हे झाड त्यांच्या आजोबांनी लावलंय. “माझ्याहून वयस्क आहे हे,” झाडाच्या सावलीत बसलेले महादेव कांबळे सांगतात. आता ओसाड झालेल्या त्यांच्या दोन एकर आमराईत एवढं एकच झाड उरलंय.
पूर्व महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्याचे चारदा खासदार राहिलेले आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारात गृह राज्य मंत्री असणाऱ्या हंसराज अहिर यांच्या विरोधात इथले गावकरी यंदा ११ एप्रिलला मतदान करणार आहेत. ते का याचं हे एकुलतं झाड द्योतक आहे.
कांबळेंच्या राईतली बाकी सगळी झाडं कोळसा खाणीसाठी त्यांची जमीन संपादित केली तेव्हा तोडून टाकण्यात आली. गेल्या दहा वर्षांत इथे सुरू झालेल्या अनेक प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत बारंज मोकासा मधल्या जमिनी, घरं संपादित केल्याने लोकांच्या उपजीविका उद्ध्वस्त झाल्या आहेत.
आणि इथल्या १८०० रहिवाशांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे – प्रकल्पासाठी बारंज मोकासाचं संपादन तर करण्यात आलं मात्र लोकांचं पुनर्वसन मात्र करण्यात आलेलं नाही.












