“बजेट बजेट जयघोष सुरू आहे, पण आमच्या आयुष्यात काही तरी फरक पडणारे का?” के. नागम्मा म्हणतात. नागम्मांचे पती २००७ साली सेप्टिक टँक साफ करत असताना मरण पावले. तेव्हापासून दोन मुलींचा सांभाळ नागम्मांनी एकटीनेच केला आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर नागम्मा सपाई कर्मचारी आंदोलनाच्या संपर्कात आल्या आणि आता त्या संघटनेच्या निमंत्रक आहेत. त्यांची थोरली मुलगी, शैला नर्स आहे आणि धाकटी आनंदी सध्या एक तात्पुरती सरकारी नोकरी करतीये.

“बजेट हा आमच्यासाठी फक्त एक भारी शब्द आहे. आमची जी काही कमाई होते त्यात आमच्या एका घराचं बजेट सांभाळणं जमेनासं झालंय. सरकारच्या सगळ्या योजनांमधून आम्हाला मात्र वगळण्यात आलंय. कसलं डोंबलाचं बजेट? माझ्या पोरींची लग्नं लागणारेत का या बजेटने?”

नागम्मांचा जन्म होण्याआधीच त्यांच्या आई-वडलांनी चेन्नईला स्थलांतर केलं होतं त्यामुळे त्यांचा जन्म चेन्नईत झाला आणि त्या इथेच लहानाच्या मोठ्या झाल्या. १९९५ साली नागुलपुरममध्ये राहत असलेल्या आपल्या सख्ख्या बहिणीच्या मुलाशी वडलांनी त्यांचं लग्न लावून दिलं. आंध्र प्रदेशच्या प्रकासम जिल्ह्यातल्या पामुरुजवळ असलेल्या या गावी नागम्मांचे पती कन्नन गवंडीकाम करायचे. नागम्मा आणि कन्नन माडिगा जातीत जन्माला आले आहेत. “२००२ साली दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा विचार करून आम्ही चेन्नईला आलो,” नागम्मा सांगतात. त्यानंतर तीनच वर्षांत कन्नन मरण पावले .

PHOTO • Kavitha Muralidharan
PHOTO • Kavitha Muralidharan

के. नागम्मा शैला आणि आनंदीसोबत

चेन्नईच्या गिंडीजवळच्या सेंट थॉमस माउंटजवळच्या अरुंद गल्लीबोळांमधल्या एका गल्लीत नागम्मांचं अगदी छोटंसं घर आहे. पाच वर्षांपूर्वी माझी त्यांची भेट झाली होती. मधल्या काळात त्यांच्या आयुष्यात फारसा काहीही फरक पडलेला नाही. “सोनं ३०,००० रुपये सॉव्हरिन होतं तेव्हापासून मी होईल तसं एक-दोन सॉव्हरिन सोनं विकत घेऊन ठेवलंय [सॉव्हरिन म्हणजे अंदाजे ८ ग्रॅम]. आता हाच भाव ६०-७० हजारांवर गेलाय. तुम्हीच सांगा, पोरींचं लग्न लावून देणं परवडण्यासारखं राहिलंय का? लग्नात सोनं मागायचं थांबवलं तरच मला लग्न लावून देणं शक्य होणारे.”

विचार करत काही क्षण थांबत त्या पुढे म्हणतातः “सोन्याचं सोडा – जेवणाचं कसं करायचं? गॅस, तांदूळ अगदी अचानक दुधाची पिशवी आणायची म्हटलं तरी परवडत नाही आता. वर्षभरापूर्वी जो तांदूळ मी १,००० रुपयांना घेतला तोच आज २,००० झालाय. कमाई मात्र होती तिथेच आहे.”

हाताने मैला काढणाऱ्या कामगारांच्या संघर्षाबद्दल बोलताना त्यांच्या आवाजातला वैताग अधिकच गहिरा होतो. आता त्या याच प्रश्नावर पूर्णवेळ काम करतायत. “त्यांच्या आयुष्यात काहीच सुधारलं नाहीये,” त्या म्हणतात. “एसआरएमएसचं नाव बदलून नमस्ते झालं. काय उपयोग आहे? एसआरएमएस नावाखाली आम्हाला किमान गट तयार करता येत होते, कर्ज काढून थोडं तरी सन्मानाने जगता येत होतं. पण नमस्ते योजनेखाली त्यांनी आता आम्हाला यंत्रं दिली आहेत. ज्या कामात माझा नवरा मरण पावला, तेच काम करण्यासाठीची यंत्रं. तुम्हीच सांगा, कुठलं तरी यंत्र आम्हाला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतं का?”

एसआरएमएसः द सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम फॉर रिहॅविलिटेशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स, २००७ (हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांचे पुनर्वसन योजना) या योजनेचे नाव बदलून २०२३ साली नमस्ते (नॅशनल क्शन फॉर मेकनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम) करण्यात आलं. पण नागम्मा सांगतात त्याप्रमाणे हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांच्या आयुष्यात तसूभरही फरक पडला नाहीये.

Kavitha Muralidharan

ਕਵਿਥਾ ਮੁਰਲੀਧਰਨ ਚੇਨੱਈ ਅਧਾਰਤ ਸੁਤੰਤਰ ਪੱਤਰਕਾਰ ਅਤੇ ਤਰਜ਼ਾਮਕਾਰ ਹਨ। ਪਹਿਲਾਂ ਉਹ 'India Today' (Tamil) ਵਿੱਚ ਸੰਪਾਦਕ ਸਨ ਅਤੇ ਉਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ 'The Hindu' (Tamil) ਵਿੱਚ ਰਿਪੋਰਟਿੰਗ ਸੈਕਸ਼ਨ ਦੀ ਹੈਡ ਸਨ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI ) ਦੀ ਵਲੰਟੀਅਰ ਹਨ।

Other stories by Kavitha Muralidharan

ਪੀ ਸਾਈਨਾਥ People’s Archive of Rural India ਦੇ ਮੋਢੀ-ਸੰਪਾਦਕ ਹਨ। ਉਹ ਕਈ ਦਹਾਕਿਆਂ ਤੋਂ ਦਿਹਾਤੀ ਭਾਰਤ ਨੂੰ ਪਾਠਕਾਂ ਦੇ ਰੂ-ਬ-ਰੂ ਕਰਵਾ ਰਹੇ ਹਨ। Everybody Loves a Good Drought ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਕਿਤਾਬ ਹੈ। ਅਮਰਤਿਆ ਸੇਨ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕਾਲ (famine) ਅਤੇ ਭੁੱਖਮਰੀ (hunger) ਬਾਰੇ ਸੰਸਾਰ ਦੇ ਮਹਾਂ ਮਾਹਿਰਾਂ ਵਿਚ ਸ਼ੁਮਾਰ ਕੀਤਾ ਹੈ।

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale