सईद घनी खान त्या दिवशी जवळ जवळ कोसळलेच. आपल्या रानात पिकावर फवारणी करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. ते फवारत असलेल्या कीटकनाशकाच्या वाफा नाकात गेल्याने त्यांना गरगरायला लागलं. “तेव्हाच माझ्या मनात विचार आलाः मी हे काय करतोय? मलाच जर असा त्रास होतोय म्हणजे मी असली कीटकनाशकं फवारून पिकवलेला भात खाणाऱ्यांना मी विषच खाऊ घालतोय. हे थांबवायला पाहिजे,” ते सांगतात.
१९९८ साली हा साक्षात्कार झाल्यापासून घनी यांनी रासायनिक कीटकनाशकं आणि खतं वापरणं पूर्णपणे थांबवलंय. आणि आता ते केवळ देशी वाण लावतात. “माझे वडील आणि इतर वयस्क नातेवाइक मंडळींबरोबर मी शेतात जायचो. ही मंडळी बरीच पिकं घ्यायची, मात्र त्यात देशी वाणांचं प्रमाण कमीच होतं,” ते सांगतात.
मंड्यामधे जैविक पद्धतीने देशी वाण लावणाऱ्यांची संख्या १० हून कमी असेल, कर्नाटकाच्या मंड्या जिल्ह्यातल्या किरुगावलु गावातले ४२ वर्षीय घनी सांगतात. या जिल्ह्यात ७९,९६१ हेक्टरवर भाताचं उत्पादन घेतलं जातं. “देशी वाणाचं महत्त्व कमी व्हायला लागलं कारण हे वाण सावकाश वाढतं आणि इतका काळ थांबल्यानंतरही पीक [कधी कधी] कमी येतं. आणि तुम्हाला पिकापेक्षा तणच जास्त दिसेल,” ते सांगतात.
अनेक शेतकऱ्यांच्या हे माथी मारलं होतं की संकरित बियाण्यांमुळे कमी काळात पण सातत्याने जास्त उत्पादन मिळेल. आणि कधी कधी तसं झालंही – सुरुवातीचा काही काळ. या लागवडीसाठी अर्थातच रासायनिक खतं, कीटकनाशकं आणि पाण्याचा अधिक वापरही होतो, देशी वाणांचे समर्थक सांगतात. कालांतराने उत्पादन घटत गेलं तरी खर्च मात्र वाढत गेला आणि आरोग्यावर तसंच शेताच्या अर्थकारणावरचे परिणामही समोर यायला लागले.
भाताचं देशी वाण हळूहळू लोप पावत चाललंय हे लक्षात आल्यानंतर घनी यांनी १९९६ मध्ये वेगवेगळं देशी वाण गोळा करून जतन करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी ४० वाणांचं बी गोळा केलं होतं. हळू हळू असं बी गोळा करण्याचा त्यांचा उत्साह वाढत गेला आणि आता त्यांच्याकडे भारतभरातल्या ७०० देशी वाणांचा संग्रह आहे. हे असं विविध प्रकारचं बी गोळा करण्यासाठी घनी वेगवेगळ्या राज्यातल्या - छत्तीसगड, केरळ, महाराष्ट्र, ओदिशा, पंजाब, तमिळ नाडू आणि पश्चिम बंगाल - शेतकऱ्यांबरोबर एक प्रकारच्या देवघेव पद्धतीचा अवलंब करतात.
त्यांच्या घरी – बडा बाग इथे दारातून शिरल्या शिरल्याच त्यांचा हा छंद तुमचं लक्ष वेधून घेतो. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, तीन मुलं आणि भावाचं कुटुंब असे सगळे इथे राहतात. भिंतीला लागून ठेवलेल्या फडताळांमध्ये काचेच्या बरण्यांमध्ये वेगवेगळ्या साळी नीट मांडून ठेवल्या आहेत तर भिंतीवर ओंब्या चिकटवून ठेवल्या आहेत. सोबत या वाणाबद्दलचे तपशील येणाऱ्या पाहुण्यांच्या माहितीसाठी – राज्यभरातून येणारे जिज्ञासू शेतकरी, कृषीशाखेचे विद्यार्थी आणि बडा बागला येणारे इतरही अनेक - नीट लिहून ठेवले आहेत . भारतातल्या वैविध्यपूर्ण साळींच्या दुनियेत जणू एक फेरफटकाच आहे हा.
“माझं सगळा भर विविध वाण जतन करण्यावर आहे, त्यांच्या विक्रीतून नफा कमवण्यावर नाही,” घनी सांगतात. ज्यांना जैविक पद्धतीने या साळी लावायच्या असतील त्यांना माफक किंमतीत ते बी विकतात.
एका एकरावर साळी लावायच्या तर ८,००० ते १०,००० रुपये खर्च येतो, ते सांगतात. संकरित बियाण्यापेक्षा कमी पिकलं तरी देशी वाण लावणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता तशी कमीच असते. “रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेल्या संकरित वाणापेक्षा जैविक पद्धतीने पिकवलेल्या भाताला बाजारात २०-४० टक्के जास्त भाव मिळतो,” ते सांगतात.
देशी वाणामध्ये औषधी गुणही आहेत, घनी सांगतात. उदा. ‘नवारा’ नावाचं एक वाण संधीवात आणि सांधेदुखीवर उपयुक्त आहे, तर ‘करिगीजिविली आंबेमोहोर’ बाळंतिणीचं दूध वाढण्यासाठी वापरला जातो. ‘सन्नकी’ नावाचं वाण लहान मुलांमधल्या जुलाबावर उपकारक आहे तर ‘महाडी’ नावाचा भात हाडं मोडली असली तर प्राण्यांना खाऊ घातला जातो.
आणि तमिळ नाडूमध्ये ‘मप्पिलाई सांबा’ नावाचं एक भाताचं वाण आहे जे नवऱ्या मुलाला शक्ती वाढवण्यासाठी दिलं जातं. या राज्याच्या काही भागात अशी परंपरा आहे की नवऱ्या मुलाने त्याची ताकद सिद्ध करण्यासाठी मोठी शिळा उचलून दाखवायची असते. या भातामुळे हा पराक्रम करण्याची शक्ती त्याला प्राप्त होते असा समज आहे.
घनी यांच्या घरातल्या भिंतीवर यातले काही तपशील – या साळी कुठल्या प्रदेशात पिकवल्या जातात, चवीतला फरक, त्यांचे औषधी गुण – त्या त्या वाणाखाली लिहिलेले आहेत. “देशी वाणांची त्यांची स्वतःची वैशिष्ट्यं आणि गुण असतात. त्यांचा आकार, आकारमान आणि रंग वेगवेगळा असतो.”
घनी यांना त्यांच्या वडलांकडून वारसा हक्काने प्राप्त झालेला बडा बाग मंड्यातल्या १६ एकर रानात आहे. इथे हे कुटुंब भात, आंबा आणि भाजीपाला पिकवतं आणि पशुधन पाळतं. घनी यांची पत्नी, सईदा फिरदोस, वय ३६ याही देशी वाण जतन करण्याच्या प्रयत्नात आपल्या पतीला मदत करतात. त्या टाकाऊ शेतमालापासून भिंतीवर टांगण्याच्या वस्तू, माळा आणि दागिने तयार करतात आणि येणाऱ्या पाहुण्यांना किंवा गावातल्या दुकानांमध्ये विकतात.
हे वाण जतन करण्याचं केंद्र तर आहेच, पण त्यासोबत त्यांचं घर आता विद्यार्थी आणि अभ्यागतांसाठी साळींबद्दलच्या आश्चर्यकारक बाबींची माहिती देणारं एक अनौपचारिक केंद्र बनलं आहे. घनींनी इतकं ज्ञान गोळा केलं आहे की आता त्यांना गावात ‘शेतकरी वैज्ञानिक’ म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. आणि शेतीच्या बाबतीत ते आता तज्ज्ञ मानले जातात. त्यामुळे ते वेगवेगळ्या शहरातल्या शाळा. महाविद्यालयं, कृषी विज्ञान केंद्रं आणि इतर संस्थांना भेटी देतात आणि नैसर्गिक शेती, बीज संवर्धनाविषयी बोलतात.
एवढे सारे कष्ट करूनही घनी यांना सरकारकडून मात्र फारशी काही मदत मिळालेली नाही. अर्थात त्यांना काही पुरस्कार मिळाले आहेत. २०१७ साली मंड्या इथल्या एका संस्थेने त्यांना शेतीतील नाविन्यपूर्ण कामाबद्दल ‘आरासामा मेन्सेगौडा पुरस्कार’ दिला. त्यांच्या इतर पुरस्कारांमध्ये, कर्नाटक सरकारने दिलेला, २००८-०९ सालचा ‘कृषी पंडित सन्मान’ (रु. २५,००० रोख) आणि २०१० साली ‘जीववैविध्य सन्मान’ (रु. १०,००० रोख) या दोन पुरस्कारांचा समावेश होतो.
“देशी वाणांचं जतन केलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे,” ते म्हणतात. “सुरुवात अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या साळी ओळखण्यापासून करता येईल.”
अनुवादः मेधा काळे