“आम्ही काही ५८ उंट जप्त केलेले नाहीत,” अमरावती जिल्ह्याच्या तळेगाव दशासर पोलिस स्थानकाचे प्रमुख अजय काकरे निक्षून सांगतात. “या प्राण्यांशी क्रूर वर्तनाविरोधात महाराष्ट्रात कोणताही कायदा लागू नसल्याने आम्हाला तसं करण्याचे कसलेही अधिकार नाहीत.”
“हे उंट फक्त ताब्यात घेतलेले आहेत,” ते म्हणतात.
आणि अर्थातच त्यांच्या पाच पालकांनाही ताब्यात घेतलं गेलं असतं पण अमरावतीच्या स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मनात काही वेगळं होतं. हे पाच उंटपाळ गुजरातेतल्या कच्छचे आहेत. चौघं रबारी आणि एक फकिरानी जाट आहे. हे दोन्ही समाज पिढ्यानपिढ्या, शतकानुशतकं उंट पाळतायत. पोलिसांनी एका स्वघोषित ‘प्राणी हक्क कार्यकर्त्याच्या’ तक्रारीवरून या पाचही जणांना अटक केली होती. मात्र दंडाधिकाऱ्यांनी सगळ्यांना तात्काळ आणि विनाअट जामीन मंजून केला.
“आरोपींकडे हे उंट विकत घेतल्याचा किंवा ते त्यांच्या मालकीचे असल्याचा, ते कुठले आहेत इत्यादी कसलाच पुरावा किंवा कागदपत्रं नव्हती,” आकरे सांगतात. त्यामुळे मग या परंपरागत उंटपाळांनी या उंटांची ओळखपत्रं सादर करण्याचा आणि त्यांच्या मालकीबद्दलची कागदपत्रं कोर्टाला सादर करण्याचा एक करामती खेळ सुरू झाला. त्यांच्या नातेवाइकांनी आणि दोन्ही समाजाच्या इतर लोकांनी काही तरी खटपट करून हे सगळं त्यांच्यापर्यंत पाठवलं.
आपल्या पालकांपासून दूर असलेले हे उंट आता एका गौरक्षा केंद्रात मुक्काम करतायत. त्यांची जबाबदारी असलेल्या कुणालाही त्यांची काळजी कशी घ्यायची त्यांना काय खायला घालायचं याची तसूभरही कल्पना नाही. गायी आणि उंट दोघंही रवंथ करणारे प्राणी असले तरी त्यांचा आहार पूर्णपणे वेगळा असतो. हा खटला अजून लांबला तर मात्र गोशाळेत ठेवलेल्या या उंटांची तब्येत ढासळत जाणार हे नक्की.
*****
उंट हा राजस्थान राज्याचा
प्राणी आहे आणि तो इतर राज्यात नीट राहू शकत नाही.
जसराज श्रीश्रीमाल, भारतीय
प्राणी मित्र संघ, हैद्राबाद
हे सगळं प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आहे.
७ जानेवारी २०२२ रोजी हैद्राबाद स्थित प्राणी हक्क कार्यकर्ते ७१ वर्षीय जसराज श्रीश्रीमाल यांनी तळेगाव दशासर पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली. पाच उंटपाळ हैद्राबादच्या एका कत्तलखान्यात उंटांची तस्करी करत असल्याचा त्यांचा आरोप होता. पोलिसांनी लागलीच त्या पाचांना आणि त्यांच्या उंटांना ताब्यात घेतलं. श्रीश्रीमाल यांना हे उंटपाळ हैद्राबादला नाही तर महाराष्ट्राच्या विदर्भात भेटले, बरं.
“मी माझ्या एका सहकाऱ्याबरोबर अमरावतीला निघालो होतो. आम्ही [चांदूर रेल्वे तालुक्यातल्या] निमगव्हाणला पोचलो तेव्हा आम्हाला एका शेतात पाच गडी उंट घेऊन बसलेले दिसले. मोजल्यावर ते ५८ उंट असल्याचं लक्षात आलं – आणि त्यांचे मान, पाय बांधलेले असल्यामुळे त्यांना धड चालताही येत नव्हतं. त्यांना अतिशय क्रूर वागणूक दिली जात होती. त्यातल्या काहींना जखमा झाल्या होत्या आणि या उंटपाळांनी काही औषधोपचारही केलेले दिसले नाहीत. उंट हा राजस्थान राज्याचा प्राणी असून तो इतरत्र राहू शकत नाही. हे उंट घेऊन ते कुठे निघाले आहेत याबद्दल या पाच जणांकडे कसलीही कागदपत्रं नव्हती,” श्रीश्रीमाल यांच्या तक्रारीत नमूद केलं होतं.
प्रत्यक्षात स्थिती अशी आहे की भारतात उंट केवळ राजस्थानमध्ये नाही तर गुजरात, हरयाणा आणि इतर ठिकाणीही आढळून येतात. पण त्यांचं प्रजनन मात्र राजस्थान आणि गुजरातमध्येच होतं. विसावी पशुधन जनगणना – २०१९ नुसार देशात उंटांची संख्या केवळ २ लाख ५० हजार इतकी आहे. म्हणजेच २०१२ साली झालेल्या जनगणनेनंतर उंटांची संख्या ३७ टक्क्यांनी घटली आहे.
हे पाचही जण अनुभवी पशुपालक असून या मोठ्या जनावरांची नेआण कशी करायची याची त्यांना इत्थंभूत माहिती आहे. पाचही जण गुजरातच्या कच्छचे आहेत आणि ते आजवर कधीही हैद्राबादला गेलेले नाहीत.
“या पाच जणांकडून मला स्पष्ट उत्तरं मिळाली नाहीत त्यामुळे माझा संशय बळावला,” श्रीश्रीमाल यांनी पारीला हैद्राबादहून फोनवर सांगितलं. “उंटांच्या अवैध कत्तलीचे प्रकार वाढत चालले आहेत,” ते सांगतात. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या भारतीय प्राणी मित्र संघ या संघटनेने भारतभरात ६०० उंटांना कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवलं असल्याचा त्यांचा दावा आहे.
त्यांच्या सांगण्यानुसार गुलबर्गा, बंगळुरू, अकोला, हैद्राबाद आणि इतर ठिकाणांहून प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. आणि त्यांच्या संघटनेने सोडवून आणलेल्या उंटांना राजस्थानात पाठवून दिलं आहे. भारतात विशेषतः हैद्राबादमध्ये उंटाच्या मांसाला मोठी मागणी आहे. पण संशोधकांचं आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की केवळ म्हातारे नर उंटच खाटिकखान्यात विकले जातात.
भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधींशी श्रीश्रीमाल यांचे सलगीचे संबंध आहेत. मनेका गांधी पीपल फॉर ॲनिमल्स या संस्थेच्या प्रमुख आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये मनेका गांधींचं म्हणणं आहे की “उत्तर प्रदेशातल्या बाघपतमध्ये एक मोठी टोळी कार्यरत आहे. उंट बांग्लादेशात नेले जातात. इतके सगळे उंट एका वेळी एकत्र असण्याचं दुसरं काहीच कारण नाही.”
प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी ८ जानेवारी रोजी प्राथमिक माहिती अहवाल सादर केला. महाराष्ट्रात उंटांच्या रक्षणाविषयी विशेष कुठला कायदा नसल्यामुळे त्यांनी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० , कलम ११ (१) (डी) अंतर्गत आरोप दाखल केले.
अंदाजे चाळिशीचे असलेले प्रभू राणा, जगा हिरा, मुसाभाई हमीद जाट,पन्नाशीचे विसाभाई सरावु आणि सत्तरी पार केलेले वेरसीभाई राणा रबारी या पाचही जणांवर आरोप दाखल करण्यात आले.
५८ उंटांची काळजी घेणं मात्र सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं आकरे सांगतात. दोन रात्री पोलिसांनी जवळच्या एका गोरक्षा केंद्राची मदत घेतली आणि त्यानंतर अमरावतीच्या एका मोठ्या केंद्राला संपर्क केला. अमरावतीच्या दस्तूर नगरमधल्या केंद्रांने मदत करण्याचं मान्य केलं आणि तिथे उंटांसाठी पुरेशी जागा असल्यामुळे त्यांना तिकडे पाठवण्यात आलं.
खेदाची बाब ही की या उंटांना तिथपर्यंत नेण्याचं काम आरोपींच्याच नातेवाइकांवर आणि ओळखीतल्या काही जणांवर येऊन पडलं. त्यांनी दोन दिवस चालत तळेगाव दशासर ते अमरावती हे ५५ किलोमीटर अंतर उंट चालवत नेले.
या पशुपालकांना पाठिंबा द्यायला अनेक जण पुढे आले आहेत. कच्छच्या किमान तीन ग्राम पंचायतींनी अमरावती पोलिस आणि जिल्हापातळीवरील अधिकाऱ्यांना विनती केली आहे की उंटांना मोकळं चरू दिलं जावं नाही तर त्यांची उपासमार होईल. नागपूर जिल्ह्यातल्या मकरधोकडा ग्राम पंचायतीत रबारींचा मोठा डेरा आहे त्यांनी देखील आपल्या समाजाच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. हे पाचही जण परंपरागत पशुपालक आहेत आणि हे उंट कत्तलीसाठी नेण्यात आले नव्हते असं ते सांगतात. आता खालचं न्यायालय उंटांचा ताबा कोणाकडे देण्यात येणार याचा निर्णय घेणार आहे. ज्या आरोपींनी त्यांना आणलं त्यांच्या ताब्यात द्यायचं का कच्छला परत पाठवायचं?
हे पाचही जण पूर्वापारपासून उंट पाळतायत हे कोर्टाला पटतं का नाही यावर निकाल अवलंबून असणार आहे.
*****
हे पारंपरिक पशुपालक आपल्यासारखे दिसत नाहीत, आपल्यासारखे बोलत नाहीत आणि
त्यांच्याविषयीच्या आपल्या अज्ञानातून असे संशय निर्माण होतात.
सजल कुलकर्णी,
पशुपालक समुदायांवरील संशोधक, नागपूर
या पाचांमधले सगळ्यात ज्येष्ठ असलेले वेरसीभाई राणा रबारी यांनी आपले उंट, कधी मेंढ्या घेऊन देश पालथा घातला आहे पण आजवर त्यांच्यावर कुणी प्राण्यांशी क्रूर वर्तन केल्याचा आरोप केला नव्हता.
“पहिल्यांदाच,” कच्छी भाषेत बोलणारे, चेहऱ्यांवर सुरकुत्यांची नक्षी असलेले वेरसीभाई म्हणतात. पोलिस स्टेशनमधल्या एका झाडाखाली मांडी घालून ते बसले आहेत. चिंतित आणि ओशाळवाणे.
“आम्ही कच्छहून हे उंट घेऊन आलोय,” १३ जानेवारी रोजी तळेगाव दशासर पोलिस
ठाण्यात आमच्याशी बोलताना प्रभु राणा रबारी सांगतात. “महाराष्ट्र आणि
छत्तीसगडमध्ये आमचे नात्यातले लोक राहतात, त्यांना द्यायला.” १४ तारखेला त्यांना
अटक झाली आणि सुटका झाली त्याच्या आदल्या दिवशी ते आमच्याशी बोलत होते.
भुज ते अमरावती संपूर्ण मार्गावर त्यांना कुणीही हटकलं नाहीय कुणालाही काही
तरी गडबड असल्याची शंकाही आली नाही. पण त्यांचा हा प्रवास अचानक थांबला तो
अमरावतीतल्या या अटकनाट्यामुळे.
हे उंट वर्धा, भंडारा आणि नागपूरला तसंच छत्तीसगडच्या काही वस्त्यांवर
पोचवायचे होते.
कच्छ आणि राजस्थानात अर्ध-भटक्या पशुपालक समाजांपैकी एक म्हणजे रबारी. त्यांची
उपजीविका म्हणजे शेरडं आणि मेंढरं पाळणे तसंच शेतीची कामं आणि वाहतुकीसाठी उंट
पाळणे. आणि ही सर्वं कामं कशी, कोणत्या विचाराने केली जातात ते कच्छ उंटपाल
संघटनेने तयार केलेल्या ‘
बायोकल्चरल कम्युनिटी प्रोटोकॉल
’मध्ये नमूद केलं आहे.
रबारी समाजातले ढेबरिया रबारी वर्षातला मोठा काळ मुबलक पाणी आणि चारा असणाऱ्या
जागांच्या शोधात भटकत असतात. अनेक कुटुंबं आता वर्षातला बराच काळ डेरा टाकून एका
ठिकाणी राहतात. त्यातले काही जण हंगामी भटकंती करतात. दिवाळीनंतर गाव सोडतात आणि
कच्छपासून दूरवर तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसग़, मध्य प्रदेश आणि
महाराष्ट्राच्या विदर्भात येतात.
मध्य भारतामध्ये ढेबरिया रबारींचे किमान ३,००० डेरे आहेत असं सजल कुलकर्णी
सांगतात. ते पशुपालक समाज आणि पूर्वापारपासून पशुधन सांभाळणाऱ्या समाजांविषयी काम
करणारे नागपूर स्थित संशोधक आहेत. रिव्हायटलायझिंग रेनफेड एरिया नेटवर्क या गटाचे
ते फेलो असलेले कुलकर्णी सांगतात की एका डेऱ्यामध्ये किमान ५-६ कुटंबं,
त्यांच्याकडचे उंट आणि आणि मोठ्या संख्येने शेरडं-मेंढरं असतात. लहान जितराब
मांसासाठी पाळलं जातं.
गेल्या एक दशकाहून जास्त काळ कुलकर्णी पशुपालकांचा तसंच पशुधन जोपासणाऱ्या
संस्कृतींचा अभ्यास करत आहेत. यामध्ये रबारींचाही समावेश आहे. त्यांना अटक
करण्याची आणि उंटांना ताब्यात घेण्याची “घटना आपल्याला पशुपालकांबद्दल किती अज्ञान
आहे हे अधोरेखित करते. हे पारंपरिक पशुपालक आपल्यासारखे दिसत नाहीत, आपल्यासारखे
बोलत नाहीत आणि त्यांच्याविषयीच्या आपल्या अज्ञानातून असे संशय निर्माण होतात.”
कुलकर्णी सांगतात की आता रबारींमधले बरेचसे गट आता स्थायिक होऊ लागले आहेत.
गुजरातेत ते आता त्यांचा परंपरागत व्यवसाय सोडून शिक्षण घेऊन नोकऱ्याही करू लागले
आहेत. महाराष्ट्रातल्या बऱ्याच कुटुंबांकडे स्वतःच्या मालकीची जमीन आहे आणि ते
स्थानिक शेतकऱ्यांसोबत काम करतायत.
“शेतकरी आणि ते एकमेकांवर अवलंबून आहेत,” कुलकर्णी म्हणतात. मेंढ्या
‘बसवायचंच’ उदाहरण घ्या. शेतं रिकामी असतात तेव्हा रबारी त्यांच्याकडची
शेरडं-मेंढरं शेतकऱ्यांच्या रानात बसवतात. त्यांच्या लेंड्यांचं उत्तम खत शेताला
मिळतं. “ज्या शेतकऱ्यांना याचं मोल माहित आहे, त्यांचे या समाजाशी चांगले ऋणानुबंध
आहेत,” ते म्हणतात.
ज्या रबारींसाठी हे ५८ उंट आणले गेले ते महाराष्ट्रात आणि छत्तीसगडमध्ये
राहतायत. त्यांचं अख्खं आयुष्य याच ठिकाणी गेलंय पण आजही त्यांची नाळ कच्छमधल्या
आपल्या गणगोताशी पक्की आहे. फकिरानी जाट फार दूरपर्यंत भटकत नाहीत पण ते अतिशय
कुशल उंटपाळ आहेत आणि त्यांचे रबारींशी जवळचे सांस्कृतिक संबंध आहेत.
सहजीवन ही सामाजिक संस्था भुजमध्ये सेंटर फॉर पॅस्टोरलिझम किंवा पशुपालन
केंद्र चालवते. त्यांच्या मते कच्छमध्ये असलेल्या रबारी, समा आणि जाट यांसह सगळ्या
पशुपालकांचा विचार केला तर त्यात ५०० उंटपाळ आहेत.
“आम्ही सर्व बाबी तपासून खातरजमा केली आहे. हे ५८ तरुण उंट कच्छ उंट उच्चेरक
मालधारी संघटनेच्या ११ सदस्यांकडून विकत घेण्यात आले आणि मध्य भारतात राहणाऱ्या
त्यांच्या नातेवाइकांकडे पोचते केले जाणार होते,” सहजीवन संस्थेचे कार्यक्रम
संचालक रमेश भट्टी भुजहून फोनवर सांगतात.
हे पाच जण अत्यंत निष्णात उंट प्रशिक्षक आहेत आणि म्हणूनच इतक्या लांबच्या
खडतर प्रवासावर जाण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. वेरसीभाई कदाचित सध्या हयात
असलेल्या तज्ज्ञ प्रशिक्षकांपैकी आणि उंटांची वाहतूक करणाऱ्यांपैकी सर्वात ज्येष्ठ
असतील.
*****
आमचा समाज
भटका आहे
,
अनेक वेळा
आमच्याकडे कसलीही कागदपत्रं नसतात
...
वर्ध्यातले
रबारी समाजाचे नेते, मश्रूभाई रबारी
कच्छहून ते नक्की किती तारखेला निघाले ते काही त्यांना
सांगता येत नाही.
“नवव्या महिन्यात [सप्टेंबर २०२१] आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांकडून उंट गोळा केले आणि
भचाउ [कच्छमधलील तहसिल] हून दिवाळी संपल्या संपल्या [नोव्हेंबरचा पहिला आठवडा] आम्ही निघालो,”
वैतागलेले आणि अस्ताव्यस्त झालेले प्रभू राणा
रबारी म्हणतात. “आम्ही
फेब्रुवारी संपता संपता छत्तीसगडच्या बिलासपूरला पोचलो असतो. आम्ही तिथेच तर निघालो होतो.”
ज्या दिवशी त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्या दिवसापर्यंत
त्यांनी कच्छहून १,२०० किलोमीटर
अंतर पार केलं होतं. भचाउहून अहमदाबादमार्गे त्यांनी नंदुरबार,
भुसावळ, अकोला, कारंजा आणि तळेगाव दशासर असा प्रवास केला होता. इथून ते पुढे वर्धा, नागपूर, भंडारा आणि तिथून छत्तीसगडमध्ये दुर्ग आणि
रायपूरमार्गे छत्तीसगडला पोचणार होते. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा गावी पोचल्यावर ते नव्याने
बांधलेल्या समृद्धी महामार्गालगत चालत आले होते.
“आम्ही दिवसाला १२-१५ किलोमीटर अंतर चालत आलोय. खरं तर तरुण उंट वीस किलोमीटर सहज कापू शकतात,”
मुसाभाई हमीद जाट म्हणतात. या पाचांमधले हे सगळ्यात तरुण. “रात्री
मुक्काम करायचा आणि सकाळी परत चालायला सुरुवात करायची.”
स्वतः खाणं बनवायचं, दुपारची विश्रांती घ्यायची, उंटांचा आराम झाला की परत प्रवास सुरू.
केवळ उंट पाळल्याच्या कारणावरून आपल्याला अटक झाल्याने ते
हादरून गेले आहेत.
“आम्ही सांडण्या विकत नाही आणि वाहतुकीसाठी फक्त उंटांचाच
वापर करतो,” मश्रूभाई रबारी म्हणतात. ते या समाजातले जुने जाणते पुढारी आहेत आणि
वर्धा जिल्ह्यात राहतात. “उंट म्हणजे आमचे पायच आहेत.” ताब्यात घेण्यात आलेले सगळे उंट नर आहेत.
या पाच जणांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हापासून मश्रूभाई, म्हणजेच मश्रूमामा त्यांच्यासोबत तळ ठोकून आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत, अमरावतीत त्यांच्यासाठी वकिलांची सोय करणं, पोलिसांना ते काय म्हणतायत ते समजावून सांगणं आणि त्यांचे जबाब नोंदवणं अशा सगळ्यात ते मदत करतायत. ते कच्छी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये पारंगत आहेत आणि रबारींच्या दूर दूर विखुरलेल्या डेऱ्यांमधला पक्का दुवा आहेत.
“विदर्भात, तेलंगणा आणि छत्तीसगडमधल्या वेगवेगळ्या डेऱ्यांवरच्या १५-१६ जणांना हे उंट द्यायचेत,” मश्रूभाई सांगतात. “त्यांना प्रत्येकाला ३-४ उंट मिळणार होते.” प्रवासाच्या दरम्यान रबारी आपला सगळा पसारा उंटांवरच लादतात, लहान लेकरं अगदी करडंसुद्धा. खरं तर त्यांचा सगळा संसारच. ते धनगरांसारखं बैलगाडी वगैरे कशाचाही वापर करत नाहीत.
“आमच्या गावांमध्ये जे उंटांचं प्रजनन करतात त्यांच्याकडून आम्ही उंट विकत घेतो,” मश्रूभाई सांगतात. “इथल्या १०-१५ लोकांना म्हाताऱ्या उंटांच्या जागी तरुण उंट हवे असतील तर आम्ही कच्छमधल्या आमच्या नातेवाइकांना तसं सांगून ठेवतो. मग उंटवाले एकत्रच सगळ्यांचे उंट पाठवतात तेही प्रशिक्षित माणसांसोबत. आपले प्राणी घेऊन आल्याबद्दल खरेदीदार या माणसांना मेहनाताना देतात - लांबचा प्रवास असेल तर महिन्याला ६,००० ते ७,००० रुपये. तरुण उंट १०,००० ते २०,००० रुपयांना मिळतो,” मश्रूभाई आम्हाला सांगतात. एक उंट वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कामला लागतो आणि २०-२२ वर्षं जगतो. “एक नर उंट १५ वर्षं तरी काम करतो,” ते सांगतात.
“खरंय की या लोकांकडे कसलीच कागदपत्रं नाहीयेत,” मश्रूभाई म्हणतात. “पण या अगोदर आम्हाला कसल्या कागदांची गरजच पडली नाहीये. पण आता यापुढे आम्हाला दक्ष रहायला लागणार असं दिसतंय. काळ बदलत चाललाय.”
पण या एका तक्रारीमुळे उंटांना आणि या उंटपाळांना उगाचच मनस्ताप सहन करावा लागलाय. “आमी घुमंतु समाज आहे, आमच्या बऱ्याच लोकाय कड कधी कधी कागद पत्र नसते,” ते मराठीत सांगतात. आणि आताही अगदी हेच झालंय.
*****
आमच्यावर असा आरोप केला जातोय की आम्ही त्यांच्याशी क्रूरपणे वागलोय. पण त्यांना मोकळ्याने चरू न देता असं कोंडून घातलंय, त्याहून जास्त क्रूर काय असणार.
पर्बत रबारी, नागपूर मधले अनुभवी उंटपाळ
ताब्यात घेतलेले उंट दोन ते पाच वर्षं वयाचे आहेत. ते कच्छी प्रजातीचे असून ते खास करून कच्छमध्ये आढळणारे भूचर आहेत. कच्छमध्ये या प्रजातीचे आजमितीला
अंदाजे ८,०००
उंट आहेत.
या प्रजातीच्या नर उंटाचं सरासरी वजन ४०० ते ६०० किलो असून सांडणीचं वजन ३०० ते ४५० किलो असतं.
वर्ल्ड अटलास
नुसार निमुळती छाती, एक कुबड आणि लांब, वळणदार मान, कुबडावर, खांंद्यावर आणि गळ्यावर केस ही या प्रजातीची लक्षणं आहेत. केसांचा रंग तपकिरी, काळा किंवा चक्क पांढराही असू शकतो.
तपकिरी रंगाच्या या खुरं असणाऱ्या प्राण्यांना मोकळं चरायला आवडतं आणि ते वेगवेगळ्या झाडाची पानं खातात. जंगलातल्या, गायरानातल्या किंवा पडक रानातल्या झाडांची पानं देखील हे उंट खातात.
राजस्थान आणि गुजरातमध्ये उंट पाळणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. दोन्ही राज्यात गेल्या दहा वर्षांमध्ये वनांमध्ये आणि खारफुटींच्या पाणथळ प्रदेशात उंटांच्या प्रवेशावर बंधनं घालण्यात येऊ लागली आहेत. या प्रदेशांमध्ये ज्या प्रकारची बांधकामं आणि विकासकामं होतायत त्याचाही या उंटांवर आणि त्यांच्या मालक-पालकांवर विपरित परिणाम होतोय. पूर्वी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असायचा तोही मोफत. पण आता तो त्यांना मिळू शकत नाहीये.
हे पाचही जण आता जामिनावर सुटले आहेत आणि आपल्या समाजबांधवांसोबत अमरावतीतल्या गोशाळेत थांबले आहेत कारण त्यांचे उंटही इथेच आहेत. सगळीकडून कुंपण असलेलं हे मोठालं मैदान आहे. रबारींना उंटांची काळजी लागून राहिली आहे कारण त्यांना लागतो तसा चारा इथे मिळत नाहीये.
रबारींचं तर म्हणणं आहे की कच्छच्या (किंवा राजस्थानच्या) बाहेर हे उंट राहू शकत नाहीत या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. “आमच्याबरोबर ते कित्येक वर्षं भारताच्या विविध भागात राहतायत, फिरतायत, ” आसाभाई जेसा सांहतात. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातल्या आसगावमध्ये राहणारे आसाभाई जुने जाणते रबारी उंटपाळ आहेत.
“खेद याचा वाटतो की आमच्यावर असा आरोप केला जातोय की आम्ही त्यांच्याशी क्रूरपणे वागलोय. पण त्यांना मोकळ्याने चरू न देता असं कोंडून घातलंय, त्याहून जास्त क्रूर काय असणार,” पर्बत रबारी म्हणतात. नारपूरचजवळ उमरेडमध्ये स्थायिक झालेले परबत देखील या समाजातले अनुभवी भटके पशुपालक आहेत.
“जनावरं खातात तसला चारा उंट खात नाहीत,” नागपूरच्या उमरेड तालुक्यातल्या सिर्सी गावात राहणारे जकारा रबारी सांगतात. या कळपातले तीन उंट जकाराभाई घेणार होते.
कच्छी उंट वेगवेगळ्या झाडांची पानं खातात - कडुनिंब, बाभूळ, पिंपळ ही त्यातली काही. कच्छमध्ये ते तिथल्या कोरड्या आणि डोंगराळ भूभागात येणाऱ्या झाडांची पानं खातात. त्यांचं दूध अधिक पोषक असण्यामागे हेच कारण आहे. कच्छी सांडणी दिवसाला ३-४ लिटर दूध देऊ शकते. कच्छी उंटपाळ त्यांना एका आड एक दिवस पाण्यावर घेऊन येतात. हे प्राणी एका वेळी सरासरी ७०-८० लिटर पाणी पिऊ शकतात. आणि ते तहानलेले असले तर अगदी १५ मिनिटात, गटागट. आणि बराच काळ ते पाण्याशिवाय राहू शकतात.
गोरक्षा केंद्रात दाखल झालेल्या या ५८ उंटांपैकी कुणालाच असं बंदिस्त पद्धतीने चारा खाण्याची सवय नाहीये. मोठे उंट इथे मिळणारा भुईमुगाचा पाला वगैरे खातात. पण अगदीच लहान उंटांना अशा चाऱ्याची सवय नाहीये, पर्बत रबारी सांगतात. कच्छहून इथे अमरावतीत येईपर्यंत उंटांना शेतातल्या, बांधावरच्या झाडांचा पाला खायला मिळाला.
एखादा तरुण उंट दिवसभरात ३० किलो चारा खाऊ शकतो, पर्बत आम्हाला सांगतात.
इथे केंद्रामध्ये गाई-गुरांना सोयाबीन, गहू, ज्वारी, मका, छोटी-मोठी भरडधान्यं इत्यादी पिकांचा कडबा आणि वैरण तसंच हिरवा चारा दिला जातो.
आपल्या माणसांना आणि उंटांना ताब्यात घेतल्याची बातमी कळताच महाराष्ट्रात आणि छत्तीसगडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक झालेले पर्बत, जकारा आणि इतरही दहा बारा रबारी अमरावतीला येऊन धडकले. त्यांची उंटांवर अगदी बारीक नजर आहे.
“सगळ्याच उंटांना काही बांधलेलं नव्हतं. पण त्यातल्या काहींना बांधावं लागतं नाही तर ते एकमेकांना चावे घेतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देतात,” जकारा रबारी सांगतात. ते सध्या गौरक्षा केंद्रात मुक्कामाला आहेत आणि उंटांचा ताबा कुणाला द्यायचा यावर न्यायालय काय फैसला देतंय याची वाट पाहतायत. “हे तरुण उंट आहेत ते एकदम आक्रमक होऊ शकतात,” ते म्हणतात.
हे रबारी परत परत सांगतायत की उंटांना मोकळ्याने चरू द्यायला पाहिजे. पूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेले उंट बंदिस्त जागेत मरण पावल्याच्या घटना घडल्याचं ते सांगतात.
उंटांचा ताबा लवकरात लवकर रबारींकडे देण्यात यावा अशी याचिका रबारींचे स्थानिक वकील मनोज कल्ला यांनी कनिष्ठ न्यायालयात दाखल केली आहे. कच्छमधले त्यांचे समाजबांधव, या भागात राहणारे इतर काही जण आणि वेगवेगळ्या ठिकाणचे खरेदीदार अशा सगळ्यांनी मिळून हा खटला चालवण्यासाठी निधी गोळा केला आहे. वकिलांची फी, त्यांचा स्वतःचा राहण्याचा खर्च, उंटांसाठी योग्य तो चारा मिळवण्यासाठीची खटपट असा सगळाच खर्च आहे.
दरम्यानच्या काळात गौरक्षा केंद्राकडे या उंटांचा ताबा देण्यात आला आहे.
“सुरुवातीला आम्हाला त्यांना खायला घालायला अडचणी आल्या होत्या, पण आता आम्हाला त्यांना किती आणि कोणत्या प्रकारचा चारा खाऊ घालायचा ते समजलंय - आणि रबारी पण आम्हाला मदत करतायत,” अमरावतीचं गौरक्षा केंद्र चालवणाऱ्या गौरक्षण समितीचे सचिव दीपक मंत्री सांगतात. “आमची जवळच ३०० एकर शेतजमीन आहे आणि आम्ही तिथून उंटांसाठी हिरवा आणि वाळलेला पाला घेऊन येतोय. चाऱ्याची कसलीही टंचाई नाही,” ते म्हणतात. काही उंटांना जखमा झाल्या होत्या. केंद्रातल्या पशुवैद्यक डॉक्टरांनी येऊन उपचारही केले. “त्यांची काळजी घ्यायला आम्ही तयार आहोत, आमची तक्रार नाही,” ते म्हणतात.
“उंट नीट खात नाहीयेत,” पर्बत रबारी म्हणतात. कोर्ट लवकरच त्यांची सुटका करून त्यांना आपल्या मालकांच्या ताब्यात देईल अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. “त्यांच्यासाठी तर हा तुरुंगच आहे.”
जामिनावर सुटका झालेले वेरसीभाई आणि इतर चौघं घरी परतायला आतुर झाले आहेत, पण आपल्या उंटांची सुटका झाल्यावर त्यांना सोबत घेतल्याशिवाय नाही. “शुक्रवारी, २१ जानेवारी रोजी धामणगाव (कनिष्ठ न्यायालय) न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाचही पशुपालकांना या ५८ उंटांची मालकी सिद्ध करण्यासाठी कागदपत्रं सादर करण्यास सांगितलं,” रबारींचे वकील मनोज कल्ला यांनी पारीला सांगितलं. “त्यांनी ज्यांच्याकडून उंट खरेदी केले त्यांनी दिलेल्या पावत्यादेखील चालतील.”
आपल्या उंटांचा ताबा आपल्याला परत मिळेपर्यंत हे रबारीदेखील आपले इतर समाजबांधव आणि खरेदीदारांसमवेत अमरावतीच्या गौरक्षा केंद्रात मुक्काम ठोकून आहेत. आणि सगळ्यांच्या नजरा धामणगाव कोर्टावर लागलेल्या आहेत.
आणि या कशाचाही सुगावा नसलेले उंट मात्र पोलिसांच्या ताब्यात, बंदिस्त.