सातजेलियामधलं हे पोस्ट ऑफिस शोधणं तसं अवघडच आहे. मातीची एक झोपडी. बाहेर लटकवलेली पोस्टाची लाल पेटी
पश्चिम बंगालच्या साउथ २४ परगणा जिल्ह्यातल्या ७ ग्राम पंचायतींसाठी हे एकच पोस्ट गेल्या ८० वर्षांपासून काम करत आहे. सुंदरबनमध्ये धुमाकूळ घातलेल्या आइला आणि अम्फान वादळांच्या तडाख्यातही हे पोस्ट टिकून आहे. इथल्या रहिवाशांसाठी हे पोस्ट फार मोलाचं आहे. त्यांची बचत खाती इथे आहेत आणि त्यांची सगळी महत्त्वाची कागदपत्रं, ओळखपत्रं वगैरे इथेच येतात.
गोसाबा तालुका तीन नद्यांनी वेढलेला आहे – वायव्येकडे गोमती, दक्षिणेला दत्ता आणि पूर्वेला गोंदोल. लक्सबागान गावात राहणारे जयंत मोंडोल म्हणतात, “या बेटांवर आमच्यासाठी [सरकारी कागदपत्रं मिळवायला] एवढं हे पोस्ट ऑफिसच आहे.”
पोस्टमास्तर निरंजन मोंडोल गेली ४० वर्षं या पोस्टात काम करतायत. त्यांच्या आधी त्यांचे वडील पोस्टमास्तर होते. त्यांचं घर पोस्टापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहे आणि ते चालतच कामाला येतात. पोस्टाशेजारी चहाची टपरी आहे आणि दिवसभर तिथे लोकांची वर्दळ सुरू असते. आणि त्यामुळे पोस्टात पण लोक येत जात असतात.
![](/media/images/02a-_AMI6814-RM-Youve_got_mail.max-1400x1120.jpg)
![](/media/images/02b-_AMI6803-RM-Youve_got_mail.max-1400x1120.jpg)
डावीकडेः पोस्टाच्या शेजारून नदी वाहते. उजवीकडेः गोसाबा तालुक्यातल्या सात ग्राम पंचायतींसाठी हे एकच पोस्ट आहे
![](/media/images/03a-_AMI6787-RM-Youve_got_mail.max-1400x1120.jpg)
![](/media/images/03b-_AMI6789-RM-Youve_got_mail.max-1400x1120.jpg)
डावीकडेः पोस्टमास्तर निरंजन मोंडोल आणि शिपाई असलेला बाबू. उजवीकडेः इथल्या रहिवाशांसाठी हे पोस्ट फार मोलाचं आहे. बहुतेकांची पोस्टात बचत खाती आहेत आणि त्यांची सगळी महत्त्वाची कागदपत्रं याच पोस्टात येतात
साठीला टेकलेले मोंडोल सकाळी १० वाजता पोस्टाचं काम सुरू करतात आणि ४ वाजता सुटी होते. वीज नाही. सौर उर्जेवर दिवा चालतो पण पावसाळ्यात त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. अशा वेळी इथले लोक रॉकेलवरचा कंदील वापरतात. महिन्याच्या खर्चासाठी त्यांना १०० रुपये मिळतात. ५० रुपये भाडं आणि ५० रुपये इतर सामानसुमानासाठी.
निरंजबाबूंबरोबर त्यांचा शिपाई बाबू काम करतो. तो सगळ्या सातही ग्राम पंचायतींमध्ये घरोघरी डाक पोचवतो. सायकलवर.
जवळपास पन्नास वर्षं इथे काम केल्यानंतर आता काही वर्षांत निरंजन बाबू इथून निवृत्त होतील. पण त्या आधी “पोस्टाची पक्की इमारत बांधायला सुरुवात व्हावी हेच माझं स्वप्न आहे,” ते म्हणतात.
या वार्तांकनासाठी ऊर्णा राऊत हिची मदत झाली आहे. तिचे आभार.