा अवघडच जाते, विशेष करून ज्यांना लहान मुलं आहेत त्यांना तर नक्कीच. “अशा मर्यादा असताना देखील ज्या बायका येतात त्यांना आम्ही जास्त पगार देतो,” अनिल बनसोडे म्हणतात. ते मंगलाताईंचे पुत्र असून त्यांच्या फडाचे व्यवस्थापक आहेत. मंगलाताईंच्या फडात काम करणाऱ्या स्त्रियांना २०१७-१८ मध्ये १०,००० रुपये महिना पगार मिळत असे. सादर केलेल्या नाचांची संख्या, अनुभव आणि कौशल्य यांच्या जोरावर सहाय्यक कलावंतांना मिळणारा सर्वाधिक पगार या वर्षाकरिता १६,००० रुपये महिना आहे.

Jyotsna
PHOTO • Shatakshi Gawade
Jyotsna (left) and Kajal Shinde (right, in blue) at a stop in Karavadi village of Satara district: the sisters support their family of eight with their earnings
PHOTO • Shatakshi Gawade

ज्योत्स्ना (डावीकडे) आणि काजल शिंदे (उजवीकडे , निळ्या कपड्यांत) सातारा जिल्ह्यातील करवडी येथील एका थांब्यावर. दोघी बहिणी आपल्या कमाईतून आपल्या आठ लोकांचं कुटुंब सांभाळतायत

बरेचदा, कुटुंबासाठी हीच खात्रीची कमाई असते. काजल शिंदे, प्रमुख नर्तकींपैकी एक आणि तिची बहीण ज्योत्स्ना, २८, दोघी आपलं आठ लोकांचं कुटुंब तमाशाच्या कमाईतून पोसतात. त्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील (बत्तीस) शिराळा या गावात राहतात. काजलने सहा वर्षांपूर्वी तमाशात नाचणं सुरु केलं, तेव्हा ती फक्त १२ वर्षांची होती. आणि ज्योत्स्नाने काही वर्षांपूर्वी तिचा नवरा तिला सोडून गेल्यावर. तिच्या कमाईतून ती तिचा १० वर्षांचा मुलगा अन् ७ वर्षांच्या मुलीचा सांभाळ करते. ही दोघंही आपल्या आजीजवळ राहतात.

"माझी मुलगी तान्ही होती, अंगावर पीत होती, तेव्हा मला तिला आईपाशी ठेवून फडावर यावं लागलं," ज्योत्स्ना सांगते. आपल्या कुटुंबातील सगळे स्थिर होईपर्यंत लग्न न करण्याचं काजलने ठरवलं आहे. जेव्हा तिने पहिल्यांदा आपल्या आईजवळ फडावर काम करण्याची इच्छा बोलून दाखवली, तेव्हा तिची आई या सगळ्याच्या विरोधात होती. पण, काजलने हे क्षेत्र असभ्य नसल्याचं तिच्या आईला पटवून दिलं.

तमाशा कलावंत वर्षातील २१० दिवस सप्टेंबर ते मे दरम्यान प्रवास करत असतात. या काळादरम्यान, गावोगावी बसने प्रवास करताना झोप घेत, ते आपलं बिढार घेऊन फिरत असतात. सार्वजनिक शौचालय उपलब्ध नसल्यास स्त्रियांना उघड्यावर अंघोळीला जावं लागतं. शारदा म्हणते की तमाशाचा फड एक परिवारच आहे, आणि “आम्ही बाया कपडे बदलत असलो की माणसं एकतर तंबूच्या बाहेर जातात. नाहीतर उघड्यावर कपडे बदलायचे असले की ते दुसरीकडे नजर वळवतात. पण काही लोक मात्र आमच्याकडेच पाहत राहतात...”

“आम्ही तंबूत कपडे बदलत असताना बरेचदा गावकरी आत डोकवायचा प्रयत्न करतात,” कोमल म्हणते. “मग त्यांना शिव्याशाप देत आम्हाला त्यांना हाकलून लावावं लागतं. जर त्यांनी ऐकलं नाही, तर मी पायातली चप्पल त्यांच्यावर फेकते.” जर प्रकरण हाताबाहेर गेलं, तर मग या बाया आपल्या पुरुष सहकाऱ्यांना किंवा व्यवस्थापकाला किंवा खेळादरम्यान उपस्थित असलेल्या पोलिसांना पाचारण करतात.

प्रवासादरम्यान स्त्रियांची मासिक पाळी चालू असेल तर शारदा म्हणतात, “आम्ही एखादं सार्वजनिक शौचालय शोधून  कापडं बदलतो.” कोमलही सांगते की पाळीच्या दिवसांत तिला घरची फार आठवण येते. तिला कसलाच खाजगीपणा मिळत नाही, पण कसंबसं ती अडचणीचे दिवस पार करते. रमा, तिची मोठी बहीण म्हणते की, तमाशात एखादी महत्त्वाची भूमिका असल्यास त्यांना पाळीमुळे पोटात – पायात गोळे जरी येत असेल तरी काम करावंच लागतं. “आम्ही एकाहून अधिक गाण्यात असलो किंवा प्रमुख भूमिकेत असलो, तर पाळीच्या काळात आम्हाला साधं टेकताही  येत नाही; कितीही आजारी असलो तरी, आम्हाला नाचावं लागणारच,” ती म्हणते.

The troupe travels for 210 days a year between September and May. During this time they live out of suitcases and sleep on the bus rides from one village to another
PHOTO • Shatakshi Gawade
The troupe travels for 210 days a year between September and May. During this time they live out of suitcases and sleep on the bus rides from one village to another
PHOTO • Shatakshi Gawade

तमाशाचा फड वर्षातील २१० दिवस सप्टेंबर ते मे दरम्यान फिरतीवर असतो. या काळादरम्यान आपलं बिढार सोबत आणि गावोगावी प्रवास करत असताना बसमध्ये मिळते तेवढीच काय ती झोप

रमा आणखी एक प्रमुख नर्तिका असून तिला दोन वर्षांची मुलगी आहे, भक्ती. “ती पोटात असताना लावणीचा हंगाम  संपेस्तोवर मी काम केलं. दोन हंगामाच्या मध्ये असलेल्या सुट्ट्यांमध्ये तिचा जन्म झाला. दीड महिना होत नाही तो मी पुन्हा उभी राहिले,” ती म्हणते. मागल्या वर्षापर्यंत याच फडातील एक गायिका असणारी रमाची आई, विमल, मुलीचा सांभाळ करायला मदत करीत असे. “पण या वर्षी आई घरी बसल्यामुळं भक्तीची काळजी घेणं कठीण होऊन बसलं आहे. मी स्टेजवर निघाले की, तिचं रडणं सुरू होतं. मग तिला सोडून जायचं मन होत नाही. मला पाहिल्याशिवाय तिचं रडणं थांबत नाही,” रमा सांगते.

जर का एखाद्या बाळाचे वडीलही त्याच फडावर काम करत असतील, तर पोरं सांभाळणं जरा सोपं होतं. कारण, एक जण स्टेजवर असताना दुसऱ्याला त्याची काळजी घेता येते.

तमाशाचं गाणं आणि बाळाचा पहिला टाहो - एकाच स्टेजवर

तमाशाच्या गाजलेल्या दंतकथांपैकी एक म्हणजे म्हणजे ज्येष्ठ कलावंत विठाबाई नारायणगावकर यांची स्टेजवरच झालेली प्रसूती. स्टेजवर नाचत असतानाच त्यांना वेणा येऊ लागल्या आणि त्यांनी आपल्या मुलीला त्यांच्या प्रसंगांच्या मध्ये जास्त गाणी घ्यायला सांगितली. आणि मग काय: मागे, तंबूत जाऊन त्यांनी बाळाला (मंगलाताईंचे भाऊ कैलास सावंत) जन्म दिला, त्याच्यावर एक गोधडी पांघरली आणि उरलेला तमाशा सादर करायला परत स्टेजवर आल्या.

मंगलाताई, विठाबाईंची सर्वांत थोरली मुलगी, यांचाही अनुभव असाच. गोष्ट १९७६ मधील, त्यांचा सर्वांत धाकटा मुलगा नीतिन याच्या जन्माची आहे. "आम्ही ऐतिहासिक वग (लोकनाट्य) सादर करीत होतो," त्या सांगतात. "आम्ही सादर करत असलेल्या लढाईच्या प्रसंगातच माझ्या नवऱ्यानं मला इशारा करून काय घडत आहे, ते सांगितलं." बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या होत्या.

dancer Rama Dalvi's mother Vimal
PHOTO • Shatakshi Gawade
Makeshift cradles are made from sarees for babies to sleep in backstage during tour stops
PHOTO • Shatakshi Gawade

मासिक पाळी , मुलांची देखभाल , आजारपण , सारं काही काम करता करताच हाताळलं जातं. डावीकडे: (मागील वर्षापर्यंत फडावर गायिका असलेल्या) रमा दळवी यांची आई विमल यांनी पोर सांभाळलंय. उजवीकडे: लुगडी बांधून केलेल्या झोळ्यांमध्ये पोरांना झोपवलं जातं

“मी त्या प्रसंगात इतकी गुंगले होते की काय होतंय तेच मला कळेना,” त्या म्हणाल्या. “जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मला गरगरायला लागलं. मी पडद्यामागे गेले आणि गावातल्या काही बायांनी मला बाळंत व्हायला मदत केली. बाळाला जन्म दिला, अन् आपला पोशाख चढवून मी स्टेजवर गेले - पण पाहते तो काय, माझा मान राखण्यासाठी लोक घरी परतले होते.”

भारती सोनावणे, ५३, मंगलाताईंची धाकटी बहीण आणि  फडावरील एक गायिका पुढे सांगतात, “माझ्या तिन्ही मुलांना जन्म दिल्याच्या दोन आठवड्यातच मी परत उभी राहिले. माझ्या आईप्रमाणेच, मी पोरं जन्मली म्हणून कधी सुट्ट्या घेतल्या नाहीत.”

रोजचा प्रवास, त्यात कार्यक्रमाच्या आणि खाण्यापिण्याच्या ठरलेल्या वेळा नाहीत, अशाने फडावरील लोकांच्या तब्येतीवर चांगलंच शेकतं. “कोणी आजारी असेल, तर फक्त सकाळीच दवाखान्यात जात येतं. रात्री आम्हाला स्टेजवर तयार राहावं लागतं,” रमा म्हणते. मागल्या वर्षी जेव्हा चिमुकली भक्ती आजारी होती, तमाशाचा फड एकाच गावी दोन दिवसांकरिता लागला होता. “ती दवाखान्यात होती आणि तिला सलाईन लावावी लागली होती. दिवस तिच्याजवळ काढायचा अन् रात्री स्टेजवर तमाशा सादर करायचा असं चालू होतं,” रमा म्हणते.

रमाने भक्ती मोठी झाल्यावर तिला घरीच ठेवायचं ठरवलं आहे. “तिनं तमाशात काम करावं असं मला अजिबात वाटत नाही. कारण, आजकालची लोकं जास्तच वाह्यात होऊ लागली आहेत. काही वर्षांनंतर तर काय बघायला लागेल कुणास ठाऊक?”


अनुवाद: कौशल काळू

Vinaya Kurtkoti

வினயா குர்த்கோட்டி நகல் ஆசிரியர் மற்றும் புனேவைச் சேர்ந்த சுதந்திர பத்திரிகையாளர் ஆவார். இவர் கலை மற்றும் கலாச்சாரம் பற்றி எழுதுகிறார்.

Other stories by Vinaya Kurtkoti
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo