आमच्यासारखा तोही अचंबित झाला होता.

आम्हाला प्रश्न पडला होताः त्या गवताच्या भाऱ्यावर, एवढ्या उंचावर त्याने सायकल कशी काय बुवा अडकवली असेल? आणि बहुतेक, त्याच्या मनातला प्रश्न असणारः गाडीच्या खिडकीतून अर्धा देह बाहेर काढून, जमिनीला जवळपास समांतर वाकून हा कोण वल्ली त्याचा फोटो काढतोय (आयफोन ३एस).

२००९ सालचा ऑक्टोबर महिना होता आणि आम्ही आंध्र प्रदेशातल्या कृष्णा आणि गुंटुर जिल्ह्याच्या मधे कुठे तरी चाललो होतो. आम्हाला सुरुवातीला तो दिसला तेव्हा काही तरी विचित्र वाटत होतं. वरती एक सायकल आणि त्याच्याही वर एक माणूस बसलेला. गवताचा भारा इतका प्रचंड की कोणत्या वाहनावर तो लादलाय तेही कळायला मार्ग नाही. नंतर कळलं की ती ट्रॅक्टरची ट्रॉली होती.

जसं आम्ही जवळ गेलो तसं आमच्या लक्षात आलं की त्या गवताच्या भाऱ्यातून एक छोटा पण मजबूत असा बांबू डोकावत होता. तुम्हालाही तो छायाचित्रात दिसत असेल. त्याच्यावरच सायकल बांधली किंवा लटकवली होती – दोरीचा मात्र पत्ता नाही. गावातल्या कुठल्याशा गल्लीत ही गाडी वळण्याआधी या भन्नाट भाऱ्याचा फोटो घ्यायचा तर खिडकीतून काहीही करून बाहेर वाकून फोटो घ्यायला लागणार होता. त्यानंतर आम्ही एक पूल ओलांडला आणि आमची वाहनं विरुद्ध दिशांना पांगली – आम्ही फोटो आला का ते पाहण्यात मग्न झालो आणि ट्रॅक्टर डळमळत वळला तेव्हा वरच्या त्याने मात्र आधाराला सायकल नाही, गवत पकडलं.

अनुवादः मेधा काळे

பி. சாய்நாத், பாரியின் நிறுவனர் ஆவார். பல்லாண்டுகளாக கிராமப்புற செய்தியாளராக இருக்கும் அவர், ’Everybody Loves a Good Drought' மற்றும் 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom' ஆகிய புத்தகங்களை எழுதியிருக்கிறார்.

Other stories by P. Sainath