"आज त्यांचा हा फोटो भिंतीवर टांगलेला नसता," शीला तारे म्हणतात. "वेळेत तपासणी झाली असती तर ते आज इथे आमच्यासोबत असते."

निळ्या पार्श्वभूमीवर काढलेल्या अशोक तारेंच्या फोटोखाली लिहिलंय: 'मृत्यू दि. ३०/०५/२०२०'.

अशोक पश्चिम मुंबईतील वांद्रे येथील के बी भाभा हॉस्पिटलमध्ये मरण पावले. मृत्यूचं कारण दिलं होतं कोविड-१९ ची ‘संभाव्य’ लागण. ४६ वर्षांचे तारे बृहन्मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगार होते.

४० वर्षीय शीला आपले अश्रू आवरतात. पूर्व मुंबईतील चेंबूर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण इमारतीतल्या भाड्याच्या २६९ चौरस फूट फ्लॅटमध्ये शांतता पसरते. त्यांची मुलं निकेश व स्वप्निल, आणि मुलगी मनीषा, आपली आई बोलण्याची वाट पाहतायत.

"भांडुपमध्ये त्यांच्या चौकीचा मुकादम पॉझिटिव्ह झाला होता तेंव्हा ८ ते १० एप्रिलच्या आसपास त्यांनी चौकी बंद केली," शीला सांगतात, "आणि सगळ्या कामगारांना [शहराच्या एस वॉर्ड मधील त्याच भागातील] नाहूर चौकीवर जायला सांगितलं. आठवडाभरानंतर त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला."

अशोक काही लोकांसोबत कचऱ्याच्या ट्रकवर काम करायचे, आणि भांडुपमध्ये विविध ठिकाणाहून कचरा उचलायचे. ते कुठलंच संरक्षक साहित्य घालत नसत. आणि त्यांना मधुमेह होता. त्यांनी मुख्य निरीक्षकांना आपल्या लक्षणांबद्दल कळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची रजेची आणि वैद्यकीय तपासणीची विनंती अनेकदा नाकारण्यात आली. शीला तारेंसोबत नाहूर चौकीत गेल्या होत्या तो दिवस शीला यांना आजही आठवतो.

"मी सायबांकडे त्यांना पाच दिवस सुटी द्या अशी विनंती करायला गेली होती," त्या म्हणतात. अशोक यांनी त्यांच्या २१ दिवसांच्या पगारी रजांपैकी एकही सुटी घेतली नव्हती. "खुर्चीवर बसलेले साहेब म्हणाले जर सगळेच सुट्ट्या घ्यायला लागले तर मग अशा वेळी काम कोण करणार?"

मग अशोक एप्रिल व मे महिन्यांत काम करतच राहिले. त्यांचे साथीदार सचिन बनकर (विनंतीमुळे नाव बदलण्यात आलंय) म्हणतात की त्यांना अशोक यांची होणारी दमछाक दिसत होती.

Sunita Taare (here with her son Nikesh) is still trying to get compensation for her husband Ashok's death due to a 'suspected' Covid-19 infection
PHOTO • Jyoti
Sunita Taare (here with her son Nikesh) is still trying to get compensation for her husband Ashok's death due to a 'suspected' Covid-19 infection
PHOTO • Jyoti

शीला तारे (इथे आपला मुलगा निकेश याच्यासोबत) अजूनही आपले पती अशोक यांच्या ‘संभाव्य’ कोविड-१९ संसर्गामुळे झालेल्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळ ण्या साठी धडपड कर तायत

"त्याला लवकर थकवा यायचा अन् श्वास घ्यायला त्रास व्हायचा. पण साहेब ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर आम्ही तरी काय करणार?" सचिन मला फोनवर म्हणाले. "आमच्या चौकीतल्या एकाही कामगाराची कोविड-१९ चाचणी झाली नाही. मुकादम पॉझिटिव्ह आल्यावर कोणालाही काही लक्षणं आहे का ते विचारलं नाही. आम्हाला फक्त दुसऱ्या चौकीत जायला सांगितलं." (सचिन आणि इतर कामगारांच्या मदतीने मुकादमांशी तब्येतीबाबत संपर्क साधण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.)

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सचिन आणि त्यांच्या साथीदारांची बृहन्मुंबई मनपा संचालित एका शिबिरात कोविड-१९ चाचणी करण्यात आली. "मला काहीच लक्षणं किंवा आजार नाहीये," सचिन म्हणतात. "पण आमची मार्च-एप्रिल मध्येच चाचणी करायला हवी होती, तेंव्हा परिस्थिती भयानक होती."

५ एप्रिलपर्यंत एस वॉर्ड मध्ये कोविडचे १२ रुग्ण आढळून आले होते. २२ एप्रिल पर्यंत हा आकडा १०२ वर गेला होता. अशोक तारे मरण पावले त्या दिवशी, १ जून रोजी, या वॉर्डात १,०७५ रुग्ण होते होत्या, आणि १६ जून पर्यंत हा आकडा ३,१६६ वर पोहोचला होता, असं एका पालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं.

वाढत्या केसेसमुळे मुंबईच्या सगळ्या वॉर्डमध्ये कोविड संबंधित कचराही वाढू लागला. पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार १९ मार्च आणि ३२ मार्च दरम्यान मुंबईत कोविड-१९ संबंधित एकूण ६,४१४ किलो कचरा जमा झाला होता. एप्रिलमध्ये शहराचा कोविड-१९ संबंधित कचरा (प्रतिबंधित क्षेत्रांसह) १,१२,५२५ किलो अर्थात ११० टनांहून अधिक होता. मे अखेरीस, अशोक मरण पावले तेव्हा, हा आकडा २५० टनांवर गेला होता.

बहुतेक करून वर्गीकरण न केलेला हा कचरा मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या इतर शेकडो टन कचऱ्यासोबतच गोळा होतो. असा कचरा गोळा करणं ही शहराच्या सफाई कामगारांची जबाबदारी असते. "कचरा पेट्यांमध्ये रोज वापरलेले मास्क, हातमोजे, टाकाऊ टिश्यू पेपर चिक्कार सापडतात," सचिन म्हणतात.

अनेक सफाई कामगार नियमित आरोग्य तपासणी व्हावी आणि त्यांच्या आरोग्याची तपासणी करायला स्वतंत्र रुग्णालये असावीत, अशी मागणी करतायत. (पाहा: अत्यावश्यक सेवा, अनावश्यक जीव ) पण बरेचदा "कोविड योद्धे" म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या पालिका सफाई कर्मचाऱ्यांना संरक्षक उपकरण आणि वैद्यकीय सेवा मात्र मिळणं दुरापास्त आहे. पालिकेच्या सेवेत  २९,००० कायमस्वरुपी आणि ६,५०० कंत्राटी तत्त्वावरचे सफाई कामगार आहेत.

'If he [Ashok] was diagnosed in time, he would have been here', says Sunita, with her kids Manisha (left), Nikesh and Swapnil
PHOTO • Jyoti

'वेळेत तपासणी झाली असती तर ते [अशोक] आज इथे असते', शीला म्हणतात. सोबत मुलं मनीषा (डावीकडे), निकेश आणि स्वप्नील

"आमच्या मागण्या कधीच पूर्ण होत नाहीत. सगळी खबरदारी अन् काळजी फक्त अमिताभ बच्चनसारख्या लोकांसाठी. मीडियावाले अन् सरकार दोघांचंही सगळं लक्ष त्यांच्याकडंच. आम्ही कोण? आम्ही आपले सफाई कामगार," ४५ वर्षीय दादाराव पाटेकर म्हणतात. ते एम वेस्ट वॉर्डातील एका बीएमसी कचरा ट्रकवर काम करतात.

"मार्च-एप्रिलमध्ये आम्हाला मास्क, हातमोजे, सॅनिटायझर काही मिळालं नाही," सचिन म्हणतात. ते सांगतात की अगदी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या चौकीतील कामगारांना एन-९५ मास्क दिले होते. "तेही सगळ्यांना नाही. ५५ कामगारांपैकी [एस वॉर्डातील नाहूर चौकीत] फक्त २०-२५ जणांना मास्क, हातमोजे अन् ५० मिलीची सॅनिटायझरची बॉटल मिळाली. ती तर ४-५ दिवसांत संपून जाते. बाकी माझ्यासारख्या कामगारांना जून महिन्यात मास्क मिळाले. आम्ही मास्क धुवून पुन्हा वापरतो. मास्क अन् ग्लोव्ह खराब झाले की नवीन माल येईस्तोवर आम्हाला सुपरवायझर २-३ आठवडे थांबायला सांगतात."

"'सफाई कामगार कोविड योद्धे आहेत' असं नुसतं बोलून काही फायदा नाही. त्यासाठी सुरक्षा अन् काळजी नको?" शीला विचारतात. "ते हातमोजे अन् एन-९५ मास्क न वापरता काम करत होते. अन् सफाई कर्मचाऱ्याच्या मरणानंतर त्याचा परिवार कसा जगतोय याची कुणाला पडलीये?" तारे कुटुंबीय नवबौद्ध आहेत.

मे च्या शेवटच्या आठवड्यात अशोक यांची प्रकृती आणखी बिघडली. "तोवर पप्पांना ताप आला होता. २-३ दिवसांनी आम्हा सगळ्यांना ताप आला. इथले डॉक्टर म्हणाले साधा ताप आहे. आम्ही औषधं घेऊन बरे झालो, पण पप्पांना बरं वाटत नव्हतं," २० वर्षीय मनीषा सांगते. ती घाटकोपर पूर्व येथे एका कॉलेज मध्ये बीकॉम द्वितीय वर्षाला आहे. घरच्यांना वाटत होतं की ही कोविडची लक्षणं आहेत, पण (तेव्हा आवश्यक असलेल्या) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशोक यांची शासकीय रुग्णालयात चाचणी होऊ शकली नाही.

२८ मे रोजी ताप उतरला होता आणि अशोक सकाळी ६ ते दुपारी २ ची शिफ्ट संपवून घरी परत आले होते, त्यांनी जेवण केलं आणि झोपी गेले. रात्री ९:०० वाजता उठून बसले तेंव्हा त्यांना उलट्या व्हायला लागल्या. "त्यांना ताप आला होता अन् गरगरल्यासारखं होत होतं. डॉक्टरकडे जायला नको म्हटले अन् झोपी गेले," शीला सांगतात.

पुढल्या दिवशी सकाळी २९ मे रोजी शीला, निकेश, मनीषा आणि स्वप्नील यांनी त्यांना रुग्णालयात घेऊन जायचं ठरवलं. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ते घराजवळची अनेक रुग्णालयं फिरले. "दोन रिक्षा केले. आई पप्पा एकात, आम्ही तिघं दुसऱ्यात," १८ वर्षीय स्वप्नील सांगतो. तो चेंबूर येथे एका कॉलेज मध्ये बीएस्सीच्या पदवीचं शिक्षण घेतोय.

Since June, the Taare family has been making rounds –first of the hospital, to get the cause of death in writing, then of the BMC offices for the insurance cover
PHOTO • Jyoti
Since June, the Taare family has been making rounds –first of the hospital, to get the cause of death in writing, then of the BMC offices for the insurance cover
PHOTO • Jyoti

जूनपासून तारे कुटुंबाची पायपीट सुरू आहे – आधी मृत्यूचं लेखी कारण घ्यायला रुग्णालयात, नंतर विम्याची रक्कम मिळवण्यासाठी पालिकेच्या कचेरीत

"सगळी हॉस्पिटल बेड नाही असंच सांगत होती," २१ वर्षीय निकेश म्हणतो. त्याने दोन वर्षांपूर्वी बीएससीची पदवी घेतली असून नोकरीच्या शोधात आहे. "आम्ही राजावाडी हॉस्पिटल, जॉय हॉस्पिटल आणि के जे सोमैय्या हॉस्पिटलला गेलो. के. जे. सोमैय्याला पप्पा डॉक्टरांना म्हणाले की ते वाटल्यास जमिनीवरही झोपायला तयार आहेत, फक्त त्यांना उपचार द्या म्हणून." अशोक यांनी प्रत्येक रुग्णालयात आपलं पालिका कर्मचारी ओळखपत्रही दाखवलं – पण त्याचाही काही फायदा झाला नाही.

अखेर वांद्र्याच्या भाभा रुग्णालयात डॉक्टरांनी अशोक यांची तपासणी केली आणि त्यांचे नमुने घेतले. "मग ते त्यांना कोविड-१९ आयसोलेशन रूममध्ये घेऊन गेले," स्वप्नील म्हणतो.

मनीषा वडलांचे कपडे, टूथब्रश, टूथपेस्ट आणि साबण द्यायला त्या रूममध्ये गेली तेव्हाची तिथली परिस्थिती तिला आठवते. "वऱ्हांड्यात सगळीकडे लघवीचा वास येत होता, खाली उष्ट्या पत्रावळी पडल्या होत्या. रूमच्या बाहेर एकही कर्मचारी नव्हता. मी आत डोकावून पप्पांना त्यांची पिशवी द्यायला आवाज दिला. त्यांनी आपला ऑक्सिजन मास्क काढला आणि माझ्याकडून पिशवी घेऊन गेले."

अहवाल येईपर्यंत अशोक निरीक्षणाखाली आहेत असं सांगून डॉक्टरांनी तारे कुटुंबियांना घरी जायला सांगितलं. त्या दिवशी रात्री १० च्या सुमारास शीला अशोक यांच्याशी फोनवर बोलल्या. "मला काय माहित होतं की त्यांचा आवाज ऐकतेय तो शेवटचा. ते म्हणत होते मला आता बरं वाटतंय," त्या सांगतात.

पुढल्या दिवशी, ३० मे रोजी, शीला आणि मनीषा रुग्णालयात परत आल्या. "डॉक्टर म्हणाले की तुमचे पेशंट काल रात्री १:१५ वाजता मरण पावले," शीला म्हणतात. "पण मी तर आदल्या रात्रीच त्यांच्याशी बोलली होती…"

दुःखाचा घाला बसलेले तारे कुटुंबीय अशोक यांच्या मृत्यूचं कारणही विचारू शकले नाहीत. "आम्हाला काहीच सुचत नव्हतं. बॉडी मिळवण्यासाठी कागदपत्रं, अँब्युलन्स अन् पैशांची सोय आणि आईला सावरण्याच्या नादात आम्ही डॉक्टरांना पप्पा कसे काय गेले हे विचारूच शकलो नाही," निकेश म्हणतो.

अशोक यांच्या अंत्यविधीच्या दोन दिवसांनंतर तारे कुटुंबीय त्यांच्या मृत्यूचं लेखी कारण मिळवण्यासाठी पुन्हा भाभा रुग्णालयात गेले. "जूनचे १५ दिवस आम्ही नुसतं हॉस्पिटलच्या वाऱ्या करत होतो. डॉक्टर म्हणायचे की रिपोर्टमधून काहीच कळत नाहीये, अशोक यांच्या मृत्यूचा दाखला तुम्ही स्वतःच वाचा," २२ वर्षीय वसंत मगरे, अशोक यांचा भाचा म्हणतो.

Left: 'We recovered with medication, but Papa was still unwell', recalls Manisha. Right: 'The doctor would say the report was inconclusive...' says Vasant Magare, Ashok’s nephew
PHOTO • Jyoti
Left: 'We recovered with medication, but Papa was still unwell', recalls Manisha. Right: 'The doctor would say the report was inconclusive...' says Vasant Magare, Ashok’s nephew
PHOTO • Jyoti

डावीकडे: 'आम्ही बरे झालो पण पप्पांना बरं वाटत नव्हतं,' मनीषा आठवून म्हणते. उजवीकडे: 'डॉक्टर म्हणायचे की रिपोर्टमधून काहीच कळत नाहीये…' अशोक यांचा भाचा वसंत म्हणतो

तारेंची मुलुंडच्या टी वॉर्डमध्ये कर्मचारी म्हणून नोंदणी होती. तिथल्या पालिका अधिकाऱ्यांनी २४ जून रोजी रुग्णालयाला पत्र लिहून तारेंच्या मृत्यूचं कारण  विचारलं, तेंव्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांना लेखी उत्तर दिलं: 'संभाव्य कोविड-१९'. या पत्रात असं लिहिलंय की अशोक यांची प्रकृती त्यांना दाखल केल्यानंतर ढासळली. "३० मे रोजी रात्री ८:११ वाजता मेट्रोपोलिस लेबॉरेटरीने आम्हाला ईमेलद्वारे कळवलं की त्यांच्या घशातील नमुना अपुरा होता. आणि आम्हाला पुन्हा चाचणी करण्यासाठी रुग्णाचे नमुने पाठवायला सांगितले. पण रुग्णाचा मृत्यू झाला असल्याने त्याचे नमुने पुन्हा पाठवता आले नाहीत. म्हणून, मृत्यचं कारण सांगताना आम्ही 'संभाव्य कोविड-१९' असं लिहिलंय."

भाभा रुग्णालयात ज्या डॉक्टरांनी अशोक यांची केस हाताळली त्यांच्याशी अनेकदा संपर्क करून पाहिला, पण त्यांनी कॉल्स किंवा संदेशांना उत्तर दिलं नाही.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 'कोविड-१९ महामारी दरम्यान प्रत्यक्ष सर्वेक्षण, रुग्णांचा शोध, पाठपुरावा, तपासणी, प्रतिबंध आणि मदत कार्य करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना रू. ५० लाख रकमेचे व्यक्तिगत अपघात विमा संरक्षण देण्यात यावे' निर्देश दिले असल्याने अशोकसारख्या 'कोविड योद्ध्यांच्या' कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २९ मे, २०२० रोजी एक ठराव संमत केला होता.

८ जून, २०२० रोजी पालिकेने हा ठराव अंमलात आणण्यासाठी एक परिपत्रक काढलं. त्यानुसार, "कुठलाही कंत्राटी कामगार/ बाह्य कामगार/ रोजंदार / मानद कामगार, कोविड-१९ संबंधित कामावर असताना मरण पावल्यास" काही अटींसह रू. ५० लाख मिळण्यास पात्र आहे.

यातील एक अट म्हणजे हा कामगार रुग्णालयात भरती होण्यापूर्वी किंवा मृत्यूपूर्वी १४ दिवस कामावर असायला हवा. तारेंना हे लागू होतं. कोविड-१९ ची योग्य ती चाचणी करण्यात आली नाही, तर मृत्यचं कारण कोविड-१९ असल्याची शहानिशा करण्यासाठी आणि या प्रकरणाचा तपास आणि वैद्यकीय कागदपत्रांची छाननी करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमण्यात येईल.

३१ ऑगस्टपर्यंत पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या कामगार अधिकाऱ्यांनी पुरवलेल्या आकडेवारीनुसार २९,००० कायम स्वरुपी कामगारांपैकी २१० जणांना संसर्ग झाला आणि ३७ कामगारांचा मृत्यू झाला होता, तर १६६ जण बरे होऊन कामावर पुन्हा रुजू झाले होते. या विषाणूची लागण झालेल्या कंत्राटी सफाई कामगारांची काहीच नोंद नाही, असं ते म्हणाले.

आपला जीव गमावलेल्या ३७ पैकी १४ कुटुंबांनी रू. ५० लाख नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत केवळ दोनच कुटुंबांना विम्याची रक्कम मिळाली होती.

Ashok went from being a contractual to ‘permanent’ sanitation worker in 2016. 'We were able to progress step by step', says Sheela
PHOTO • Manisha Taare
Ashok went from being a contractual to ‘permanent’ sanitation worker in 2016. 'We were able to progress step by step', says Sheela
PHOTO • Jyoti

अशोक तारे २०१६ मध्ये कंत्राटी पदावरून 'पर्मनंट' सफाई कामगार झाले होते. 'एकेक करून जमवलं सगळं,' शीला म्हणतात.

अशोक यांच्या मृत्यूचं लेखी कारण मिळाल्यावर तारे कुटुंब आपल्या रू. ५० लाखांच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी पालिकेच्या टी वॉर्ड कार्यालयाच्या वाऱ्या करू लागलं. नोटरीची फी, झेरॉक्स प्रती, ऑटो रिक्षाचं भाडं आणि इतर खर्च मिळून आतापर्यंत रू. ८,००० खर्च झालेत.

तारे यांचं बँकेतलं पगाराचं खातं वापरू न शकल्याने शीला यांनी आपलं अर्ध्या तोळ्याचं सोन्याचं कानातलं गहाण ठेवून रू. ९,००० उचलले. "दरवेळी साहेब लोक कागदपत्रात काहीतरी बदल करायला सांगायचे, अन् नंतर त्याला नोटरी करावं लागायचं. रु. ५० लाख नाही तर नियमाप्रमाणे निदान त्याच्या वडलांच्या जागी माझ्या मोठ्या मुलाला नोकरी तरी लावून द्यावी," त्या मला कागदपत्रं दाखवत म्हणतात.

टी वॉर्डच्या सहायक आयुक्तांच्या कार्यालयात २६ ऑगस्ट रोजी संपर्क साधला असता उत्तर मिळतं: "हो, ते आमचे कर्मचारी होते आणि आम्ही त्यांची फाईल क्लेमसाठी पुढे पाठवली आहे. पालिका अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचे निर्देश मिळण्याची प्रतीक्षा असून पालिका त्यावर कार्यवाही करत आहे."

तारेंच्या कमाईवर घर चालत होतं. जूनपासून शीला शेजारच्या इमारतींत दोन घरी स्वयंपाक करायला जाऊ लागल्या आणि त्यांना जेमतेम रू. ४,००० पगार मिळत आहे. "आता सगळं भागवणं कठीण जातंय. अगोदर कधीच काम केलं नव्हतं पण आता नाईलाज आहे. दोन मुलांचं अजून शिक्षण सुरू आहे," त्या म्हणतात. त्यांचे मोठे भाऊ, ४८ वर्षीय भगवान मगरे, नवी मुंबई महानगर पालिकेत सफाई कामगार असून त्यांनी थकलेलं रू. १२,००० खोलीभाडं भरलंय.

अलीकडेच, २०१६ मध्ये अशोक 'पर्मनंट' सफाई कामगार झाले होते आणि कंत्राटी कामगार म्हणून त्यांना आतापर्यंत मिळणारा पगार रू. १०,००० वरून रू. ३४,००० झाला होता. "त्यांना बऱ्यापैकी पगार मिळायला लागला तेव्हा आम्ही मुलुंडच्या झोपडपट्टीतून या एसआरए बिल्डिंगमध्ये राहायला आलो. एकेक करून जमवलं सगळं," शीला म्हणतात.

अशोक यांच्या मृत्यूनंतर तारे कुटुंबीयांच्या प्रगतीला खीळ बसली आहे. "सरकारने आमचं म्हणणं ऐकावं. त्यांना रजा का नाही मिळाली? त्यांची अन् इतर कामगारांची वेळीच चाचणी का नाही केली?" शीला विचारतात. "त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये भरती व्हायला धडपड करायची वेळ का आली? त्यांच्या मरणाला नक्की कारणीभूत तरी कोण?"

ஜோதி பீப்பில்ஸ் ஆர்கைவ் ஆஃப் ரூரல் இந்தியாவின் மூத்த செய்தியாளர்; இதற்கு முன் இவர் ‘மி மராத்தி‘,‘மகாராஷ்டிரா1‘ போன்ற செய்தி தொலைக்காட்சிகளில் பணியாற்றினார்.

Other stories by Jyoti
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo