२० फेब्रुवारी २०१९ रोजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमधून शेतकरी मुंबईवर मोर्चा नेण्यासाठी नाशिकला जमा झाले. नाशिकच्या दिंडोरीमध्ये आणि इतरही गावांत, मोर्चेकऱ्यांनी कित्येक आठवडे आधीपासूनच तयारी सुरू केली होती. शिधा गोळा केला, स्वयंपाकासठी मोठाली भगुली-पातेली, पाणी भरून ठेवायला ड्रम आणि अंथरुणासाठी चवाळ्या, ताडपत्र्या आणि गाद्या जमा झाल्या.
दिंडोरीहून शेतकरी १३ किमीवरच्या ढाकंबे टोल नाक्यापाशी पोचले, टेम्पो, काळी-पिवळी आणि दुचाकीवर. सोबत निरगुडे करंजाळी, भेडमाळ, तिळभात, शिंदवड आणि इतर गावातून शेतकरी गोळा व्हायला लागले. ते डहाणूहून, नाशिक, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून तसंच मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमधून आले होते. त्यानंतर त्यांनी सर्वांनी एकत्र नाशिकच्या मध्यवर्ती बस डेपोच्या दिशेने मोर्चाला सुरुवात केली, तिथे इतर जिल्ह्यातले अजून शेतकरी जमा होत होते.
२१ फेब्रुवारी २०१९ रोजी शेतकऱ्यांनी नाशिक बस डेपोपासून मोर्चा सुरू केला आणि ११ किमी चालत गेल्यावर दुपारी २.३० च्या सुमारास ते विल्होळी गावी पोचले. रात्री उशीरा महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आणि मोर्चाची आयोक अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांमध्ये प्रदीर्घ बेठक झाल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला. सरकारने परत एकदा मोर्चेकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं आहे.
अनुवादः मेधा काळे