कन्हैयालालने इंजिन ड्रायव्हरच्या केबिनमधून हातात लाल आणि हिरवे झेंडे घेऊन खाली उडी मारली तेव्हा आम्ही देखील त्या संथ गाडीतून खाली उतरलो. आम्ही या क्षणाचीच वाट पाहत होतो. अर्थात पुढचं २०० मीटर अंतर तो एखाद्या धावपटूसारखा वेगात पळत जाईल याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही देखील त्याच्या मागे पळालो, खडबडीत रस्त्यावर धडपडलो. कन्हैयालाल त्या बिना रक्षकाच्या रेल्वे फाटकापाशी गेला आणि हातातला लाल झेंडा फडकवत त्याने त्वरित ते फाटक बंद केलं. आणि मग गाडीच्या दिशेने वळून त्याने हातातला हिरवा झेंडा फडकवला. गाडी फाटकातून पुढे गेली – आणि थांबली. कन्हैयालालने फाटक उघडलं आणि परत धावत तो इंजिन ड्रायव्हरच्या केबिनच्या दिशने धावत आला, आम्हीही त्याच्या अगदी मागेच होतो.
एकूण ६८ किलोमीटरच्या अंतरात त्याला हेच सगळं १६ वेळा करू शकतो. “मी हेच करतो. मी एक फिरता द्वारपाल आहे,” तो म्हणतो. ‘फिरता’ या शब्दाचा फार वेगळा, पूर्वीच्या काळातला अर्थ आता आपल्याला कळतो. ही छत्तीसगडमधली दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आहे. आणि आम्ही २३२ डाउन धमतरी पॅसेंजरमध्ये आहोत. ही गाडी ‘लेबर ट्रेन’ म्हणून ओळखली जाते. जवळपासच्या खेड्यापाड्यातले हजारो मजूर या गाडीने कसं तरी करून काम मिळण्याच्या आशेने रायपूर शहरात येऊन थडकत असतात. धमतरी ते रायपूरमधलं तेलीबांधा हे अंतर तीन तास पाच मिनिटात कापलं जातं आणि वाटेत सहा ठिकाणी गाडी थांबते. मार्गावर एकूण १९ फाटकं आहेत, ज्यातल्या केवळ २ किंवा तीन ठिकाणी रक्षक आहे.
“माझं काम आहे फाटक खोलायचं आणि बंद करायचं,” कन्हैयालाल गुप्ता सांगतो. “पूर्वी फाटकावर रक्षक असायचे पण आता माझीच फिरता द्वारपाल म्हणून नेमणूक झाली आहे. मी आधी गँगमन म्हणून काम करत होतो पण मला या पदावर बढती मिळाली आहे, जिथे गेली दोन वर्षं मी काम करतोय. मला माझं काम आवडतं.” तो नक्कीच मन लावून आणि कष्टाने त्याचं काम पार पाडतोय (आणि महिन्याला रु. २०,००० हून कमी कमवतोय).
या मार्गावरच्या आधीच्या काही स्थानकांमध्ये हा ‘फिरता द्वारपाल’ फाटक बंद करून झाल्यावर गाडीच्या मागच्या डब्यात चढतो. गाडीत जास्त गर्दी नसल्यामुळे तो आरामात बसू शकतो. पण जसजशी गाडी रायपूरच्या जवळ यायला लागते तसं त्याला आत शिरणं काही शक्य होत नाही. त्यामुळे त्याला पळत पळत इंजिन ड्रायव्हरचं केबिन गाठणं आणि पुढचं फाटक येईपर्यंत तिथे उभं राहण्यावाचून दुसरा पर्याय नसतो.
कधी काळी रेल्वे खातं स्वतः मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करत असे. मात्र आजमितीला या खात्यात प्रचंड अनुशेष आहे. कन्हैयालालची नोकरी हे काही नाविन्यपूर्णतेचं उदाहरण नाही. कामगारांची संख्या कमी ठेवण्याचा आटापिटा आहे सगळा. सुरक्षेच्या अंगाने पाहता या सर्व १६ फाटकांवर माणूस असणं गरजेचं आहे. आणि रेल्वेच्याच अधिकृत आकडेवारीनुसार देशात ३०,००० हून अधिक रेल्वे फाटकं आहेत, आणि यातल्या ११,५०० फाटकांवर रक्षक नाही.
एकूण रेल्वे अपघातांच्या ४० टक्के आणि रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांच्या दोन तृतीयांश अपघात रेल्वे फाटकांपाशी होतात. रक्षक असणाऱ्या फाटकांवरती अशा प्रकारचे अपघात दुर्मिळ आहेत. मग यावर रेल्वेचा तोडगा काय तर फाटकांवर माणसं नेमण्याऐवजी अशी फाटकंच बंद करायची. किंवा मग असे अनेकांचं काम एकट्याने करणारे कन्हैयालालसारखे ‘फिरते द्वारपाल’ नेमायचे.
आता २३२ धमतरी पॅसेंजरचा काही अपघात होण्याची शक्यता तशी विरळाच. एक तर ही नॅरो गेजवर चालणारी गाडी आहे, अजूनही चालू असलेल्या फार थोड्या मार्गिकांपैकी एक. आणि ती जरा जास्तच संथपणे जाते, आणि खरं तर एवढी लोकं तिला लटकलेली असतात, की तिने तसंच जायलाही पाहिजे. तरीही, कन्हैयालालच्या या कामामागचं कारण मात्र कामगारांची संख्या कमी करणं हेच आहे.
“भारतीय रेल्वेची मान्य पदसंख्या १३.४ लाख इतकी आहे,” राष्ट्रीय रेल्वे मजदूर युनियनचे जनरल सेक्रेटरी वेणू पी. नायर सांगतात. “पण जवळ जवळ २ लाख पदं भरलेली नाहीत. आणि दर वर्षी यात वाढच होत चाललीये. असाच कल आहे. सत्तरच्या दशकात आमचे १७ लाख कामगार आणि ५ लाख नैमित्तिक मजूर होते. आणि आता पहा – खरं तर तेव्हापासून आज, प्रवासी गाड्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. स्थानकांची संख्या, रेल्वेपट्ट्या आणि आरक्षणाच्या खिडक्याही वाढल्या आहेत. तरीही गेल्या २० वर्षांत पदांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. हे चुकीचं आणि धोकादायक आहे.” भारतीय रेल्वेच्या १२,००० हून जास्त गाड्या आहेत आणि रोज किमान २ कोटी ३० लाख प्रवासी त्यातून प्रवास करत असतात.
सात डबे असणाऱ्या धमतरीच्या लेबर ट्रेनची क्षमता ४०० हून कमी आहे. पण गाडीत बसलेले, कडेला आणि गाडीच्या मागे लटकणारे आणि दोन डब्यांच्या मधेही उभे असलेले असे मिळून कदाचित त्याच्या दुपटीहून जास्त प्रवासी गाडीतून प्रवास करत असावेत. “रायपूरच्या जवळ पोचतो ना तेव्हा तुम्ही ही गाडी पहायला पाहिजे,” एक कामगार म्हणतो. “तेव्हा तर गाडीच्या टपावरही जागा नसते.”
आम्ही दोघं, आमचे व्हिडिओ कॅमेरे घेऊन दर फाटकावर कन्हैयालालच्या मागे सशासारखे टुणटुण पळताना पाहणं म्हणजे बाकी प्रवाशांसाठी करमणूकच होती. “सिनेमाचं शूटिंग चाललंय रे,” दोन डब्यांच्या मध्ये उभ्या असलेल्या एकाने जाहीर केलं. “ते बॉलिवूडहून आलेत.” “अरे, हिरो कोण रे?” त्याचा जोडीदार ओरडतो. “अरे हिरोचं सोड,” तिसराच कुणी खेकसतो. “हिरॉइन कोण आहे बोल.”
काहीही असो, ते सगळे गाडी स्थानकात आली की आमच्याशी निवांत गप्पा मारतात. त्यांच्यातला प्रत्येक जण शहरात काम शोधण्यासाठी गाव सोडून आलाय. शेती पार कोलमडून गेलीये अशा असंख्य गावांमधनं हे सगळे आलेत. पण गाडीने काय येताय, आम्ही विचारतो. एवढ्या गर्दीत रायपूरला पोचेपर्यंतच तुमचा दम निघत असेल, आम्ही म्हणतो. “धमतरीहून रायपूरला यायचं गाडीचं तिकिट फक्त २० रुपये पडतं. याच अंतरासाठी बसला मात्र ६५-७० रुपये पडतात, तिपटीहून जास्त. यायला जायला बस केली तर आम्ही दिवसाचे जे काही २००-२५० रुपये कमावतो त्यातले अर्धे प्रवासावरच खर्चून जातील.”
“सकाळच्या गाडीला बहुतेक सगळे प्रवासी खरंच मजूरच असतात,” इंजिन ड्रायव्हर वेणुगोपाल सांगतात. आतल्या गावातले लोक या गाडीने रायपूरला रोजंदारीच्या कामासाठी जातात. आणि त्याच गाडीने रोज संध्याकाळी वापस येतात.
“फार कष्टाचं आहे हे,” केंद्री स्थानकात रोहित नवरंगे म्हणतो. केंद्री गावात त्याचं छोटंसं सायकल दुरुस्तीचं दुकान आहे तरीही तो अधून मधून हा प्रवास करत असतो. “एवढ्यावर पोटापुरती कमाई होत नाही,” तो म्हणतो.
आम्ही परत गाडीत चढतो. कन्हैयालालचं सगळं लक्ष त्याच्या कामावर आहे आणि पुढच्या फाटकावर उतरण्यासाठी तो सज्ज आहे. “खोला, बंद करा,” तो हसत हसत म्हणतो.
या काहणीची एक इंग्रजी आणि आवृत्ती २२ सप्टेंबर २०१४ रोजी बीबीसी न्यूज ऑनलाइन ( http://www.bbc.com/news/world-asia-india-29057792 ) वर प्रसारित करण्यात आली होती.
अनुवादः मेधा काळे